Monday, September 3, 2018

कॅनव्हास

फळ्यावर लिहिलेला गृहपाठ आहे तसा उतरवता सुद्धा येत नाही का तुम्हाला ? अरे पहिली वेलांटी लिहिलेली दिसत असून सुद्धा दुसरी वेलांटी कशी देतोयेस तू ? , फळ्यावर काढलेल्या चित्रातला मुलगा बघ आणि तुझ्या वहीतला मुलगा बघ खूप साम्य असले पाहिजे अशी अपेक्षा नाही पण किमान मुलगा तरी वाटू दे कि' या आणि अशा अनंत पालूपदांच्या वातावरणात बालपण आणि पुढे तारुण्यही सरल्यामुळे समोर असलेली गोष्ट आहे तशी रेखाटने हि गोष्टही कधी शिताफीने जमली नाही. पुढे दुर्दैवाने कम्प्युटरला समर्पित झाल्यामुळे Ctr C + Ctr V देवदूतासारखे वाटायला लागले.


 

समोर लिहिलेले वाक्य तसेच्या तसे लिहिताना हि तऱ्हा होती तिथे प्रत्यक्षात समोर टांगलेले सहा बाय तीन फुटाचे चित्र हुबेहूब उतरवणे तेही तितक्याच ताकदीने आणि चोख रंगसंगतीने या गोष्टीने मी प्रचंड भारावून गेलो होतो.

किती दिवस किव्वा कदाचित महिन्याची मेहनत त्यामागे ओतली असेल हा वेगळाच भाग पण उभे राहून ते चित्र पूर्णत्वाला नेणे हि गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे.असंख्य लोकांचा आवाज,त्यांचे सारखे मधून चालणे,थांबून फोटो काढणे या आणि अशा अनेक व्यत्ययांवर मत करून ती प्रतिमा रेखाटून पूर्ण करणे हि कमालीची बाब होती.

कलाकार व्यक्ती हि वयाच्या सत्तरीला टेकली असावी.पण ब्रश धरल्यावर त्यांचा हात तसूभरही थरथरला नाही हे विशेष.रंगांची छटा ठरवणे त्याप्रमाणे ती आधी बनवणे आणि ती मनासारखी झाल्यावर ब्रश कॅनव्हासला टेकवणे या क्रिया डोळ्यांना देखील सुखावणाऱ्या होत्या.मी तिथे जेमतेम १५ मिनिटे होतो पण त्या संपूर्ण वेळात त्या आजोबांनी चित्रा व्यतिरिक्त कुठेही लक्ष दिले नाही.माझ्यासारखे किमान वीस लोक त्यांच्या भोवती होते पण बोलणे तर सोडाच त्यांनी मान वळवून पहिले सुद्धा नाही.

बाकी मांडलेली चित्र उत्तम असणारच त्या शिवाय ती तिथे असणे शक्य नाही पण कलाकृती आकार घेत असताना पाहण्यात वेगळीच मजा होती.चित्र जरी तंतोतंत सारखे होते तरी त्यातील मेहनत स्पष्ट दिसत होती.एकूणच ती पंधरा मिनिटे नवीन गोष्टी पाहण्यात आणि शिकण्यात गेली.त्या काकांचे अभिनंदन किव्वा कौतुक करायची इच्छा होती पण त्यांना थांबवून बोलण्ययाची हिम्मत झाली नाही.गुपचूप फोटो घेऊन तिथून निघालो.

अशीच एक चित्र काढणारी युवती मी अमेरिकेत सेंट्रल पार्क मध्ये पहिली होती तिची आठवण झाली.तेव्हा निसर्गचित्र होते तर या वेळच्या चित्राचा गाभा वेगळा होता.दोन्ही प्रसंगात दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे कलाकृती पूर्ण होईपर्यंत तो कलाकार आणि त्याची कलाकृती यामध्ये तिसरा कोणी येऊच शकत नाही आणि वर वर फक्त पाहून चित्र काढणे एवढी सोपी गोष्ट वाटत असली तरी त्यासाठी लागणारे कौशल्य हे अवगतच असावे लागते.

कलाकृतीविषयी अचंबा आणि कलाकारांविषयी कौतुक या दोन्ही भावना मनात ठेवून आठवणीदाखल फोटो सोबत घेऊन मी मोनालिसा साठी असलेले 'लुव्र' म्युझियम सोडले.चित्रकलेतील आपली गती आणि जाण कमी असूनही या चित्राने दिलेला आनंद वेगळाच होता.शेवटी ती कलाच,प्रत्यक्ष कलाकाराला समाधान तर देतेच पण सामान्यांना देखील तितकाच आनंद देण्याची कुवत राखते.

हृषिकेश पांडकर

Art gallery | 2018

 

No comments:

Post a Comment