आत्मचरित्र्य ते ही एका
सामान्य कारकूनाचे.बालपण कोकणात आणि संसार,नोकरीचा काळ मुंबईतील चाळीत सरलेला.यात थोडी
प्रगती होऊन उर्वरित आयुष्य चाळीतून बिल्डिंग मधील फ्लॅट मध्ये गेलेले.साध्या सरळमार्गी
मध्यमवयीन इसमाचे आत्मचरित्र्य लिहावं अशी एकही गोष्ट याच्या आयुष्यात घडलेली नाही.आणि
तरी देखील अशा इसमावर आत्मचरित्र्य लिहिणाऱ्या पुलंना सर्वप्रथम माझा नमस्कार.
या तरुणाची सामान्य जीवनकथा
लोकांनी का वाचावी याला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणजे भाईंचे 'असा मी असामी' हे पुस्तक.अनेक
लोकांनी हे पुस्तक अनेकदा वाचले असेल यात शंकाच नाही. या पुस्तकातील मला आत्ता आठवणारी आणि लक्षात राहिलेली काही वाक्य मला का
आवडली हे लिहावंसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.कदाचित अजून काही वाक्य नक्की असतील
पण तूर्तास मला जी आठवली ती लिहीत आहे.
- "या जगात काय म्हटलंय या पेक्षा कोणी म्हटलंय
यालाच अधिक अर्थ आहे."
कुठल्याही निबंधाची सुरुवात मी कोणाच्या तरी वाक्याने
करायचो.कारण कन्टेन्ट महत्वाचा नाही..ते कोणी म्हटले आहे हे तुम्हाला माहित आहे हे
सुचवायचं प्रयत्न अधिक असायचा.कदाचित हा याच पु.ला च्या वाक्याचा परिणाम असावा.पण तेच
खरं आहे हे कालानुरूप पटत जातेच.काय लिहिलेलं आहे यापेक्षा ते लिहिणारी व्यक्ती कोण
आहे यावरून त्या वाक्याच्या वजनातील तफावत ठरत जाते.
- “सुटीशी संबंध आल्याशिवाय तिथीची भांडणं सुरु होत
नाहीत.”
पु.लंनी लिहिलेली ओळ निदान माझ्या जन्माच्या आधीची
असेलच.पण अजूनही ही ओळ तितकीच चपखल आणि अर्थपूर्ण आहे याचा कायम बोध होत राहतो.आजही
गुढीपाडवा जर शनिवारी आला तर आपली नाकं मुरडतात कारण आपली हक्काची सुट्टी गेलेली असते.पण
इतका साधं,सुटसुटीत आणि वाचताक्षणी पटणारं वाक्य ओघवत्या शैलीत बेमालूम लिहिता येणं
हेच किती कौतुकास्पद आहे.
- “नोकरी हि लग्नाच्या बायको सारखी..दुसरी चांगली दिसते
म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नाही..शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्या सारख्याच.”
नोकरी बहुसंख्य लोक करतात त्याहून जास्त लोक लग्नही
करतात पण नोकरी आणि बायको यांची इतक्या हलक्या फुलक्या शब्दात सांगड घालणारी हि एकमेव
ओळ माझ्या वाचनात आलीये.शेवटी सगळ्या नोकऱ्या आणि सगळ्या बायका सारख्या हे सांगून विनोदी,व्यवहारी
आणि मार्मिक अशा तीनही अंगानी आपलं मत मांडून भाई मोकळे झालेले आहेत.
- “मी आपला बेताबेताने पाणी उडवत होतो...प्रोक्षण केल्यासारखा..पण
ही मात्र माझ्या अंगावर भसाभस पाणी उपशीत होती..माहेरी बहुधा रेडा धुण्याचं काम हिच्याकडे
असावं.”
