पिते 'नीर' डोळे मिटुनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची
आपण डोळे मिटून दूध पितोय म्हणून भोवतालचे आपल्याला पाहत नाहीत अशी भाबडी समजूत असलेल्या मांजराला उद्देशून हि काव्यपंक्ती आहे.या लिहिलेल्या ओळी जरी त्या मांजराची नकारात्मक बाजू दाखवत असल्या तरी या फोटोतील मांजर मात्र कुठलीच चोरी करत नाहीये.मध्य भारतातल्या तापलेल्या जंगलात भर दुपारी पोटभर आणि मनसोक्त पाणी पिण्यात रमून गेलेल्या वाघिणीची हि भावमुद्रा आहे.
आजूबाजूला उभे असलेला मनुष्यप्राणी किव्वा जंगलातील इतर वन्यजीव जे लपून पाहत असतील किव्वा नसतीलही यांची यत्किंचितही फिकीर न करता जठराग्नी शमवणाऱ्या या जंगलाच्या राणीने तिच्या सभोवतालचे वातावरण स्तब्ध केले होते.तल्लीन होऊन पाणी पिणारी वाघीण पाहणे हे इतके समाधान देणारे होते कि हे पाहताना आपल्या घरी चोरून दूध पिणाऱ्या हिच्या मावशीचा उल्लेख इथे काहीसा विरोधाभास करणारा वाटत राहतो.
पाणवठा हि जंगलातील एकमेव जागा आहे जिथे दिवसातील विविध वेळा मिळून त्या जंगलातील संपूर्ण जीवसृष्टी एकवटते.मात्र हा पट्टेरी जीव जेव्हा तिथे असतो तेव्हा बाकीचे जीव आडोश्याला नाहीसे होतात आणि राजा एकटाच पाणी पीत असतो.हीच जंगलाची रीत आहे.
या मार्जार जातीची पाणी पिण्याची पद्धत तशी जरा राजेशाहीच. मागचे दोन्ही पाय दुमडून पाण्याला थेट जीभ लावून पाणी पिणारी मुद्रा पाहताना मजा येत राहते.दहा मिनिटांचा हा नजारा पाहण्यासाठी दीड तास पहाव्या लागणाऱ्या वाटेचे सार्थक झाल्याचे समाधान शब्दात वर्णन करणे अवघडच.
मला खात्री आहे कि चोरट्यांना रात्री पसरलेल्या चांदण्याच्या प्रकाशाची भीती वाटत असेल किव्वा वाघाच्या मावशीला घरातले दूध चोरून पिताना काहीशी भीती वाटत असेल. पण या फोटोतल्या मांजरीला पाणी पिताना त्या भीतीचा लवलेशही नसणार.मिटलेले डोळे हे क्षणिक मिटलेल्या पापणीच्या परिणाम आहे.
तिने पोटभर पाणी प्यायले आम्ही मनसोक्त फोटो काढले कोणाचे जास्त समाधान झाले माहित नाही पण तिची फक्त तहानच भागली असेल आमचे मात्र डोळे,मन आणि कॅमेरा या तीनही गोष्टी तृप्त झाल्या.
हृषिकेश पांडकर
०४.०६.२०१९
You don't know what thirst is until you drink for the first time .
Tipeshwar wildlife sanctuary | India | June 2019
No comments:
Post a Comment