Wednesday, September 5, 2018

शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा

 पहिल्या पावलापासून ते आजवरच्या प्रत्येक प्रवासात साक्षीदाराची आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या आईला वंदन आहेच,

पण अयोग्य वेळी घरी अवतरण्यापासून ते सणासुदीला,आनंदात आणि दुःखात एक कुटुंब म्हणून उभ्या असलेल्या सर्व नातेवाइकांकडूनही खूप शिकलो..

खुर्चीला धरून उभे राहण्यापासून ते स्वबळावर दोन्ही पायांवर उभे रहायला शिकवणाऱ्या बाबांना वंदन आहेच,

पण दिवाळीच्या आदल्या रात्री फटाक्यांची योग्य वाटणी करण्यापासून ते वेगसच्या कसिनो मध्ये 'हे घे लाव अजून पैसे' म्हणणाऱ्या भावाकडूनही खूप शिकलो..

नवरा-बायकोच्या विनोदावर तितक्याच सहजतेने हसणाऱ्या आणि आमच्या चौकोनी कुटुंबात बेमालूम मिसळलेल्या बायकोला वंदन आहेच,

पण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला नेमाने हफ्ते घेण्यापासून ते 'दादा मला एक वाहिनी आण' या आणि इथून पुढल्या प्रवासातही एक स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या लाडक्या बहिणींकडूनही खूप शिकलो..

हातात खडू आणि बाजूला फळा असलेल्या शिक्षकांना तर वंदन आहेच,

पण वेळेवर घंटा देणाऱ्या आणि सुट्टीची बातमी आणणाऱ्या शिपाई काकांकडूनही खूप शिकलो..

'सुसंस्कार' या परिघाबाहेरही जग आहे याची जाणीव करून देणाऱ्या आणि यश,अपयश,प्रगती,अधोगती,मंगल अमंगल या आणि अशा सर्व प्रसंगात खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या मित्रांना वंदन आहेच,

पण निंदकाचे घर असावे शेजारी या बाण्याला तंतोतंत जागलेल्या निंदकांकडूनही खूप शिकलो...

सिग्नलला झेब्रा क्रोसिंगच्या मागे थांबण्या पासून ते सुजाण नागरिक म्हणून घेता येईल इथपर्यंतचे सर्व साधे सोपे नियम पाळणाऱ्या लोकांना वंदन आहेच,

पण तेच झेब्रा क्रोसिंग बिनादिक्कत ओलांडून सिग्नल मोडणाऱ्या आणि सामाजिक कुठलाच नियम आम्हाला लागू नाही अशा अविर्भावात वावरणाऱ्या सर्वांकडूनही खूप शिकलो..

सहज आठवणाऱ्या आणि डोक्यात येणाऱ्या प्रत्येक गुरूला वंदन आहेच,

पण नकळत शिकवून जाणारी प्रत्येक व्यक्ती हि गुरुतुल्यच ...

ज्या सर्वांकडून जे काही उणं-दुणं शिकलो त्या सर्वांना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा 

हृषिकेश पांडकर

०५ सप्टेंबर २०१८

 

No comments:

Post a Comment