स्वतःवर जो विनोद करू शकतो तो श्रेष्ठ विनोदवीर असं
म्हणतात.स्वतःला रेडा म्हणवून घेत पाणी उडवायचा क्रियेमधील तफावत अधोरेखित करण्याची
हि पद्धत वाक्य संपल्या नंतर काही क्षणांनी जाणवते.पण एकदा विनोद लक्षात येतो तेव्हा
यातील मजा निखळ आनंद देते आणि हेच पु.लं.च्या संपूर्ण लेखनाचे सार आहे.
- “आमच्या देशातल्या लोकांच्या ढुंगणावर हंटर हवा सदैव
काय...हंटर..अरे साहेब आहे हे ठीक आहे..राज्य करावे ते इंग्रजानीच”
तब्बल तीनशे वर्ष इंग्रजानी आपल्यावर राज्य केले.असंख्य
जुलूम केले.'चले जाव ' असे म्हणून आपण त्यांना यशस्वीपणे हाकलूनही दिले.अनंत बलिदानं,मोर्चे,लढाया,आंदोलनं
सगळं आपल्याला श्रुत आहेतच आणि या सर्व गोष्टी माहित असूनही पु.लं.च हे वाक्य तरीही
आपल्याला पटतं हे या लेखणीच यश आहे.राज्य करावं ते इंग्रजांनीच यात गोर्यांबद्दलचा
वेगळ्याच अंगाचा आदर व्यक्त होतो.ते शासक होते पण त्यांनी आग्रहाने शिस्त लावून देशात
बदल केले.त्याच शिस्तीचा अभाव आजही आपल्याला जाणवतो आणि म्हणूनच हे वाक्य ऐकताक्षणी
पटून जाते.
- “अरे जुना काळा कोट फाटला..नवा शिवावयास नव्हता दमडा..राहिला
उघडा आणि झाला महात्मा”
विनोद आणि राग या दोनही भावना मांडणारे जोश्यांच्या
वडिलांच्या तोंडचे हे वाक्य इतके बोलके असू शकेल याचा बोध संपूर्ण उतारा वाचल्यावर
येतो.बापूंविषयीचे मत एखाद्या मध्यमवर्गातील गृहस्थ मांडतोय त्यामागची त्याची भावना
शब्दागणिक स्पष्ट होत जाते.तरीही शब्दांची गर्भश्रीमंती असल्यामुळे त्याला आलेली विनोदाची
झालर या वाक्यातील विनोदाचे आणि वास्तविकतेचे अंग तितक्याच शिताफीने आणि स्वतंत्रपणे
जपते.
- “तुमच्या त्या लेंग्याचा आणि पंचाचा, साहेबाच्या
पॅंटीवर काही परिणाम होणार नाही.”
स्वातंत्र्य पूर्व काळातील मध्यमवर्गातील कुटुंबवत्सल
गृहस्थाचा सत्याग्रह आणि आंदोलन करणाऱ्या बापू आणि टिळकांवरचा लटका राग इतक्या सहज
भाषेत व्यक्त झालाय.म्हणजे आताही हि ओळ वाचताना गांधी किव्वा टिळकांवर टीका केलीये
असा वास देखील येत नाही किव्वा लेखकाबद्दल संतापही यायला जागा नाहीये.उलट इतका मोठा
भावार्थ इतक्या मार्मिक आणि हलकाफुलका पोहोचविणाऱ्या भाईंबद्दलचा आदर शब्दागणिक दुणावताच
राहतो.
- “हे जग टिकवायला कुणी काही खास करायला लागतं याच्यावर
माझा विश्वास नाही.”
तत्वज्ञान सांगायला कोणी महात्मा किव्वा गाढेपंडितच
असायला हवा याची मुळीच गरज नाहीये.सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या तोंडी असलेले हे वाक्य
आजच्या काळातही तितक्याच मोलाचा सल्ला देऊन जाते.कोणीतरी काहीतरी तीर मारले म्हणून
हे जग अजूनही चालू आहे वगरे अशा गोष्टी म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे हे सांगताना तीन
चार साध्या सरळ शब्दात हसत हसत थेट अर्थ पोहोचवणारे हे वाक्य मनापासून पटते. धोंडो
भिकाजी जोशी या चाळीतल्या सामान्य गृहस्थाच्या तोंडी लिहिलेले वाक्य बऱ्याच गोष्टी
सांगून जाते.
