Thursday, June 28, 2018

Versailles Palace

फ्रेंच राज्यक्रांती ज्याने आपल्यासमोर उलगडताना पहिली असा हा व्हर्साईलेसचा राजवाडा ज्याने चौदाव्या लुईच्या ऐषोआरामाच्या सगळ्या कल्पना,इच्छा आणि आकांशा सत्यात उतरवल्या.जगातील सर्वात मोठे राजकीय कार्यक्षेत्र किव्वा जगातील सर्वात मोठा राजेशाही वास्तव्याचा महाल म्हणजेच व्हर्साईलेसचा राजवाडा.सुमारे २०१५ एकर क्षेत्रात दिमाखात उभी असलेली हि भव्य वास्तू.


 

फ्रेंच राज्यक्रांती इतिहासाच्या पुस्तकात वाचली होती. त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आणि कालांतराने ती इथेच संपुष्टात आली.व्हर्साईलेसच्या करारावर स्वाक्षऱ्या होऊन पहिल्या महायुद्धाला १९१९ साली इथेच पूर्णविराम मिळाला.हा राजवाडा हि फक्त एक वास्तू म्हणूनच प्रसिद्ध नव्हती तर 'अँशियन' शासनाच्या संपूर्ण राजेशाही व्यवस्थेचे प्रतीक म्हणूनही याची ख्याती होती आणि राहिलाही.

राजा आणि राणीची भव्य दालने,नितांत सुंदर असलेला शिश-महाल आणि राजासाठी असलेला स्वतंत्र ऑपेरा जो 'रॉयल ऑपेरा' म्हणूनही ओळखला जातो.या आणि अश्या असंख्य दालनांनी सजलेला हा राजवाडा फ्रान्सच्या त्याकाळच्या वैभवाची नाळ अबाधित ठेवतो.यातील शिश-महाल अर्थातच जास्त चर्चेत आहे.जेव्हा हा महाल बांधण्यात आला तेव्हा काच बनवण्याची मक्तेदारी व्हेनिसकडे होती.आणि या काचेच्या कामासाठी फ्रांस राज्यकर्त्यांनी इटली मधून या कामगारांना आणले होते.मात्र काम पूर्ण झाल्यावर 'आमचे काच बनविण्याचे रहस्य सांगितले' या रागात इटालियन लोकांनी या कारागिरांना मृत्युदंड दिला अशी माहिती समजली.ही या कारागिरांची शोकांतिका.

व्हेनिस प्रत्यक्षात पाहण्याचा योग्य आला नाहीये पण तिथल्या वास्तुसौन्दर्याशी साधर्म्य बाळगणाऱ्या या महालावरून युरोपातील बांधकाम कौशल्याची कल्पना करणे सोपे जाते.भव्यता,मजबूतपणा,सममिती,प्रमाणबद्धता आणि त्यातही तितक्याच कल्पकतेने जपलेली कोरीव अदाकारी बाहेरूनच डोळ्याचे पारणे फेडते.

तिथल्याच एका फ्रेंच म्हाताऱ्याने गप्पांच्या ओघात सांगितले कि 'समोर दिसणारा राजवाडा इतका मोठा आहे कि स्वयंपाक घर आणि राजाचा भोजनकक्ष यातील अंतर कापेपर्यंत ते राजेशाही भोजन बरेचदा थंड होऊन जात असे.' यात अतिशयोक्ती किती आणि सत्य किती याचा शहानिशा मी केला नाही पण डोळ्याला दिसणाऱ्या वास्तवामुळे म्हाताऱ्याच्या वक्तव्यात तथ्य असल्याची जाणीव झाल्यावाचून राहिली नाही.

वेळेच्या अभावामुळे संपूर्ण राजवाडा पाहता येणे अर्थातच शक्य नव्हते.पण ओझरता आणि बाहेरून जितका न्याहाळता येईल तितका डोळ्यात साठवून घेतला.या राजवाड्याला लागूनच मागच्या बाजूस व्हर्साईलेसचे याहून जास्त मोठा बगीचा आहे.त्याबाबतीत पुढल्यावेळी लिहीनच.पण या ठिकाणाला भेट देणार असाल हे उद्यान आणि हा राजवाडा यासाठी संपूर्ण दिवस राखून ठेवा.कारण घाई घाईत खाल्लेला कितीही चवदार पदार्थ पचनासही त्रास देतो आणि चवीचा आनंद मनापासून देण्यातही तितकाच असमर्थ आणि असक्षम ठरतो.

- हृषिकेश पांडकर

I'd rather live in a cave with a view of a palace than to live in a palace with a view of a cave 🙂

Versailles Palace | France | June 2018

 

Monday, June 25, 2018

Chapel Bridge

 वयाची बत्तीशी पुण्यालाच अर्पण केल्यामुळे पूल किव्वा ब्रिज या शब्दांशी काही ठराविक नावे वयानुसार अंगवळणी पडली.जेमतेम दोन नद्या त्या नद्यांची 'पात्र' कालानुरूप 'फुलपात्र' होऊ लागलीयेत हा भौगोलिक बदलाचा दुःखद भाग समजून त्यावर तात्पुरती अलगद चादर घालुयात.तेवढेच मानसिक समाधान.असो,या नद्यांवर असलेले पुण्यातील पूल म्हणजे नवा पूल,बालगंधर्व पूल,एस.एम.जोशी पूल, झेड ब्रिज,राजाराम पूल आणि म्हात्रे पूल इत्यादी.


