शहराच्या एकूणच रचनेवरून किव्वा निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे तयार झालेले क्षितिज म्हणजेच कदाचित 'स्कायलाईन' होय.हस्तक्षेप म्हणण्याचे कारण असे कि नदीकाठी,समुद्र किनाऱ्यावर किव्वा टेकडीच्या पायथ्याला वसलेल्या शहरी रचनेमुळे तयार झालेले चित्र म्हणजेच कदाचित 'स्कायलाईन' असावी या मतावर मी ठाम होत चाललोय.
शहराची स्कायलाईन हि त्या विशिष्ट शहराची स्वतंत्र ओळख असते.काही शहरे तर केवळ स्कायलाईन पाहून ओळखता येऊ शकतात.जणू काही ती स्कायलाईन त्या शहराच्या स्वाक्षरीचे काम करते.अशीच एक नावाजलेली स्कायलाईन म्हणजे न्यूयॉर्क शहराची. सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'च्या प्रांगणातून किव्वा न्यू जर्सीच्या कडेवरून दिसणारी न्यूयॉर्कची स्कायलाईन कायमच लक्ष वेधून घेते.
हडसन नदी जिथे अटलांटिक महासागराला मिळते साधारण त्या भागातून न्यूयॉर्कची स्कायलाईन मनसोक्त आणि डोळेभरून पाहता येते.जगातील प्रमुख आर्थिक,व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्रांच्या इमारती आणि मुख्यालये डोळ्याचे पारणे फेडतात.एम्पायर स्टेट,वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे स्मरण स्मारक या गोष्टी प्रकर्षाने लक्ष वेधून घेतात.
लक्ख ऊन किव्वा रात्रीच्या दिव्यांच्या लखलखाटात सजलेली मॅनहॅटनची स्कायलाईन न्यूयॉर्क भेटीतील 'चुकवू नये' या सदरात मोडणारी गोष्ट.शहर कसे असेल याची प्रचिती शहराबाहेरून यावी या ताकदीची हि रचना शहराविषयीचे आकर्षण अजूनच वाढवते.
हीच स्कायलाईन पाहण्यासाठी काही विशिष्ट जागा आहेत.प्रत्येक ठिकाणावरून याच शहराचं रुपडं वेगळं दिसू शकतं.ब्रुकलीन ब्रिज,न्यू-जर्सी शहराचा किनाऱ्यालगतचा भाग,गव्हर्नर आयलंड फेरी किव्वा लिबर्टीची फेरी.प्रत्येक ठिकाणावरून दिसणारा नजारा वेगळा असतो आणि प्रत्येक वेळी तो जास्त आवडतो.शहरात शिरण्याआधी प्रथमदर्शनीच या शहराच्या प्रेमात पडायला लावणारी स्कायलाईन डोळ्यात साठवताना नजर तोकडी पडते एव्हढे निश्चित.
अमेरिकेच्या आणि पर्यायाने जगाच्या आर्थिक महासत्तेला भेट देण्याची संधी मिळाली तर हि स्कायलाईन पहायला विसरू नका.शहरातल्या गोष्टी या ओघाने पाहता येतीलच पण ज्या शहरात चाललोय ते बाहेरूनही तितकेच सुंदर आहे याचा प्रत्यय घ्यायची संधी सोडू नका.शहराचे अंतरंग ज्या प्रगत तंत्रज्ञानाने सजले आहे तितक्याच दिमाखात बाह्यरूप देखील आखीव-रेखीव आणि विलोभनीय याचा अनुभव नक्की येईल.
हृषिकेश पांडकर
१०.०९.२०१८
The skyline of New York is a monument.
New York | USA