Wednesday, July 5, 2017

संडास

 ...आणि हा संडास..का हो..नाही म्हणजे इथेही ऑटोमॅटिक होता कि कुंथावं लागतं ?"

अगदी हेच वाक्य माझ्या डोक्यात आला जेव्हा वॉशरूमचा दरवाजा उघडून हि गोष्ट पहिली.जितकी आमच्याकडे संपूर्ण घरात बटणं नसतात तितकी या कमोडला होती.बसावं तर शॉक लागेल कि काय अशी उगीचच भीती वाटत होती.पण 'पुढचे काही दिवस यावरच बसण्याशिवाय गत्यंतर नाहीये' या भीतीचा आधार घेऊन उसन्या धैर्याने त्यावर आरूढ झालो.आणि या गोष्टी पुढे अंगळवळणी पडल्या तो पुढचा भाग.


 

पुण्यात अखंड बालपण आणि निम्मे तारुण्य (मी निम्मे हा शब्द मुद्दाम लिहिला आहे कारण वाचकांना वयाचा अंदाज येऊ नये) घालवल्या मुळे पुलंनी उल्लेख केलेल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा प्रत्यय आला होता.पण हा कमोड बघून पुलंचा शत्रुपक्ष प्रकर्षाने आठवला.संदर्भ नक्कीच वेगळा आहे पण भाईंच्या वर्णनाला चपखल बसणारे दृश्य पाहून एकाच वेळी पूर्वरंग आणि शत्रुपक्षाची आठवण झाली.या जपान्यांच्या घरात अशाच आणि इतक्या करामती केलेल्या होत्या कि पु.ल म्हणतात त्या प्रमाणे ते रहायचे घर आहे कि कौरवांची मोरू करायला बांधलेली मयसभा आहे याचा खरंच थांगपत्ता लागत नाही.पुढच्या चार पाच दिवसात पुन्हा एकदा 'मी आणि माझा शत्रुपक्ष' व 'पूर्वरंग' डोळ्याखालून घातले.घरापासून लांब राहूनही आपलेपणा वाटावा इतकं त्यात सामर्थ्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

आज हे लिहायचे कारण म्हणजे मित्रांनी वाढदिवसाला दिलेल्या या दोनही पुस्तकांच्या पहिल्या पानावर आजची तारीख आहे तेव्हाही बुधवारच होता.फक्त वर्ष तेवढे वेगळे होते,२०००.मी दहावीत होतो.सतरा वर्ष पूर्ण झाली.

खरंच,काही गोष्टी कितीही बदलल्या तरी काही गोष्टी तश्याच राहतात चिरकाल...निरंतर.

- हृषिकेश

 

No comments:

Post a Comment