 

कसबा पेठेत लहानपण गेलं त्यामळे सुरुवात नव्या पुलाने केली.घराजवळची सर्वात जवळची बाग म्हणजे 'संभाजी उद्यान' त्यामुळे बालगंधर्व पूल नित्याचा झाला.शिक्षणाच्या ओघाने एस.एम.जोशी ब्रिज परिचयाचा झाला.माझ्या प्रेमाचा आनंद असला तरी पुण्यातील अनेक युगुलांच्या आनंदाचा साक्षीदार असलेला झेड ब्रिज हा सर्वश्रुत होताच.त्याच प्रमाणे केवळ गणपती विसर्जनाला इथे गर्दी होते आणि अलका टॉकीज हे पुण्यातील जुने चित्रपटगृह असून तेथे खूप छान इंग्रजी सिनेमे लागायचे,अशा चित्रपटगृहाकडे नेणारा म्हणून 'लकडी पूल' आपलासा वाटत आला आहेच (मात्र नावाप्रमाणे हा पूल लाकडाचा नाहीये).लग्नाची कार्यालये,ढोल-ताशांचा सराव आणि फटाक्यांची दुकाने यामुळे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा म्हणून म्हात्रे ब्रिजची ओळख आहे.केवळ सिंहगड रोडला जोडणारा आणि एखादा पत्ता सांगण्यास जिव्हाळ्याची खूण असणारा राजाराम पूल.अशा अनंत कारणांनी वावर असलेले आणि इथून पुढेही राहणारे पुण्यातले पूल किव्वा ब्रिज झिजवण्याची संधी मला मिळाली.

त्यानंतर मुंबईचा बांद्रा-वरळी 'सी लिंक' पाहण्याचा योग्य आला.कालांतराने कोलकात्याच्या हावडा पासून ते ब्रुकलिन आणि गोल्डन गेट ब्रिज पर्यंतचा अनुभव झाला.पण या फोटोसारखा अनुभव कुठेच आला नाही.

आता मुद्द्याकडे वळतो,वर वर्णिलेले आणि पाहिलेले पाण्यावरील सर्व पूल एकतर दगडाचे होते किव्वा लोखंड आणि तत्सम धातूचे होते मात्र हा फोटोतला पूल पूर्णपणे लाकडापासून बनविलेले आहे हा सर्वात मुख्य फरक.दुसरा तितकाच महत्वाचा फरक असा जाणवला कि हा संपूर्ण लाकडी पूल छताखाली बंदिस्त आहे.म्हणजे पावसात पुलावर उभे राहूनही भिजण्याची सुतराम शक्यता नाही.लाकडी बांधकाम आणि छप्पर असलेला हा 'Reuss ' (हा शब्द मराठीत कसा उच्चारला जातो याची कल्पना नाही) नदीवर बांधलेला संपूर्ण युरोपातील सर्वात जुना अशा प्रकारचा पूल आहे.

या पुलावरून फिरण्याचा अनुभव फार वेगळा होता.कारण पुलावर उभे राहून आकाश दिसत नाही अशी अवस्था इथे सर्वप्रथम पहायला मिळाली.याबरोबरच पुलावरून चालताना दुतर्फा असलेल्या लाकडी बांधणीवर बाहेरील बाजूने फुलाने सजलेले कठडे जास्त लक्ष वेधून घेतात.याच बरोबर पुलाच्या छतावर आतील बाजूने लावलेली सोळाव्या शतकातील ऐतिहासिक चित्रे भुरळ घालतात.

प्रत्यक्षदर्शी पूल तसा खूप मोठा नाहीये पण या वेगळेपणामुळे नक्कीच लक्षात राहतो.छतावर बाहेरील बाजूने जमा झालेले शेवाळे लांबून पाहताने पुलाचे सौन्दर्य वाढवते.पुलाच्या मध्यातून सभोवताल न्याहाळणे हा देखील मजेशीर भाग आहे.पुलाच्या उजव्या बाजूला विविध हॉटेल्स असल्याने नदीकडे तोंड करून मांडलेले टेबल्स आणि त्यावर दारू रिचवणारी गोरी जनता हेवा करण्याजोगी वाटते.

असा हा जगातील सर्वात जुना 'ट्रस' बांधणीतील पूल स्विझर्लंडच्या सौन्दर्यात अजूनच भर टाकताना दिसतो.आजूबाजूला असलेली म्युझियम,खरेदीची असंख्य दुकाने आणि हॉटेल्स असूनही ही लाकडी गोष्ट आपले वेगळेपण तितकेच जपून ठेवते आणि आकर्षितही करते.स्विझर्लंडच्या श्रीमंतीच्या व्याख्येत बसत नसला तरी त्या सधनतेत मोलाची भर टाकणारा २०५ मीटरचा लाकडी पूल नक्कीच प्रेक्षणीय आहे हे नक्की.

