Thursday, August 30, 2018

ऱ्हाईन

युरोपातील सर्वात मोठा धबधबा असे ज्याचे वर्णन केले जाते तो हा ऱ्हाईन धबधबा.सर्वात मोठा का असा प्रश्न फोटो पाहून नक्की पडू शकतो.फोटो कशाला प्रत्यक्षात पाहताना देखील हि शंका डोकं वर काढतेच.धबधबा म्हणजे उंचावरून कोसळणारे पाणी आणि जितक्या उंचावरून ते कोसळते त्यावरून तो मोठा कि लहान हे ठरतो हा माझा प्राथमिक समज होता.पण या माझ्या माहितीला संपूर्णपणे बगल देऊन नवीन माहिती पुढ्यात आली ती म्हणजे उंची सोबतच कोसळणाऱ्या प्रवाहाचा घेर हा घटक देखील धबधब्याला मोठा बनवण्यात तितकाच महत्वाचा आहे.आणि त्यामुळेच सुमारे तेवीस मीटर इतकीच उंची असूनही एकशे पन्नास मीटर रुंदीचा घेर या धबधब्याला युरोपातील सर्वात मोठा धबधबा बनवितो.


 

धबधब्यापेक्षाही त्याचा सभोवताल आणि रमणीयता जास्त भावते.रौद्र रूप नसल्याने बरेचदा फक्त तलावाकाठी फिरल्यासारखे वाटते.बोटीत बसून मुख्य प्रवाहाजवळ गेल्यास धबधबा जास्त जाणवतो.मध्यभागी असलेल्या दगडांमुळे मुख्य प्रवाह दोन समान भागात कापला गेला आहे.पात्र भव्य असल्याने कोसळणाऱ्या पाण्याला विसवायला पुरेसा वेळ मिळतो.धबधबा चारही बाजूने पाहता येत असल्याने कुठलाही कोपरा नजरेतून सुटण्याची सुतराम शक्यता नाहीये.हे या ठिकाणचे वैशिष्ठ्य.

एक सहज तलावाभोवती चक्कर आणि नौकाविहार या दोन गोष्टींचा आनंद घेण्यासाठी जाणार असाल तर नक्की भेट द्या.पण युरोपचा नायगारा म्हणून पहायला निघाला असाल तर निराशा पदरी येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.असो,याखेरीज तिथे असलेल्या बाराव्या शतकातील 'वर्थ' चा किल्ला लक्ष वेधून घेतो हि तितकीच जमेची बाजू.सध्या तिथे एक हॉटेल आहे.पण या वस्तूची बांधणी कायम स्मरणात राहते.

धबधबा हि कल्पना डोक्यात घेऊन आपण जातो पण त्याला न्याय मिळतोच असे नाही.अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे.माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगितले तर युरोपातील सर्वात मोठा धबधबा अशी बिरुदावली मिरवणारा 'ऱ्हाईन' तितकासा भव्य नक्कीच वाटत नाही.सौन्दर्य आणि भव्यता या दोन भिन्न गोष्टी आहेत.आणि 'ऱ्हाईन' हा सुंदर आहे.

- हृषिकेश पांडकर

The largest waterfall in Europe.

Rhein waterfall | 2018

 

Monday, August 27, 2018

Deotibba peak

बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर वाहणाऱ्या नद्या, बैठ्या घरांच्या तुरळक वस्त्या,कुरणांवर चरायला विखुरलेली पाळीव जनावरं किव्वा त्याच हिमाच्छादित शिखरातून तोंडाला फडकी गुंडाळून आणि हातात बंदुका घेऊन हिंसेच्या दिशेने मार्गक्रमण करणारे अतिरेकी या दोन्ही परस्पर विरोधी दृश्यांचा आणि माझा पहिला संबन्ध आला तो 'रोजा' या चित्रपटामुळे.


 

सुदैवाने अतिरेकी हा भाग सोडला तर यातील बाकीचा सर्व भाग प्रत्यक्षात पहायची संधी मिळाली.ट्रेकला असताना दुपारी दोन अडीचला कॅम्प वर पोहोचून तंबू लावल्यापासून ते सकाळी पुढच्या कॅम्पकडे निघण्यासाठी तंबू काढेपर्यंतचा वेळ म्हणजे भोवतालचे सौन्दर्य आठवणीत कैद करण्यासाठी मिळालेली संधीच असते.

सह्याद्रीचं रूप जर रांगडं असेल तर त्या तुलनेत हिमालय लोभसवाणा आहे.पसरलेल्या बर्फामुळे असे म्हणायचं मोह झाला असेल कदाचित.पण निसर्गच तो शेवटी त्याच्या लहरीपणाला मात ती कोण देणार ? त्याचा मूड चांगला असेल स्वर्ग फिका पडेल नाहीतर...दक्षिण भारत आपण तसेही बघतच आहोत की.