- “लोकांच्या स्वप्नाच्या तपशिलात आपण कशाला शिरा.”
लोकांना कशी स्वप्न पडतात आणि आपल्याला तशी स्वप्न
कशी पडत नाहीत.आपल्याला कशी भलतीच स्वप्न पडत असतात हे सांगताना असलेले हे वाक्य.दुसर्यांचा
स्वप्नाचा कथेत आपणं कशाला रमायचे.किव्वा दुसऱ्यांना कशी स्वप्न पडतात त्याचं आपल्याला
काय या अर्थी असलेले वाक्य पु.लंनी इतके ओघवते लिहिले आहे कि आपल्यालाही क्षणभर असेच
वाटत राहते 'मरूदे ने त्याला पडलेल्या स्वप्नाचे आपल्याला काय करायचंय'.या वाक्यात
कुठेही अलंकारिक भाषा किव्वा शब्द नाहीये पण लिहिताना सुचणारी सहजता या लेखकाला वेगळी
उंची देते.
- “असल्या लोकांना 'कॅज्युअल लिव्ह' सुद्धा रविवारला
जोडून मिळते.”
सामान्य माणसाच्या इतक्या जवळून जाणारा विनोदी लेखक
कुठलाच नाही.आणि या पुढेही होईल याची अशाही नाही.नशीबवान लोकांच्या वैभवाचे वर्णन करताना
पैसे आणि इतर या गोष्टी लिहिल्याचा अनेक आठवणी आहेत पण माझ्या स्वतःच्या आयुष्यात आणि
अर्थातच तुमच्याही आयुष्यात घडणारी इतकी जवळची गोष्ट वाचताना 'अरे हे किती सहज,सोपं
आणि जवळच उदाहरण आहे' असं ज्याला वाटणार नाही तो कदाचित या विनोदाला मुकेल आणि पर्यायाने
त्या निखळ आनंदालाही.रविवारी जोडून मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद तेव्हाही नशिबवानालाच भोगायला
मिळाला आणि आता देखील हा आनंद उपभोगणारा तेवढाच भाग्यवंत आहे.
- “हे असले कुटील शेजारी आमच्याच डोक्यावरती का आलेत
कोण जाणे.”
शब्दांचा खेळ तो हि इतका चपखल.आपल्या घराच्या वर किव्वा
शेजारी राहणारे लोक खलबत्त्यात काही ना काही सतत कुटत असतात किव्वा त्यांची मुलं खुर्च्यांची
गाडी-गाडी करून खेळतात त्यामुळे आपल्या घरात सतत आवाज होतो.या त्रासाला कंटाळून 'कुटील
शेजारी' हे इतका चपखल विशेषण सुचणे या सारखा नेमकेपणा लिखाणात येणं हे जास्त कौतुकास्पद.
- “बायकांना ज्या गोष्टी फक्त स्वतःलाच जमतात असं वाटत असतं त्यातली खरेदी हि एक महत्वाची गोष्ट.”
आत्ताच्या व्हॉट्स-अँपच्या जगात नवरा-बायकोमधील बायकोवर
असलेले विनोद अगणित वाचायला मिळतात.त्या वळणावर जाणारी हि ओळ.मात्र त्यातही इतकी सहजता
आणि मुख्य म्हणजे संपूर्ण वाक्य वाचताना ओळ म्हणणारा नवरा देखील तितक्याच ठामपणे डोळ्यासमोर
येत राहतो.बायकांना,फक्त आणि स्वतःला या तीन शब्दात सगळा विनोद दडला आहे.समस्त नवऱ्यांच्या
जातीला अर्पण केलेला हा विनोद आहे.पण तरीही स्त्री असो किव्वा पुरुष वाचताना दोघंही
तितक्यचा मोकळेपणाने आजही हसतील इतक्या ताकदीचे ते शब्दसामर्थ्य आहे.
