|| श्री ||
प्रति,
खेळणाऱ्या त्या ११ जणीस,
पत्र लिहिण्यास कारण कि,
कौतुक करावं की सांत्वन करावं या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलोय.राग व्यक्त करावा की या मेहनतीला शाबासकी द्यावी या दोन दगडांवर मी पाय ठेऊन उभा आहे.जिद्द,साहस,चिकाटी आणि मेहनतीने तुम्ही अंतिम फेरी गाठलीत तिथेच तुम्ही करोडो भारतीयांची मन जिंकलीत.या तुमच्या वाटचालीसाठी तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे.पण अंतिम सामन्यात तुम्हाला इंग्लंड ने हरवले असे म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून हरलात हे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.चार वर्षांनी येणारी हि सोनेरी संधी शेवटच्या काही क्षणात डोळ्यासमोरून निसटली.
अंतिम सामन्याचा दबाव, समोरच्या संघाचा दबदबा,मोठी स्पर्धा, प्रतिस्पर्ध्याच्या घरचे मैदान या आणि अश्या अनेक अडचणी नक्कीच होत्या.कागदी आघाडीवर गोर्यांचा संघ सरस होताही कदाचित.पण याचा परिणाम नव्वद टक्के सामन्यात तुमच्यावर अजिबात झाला नाही.मग शेवटच्या दहा टक्क्यात ती जिद्द,ती चिकाटी आणि तो सय्यम किंचितसा कमी पडला आणि मन जिंकणाऱ्या तुम्ही करंडक जिंकण्यापासून अजून चार वर्षाकरीता वंचित राहिलात.
तुम्ही हरलात याचे दुःख किव्वा राग नाहीये.मात्र अंतिम सामन्यासहित संपूर्ण मालिकेत ज्या जबाबदारीने तुम्ही खेळलात नेमका तोच अभाव शेवटच्या अर्ध्यातासात दिसून आला आणि करंडकाचे स्वप्न भंगले.निराशा पूर्णपणे लपवून पुढे जाण्याइतका संत मी अजून झालो नाहीये.त्यामुळे जेमतेम महिन्याच्या अवधीत दोन मोठ्या स्पर्धांच्या पराभवाचे ओझे कदाचित मला अजून जड भासत असावे.पण तुमच्या कष्टाला अगदी शेवटच्या क्षणाला लागलेली नजर हुरहूर लावून गेली.
असो, खेळाडू म्हणून यश आणि अपयश तितक्याच समर्थपणे जर तुम्ही पचवू शकत असाल तर एक प्रेक्षक म्हणून आम्ही देखील हा पराभव तितक्याच सकारात्मक पद्धतीने घेणे अपेक्षित आहे.आणि ते आम्ही नक्की करूच.पण विश्वविजेतेपद गमावल्याची रुखरुख मात्र लागून राहील एवढे निश्चित.
प्रत्येक अनुभव हा नवीन असतो.जो संघ सुरुवातीला स्पर्धेसाठी पात्र सुद्धा ठरेल कि नाही इथपासून प्रवास सुरु करतो आणि थेट अंतिम फेरीत धडक मारतो त्याचा आम्हाला कायमच अभिमान राहील.मायदेशी जेव्हा विमानतळावर उतराल तेव्हा ताठ मानेने या,संपूर्ण देश तुमच्या स्वागताला उभा असेल.
हृषिकेश
भारत