जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात अजूनही आहेत तर शिवराय आपल्यापर्यंत पोहोचविणारे बाबासाहेब आपल्यातून कसे जाऊ शकतील ?
आज पहाटे प्राणज्योत मालवली अशी बातमी फक्त येतीये. कदाचित बाबासाहेब शरीराने आपल्यात नसतील पण शिवरायांच्या प्रत्येक घटनेची नोंद ठेवणारा हा अवलिया आपल्यातून निघून जाऊच शकत नाही.
शाळेत असताना रमणबागेच्या मोकळ्या मैदानावर उघड्या आकाशाच्या कौलाखाली पाहिलेला जाणत्या राजातील शिव राज्याभिषेक आणि त्यानंतर बाबासाहेबांना नमस्कार करून मूठभर घेतलेली साखर अजूनही तोंड गोड करते आणि करत राहील. पुरंदरे वाड्याच्या भेटीत ऐकलेल्या असंख्य गोष्टी, रायरेश्वराच्या शपथेपासून ते तोरणा, पन्हाळा,विशाळ, कोंढाणा, पुरंदर, वज्रगड ते अगदी प्रतापगड, राजगड, रायगड इथपर्यंतचा प्रवास ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांसोबत घडविला असे बाबासाहेब आपल्यातून जातीलच कसे ?
शपथ घेताना जिजाऊंच्या अभिमानाचे वर्णन असो, जावळीत ठाण मांडलेल्या खानाला भेटण्यापूर्वीची धाकधूक असो, आग्र्याहून निसटताना होणारी धडधड असो, लाल महालातून बोटं छाटून पसार होणारे महाराज असो,सिंहासारखा ताना गमावल्याची हुरहूर असो किव्वा बाजींना खिंडीत सोडून जातानाची द्विधा मनस्थिती असो या प्रत्येक घटना ज्यांनी माझ्यासाठी आणि असंख्य रयतेसाठी पुन्हा जिवंत केल्या ते बाबासाहेब आपल्यातून जातीलच कसे ?
रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्थानी बसून मावळत्या दिनकराला साक्षी ठेऊन संपूर्ण राज्याभिषेक सोहळा उलगडून सांगणारे बाबासाहेब आपल्यातून जातीलच कसे ?
" या सप्तगंगांचं पाणी महाराजांच्या मस्तकावरून वाहत असेल तेव्हा त्यांना काय वाटलं असेल हो" ? असे बाबासाहेब आमच्या सारख्या लहान पोरांना विचारत तेव्हा आमच्याकडे उत्तरच नसायचं. तेव्हा बाबासाहेब स्वतःच सांगायचे कि कदाचित महाराज त्यांना माहेरी घेऊन आले आहेत असं त्यांना वाटत असेल. एखादी गोष्ट जिवंत करून कशी सांगावी याचे मूर्तिमंत उदाहरण होते आणि राहतील आदरणीय बाबासाहेब.
गागाभट्टांचे मंत्रोच्चार ज्यांनी आमच्या कानापर्यंत आणून सोडले ते बाबासाहेब आपल्यातून जातीलच कसे ?
आमचे महाराज कसे होते हे ज्यांनी आम्हाला सांगितलं ते बाबासाहेब आमच्यातून जातीलच कसे ?
बाबासाहेब सदैव आपल्यात राहतीलच..
भावपूर्ण श्रद्धांजली !
जगदंब जगदंब !
हृषिकेश पांडकर
१५.११.२०२१