- “उगीच शेजाऱ्यांना वाटायचं कि कोकणातून काही तार
बीर आलीये कि काय.”
'कोकणातून तार येणे' हि कुठली अधिकृत म्हण अथवा वाक्यप्रचार
नसला तरी वाक्याचा अर्थ बेमालूम समजून चेहेऱ्यावर हास्य येईलच याची खात्री असलेले हे
वाक्य.बेसूर आवाजातील गाणे जर कोणी म्हणत असेल तर 'काय रडतोय' असे आपण त्याला विनोद
म्हणून विचारू पण तोच विनोद कल्पकतेने लिहिलेला इथे वाचायला मिळतो.कुटुंबाचे मुळगाव
कोकण आहे याची जाताजाता करून दिलेली जाणीव देखील मजेशीर वाटते.
- “बायका,बाकी बायकांकडे जितक्या निरखून पाहतात तितके
पुण्यातले पेन्शनर देखील नाही हो.”
बायकांकडे कसे पहावे यासाठी पुण्यातल्या 'पेन्शनर सारखे'
हे मोजण्याचे परिमाण ठरू शकते हि माहितीच आपल्याला नवीन असते.पण इतकी लगेच पटून जाणारी
तुलना चेहेऱ्यावर हास्य आणायला पुरेशी आहे.एकतर बायकांनी बायकांकडे निरखून पाहणे या
विरोधाभासातील विनोद त्यामागे दडला आहे हे
पचनी पडेपर्यंत पेन्शनर ची तुलना वाचायला मिळते.म्हणजे केवळ शब्दसामर्थ्य आणि असामान्य
निरीक्षण शक्तीमुळे झालेली विनोदनिर्मिती खऱ्या अर्थाने निखळ मनोरंजन करते.बायका बायकांचे
कौतुक करत नाहीत.पण मग इतक्या निरखून पाहण्यामागचे प्रयोजन काय याचा सहज आढावा पुस्तकात
या आधीच्या दोन तीन वाक्यात वाचायला मिळतो.
- “आपल्या पैशानी दुसऱ्याची श्रीमंती बघायचा धंदा सांगितलाय
कुणी.”
हा प्रत्यय तर आपल्याला कैक वेळेला आला आहे.मध्यमवर्गीय
कुटुंबातील सामान्य नवर्याच्या तोंडी असलेले वाक्य कथानकाची झलक एका ओळीत स्पष्ट करत
आहे.दुसऱ्याचे ऐश्वर्या पाहण्यासाठी आपल्या पदरचे पैसे खर्च करण्याची गरज नाही हे सांगण्यासाठी
भाईंनी वापरलेले वाक्य त्या पात्राच्या तोंडी इतक बेमालूम बसून गेलय की केवळ एका वाक्याने
संपूर्ण व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते.हेच या लेखकाचं यश आणि वाचकाच भाग्य आहे.
- "अरे कितीदा तेच तेच सांगशील तिकडे त्या सुभद्रेच
लग्न होऊन तीsस पोर देखील झाले असेल"
कुठल्याश्या नाटकाच्या प्रसंगात नारदाच्या तोंडी 'लग्नाला
जातो मी' हे पद आहे.पण हा नारद ती ओळ इतक्या वेळा गुणगुणत असतो.त्यावर आलेली हि प्रतिक्रिया
आहे.अतिशयोक्ती म्हणजे विनोद नाही पण अतिशयोक्ती हा विनोदाचा एक भाग नक्की होऊ शकतो
आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथे येतो.अतिशयोक्ती नक्की आहे पण अजीर्ण होत नाही हे
या शब्द मांडणीचे यश.एखाद्या गोष्टीला कंटाळून शेवटी आलेली प्रतिक्रिया आणि त्यातही
इतका समर्पक विनोद वाचताना मजा येत राहते.
- “परक्यांच्या देखत लावायचा आवाज मी नवरा म्हणून अजूनही
राखून ठेवला आहे.”
