Thursday, November 9, 2017

चंद्र पाहिलेली माणसे


खऱ्या अर्थाने 'मामाच्या गावाला' जाण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या नासाला भेट देण्याची संधी मिळाली.आपण केलेली प्रगती जगासमोर कशी मांडावी याचे चोख आणि चपखल उदाहरण म्हणजे नासा.आपण काय कमावले,आपण कशी प्रगती केली,कसे यश मिळवले याची जगाला व्यवस्थित माहिती देण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे नासाचे व्हिजिटिंग सेंटर.खगोलशास्त्र,अंतराळयान आणि अंतराळातील प्रवासाचा मानदंड म्हणून जगाला असलेली ओळख सार्थ ठरवणारे नासा प्रत्यक्षदर्शी देखील तितकेच कौतुकास पात्र आहे याची प्रचिती येते.  

          अवाढव्य अमेरिकेच्या आग्नेय टोकाला असलेल्या निमुळत्या फ्लोरिडा राज्यात वसलेले केनेडी स्पेस सेंटर हे नासाच्या दहा फिल्ड सेंटर पैकी एक महत्वाचे ठिकाण.उपग्रह किव्वा वायुयान यांच्या उड्डाणासाठी सर्वात महत्वाचे नासाचे केंद्र म्हणून केनेडी स्पेस सेंटर ओळखले जाते.'अपोलो' आणि सॅटर्न-V च्या उड्डाणाचे सर्वेसर्वा समजले जाणारे हे ठिकाण पाहणे हा विलक्षण अनुभव होता.



          'सनशाईन स्टेट' असे राज्यनाव धारण केलेल्या फ्लोरिडाचे सुसह्य ऊन अंगावर झेलत 'इंडियन' नदीच्या मध्यातून नासा पार्कवे वरून आपण जात असतो तेव्हाच याच्या भव्यतेची प्रचिती यायला सुरुवात होते.आपण जगातील महासत्ता का आहोत याची पदोपदी जाणीव करून देणारी यंत्रणा आपल्याला थक्क करून सोडते.पार्किंग पासून सगळ्या गोष्टी स्मरणात राहतात.गाडी लावून आपण जेव्हा केनेडी स्पेस सेंटरच्या व्हिजिटिंग सेंटर कडे चालत असतो तेव्हा दिसणारा 'नासा'चा वर्तुळाकृती लोगो लक्ष वेधून घेतो.आणि या नंतर डोळ्यात भरते ते म्हणजे 'अटलांटिस' या यानाची उभी केलेली भव्य प्रतिमा.



          तिकीट,सिक्युरिटी या त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर मग आत कुठेही प्रवेश फी किव्वा तत्सम खर्च नाहीयेत.त्यामुळे संपूर्ण दिवसभर विज्ञान,खगोलशास्त्र,तारांगण,पृथ्वी,चंद्र आणि मान उंच करून पहाव्यात अशा सर्व गोष्टींच्या सहवासात आपला दिवस सहज निघून जातो.

          व्हिजिटर्स सेंटर मधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे नासाने केनेडी स्पेस सेंटरला दिलेले अंतराळयान 'अटलांटिस'.अटलांटिसचे STS-135 हे शेवटचे अंतराळयान गेल्या नंतर २९ जुन २०१३ साली हे व्हिजिटर सेंटर मधील अटलांटिस लोकांना पाहण्यास खुले केले गेले आहे.अगोदर त्यांची या यानाविषयी एक छोटीशी माहितीपर चित्रफीत पाहून हे खरे खुरे आणि अंतराळात जाऊन आलेले यान संपूर्ण आत बाहेरून पाहणे हा अनुभव मजेशीर असतो.संपूर्ण यान व्यवस्थित उघडे करून आपल्यासमोर ठेवलेले आहे.त्याच्या बद्दलची सगळी माहिती योग्य प्रकारे तिथे लावलेली आहे.जगभरातून येणारे पर्यटक शांतपणे पाहात आणि फोटो काढत या यानाभोवती विखुरलेले दिसतात.



           याच ठिकाणी 'हबल' या दुर्बिणीची खऱ्या आकाराची प्रतिकृती ठेवलेली आहे.सर्वात मोठ्या दुर्बिणींपैकी एक दुर्बीण अशी ज्याची ओळख आहे हि दुर्बीण येथे पाहायला मिळते.

         याशिवाय 'Challenger STS-51L ' आणि 'Columbia STS-107 ' या अंतराळयानाच्या अपघाताच्या आठवणी इथे जपून ठेवलेल्या पहायला मिळतात.यामधील अंतराळवीरांचे कपडे आणि यानाचे भग्नावशेष येथे जतन करून ठेवलेले आहेत.

        इथेच आपण अंतराळातील वातावरणाचा अनुभव घेऊ शकतो.हा कदाचित वेगळाच अनुभव असू शकेल.कारणाअभावी मला तो घेता आला नाही.पण वेळ असल्यास हि गोष्ट करणे मजेशीर असू शकेल..

