Thursday, July 20, 2017

मर्फीचा नियम

 “Anything that can go wrong will go wrong.”

'निर्भेळ' या सौज्ञेवरचा विश्वासच उडलाय माझा..

पाऊस आणि गर्दी यांच्या फुगडीतून लवकर घरी पोहोचावं तर शेवटच्या टप्प्यातील रस्त्याचे काम वेळ चोरून नेते.ऑफिस मधून लवकर निघाल्याचा निर्भेळ असा आनंद, नेहमीचीच वाट हिरावून नेते.

यश तर नाहीच पण निर्भेळ अपयशानेही हात सोडलाय माझा..हरल्यासारशी हरणे होतेच..मार्जिन मात्र तोकडे पडते..हि मॅच दणदणीत हरलो तर पुढली मॅच किमान ऑस्ट्रेलिया बरोबर खेळावी लागणार नाही या समाधानालाही मी पारखा होतो..जिंकण्याचा आनंद दूरच राहिलाय ..पराभवही मनासारखा नसतो.

हाफ चड्डी आणि बनियनवर तक्क्याला टेकून चहात खारी बुडवत मॅच पहायला बसतो तेव्हा सोसायटीचे सेक्रेटरी वॉचमनच्या पगाराचा हिशोब सेटल करायला दत्त म्हणून हजर होतात...पुढे नाईलाजास्तव कपडे चढवावे लागतात..चहा,खारी,तक्क्या,मॅच या निर्भेळ आनंदाला जाता जाता तेवढी हाय लागते.

मर्फीचा नियम म्हणजे अजून काय वेगळे असते..?

वर्षा सहलीला टळटळीत ऊन आणि रेनकोट नसताना मुसळधार पाऊस परीक्षा पाहतो का खिल्ली उडवतो हेच मला अजून समजत नाही.

खिशात कायम दोन चाव्या असतात,प्रत्येक वेळी पहिल्यांदा चुकीचीच चावी हातात येते..हे म्हणजे ५०-५०-९० चा नियम झाला..एखादी गोष्ट योग्य पद्धतीने होण्याची शक्यता जर ५०-५० असेल तर ती अयोग्य रीतीने होण्याचे प्रमाण ९० टक्के असते हा समज दृढ होत चाललाय माझा.

काही लोक लांबून छान दिसतात..इतकेच काय तर जवळूनही छान दिसतात.प्रश्न फक्त इतकंच आहे कि बोलायला तोंड उघडले कि कमालीचे नकोसे होतात.हे उदाहरण प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो याचे आहे कि मी विज्ञानाची टर उडवतोय ?

एखादा महत्वाचा फोन येणार असेल तर साधारण त्याच वेळेला रेंज जाऊन हकनाक शिव्या पदरात पडून घेण्याचे श्रेय कधी अनुभवलंय ? ब्रेडला जॅम किव्वा बटर लावताना चुकून हातातून ब्रेड पडला तर कायम तीच बटर वाली बाजू खाली पडलेली पाहून कधी नशिबाला दोष दिलाय ? पण याला दुर्दैव म्हणत नाहीत..हाच तो मर्फीचा लॉ आहे जो फक्त माझ्याच बाबतीत सफल होतो असं प्रत्येकाला वाटत. 🙂

काही वेळा सहज गाडीवरून जाताना अशा दैनंदिन आयुष्यात येणारे प्रसंग आठवतात आणि मग त्याची कारणमीमांसा करण्याची इच्छा होता.तर अशाच काही प्रसंगांचा उल्लेख इथे केला.अश्या अनंत घटना रोज घडतात.

बरं या गोष्टी बदलल्या पाहिजेत,यावरील उपाय किव्वा या गोष्टी होऊच नये यासाठी घेता येणारी काळजी वगरे गोष्टींवर मी बोललेलो नाही. फक्त अनुभव सांगितले.कारण काही गोष्टी न बदलता तश्याच अनुभवण्यात देखील वेगळीच मजा असते.तुमच्या बाबतीत असे काही मर्फीचे अनुभव असतील तर सांगा नक्की.कारण दुसऱ्याच्या अनुभवात 'अरे हो माझंही नेहमी असंच होतं' असे वाटण्यात एक वेगळाच आनंद असतो. नाही का ?

- हृषिकेश

 

No comments:

Post a Comment