Monday, July 15, 2019

इथे ओशाळला पराभव...


'कोणीही जिंकुदे आपल्या बापाचं काय जातंय..अजून एक नवीन विजेता क्रिकेट विश्वाला मिळेल या पलीकडे ना कुठले सोयर ना कुठले सुतक' या साध्या सोप्या जाणिवेवर उडालेले रविवार दुपारच्या नाणेफेकीचे नाणे त्याच रात्री अश्या निर्णयावर घरंगळून विसावले आणि तिऱ्हाईत प्रेक्षकांच्या देखील भावनांचा कडेलोट झाला असे क्षण दुर्मिळच.

धोनी रनआउट झाला आणि आपण विश्वकरंडकातून बाहेर पडलो याची नोंद ठेवलेल्या वहीची शाई वाळायच्या आत आणि चाहत्याचे नैराश्य स्थिरावायच्या आत खेळाच्या विश्वात अजून एका निर्णयाची भर पडतीये.

एक भारतीय म्हणून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात इंग्लंड जिंकल्याचा आनंद असायला हरकत नाही किव्वा न्यूझीलंड न जिंकल्याचं खूप दुःख वाटायची देखील तशी गरज नाही.पण तरीही आपली टीम इथे कुठेच नसताना देखील दुसरा संघ हरल्याचे जास्त वाईट वाटल्याची हि वेळ माझ्यासाठी तरी अग्रस्थानीच राहील हे निश्चित.

'इंग्लंड सहज जिंकेल इथपासून ते आता मात्र न्यूझीलंड जिंकेल' इथपर्यंत आणि 'च्यायला इंग्लंड थोडक्यात जिंकेल' पासून 'न्यूझीलंड ने सुपर ओवरीत वर्ल्ड कप जिंकला' या क्षणापर्यंत आलो असताना 'क्राऊन क्रिकेट का मॅडम जी हम ले जायेंगे' या वाक्याला लागलेला सुरुंग क्रिकेट इतिहासात सतत बोचत राहील हि सल कायम आहे.

दोन्ही संघ तोडीस तोड खेळले, धावसंख्या समान असल्याने निर्णायक सुपर ओव्हर झाली..तिथेही धावसंख्या समान झाल्यामुळे चौकारांच्या संख्येवरून करंडकाचा निकाल लागला पण सर्वांती तितक्याच धाव केल्या पण पुरेसे चौकार मारले नाही या एका निकषावर न्यूझीलंडचे पहिल्या विश्वचषकाचे स्वप्न भंगले आणि तेच इंग्लंडचे स्वप्न सत्यात उतरले.हे म्हणजे भाषेच्या परीक्षेत दोघांचे निबंध समतोल होते पण एकाने लिहिलेल्या निबंधात जास्त वेलांट्या होत्या त्यामुळे तो सरस ठरला.

नियम आधीपासूनच माहित होते पण त्याचे गांभीर्य काल अधोरेखित झाले. पुढे कदाचित या नियमात बदल होतील किव्वा होणारही नाहीत पण जेव्हा जेव्हा ओव्हर-थ्रो किव्वा सुपर-ओव्हर याचा विषय निघेल तेव्हा २०१९ च्या विश्वकपाचा उल्लेख झाल्याशिवाय ती वेळ सरणार नाही हे नक्की.

कुठलाही गाजावाजा न करता आपला खेळ खेळत २०१५ च्या अंतिम फेरीप्रमाणे यंदाही अंतिम फेरी गाठणारा न्यूझीलंडचा संघ अशा प्रकारे पराभूत होईल अशी कल्पना सुद्धा आपण केली नव्हती.पण खऱ्या अर्थाने तो संघ आज पराभूत झाला असे म्हणणे देखील गैरच.पराभूत तर इंग्लंड देखील झाला नाहीये पण म्हणून तो विजयी झाला असे जे चित्र आहे ते क्लेशदायक वाटत राहणार.

बोल्टचा झेल,ओव्हर-थ्रोचा चौकार आणि नियमांच्या आसुडाचा वळ त्या पूर्वेच्या बेटावरील लोकांच्या स्मरणात असे बसले असतील कि आपण याची कल्पना न केलेलीच बरी.जर अंतिम सामना असा होणार होता तर आपल्यासारख्या क्रिकेट वेडा देश यात सहभागीच नाहीये हाच सुटकेचा निश्वास.आम्ही नसतो सहन करू शकलो.

इंग्लंडच्या विजयापेक्षा न्यूझीलंडच्या पराभवचं कौतुक जास्त होईल याचा अंदाज कदाचित इंग्लंडला सुद्धा नक्की असेल.अर्थात इंग्लंडच्या विजयाचा आनंद हिरावून घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही पण न्यूझीलंड पराभूत झालेच नाहीत त्यांना नियंमानी पराभूत जाहीर केलंय असं म्हणणंच जास्त समर्पक राहील.

असो,या खेळाने मला काय दिले या यादीत अजून एका गोष्टीची भर पडली.नवीन आठवणी दिल्या.विश्व चषकाचा अंतिम सामना परत असा कधी होईल याची शक्यता नसलेलीच बरी.झाला तर तो योग्य निकषांवर निकालात निघेल हि अपेक्षा. 'क्रिकेट गेम इस अ ग्रेट लेव्हलर' असे म्हटले जाते न्यूझीलंडसाठी याची लेव्हल होण्यासाठी किमान चार वर्षाची तरी निश्चितीं आहे.'क्रिकेट इस या गेम ऑफ अनसर्टन्टी' असेही म्हटले जाते त्याची पुनर्प्रचिती आली पण इतका अनसर्टन असेल याचा अंदाज नव्हता.



करंडकाच उंचवतानाच्या आनंदात जरी इंग्लंडचे खेळाडू दिसत असले तरी कुठंतरी ते हुकल्याची खंत उराशी बाळगणारे न्यूझीलंडचे खेळाडू देखील मनात तरळून जातील.हे पराभवाचे शल्य नक्कीच नाही पण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्या मेहनतीच्या परिघाबाहेर नशीब नावाचा घटक दबा धरून बसलेला असतो आणि त्याचा हा निकाल खऱ्या अर्थाने अनाकलनीय वाटत राहील याचे जास्त वाईट वाटते .

रन-आऊट झाल्यावर गप्टिलची मुद्रा सगळं काही सांगणारी होती.करंडक उंचावताना मॉर्गन आणि संपूर्ण संघ आनंदी असणार यात दुमत नाही पण भोवताली वाजणाऱ्या टाळ्या या नक्की कशाच्या असतील हा प्रश्न तितकाच  गुलदस्त्यात राहील.कारण २०१९ ची विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंड जिंकले या नंतर ते किती धावांनी अथवा विकेट्स ने जिंकले असा प्रश्न येईल त्याचे उत्तर तितकेसे अभिमानाने सांगता येण्यासारखे असेल असे वाटत नाही.

क्रिकेट खेळाचे जनक अशी बिरुदावली मिरविणाऱ्या गोऱ्या साहेबाने पहिल्यांदा विश्वकरंडक उंचावला त्यांचे निश्चितच मनापासून अभिनंदन पण नियमांची अंमलबजावणी करत किवींचा पदरी आलेला पराभव आज इथे खऱ्या अर्थाने ओशाळला हेही तितकेच खरे..!!!







हृषिकेश पांडकर
१५-०७-२०१९


No comments:

Post a Comment