- हृषिकेश पांडकर

Kapellbrücke -

One of the oldest wooden foot-bridges in Europe.

Chapel Bridge | Switzerland | June 2018

Monday, June 18, 2018

ब्रोकन चेअर

 This chair .. More than just a furniture.

साहेबांच्या घरासमोर निदर्शनात्मक ठिय्या मांडणे, हि गोष्ट आपल्याला नवीन नाही आणि आंदोलन करूनही आपण त्या गोष्टीला राजी न होणे हेही आपल्या साहेबाला नवीन नाही.या आंदोलनात खुर्चीचा समावेश असेल तर मग आनंदच आहे आणि या सगळ्या गोष्टी परदेशात पहायला मिळणे या सारखा योगायोग नाही.किव्वा तो संबंध लावावा यासारखा निरागसपणा नाही.


 

याच गोष्टीची जाणीव होते ती जिनिव्हा मधील या 'ब्रोकन चेअर' स्मारकाला भेट दिल्यावर.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वापरलेल्या 'लॅन्डमाईन्स' अर्थात 'भू-सुरुंगाच्या' विरोधात सुरु केलेल्या चळवळीचे प्रतीक किव्वा त्या चळवळीच्या कराराचे स्मारक म्हणजे हे 'ब्रोकन चेअर' चे लाकडी शिल्प.

१९९७ साली भू-सुरुंग वापरायचे नाही असा तह/करार करण्यात आला होता.जो 'ओट्टोवा करार' म्हणूनही ओळखला जातो.यासोबतच जगातील सर्व राष्ट्रांनी या कराराला मान्यता द्यावी आणि भू-सुरुंगांचा वापर बंद करावा यासाठी 'Handicapped International या संस्थेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.आणि त्याच मोहिमेअंतर्गत 'डॅनियल बर्सेट' या कलाकारांकडून हि बारा मीटर उंचीची,साडेपाच टनांची लाकडी आणि एक पाय नसलेली खुर्ची बनविण्यात आलेली आहे.नसलेला पाय हा भूसुरुंगात जखमी अथवा मृत पावलेल्या व्यक्तींची जाणीव करून देतो.

याच्या इतिहासाची आणि परिणामाची इत्यंभूत माहिती विकिपीडियावर सहज मिळेलच पण एक पर्यटक आणि त्यातूनही भारतीय पर्यटक म्हणून मला याच्या वेगळ्या बाजू जास्त मजेशीर वाटत.

सर्वप्रथम तर हि खुर्ची इथे फक्त तीन महिने राहणार होती जी आता अखंडित वीस वर्ष इथे व्यवस्थित न डगमगता उभी आहे (तीनच पाय असूनही). बरं या 'ओट्टोवा' करारावर जगातील सर्व राष्ट्रांनी मान्य म्हणून सह्या केल्या आहेत का ? तर नाही.सध्या तरी अमान्य राष्ट्रांमध्ये अमेरिका,चीन आणि रशिया या आणि इतर पंचवीस देशांबरोबरच आपणही (भारत) त्यात समाविष्ट आहोत.म्हणजे आम्ही लॅन्डमाईन्स वापरणार असे आपले म्हणणे आहे. ..असो..युनाइटेड नेशन्सच्या जागतिक मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर हि खुर्ची उभारलेली आहे.म्हणजे शांततेचा अर्ज थेट राष्ट्रपती भवनात केल्यासारखा देखावा वाटतो.

एक स्मारक म्हणून आणि शांततेचे आवाहन करणारी हि खुर्ची तिच्या भव्यतेमुळे पहायला छान वाटते.त्यात युनायटेड नेशनच्या मुख्यालयासमोरच असल्याने ते शांततेचे आवाहन अजूनच चपखल बसते.असे हि खुर्ची पाहताना नेहमीच वाटत राहते.

अशा प्रकारे वर म्हणल्याप्रमाणे आवाहन करूनही भारत या गोष्टीला राजी झालेला नाहीये अशी मी पाहिलेल्या यादीवरून तरी माहिती मिळाली.करणे काहीही असोत पण स्मारक,साहेबांचे घर,सामान्य नागरिक आणि खुर्ची या चार नेहमीच्या गोष्टींचा संबन्ध इथे देखील पहायला मिळाला.

लोक कुठल्या गोष्टीसाठी स्मारक बांधतील आणि ते भविष्यात पर्यटकांचे आकर्षण बनेल याचा नेम नाही. तुटलेल्या पायाखाली उभे राहून समोरच्या युनायटेड नेशन च्या आवारात लावलेल्या सर्व देशांच्या झेंड्यांमधील भारताचा झेंडा शोधत आणि खुर्चीचे फोटो घेत तो अर्धा तास कसा सरला हे समजलेच नाही.पण एक वैविध्यपूर्ण स्मारक पहिल्याच आनंद घेऊन मी आज पुढे सरकत होतो.

हृषिकेश पांडकर

Broken Chair monument | Genève | June 2018