Friday, December 15, 2017

सुटलेल्या झेलांच्या आठवणी

 टेस्ट क्रिकेट किव्वा एकदिवसीय सामन्यात एखादी मोठी भागीदारी चालू असताना,भरपूर धावा होत असताना आणि विकेट पडण्याची सुतराम शक्यता नसताना समजा आपण जर स्लिप मध्ये उभे राहिलो असू आणि 'From no where' एखादा जोरात टाकलेला लेंग्थ बॉल बॅटची कड घेऊन थेट आपल्या गुडघ्याच्या उंचीवर आल्यावर एक क्षण जी मानसिक स्थिती होते ना तशीच अगदी तशीच अवस्था हा फोटो काढताना माझी झालीये.


 

प्रस्तावना झाली आता गाभा सांगतो.वर वर्णिलेल्या प्रसंगातून वाचकहो असा भावार्थ घ्या कि इतका वेळ आपण चालू असलेल्या प्रकाराशी इतके समरस झालेलो असतो कि अचानक आणि अनपेक्षित घडलेल्या घटनेकडे कदाचित दुर्लक्ष होते आणि ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो ती गोष्ट डोळ्यादेखत निसटते.अर्थात वरच्या प्रसंगात अगदी 'कॅचेबल हाईट' वर असलेला म्हणजे साधारण सहज झेलत येणारा चेंडू क्षणार्धात जमिनीवर सांडतो.खेळ पुन्हा तसाच पुढे चालू राहतो आणि पुन्हा एकदा तीच प्रतीक्षा अविरत सुरु राहते.

हे सांगायचं उद्देश असा कि अश्याच एका दक्षिण भारतातल्या संध्याकाळी जंगलातून जात असताना काहीतरी दिसेल या प्रतीक्षेत बराच वेळ होतो पण सय्यम अंत पहात होता.धुळी पासून कॅमेरा जपावा म्हणून झाकलेला कॅमेरा तसाच निपचित होता.सूर्य देखील नित्य नेमाने प्रदक्षिणा पूर्णत्वाला नेत होता.अगदी सूर्यास्त नाही पण किरणे मात्र चांगलीच लांबली होती.उन्हाचा उबदारपणा थंड वाऱ्याने बेमालूम चोरला होता.जंगल दिवसाच्या उत्तरार्धात विसावत होतं.

एवढ्यात एका वळणावरून आम्ही पुढे सरकलो आणि आमच्या काही फुटांवरून या बिबट्याने शांतपणे रस्ता ओलांडला.मागे वळून कॅमेरा काढून,त्याच्या आयपीस मधून तो बिबट्या पाहून आणि असलेल्या प्रकाशाचा हिशोब जुळवत जेव्हा घाई घाईत शटर दाबले तोपर्यंत राजे झुडपात नाहीसे झाले.हाती फक्त दोन फोटो राहिले.जंगल पुन्हा तेच आणि तोच पुढचा शोध कायम.

हाती लागलेल्या त्या दोन फोटोपैकी आत्ता टाकलेला हा एक फोटो.इतक्या वेळच्या सुस्तपणामुळे अचानक गडबडीत काढलेला फोटो.डोळ्यासमोर दिसणारा संपूर्ण बिबट्या तसाच सोडून शेजारच्या झाडाचे खोड व्यवस्थित फोकस झाले आहे.बिबट्या तसाच पसार झाला निसटता आणि धूसर.हाती आलेला चांगला फोटो गमावला तो भाग वेगळाच.पण क्षणार्धाच्या घाईमुळे आठवणीतला फोटो कायमचा गेला याचे शल्य जास्त.

असो …चालायचेच…प्रत्येक फोटोमागे काहीतरी आठवणी असतात त्याप्रमाणेच या धूसर फोटोमध्येही तितक्याच स्पष्ट आठवणी जपल्या गेल्या एवढे मात्र नक्की.घेतलेल्या झेलांच्या आठवणी कायमच आनंददायी असतात पण सुटलेल्या झेलांमधून शिकण्याची मजा काही वेगळीच नाही का ? 

- हृषिकेश

Karnataka | India | November 2017

 

Friday, December 8, 2017

किल्ल्यावरचा वाघ

 लहानपणी दिवाळीत घराच्या बाल्कनी मध्ये किल्ला बनवायचो.'लहानपणी' हा शब्द मुद्दाम वेगळा नमूद करावा लागतोय याचे कारण एकतर मी (वयाने) मोठा झालोय किव्वा मी आता किल्ला बनवत नाही.अर्थात दोन्ही गोष्टी तितक्याच क्लेशदायक आहेत.असो तर या दिवाळीच्या आमच्या किल्ल्यावर कायमच वाघाला अभेद्य स्थान असायचे.वर्षानुवर्षे त्याच आवेशात बसलेला वाघ किल्ल्याची शान असायचा.


 

अळीव किव्वा मोहरीच्या बनात आणि विहिरीला खेटून असलेल्या गुहेत गवतात चरत असलेल्या गाई आणि हरणांना न्याहाळणारा तो जंगलचा राजाची तेव्हाही तसूभर हालचाल नसायची आणि आजही तो यत्किंचित हलला नाही.त्याच विहिरीवर पाणी भरायला आलेल्या बायका शांतपणे बसून तो तेव्हाही पहायचा आणि आज आमची संबंध जिप्सी असूनही तो जरासाही वळला नाही.