पती-पत्नीच्या नातेसंबंधातील कधीही विभागला न जाऊ शकणार
हा पैलू.वाचता क्षणी पटेल असाच आहे.पण इतक्या सहजतेने तो आपल्यासमोर येतो याच कौतुक
जास्त वाटते.'बायकोसोबत घरात,बायकोसोबत एकांतात आणि बायकोसोबत परक्यांसमोर लावायचा
आवाज वेगळा असतो किव्वा असावा लागतो हा नियम किव्वा निष्कर्ष नाहीये.मात्र तल्लख निरीक्षणशक्ती
आणि अनुभवातून आलेला हा बोध यावर आधारलेले हे वाक्य पु.लंनी इतक्या सहजतेने लिहिलंय
कि पुस्तक वाचतानाही तंतोतंत पटल्याचे हास्य आल्याखेरीच वाचक पुढे सरकणार नाही.आणि
वाचणारी व्यक्ती स्त्री असेल तरीही याला अपवाद नाही.
- “राम कृपेपेक्षा दाम कृपा मोठी.”
'द होल थिंग इस दॅट के भय्या सबसे बडा रुपय्या' हे
पद्यरूपी असलेले ९० च्या दशकातील सत्य आपल्याला माहित आहेच.पण ७० च्या दशकातही अशीच
परिस्थिती होती हे सांगताना पुलंनी इतर देवाच्या कृपेपेक्षा लक्ष्मीची कृपा महत्वाची हे इतक्या अलगद पद्धतीने सांगितलं
आहे.भक्ती तुम्ही देवावर करा किव्वा धनावर तो तुमचा प्रश्न आहे.पण तुमच्यावर कोणाची
कृपा होते हा प्रश्न महत्वाचा.आणि त्यात रामापेक्षा दाम सरस ठरतो हा अनुभव.
- “अहो म्हणजे तपश्चर्येच्या आधीच अप्सरा..हे म्हणजे
मरायच्या आधीच मुन्सिपाल्टीचा पास..”
एखादी गोष्ट मिळण्यामागे काही साधना असते मेहनत असते.मात्र
ते कष्ट घ्यायच्या आधीच जर यश मिळाले असेल तर त्या ठिकाणी हे वाक्य तंतोतंत बसेल.तपश्चर्या
केल्यानंतर अप्सरा तपोभंग करायला येतात असा आपला पौराणिक इतिहास सांगतो.पण इथे मात्र
त्या तपश्चर्येपूर्वीच त्या अप्सरा आल्याने आनंद वेगळाच.थोडक्यात काय तर मरणाच्या दुःखापेक्षा
वैकुंठाचा पास मिळाल्याचा आनंद जास्त.तुलना करण्यासाठी निवडलेला विभागाचं नकळत विनोद
घडवून आणतो त्याचे हे अत्यंत मार्मिक उदाहरण. तुलना करायला कुठलीही मर्यादा भाईंनी
बाळगली नाहीये.
- “डोळे मिटून जर मिनिटभर उभं रहायचं तर घडाळ्यात मिनिट
झालेलं पाहणार कोण ?”
तुम्ही याचा अनुभव नक्की घेतला असणारच.कारण शाळेतील
मूल्यशिक्षणच्या तासापासून ते दोन मिनिटे श्रद्धांजली पर्यंत हि वेळ आपल्या सर्वांवर
येते.पण हि इतकी साधी भोळी शंका कधी कोणी उपस्थित केल्याचे तुमच्या ऐकिवात आहे का
? माझ्या तरी आत्तापर्यंत कोणी नव्हते. हि शंका मी देखील उचलून धरली ती या असामी व्यक्तिमत्वाच्या
लेखननंतर .शंका अगदीच रास्त आहे जर सगळेच मिनिटभर डोळे बंद करणार आहेत तर मिनिट पूर्ण
झाल्याचे बघणार कोण ?
- “आपण लहान मुलांशी जे बोलतो त्याला बंगाली म्हणतात
हे मला माहितीच नव्हतं.”
