रविवारची संध्याकाळ ही तशीही जरा उदासीन वाटत राहिली आहे. कुठे तो शुक्रवारच्या संध्याकाळचा तोरा, कुठे ती शनिवारची बेफिकीर संध्याकाळ आणि कुठे ती सोमवारच्या कामाचं ओझं वाहणारी, शनिवारच्या आनंदाचं चिंतन करणारी संथ सरणारी रविवार संध्याकाळ.
आज तशीच संध्याकाळ. पण ही कटुता जरा जास्तच जाणवली. मागचा संबंध आठवडा दिवाळी येणार या तयारीत अलगद सरला. दिवाळीचे चार दिवस आले म्हणेपर्यंत निसटले. दिवाळी या तीन अक्षरात सामावलेला तो उत्साह संपताना उगीचच रुखरुख लावून गेला. पुढल्या वर्षी हीच दिवाळी परत येणार हे पक्क माहीत असून देखील भाऊबीजेसोबत हा मंगल सोहळा क्षणार्धात संपल्याची एक भावना माझ्या रविवारच्या संध्याकाळ वर अजूनच गडद भासत होती.
पहिल्या दिवशी लालबुंद मातीचा असलेला किल्ला आज असंख्य भेगांनी भग्न वाटत होता. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रेखाटलेली रांगोळी पायाच्या धक्क्याने काहीशी फिस्कटलेली आणि रात्रभर जळलेल्या आणि ओघळलेल्या पणातीमधील तेलाच्या थेंबांनी विखुरलेली बघवत नव्हती. कंदील तेवढा दिवाळीची आठवण जपत होता पण अवेळी पावसाच्या भेटीने निसतलेल्या काही झिरमिळ्या उगीचच अस्वस्थ करून जात होत्या.
मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या फराळाच्या आलेल्या पिशव्या तशाच टेबलवर कोपऱ्यात निपचित होत्या. चव चाखावी या भावनेपेक्षा संपतील का हाच प्रश्न कदाचित विचारात होत्या. गेले ५/६ दिवस गोडाच खाणं होतंय तर आज मुगाची खिचडीच करू या वाक्यात असलेली तुलना उगीचच नकोशी वाटत होती. ज्या टेबल वर बहिणींची गिफ्ट्स काढून पसरून ठेवली होती उद्या तिथे परत लॅपटॉप येणार ही गोष्टच पटत नव्हती.
माहीत आहे आणि होतंच की दिवाळी पाचच दिवसांची आहे, दरवर्षी आहे तरीही संपताना होणारी घालमेल इतकी टोकाची का असते ? कदाचित हीच लागलेली हुरहुर पुढल्या दिवाळीची ओढ म्हणून काम करत असावी. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं बाप्पाला ओरडून सांगताना जी अवस्था होते ना तशीच काहीशी गत माझी दिवाळीत लावलेल्या दिव्यांची माळ उतरवताना होते..
काय जादू आहे या आपल्या सणात हे शब्दात व्यक्त होणे जरा कठीणच पण वर्षभर वाट पाहावी असे सण आपल्या वाटेल आले हे आपले भाग्यच..
माझी रविवार संध्याकाळ याच विचारात सरली..शेवटी कॅलेंडरच पानचं ते, उलटलं आणि दिवस सरला..आठवणी साठवत पुढे सरकायचं त्यातही एक वेगळीच मजा आहे नाहीका ?
उरलेला फराळ आणि उद्यपासून सुरू होणारे ऑफिस काम या दोन्हींची विल्हेवाट लावण्याची मानसिक उभारी तुम्हास लाभो अशी मनापासून प्रार्थना करून मी माझा हा रविवार संपवतो
- हृषिकेश पांडकर ,
०७.११.२०२१
No comments:
Post a Comment