Wednesday, January 28, 2015

मला त्या गावी जायचय...




शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ
असावी...
स्कवेअरफुटाचा हिशोब नको फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी..
श्रीमंती घरात नसली तरी बेहेत्तर,संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी..
महिना अखेरच्या पगारची आस न
सावी..meeting,appraisal,onsiteचा गंध नसावा..
मला त्या गावी जायचय... 

उजव्या भिंती पालिकडल्या खोलीत पू.ल रहात असावेत…
सकाळी त्यांच्याच पेटीने जाग यावी..
नळावरील भांडणे शाळेची गडबड नोकरदारांची घाई आम्ही दोघांनी एकत्र पहावी..
पू.लनी प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करावी..व मी मनसोक्त हसावे..
बटाट्याच्या चाळीतील सगळी मंडळी तिथेच वास्तव्यास असावी...
तीच दृष्य तेच सण त्याच चर्चा आज भाईनसमवेत अनुभवाव्यात
मला त्या गावी जायचय...

चाळीच्या समोर ते 'चौकोनी कुटुंब' बंगल्यात रहात असावे..
उन्हाळ्याच्या सुट्टीत अंतुशेटांच्या पोफळीच्या बागेत विसावा घ्यायचाय..
नंदा प्रधानच्या गाडिवर बसून मरीन ड्राइव पहावा...
त्याने केलेले मुलीचे वर्णन याची देही अनुभवावे..
रोज पानवला बघतो...आज भाईंबरोबर त्याला भेटावे..
मला त्या लग्नात जायचय जिथे नारायणाचा मुरारबाजी झालाय..
मला त्या गावी जायचय...

खूप शिवाजयंत्या पाहिल्या...आज भाइ आणी हरितात्यानसोबत राज्याभिषेक पहायचाय..
उभे राहीला लागले तरी चालेल पण त्या 'म्हैस'वाल्या ST मधेच चढायचय..
अगदी पू.लन्च्या शेजारी नाही..पण मागे तरी रहायचय..

कुंभारलीचा घाट उतरून चिपळुनात विसवायचय..
आमच्याच चाळीत शेजारी येणार्या सखाराम गटण्याला एकदा घरी चहाला बोलावायचय..

मला त्या गावी जायचय...

मुंबईला जाताना पेस्तन काकांबरोबर गप्पात रामायचय..
पू.ल आणी पेस्तन काकांच्या गप्पांमधून खूप काही अनुभवायचय..
लक्ष्मणांच्या 'कॉमन मॅन' ला घरी रहायला बोलावायचय..
तो जाइल तिथे..जाइल तेव्हा त्याच्याबरोबर हिंडायचय..

मला त्या गावी जायचय...

खूप इच्छा आहे 'चितळे मास्तरांना' एक नवीन चप्पल जोडी घेऊन द्यायची..
कितीही त्रासदायक असले तरी शत्रूपक्षाच्या ट्रिपचे फोटो बघायला जायचय..

फोटो बघत असताना त्यांचीच चाललेली चर्चा ऐकून खूप बोर व्हायचय
एखाद्या इमारतीचे बांधकाम बघायला भाईंना अग्रह करायचाय..
एखाद्या कार्यक्रमाला भाईनसोबत प्रमुख पाव्हणा म्हणून मिरवायचय...


मला त्या गावी जायचय...

अगदी जपान युरोपची सहल नको..
फक्त दुपारच्या चहाला पु.लन्च्या तोंडून ते ऐकायचय..
जपानी पंखा असो की युरोपियन दारू..त्याचा अनुभव भाईंच्या प्रत्यक्ष वर्णनातून घ्यायचाय
जन्मावरून पुणेकर असलो तरी मुंबईकर आणी नागपूरकर पण व्हायचय
कॉमन मॅन सारखे डोळे करून..पू.ल आणी अत्र्यांना गप्पा मारताना ऐकायचय..

मला त्या गावी जायचय...

'बालगंधर्वच्या' उद्घटानात पु.लन्चा श्रोता व्हायचय
सुनीता बाईंच्या व्याघ्रदर्शनाला कॅमेरयाशिवाय जायचय
आमच्या चाळीतल्या लोकांबरोबर 'त्या' पुण्याच्या प्रवासाला जायचय.
गच्चीच्या चळवळीत घोषणा द्यायला जायचय..

मला त्या गावी जायचय...

काल्पनिक असलो तरी चालेल..
पण R.K.च्या त्या कॉमन मॅन सारख बनून पु.लन्च्या संपूर्ण प्रवासात एक सहप्रवासी व्हायचय..


...फक्त एकदाच मला त्या गावी जायचय...



                                                                                   हृषिकेश पांडकर
                                                                                                    २८.०१.२०१५
 

8 comments:

  1. सर्वसामान्य मराठी जनाचे मनातील- द्वन्दाचे सुरेख प्रतिबिंब………. !

    ReplyDelete
  2. मलाही त्या गावी जायचे आहे... खूपच मस्त... ज्यांनी pu.la. वाचले आहे त्याच्यासाठी खूपच मस्त अनुभव आहे.

    ReplyDelete
  3. मंत्रमुग्ध केले आहे या लेखाने
    असे खरेच अनुभवायला मिळेल की नाही माहित नाही
    पण विचार येताच थोडा वेळ तरी सुखावह जातो..
    ह्रिषिकेष
    असेच पुलं आम्हाला सदैव साक्षात्कार देतील तुझ्यारूपाने अशी आकांक्षा बाळगतो आहे
    स्वानंद

    ReplyDelete
  4. Kya Baat, Kyaa Baaat... Kyaaa Baaaat !!!

    ReplyDelete
  5. --कधीही न भेटणार्या मनातील गावाच्या शोधातील मनस्वी भटकंती ------!

    ReplyDelete