          हे पाहून झाल्यावर मी अटलांटिस मधून बाहेर पडत होतो.आणि तेवढ्यात एक बातमी कानावर आली ती म्हणजे आज जिथून प्रत्यक्ष उड्डाण होते त्या 'लाँच पॅड' वर जात येणार नाही.हे म्हणजे ज्या अट्टाहासापायी मी इथे आलो तीच संधी गमावल्यासारखे होते.कारण जिथून यान प्रत्यक्ष अवकाशात जाते ती जागा पाहण्याची संधी मी गमावली होती.मात्र या निराशेची जागा क्षणार्धात आनंदाने आणि उत्साहाने घेतली कारण या लाँच पॅड वरून आज प्रत्यक्ष लाँच पाहायला मिळणार होता.मी गेलो त्याच दिवशी 'Space -X Falcon 9 rocket' चा लाँच होता.जंगलात वाघ बघायला मिळाल्याच्या आनंदाइतका नाही पण त्याच्या जवळ जाणारा आनंद झाला होता.नशीब किती बलवत्तर असावा याचा तो नमुना होता.

लाँच असल्यामुळे रोजच्या पेक्षा जास्त गर्दी जाणवत होती असा तिथल्या लोकांकडून नंतर समजले.व्हिजिटर सेंटर पासून प्रत्यक्ष नासा ची बिल्डिंग पाच सहा मैलावर आहे.इथे तुम्हाला त्यांचाच बसने जावे लागते.अर्थात या इमारतीजवळ कुठेही उतरण्याची परवानगी नसल्यामुळे सिनेमात दिसणारी बिल्डिंग आपल्याला बसच्या खिडकीतूनच पहावी लागते.या इमारतीला 'VAB' म्हणजेच Vehicle Assembly Building असे म्हणतात.येथे यानाची प्रत्यक्ष बांधणी केली जाते.सॅटर्न-V आणि इतर अनेक अवकाशयानाची बांधणी येथे झालेली आहे.५२६ फूट उंच आणि ७१६ फूट लांब अशी हि आठ एकरामध्ये पसरलेली एक खोली आहे.या आकड्यांवरून तुम्ही भव्यतेचा अंदाज बांधु शकता.जगातील सर्वात मोठी एक खोली असे याचे वर्णन केले जाते.या इमारतीवर रंगवलेला अमेरिकेचा झेंडा हा जगातील सर्वात मोठा झेंडा म्हणून ओळखला जातो.२०९ * ११० फूट असे याचे माप आहे.या झेंड्यावरच्या प्रत्येक चांदणीच्या आकार सहा फूट इतका आहे.



          तर अशी हि एक माजली खोली आपल्याला चारही बाजूंनी पाहता येते.आणि येथूनच पुढे 'सॅटर्न-V' आणि 'अपोलो' यानाच्या यशापयशाची गाथा अनुभवण्याची संधी मिळते.अपोलो ची यशस्वी उड्डाणे,काही फसलेल्या मोहीम तसेच सॅटर्न-५ चे यश याची इत्यंभूत माहिती देणारे मोठे प्रदर्शन पाहता येते.आणि अर्थातच प्रत्यक्ष लाँच देखील येथूनच पहायचा असतो.

          निल आर्मस्ट्राँग ने सर्वप्रथम चंद्रावर पाऊल कसे ठेवले,त्याला आलेल्या अडचणी,मोहिमेदरम्यान अमेरिकेच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया,जगभरातील वर्तमानपत्रांचे मथळे या सर्व गोष्टी इथे अभिमानाने जपलेल्या आहेत.हे करत असतानाच अपोलो १ च्या अपघातातील वीरांच्या स्मृती देखील इथे पहावयास मिळतात.अपोलो १ मध्ये मृत पावलेल्या Gus Grissom,Edward H.White आणि  Roger B. Chaffee या तिघांच्याही आठवणींचे स्मारक येथे आहे.याचबरोबर अपोलो १३ चे 'यशस्वी अपयश' देखील इथे पहावयास मिळते.चंद्रावर उतरण्यात जरी अपयश आले तरी देखील तिथपर्यंत जाऊन पुन्हा पृथ्वीवर सुखरूप आल्यामुळे 'यशस्वी अपयश' हे नाव धारण करणारी अपोलो १३ ची मोहीम येथे आपल्यासमोर मांडलेली आहे.