हे वाक्य लिहायच्या आधी तुम्ही बंगाली ऐकलेले हवे,लहान
मुलांचे बोबडे बोल ऐकलेले हवेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही गोष्टी कां देऊन
ऐकल्या असतील तर दोन्हींचा आवाज कानाला एकाच पद्धतीने येतो हे समजण्याची आणि लक्षात
राहण्याची हातोटी देखील पाहिजे.आणि या तीनही गोष्टी भाईंना जमल्या आणि 'हो यार कसलं
बरोबर आहे हे' हे वाक्य आपल्याला म्हणायची संधी त्यांनी दिली या बद्दल आपण त्यांचे
ऋणी राहणे हा सोपा पर्याय आपल्यासमोर आहेच.
- “आमच्या संसारात कर्त्याप्रमाणे काहीच चालत नाही..मग
आमच्या मुलाने क्रियापद तरी का चालवावं ?”
मराठी भाषेने सर्वांना समान शब्द दिले आहेत.प्रत्येकाला
तेच अर्थही दिलेले आहेत पण ते जोडून वाक्य बनवण्याची हातोटी हि ज्याची त्याची अंगभूतच.आणि
इथेच भाई आपल्यापासून खूप पुढे निघून गेले याची पुन्हा एकदा इथे प्रचिती येते.मध्यमवर्गीय
कुटुंबातील कर्ता म्हणजे नवरा.पण त्याच्या मनाप्रमाणे संसारात काहीच चालत नाही हि त्याची
खंत पहिल्या वाक्यात व्यक्त होतीये.आणि हे व्यक्त करीत असताना आपल्या मुलाला मराठीच्या
तासाला क्रियापद चालवता येत नाही यात त्याची काय चूक असे सहज विचारून त्याच्या चुकीवर
पांघरून घालणारा पालक इथे गमतीशीर वाटत राहतो.
- “समर्थांनी मूर्खांची इतकी लक्षण लिहून देखील अजून
बरीच शिल्लक राहिली आहेत याची मला खात्रीच पटली.”
समोरच्या व्यक्तीच मूर्खत्व पटल्यानंतर सात्विक संताप
साध्या आणि सरळ शब्दात व्यक्त करण्याची इतकी कल्पकता मी तरी या आधी कुठेही वाचली नव्हती.
- “बाका प्रसंग आला कि बाथरूम हा नवऱ्याचा जातीला केवढा
मोठा आधार आहे हे पटायला लागतं.”
घरातल्या वादावादीच्या किव्वा चर्चेच्या प्रसंगात आपली
बाजू पडायला लागल्यावर भूमिगत होण्यासाठी बाथरूम ही जागा स्वर्गाहून कमी नसते.तिथे
थोडी उसंत मिळते,एकांत मिळतो,पुढल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठीची क्षणभर विश्रांती
देखील मिळते आणि विचार करायला वेळही मिळतो.हा दैनंदिन आणि घरगुती जीवनातील अनुभव प्रत्येकाला
नक्की आला असणार पण त्याला लिखित रूप देऊन भाई अजूनच आपल्यात समरस होऊन गेले…
या आणि अश्या अनेक विनोदी
वाक्यामुळे हा कडमड्याचा जोशी इतका नावारूपाला आला.अर्थात असा मी असामी या पुस्तकातील
ही काही वाक्य आहेत.याव्यतिरिक्तही यातील अनेक शाब्दिक कोट्या आणि प्रसंग लेखन आपल्याला मनमुराद हसवून जातं.
कदाचित हीच भाषाशैली,शब्दांची
मांडणी,सूक्ष्म निरीक्षण आणि सतत आपल्यातला वाटत राहणारा विनोद यामुळे पु.लंनी आपल्याला
नेहमीच बांधून ठेवले आहे.म्हणूनच पु.लं आपल्यातून कधी गेलेच नाहीत आणि जावू शकणारही
नाहीत..
हृषिकेश पांडकर
२३.०१.२०१९