सलग दोन मॅचेस हरल्यावर आपण जसे थाटात अफगाणिस्तान बरोबर जिंकलो आहोत ना अगदी तसेच एक वर्ष दिवाळी लो प्रोफाइल गेल्यावर यावर्षी लोक थाटात साजरी करत आहेत. मागच्या वर्षीची कसर व्याजासाहित वसूल होणार हे तर निश्चित आहेच.
आत्तापर्यंत निम्मी दिवाळी झालीये, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. आज पाडवा आणि यानंतर भाऊबीज आहे. बलिप्रतिपदा वगरे पण दिवाळीचा भाग समजला जातो पण फोटो काढावे असं या दिवसात काहीच नाही.
तर सांगायचा मुद्दा असा आहे की केवळ ३ दिवसात माझ्या मोबाईलच्या फोटो गॅलरीने हात टेकलेत.
फोटो कोणी कसे किती आणि कोणते टाकावे याबद्दल माझा कुठलाच आक्षेप नाही किव्वा माझं काही म्हणणं पण नाही. फक्त त्यातून आपण आपलं मनोरंजन कसं करून घ्यायचा हा एक मजेशीर भाग आहे.
कॅलेंडरवर विकत आणल्यापासून छापलेले दिवाळीचे दिवस लोक स्नुझ केलेल्या अलार्म सारखे रोज टाकत आहेत. आकाशकंदील, पणत्या आणि फटाके यांचे फोटो डिलिट करेपर्यंत देव दिवाळी येईल इतपत त्यांची संख्या झालीये.
या उलट काही लोक असतात जे 'सेम टू यु' या तीन शब्दात आपली दिवाळी उरकतात. ही तीच लोकं असतात ज्यांचा आकाशकंदील ७/८ वर्षांपासून एकच असतो.
घरी केलेल्या किल्ल्याचे फोटो, रांगोळी रोज वेगळी असल्याने तो रोज टाकणे क्रमप्राप्त आहेच. रांगोळी असल्याने त्यावर पणती लावताना शक्य तितके सुंदर दिसताना काढलेला फोटो गणेशोत्सवात काढलेल्या घरच्या मोदकाच्या तोडीचा असतो. त्यामुळे तो पाठवणे याला पर्याय नाही. बरं साडी तीच आणि नेसलेली व्यक्ती तीच पण पुढल्या फोटोत आकाशकंदील असल्याने त्या फोटोला सुद्धा पर्याय नाही. या नंतर अजून एक मोठा वर्ग आहे जो फुलबाजी धरलेल्या लहान मुलांचा फोटो टाकतात. पुन्हा सांगतो आक्षेप नाही पण जेव्हा असे फोटो काढणार असाल तेव्हा थोडा विचार करा, त्या फुलबाजीच्या प्रकाशात निरागस हसणारा चेहरा येतच नाही. त्यामुळे तो फोटो तेवढा नीट काढा. काही फोटोत तर पोरग घाबरून असतं पालक फोटो काढून पाठवायला मोकळे असतात.
जेव्हा रांगोळीच्या मधोमध पणती ठेवली जाते तेव्हा पणतीचे तेल रांगोळीच्या रंगात बेमालूम मिसळते. तर या तेलकट रांगोळीचा फोटो तुम्ही नक्की टाळू शकता.
कुटुंबातील कर्ता पुरुष छान आकाशकंदील लावतोय, पोरगं किल्ला करण्यासाठी विटा वाहून आणतय असं चित्र असलेली जाहिरात कधी पहिली आहे का ? जाहिरात किव्वा शुभेच्छा यामध्ये फक्त वाढीव सुंदर संतूर मम्मी कडक साडीत रांगोळी जवळ बसलेली असते. दाराला मस्त कंदील असतो.सासू सासरे कौतुकाने सुनेकडे पहात असतात. कुंपणावर ओळीने पणत्या लावलेल्या असतात.
ही तर सुरुवात आहे..आज पाडवा आहे त्यामुळे रात्री जोड्यांच्या फोटोचा पूर यायची शक्यता आहेच. आजचा बायकोचा किव्वा नवऱ्याचा फोटो उद्या अनुक्रमे बहीण किव्वा भावात बदलणार हेही तितकेच खरे.
फोटो टाकणे यात काहीच गैर नाही पण मला फोटो टाकण्यापेक्षा बघण्यात मला जास्त मजा येते म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप.
भरपूर फोटो काढा..भरपूर फोटो टाका..
संस्कृतीचे डिजिटल प्रतिबिंब आज पहायला मिळेल. हल्ली सणांची हीच मजा असते. आपल्या घरी जरी शांतता असेल तरी बाकीच्या मंडळींकडे साजरा होत असणारा सण जणू आपल्याच घरात होतोय असे वाटण्या इतपत आपण सर्वाशी एकरूप झालोय...
दीपावलीच्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा..
- हृषिकेश पांडकर
No comments:
Post a Comment