Thursday, August 2, 2018

छोटासा धबधबा

एरवी रुक्ष वाटणाऱ्या या दगडांच्या राशीवर अगदी धो धो नाही पण खळखळ ओघळणारे पाणी त्या चिंब पावसातही सुखद वाटते.दूधसागर धबधब्याचा फोटो टाकल्यानंतर हा फोटो टाकण्यामागचा हेतू हाच आहे कि निसर्गाच्या रूपात जरी इतक्या कमालीची तफावत असली तरी त्यातून मिळणाऱ्या आनंदात कुठलीच भिन्नता नाहीये.


 

गुरुत्वाकर्षण,पाण्याचा अविरत वाहण्याचा स्थायीभाव आणि पाण्याच्या वेगातही खंबीरपणे निश्चल राहण्याची दगडांची भूमिका या तीन गोष्टींवर अखंडित असलेले हे धबधबा नावाचे सौन्दर्य डोळ्यांसोबत कानाचेही पारणे फेडते.दगडांवरून वेगात वाहत खाली आल्यानंतर पृष्ठभागालगत संथ वाहणारे पाणी देखील तितकेच समाधान देते.कितीही तोच तोच पण असला हे दृश्य कधीच निरस होऊ शकत नाही.

सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कुठे फार लांब जावे लागत नाही.केवळ ४/५ वेळा पाऊस झाल्यावर पुण्यालगतच्या डोंगररांगांमध्ये बेमालूम वाहणारे हे छोटे धबधबे कमालीचा आनंद देतात.अशाच एका काहीश्या निर्जन रस्त्यावर अविरत निथळणारा हा छोटासा धबधबा.

फोटो काढताना एक विचार मनात डोकावला.असे अनंत ओहोळ अनेक ठिकाणी असतील.यापेक्षाही सरस निसर्ग अर्थातच असेल पण केवळ तिथे आपण पोहोचू शकत नाही म्हणून ते पाहता येत नाही आणि आपण त्या किमयेला मुकतो याची खंत जास्त.

जेव्हा निसर्ग आपले सौन्दर्य उलगडत असतो तेव्हा ते ग्रहण करताना खऱ्या अर्थाने आपलीच झोळी दुबळी ठरते एवढे मात्र नक्की.

Water is the most perfect traveler because when it travels it becomes the path itself.

Pune | India

 

No comments:

Post a Comment