तशीच मुद्रा,तोच आवेश,तसाच रुबाब आणि तेच सौन्दर्य.अंगाभोवती गवत असूनही आपले वेगळे पण जपणारा तो वाघ आज पुन्हा आठवला

नाही म्हणायला मधले काही क्षण पाठीवर लोळला देखील पण फोटो काढायला त्याची परवानगी नसावी.काही वेळ तर पलीकडे तोंड करून झोपला होता; हाक मारायची देखील सोय नाही.नंतर कदाचित आमची कीव येऊन त्याने आमच्याकडे मान फिरवली असावी.

तोच हा क्षण,टीव्हीवरच्या दोन कार्यक्रमात जाहीरात लागावी त्याप्रमाणे सूर्यास्त आणि रात्र या मध्ये केवळ रंग दाखवून जाणारा संधिप्रकाश पसरला होता.आमची सफारी संपण्याची वेळ झाली होती आणि याच्या रात्र सफारीचा तो प्रारंभ होता.

पुढ्यात बसलेला वाघ सोडून निघून जाणे इतका माज करण्याची संधी सुदैवाने कधीच मिळाली नव्हती.पण एखाद्याच्या घरी न सांगता भेटीला जायचे म्हणल्यावर त्याच्या 'रुटीन' ला अडथळा येणार नाही याचे भान ठेवणे यासारखे सामंज्यस्य नाही हेच खरे..नाही का ?

- हृषिकेश

 

Friday, December 1, 2017

नायगरा

आपल्याजवळची नैसर्गिक संपत्ती जगासमोर कशी मांडायची आणि त्याचे चार चौघांकडून कौतुक कसे करून घ्यायचे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अमेरिका.अर्थात यातही कला आहे प्रश्नच नाही.मुख्य म्हणजे आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दलची आस्था हा खूप मोठा घटक आहे. 'पिकतं तिथं विकत नाही' हे जरी आपण मान्य केले तरी काही लोक मात्र पिकवून,छान पॅकिंग करून,सजवून त्या गोष्टी विकतात हेही तितकेच खरे आहे.


 

स्वतःकडे काय आहे आणि ते लोकांसमोर कश्याप्रकारे मांडल्यावर त्याची किंमत सर्वार्थाने वसूल होईल याचा ज्याला अंदाज असतो तोच खऱ्या अर्थी प्रगत म्हणावा लागेल.कदाचित हे अमेरिकेच्या महासत्ता होण्यामागचे एक कारण असू शकेल.आणि दुर्दैवाने याच गोष्टीचा अभाव आपल्याकडे दिसून येतो.याला किव्वा या पाठीमागे अनंत कारणे असतीलही पण याचा फटका मात्र एक राष्ट्र म्हणून आपल्याला जोरात बसतोय.

याचा प्रत्यय मला येत होता जेव्हा मी नायगारा धबधबा पहात होतो.लोकांनी प्रेमातच पडाव अश्या प्रकारे पाहण्याची सोय इथे केलेली आहे.धबधबा हा नक्कीच भव्य आणि सुंदर आहेच.पण तोच धबधबा रात्री पाहण्याची केलेली सोय,रंगबिरंगी प्रकाशझोत सोडून त्याचे खुलवले रूप,धबधब्याच्या पोटात जाऊन आनंद घेण्यासाठी केलेली बोटीची फेरी या गोष्टी अजून आपल्याला धबधब्याच्या प्रेमात पाडतात.

एखादे पर्यटन स्थळ कसे असावे किव्वा एखादे पर्यटन स्थळ जतन कसे करावे याचा मानदंड इथे पहायला मिळतो.धबधबे आपल्याकडे चिक्कार आहेत.पण जगभरातून ते पाहण्यासाठी लोक येतात अशी एकही धबधब्याची ओळख आपण अजून निर्माण करू शकलो नाही हे वास्तव आहे.तिथेही पाणीच वाहते आणि इथेही पाणीच वाहते.दूधसागरची उंची तर नायगारा पेक्षा जास्त असेल कदाचित.पण दूधसागर अखंड पाहता येईल अशी एकही सोय एकही जागा आपल्याला करता आलेली नाही याचे वाईट वाटते.

निसर्ग,कला आणि संस्कृती यांच्या वैविध्यतेने संपन्न असलेल्या आपल्या राष्ट्रात पहायला मिळणार नाही अशा गोष्टी फार कमी आहेत.मात्र तिथपर्यंत पोहोचून त्याचा आनंद घेणे हे कदाचित अनेक कारणांमुळे दुरापास्त होत आहे आणि हीच गोष्ट आपल्यात आणि विकसित राष्ट्रात अंतर वाढवण्यात कारणीभूत ठरत आहे का अशी शंका निर्माण होते.

अर्थात हे सांगत असताना नायगऱ्याचे महत्व आणि सौंदर्य हिरावून घेण्यात काहीच अर्थ नाहीये.त्यामुळे शक्य झाल्यास या दोन राष्ट्रांच्या सीमेवर अविरत कोसळणाऱ्या फेसाळ गोड्या पाण्याच्या जलाशयाला नक्की भेट द्या.अमेरिकेची ओळख म्हणून याचे नाव का घेतले जाते याचा अंदाज सहजच येईल.

- हृषिकेश