          या गोष्टी पाहून होईपर्यंत दुपारचे तीन वाजले होते.सकाळी मिळालेल्या माहितीनुसार ३.३० ते ५.३० या वेळात कधीही लाँच होणार असल्याने जेवण उरकून मी बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत येऊन थांबलो.बसण्याची व्यवस्था असलेला स्टॅन्ड तुडुंब भरलेला होता.डाव्या बाजूला मोठा इलेक्ट्रॉनिक फलक लावला होता ज्यावर कॉउंटडाउन आणि थेट प्रक्षेपण होते.आणि समोर पसरलेल्या विस्तीर्ण जलाशयात असलेल्या लॉन्च पॅड वर तो उपग्रह उडण्याच्या तयारीत होता.सुमारे पाऊणे चारच्या सुमारास एक निवेदन झाले.आणि लगेचच काऊंटडाऊन सुरु झाले.दहाव्या सेकंदाला उपग्रहाच्या तळाशी आगीचा लोळ उसळला आणि उपग्रहाने आकाशात मार्गक्रमण केले.सिनेमात आणि टीव्हीवर पाहतो तेव्हा आवाज आणि भव्यता जाणवत नाही पण प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव खरोखर विलक्षण होता.यशस्वी उड्डाणानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांनी अभिनंदन केले आणि यानाने अवकाशात झेप घेतली.काही क्षणातच यान दिसेनासे झाले आणि एका यशस्वी उड्डाणाचे आम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरलो. 



          नासा मध्ये जाऊन अवकाशात भरारी घेणारे यान पाहणे याचा आनंद वेगळाच होता.अनुभव जमा करून घेत मी पुन्हा बसने व्हिजिटिंग सेंटर मध्ये पोहोचलो.एव्हाना सहा वाजत आले होते.सूर्य अस्ताला जात होता आणि इतका वेळ असलेलं ऊन नाहीसे होवून त्याची जागा थंड वर घेत होता.रॉकेट गार्डन मध्ये असलेल्या यानाच्या प्रतिकृती आणि दिमाखात उभे असलेले अटलांटिस सोनेरी रंगाच्या पार्श्वभूमीवर सुंदर दिसत होते.

          सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला होता आणि आकाशात चंद्राचे आगमन झाले होते.दिवसभर जवळून चंद्र कसा दिसतो हे पाहिल्यावर आता लांबून चंद्र कसा दिसतो हे पाहणे गमतीशीर वाटत होते.कौतुक आणि अभिमान अशा दोन्ही संमिश्र भावना बरोबर घेऊन पर्यटक पार्किंगकडे सरकत होते.शाहरुखच्या स्वदेस ने दाखवलेल्या "नासा" नंतर 'Failure is not an option' या विधानाला तंतोतंत जागणाऱ्या प्रत्यक्ष 'नासा' ला पाहीले.



          पुन्हा एकदा त्याच नासा पार्कवे वरून परतत होतो आणि अब्दुल कलामांच्या 'Science is a beautiful gift to humanity; we should not distort it' या ओळी आठवल्या.

          कुठलीही गोष्ट अवघड नाही हे सांगण्यासाठी आपण 'हे काही रॉकेट सायन्स नाही' या वाक्याचा वापर करतो आज हेच रॉकेट सायन्स  पहायचा यो आला.संधी मिळाल्यास या विज्ञानाच्या अचंब्याला नक्की भेट द्या.कवी,लेखक यांच्या कल्पनेतील चंद्रावर प्रत्यक्षात झेंडा गाडणाऱ्या 'नासा' चे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.


हृषिकेश पांडकर
०९-११-२०१७

        “We choose to go to the moon in this decade and do the other things, not because they are easy, but because they are hard, because that goal will serve to organize and measure the best of our energies and skills, because that challenge is one that we are willing to accept, one we are unwilling to postpone, and one which we intend to win.”

- John F. Kennedy 

33 comments:

  1. Very nice and informative....barobar 6 वर्षांपूर्वी इथे भेट दिलेली. त्या सगळ्या आठवणी आठवल्या. It was amazing experience.

    ReplyDelete
  2. khupach surekh lihilay. ase ekhadya jagela describe karnare likhan over informative honyachi bhiti aste. pan tumhi information overload hou na deta itka chan chitra ubha kela dolya samor. pratyaksha nasa la jaun alyasarkha vatla.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Sneha..keep reading ani tu Kahi lihit asashil tar kalav :)

      Delete
  3. As usual mast lihila ahes re !!!

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. मला पण इथे घेऊन जाशील का रे?

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर लेख ! शब्दांकन छान
    या लेखामुळे इथे बसून 'नासा' ची सफर केल्याचा आनंद मिळाला...

    ReplyDelete
  7. Your blogs are always informative especially your artistic photos with appropriate frames.
    We recollected unforgettable memories of visit to NASA Houston

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Kaka for your kind reply.Keep reading as usual :)

      Delete
  8. कुठल्याही विषयावर लिखाणकाम करणे तुझ्यासाठी Rocket Science नाही. सहज जमतं ते तुला. फारच माहितीपूर्ण वर्णन !!
    अंतराळ शोध-मोहिमेची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या NASA ला भेट देण्याचे भाग्य तुला लाभले याचा खूप आनंद झाला.

    ReplyDelete
  9. Mast lihale ahe hirshi as usually.

    ReplyDelete