हा फोटो तसा जुनाच पण असंख्य आठवणींचे ओझे वाहतोय.पहाटेच्या लक्ख उन्हात चरायला सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एक जण या दगडावर चढला असतानाचा हा क्षण.बर्फ आणि सूर्यकिरणे यामुळे पल्याडली पर्वतरांग तितकीशी रेखीव नसली तरी 'हिमालयाची उंची' सर्वतोपरी स्पष्ट करणारी हि अभेद्य शिखरे डोळ्याचे पारणे फेडतात.या शिखरांच्या पुढ्यात उभा ठाकलेला हा जीव निसर्ग आणि इतर सजीव यांच्यातील प्रतीकात्मक दारी वेळोवेळी सिद्ध करतो.देवतिब्बा शिखराकडे मार्गक्रमण करताना वाटेतल्या एका कॅम्प वर टिपलेले हे दृश्य.

इथे किव्वा इतर कुठल्याही ठिकाणी निसर्गसानिध्यात फिरत असतान एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ते म्हणजे याच्याकडे सौन्दर्याची कुठलीच कमतरता नसते.किंबहुना ते सौन्दर्य वेचताना आपण प्रत्येक वेळी कमीच पडतो.आणि हीच कमी भरून काढायला पुढल्या वेळी हाच निसर्ग पुन्हा नव्याने खुणावत असतो.पुढल्या भेटीतही आपली झोळी कमीच पडणार याची पुरेपूर खात्री असूनही आपण तो आनंद टिपायला जातो यातच सगळं आलं नाही का 🙂

- हृषिकेश पांडकर

Deotibba peak | India

 

Monday, August 6, 2018

Cologne Cathedral

पुण्यातला जन्म आणि जडणघडण असल्याने कॅम्प परिसरात असलेली हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच चर्च पाहण्याचा योग आला.पाहण्याचा म्हणजे पत्ता सांगताना आधार घेता येईल इतकी शुल्लक ओळख.त्यानंतर भुताचे सिनेमे पाहताना जो काही संदर्भ आला तितकाच.


 

पुढे गोव्याला फिरण्याची संधी मिळाली आणि पोर्तुगीजांची चर्च बघता आली.मेणबत्ती,क्रॉस,येशूची प्रतिमा,ओळीत मांडलेली लाकडी बाकडी,रंगीत काचांच्या खिडक्या आणि भयाण शांतता या पलीकडे चर्चची आणि माझी अजूनही ओळख नाही.

मंदिर म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी प्रतिमा म्हणजे सर्वप्रथम तर दुतर्फा असलेली पूजेचे साहित्य आणि खेळणी विकणारी टपरीवजा दुकाने,नारळ,फुले आणि फळे यांची एकत्रित बांधणी करून विकणारे (गळी उतरविणारे) असंख्य विक्रेते,दारात असलेली घंटा,गाभाऱ्याच्या उंबरा ओलांडला कि येणारा कापूर,फुले,उदबत्ती,तुपाच्या वाती,अर्धवट जळलेले तेल आणि अत्तराचा सुगंध या सर्वांचा मिश्रित ओळखीचा असलेला वास नाकाचा ताबा घेतो.

मंदिर आणि शांतता हे समीकरण आपल्याकडे नाही इथपर्यंत मान्य.पण मंदिर आणि स्वच्छता हे हि समीकरण आपल्याकडे नाही हि गोष्ट जास्त दुर्दैवी वाटते.आणि नेमकी हीच शांतता या चर्च मध्ये प्रकर्षाने अनुभवायला मिळते.श्रद्धा अंधश्रद्धा हा वेगळाच मुद्दा,धर्म,पूजनीय देव-देवता हा देखील भिन्न भाग पण प्रार्थनेचे स्थळ कसे असावे याचा उत्तम नमुना म्हणजे चर्च.

आत मध्ये असणारी मूर्ती किव्वा त्यामागील कथा याविषयी माझी माहिती आणि अभ्यास तोकडाच.पण स्थापत्य,कलाकुसर,मांडणी आणि त्या संपूर्ण वास्तूची देखरेख याचे कौतुक नक्कीच.स्थापत्य,कलाकुसर आणि मांडणी यामध्ये आपली मंदिरे किंचितही मागे नाहीत किंबहुना दोन पावले पुढेच पण महत्वाचा भाग म्हणजेच देखरेख आणि देखभाल.आणि नेमके यातच आपण बरेचदा सपाटून मार खातो.

जर्मनी मधील कलोन या शहरात असलेले हे चर्च.जे प्रार्थनीय स्थळासोबतच पर्यटकांचेही आकर्षण बनले आहे.साधारण वीस हजार लोक इथे प्रत्येक दिवशी भेट देतात.या वास्तूच्या आतील बाजूने दगडी कमानींचे घेतलेले हे छायाचित्र.

पर्यटक आणि भाविक या दोघांचीही संख्या आपल्याकडे नक्कीच कमी नाही.त्या भाविकाला किव्वा त्या पर्यटकाला पवित्र्य वास्तूंचे मांगल्य आणि भव्यता खरंच अनुभवता येते का हा प्रश्न मात्र तितकाच अनुत्तरित राहतो.

- हृषिकेश

Tallest Roman catholic cathedral in the world.

Cologne Cathedral | Germany | 2018