Friday, November 24, 2017

बिबट्या

 मांजर हि जर का वाघाची मावशी असेल तर बिबट्या हा वाघाचा मामेभाऊ आहे.जो लहानपणापासून परदेशात वाढलाय.जिथे टिश्यू-पेपर,खायला पिझ्झा,डोक्याला कानटोपी,डोळ्यावर गॉगल आणि हातात एखादे गळी उतरविण्याचे कुठलेही पेय याचे बाळकडू मिळालेले असते.शाळेत बाकीची मुलं इंग्रजी बोलतात त्यामुळे मातृभाषा कितीही भारतीय असली तरी कानावर आदळणाऱ्या आंग्ल संस्काराचा प्रभाव सदैव जिभेवर तरळत असतो.’शुभंकरोती’ किव्वा ‘वदनीकवल घेता’ या श्लोकांना फाटा देऊन ‘बाबा ब्लॅकशीप’ आणि ‘हम्प्टी-डम्प्टीचा’ जप हा त्यांना नवीन नसतो.गोरा गोमटा रंग, कदाचित निळे-घारे डोळे,भुऱ्या रंगाचे केस आणि आई वडिलांच्या कृपेने आसलेली खळी.यामुळे दिसण्याचा मात्र रुबाब असतो.आणि त्यामुळे कदाचित रांगडेपणाचा अभाव भासतो.


 

वाघाला दचकून असलेला बिबट्या त्याच लहान पोराप्रमाणे आपल्या भारतातील भावंडांमध्ये खेळताना धडपडेल कि काय असे उगीचच वाटत राहते.आणि म्हणूनच वाघाप्रमाणे भर रस्त्यातून बेमालूम चालण्यापेक्षा कुठल्याश्या गर्द झाडीत असलेल्या उंच फांदीवर आपले नाजूक आणि कमनीय शरीर वाळत टाकल्यासारखे पसरून ठेवणारा लाजाळू बिबट्या न्याहाळण्यासारखे सुख नाही.निबिड अरण्यात ती लटकलेली शेपटी शोधून त्या शेपटीच्या मालकापर्यंत पोहोचण्याची मजा वेगळीच.अशाच काबिनीच्या घनदाट जंगलात सूर्यास्त पाहण्यात रमलेला हा वाघाचा मामे-भाऊ.

Kabini | India | 2017

 

No comments:

Post a Comment