टेस्ट क्रिकेट किव्वा एकदिवसीय सामन्यात एखादी मोठी भागीदारी चालू असताना,भरपूर धावा होत असताना आणि विकेट पडण्याची सुतराम शक्यता नसताना समजा आपण जर स्लिप मध्ये उभे राहिलो असू आणि 'From no where' एखादा जोरात टाकलेला लेंग्थ बॉल बॅटची कड घेऊन थेट आपल्या गुडघ्याच्या उंचीवर आल्यावर एक क्षण जी मानसिक स्थिती होते ना तशीच अगदी तशीच अवस्था हा फोटो काढताना माझी झालीये.
प्रस्तावना झाली आता गाभा सांगतो.वर वर्णिलेल्या प्रसंगातून वाचकहो असा भावार्थ घ्या कि इतका वेळ आपण चालू असलेल्या प्रकाराशी इतके समरस झालेलो असतो कि अचानक आणि अनपेक्षित घडलेल्या घटनेकडे कदाचित दुर्लक्ष होते आणि ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो ती गोष्ट डोळ्यादेखत निसटते.अर्थात वरच्या प्रसंगात अगदी 'कॅचेबल हाईट' वर असलेला म्हणजे साधारण सहज झेलत येणारा चेंडू क्षणार्धात जमिनीवर सांडतो.खेळ पुन्हा तसाच पुढे चालू राहतो आणि पुन्हा एकदा तीच प्रतीक्षा अविरत सुरु राहते.
हे सांगायचं उद्देश असा कि अश्याच एका दक्षिण भारतातल्या संध्याकाळी जंगलातून जात असताना काहीतरी दिसेल या प्रतीक्षेत बराच वेळ होतो पण सय्यम अंत पहात होता.धुळी पासून कॅमेरा जपावा म्हणून झाकलेला कॅमेरा तसाच निपचित होता.सूर्य देखील नित्य नेमाने प्रदक्षिणा पूर्णत्वाला नेत होता.अगदी सूर्यास्त नाही पण किरणे मात्र चांगलीच लांबली होती.उन्हाचा उबदारपणा थंड वाऱ्याने बेमालूम चोरला होता.जंगल दिवसाच्या उत्तरार्धात विसावत होतं.
एवढ्यात एका वळणावरून आम्ही पुढे सरकलो आणि आमच्या काही फुटांवरून या बिबट्याने शांतपणे रस्ता ओलांडला.मागे वळून कॅमेरा काढून,त्याच्या आयपीस मधून तो बिबट्या पाहून आणि असलेल्या प्रकाशाचा हिशोब जुळवत जेव्हा घाई घाईत शटर दाबले तोपर्यंत राजे झुडपात नाहीसे झाले.हाती फक्त दोन फोटो राहिले.जंगल पुन्हा तेच आणि तोच पुढचा शोध कायम.
हाती लागलेल्या त्या दोन फोटोपैकी आत्ता टाकलेला हा एक फोटो.इतक्या वेळच्या सुस्तपणामुळे अचानक गडबडीत काढलेला फोटो.डोळ्यासमोर दिसणारा संपूर्ण बिबट्या तसाच सोडून शेजारच्या झाडाचे खोड व्यवस्थित फोकस झाले आहे.बिबट्या तसाच पसार झाला निसटता आणि धूसर.हाती आलेला चांगला फोटो गमावला तो भाग वेगळाच.पण क्षणार्धाच्या घाईमुळे आठवणीतला फोटो कायमचा गेला याचे शल्य जास्त.
असो …चालायचेच…प्रत्येक फोटोमागे काहीतरी आठवणी असतात त्याप्रमाणेच या धूसर फोटोमध्येही तितक्याच स्पष्ट आठवणी जपल्या गेल्या एवढे मात्र नक्की.घेतलेल्या झेलांच्या आठवणी कायमच आनंददायी असतात पण सुटलेल्या झेलांमधून शिकण्याची मजा काही वेगळीच नाही का ?
- हृषिकेश
Karnataka | India | November 2017