Sunday, January 4, 2015

हाती लागलेले मृगजळ - 'लास वेगस'



निसर्गाने ताटात वाढून ठेवलेलया पदार्थांचा उपभोग घेणे ही पर्यायाने सोपी गोष्ट आहे.सोपी असलेली गोष्ट देखील आपण पूर्णपणे करत नाही हा भाग निराळा.बरेचदा या निसर्गाच्या वरदहस्ताची अवहेलनाच दिसून येते.दुर्दैव देणार्याचे कि आपल्यासारख्या स्वीकारणाऱ्याचे हा प्रश्न तितकाच अनुत्तरीत. 

          कदाचित वरच्या वर्णनातून आपण काय वाचत आहोत याचा संदर्भ लागणे अवघड आहे.पण लेखाची सुरुवात जड शब्दांनी केली की पुढे केलेल्या वर्णनाला दाद मिळू शकते हे मला माझ्या पहिली ते दहावीच्या मराठीच्या पुस्तकाने शिकविले.

          असोतर पहिल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे निसर्गाने वाढलेले ताट म्हणजे आपल्या सभोवताली असलेले जंगल,समुद्र,वाळवंट,प्राणी,पक्षी आणि इतर बर्याच गोष्टी,ज्या आपण हक्काने आणि पोटभरून पाहू शकतो.आता या गोष्टी जश्या आहेत तश्या बघणे हि तर इतकी सहज आणि सुंदर गोष्ट आहे की त्याची तुलना इतर कशाशीही होवू शकत नाही.कदाचित याआधी जंगल,समुद्र,बर्फ आणि पाऊस या गोष्टींचे वर्णन तुम्ही वाचले असेलच.आज मी तुम्हाला अशीच गोष्ट वाचायला भाग पाडणार आहे.यावेळी मात्र असा विचार आहे की याच निसर्गाच्या चौथर्यावर मानवनिर्मित उभारलेला दरबार किती अद्भुत आणि अविस्मरणीय असू शकतो याची जाणीव करून द्यावी.

          समुद्रावर उभारलेले मोठे पूल पाहिले,जंगलात बांधलेली फार्म हाउस पाहिली,बर्फात उभारलेली अलिशान घरे पाहिली,पाण्याखाली बांधलेली भव्य प्रयोगशाळा पाहिलीआता वेळ आली होती ती रुक्ष कोरड्या वाळवंटात,रात्री थंडीने गारठणार्या आणि दुपारी उन्हाने तापणाऱ्या सोनेरी रेतीत मांडलेला जुगार अड्डा बघण्याची.'The Entertainment Capital Of World' ज्याला म्हटले जाते असे 'लास वेगास' पाहण्याची.एखाद्या वाळवंटावरील सात किलोमीटरचा रस्ता जगाच्या मनोरंजनाची राजधानी कशी होवू शकते हे कुतूहल घेवून उडालेले विमान जेव्हा वेगस विमानतळावर विसावते तेव्हा अलीबाबाच्या गुहेत जाणार्या त्या चाळीस चोरांची मानसिकता जशी होती तशीच माझी पण झाली होती.स्वर्गात जेव्हा सारीपाट खेळला जात होता तेव्हा कदाचित मद्य आणि मदिरेच्या प्रभावाखाली आल्यामुळे हातातून पडलेले खेळाचे फासे भूतलावर येवून याच वाळवंटात पडले असा भास मला वेगस विमानतळावरून हॉटेल मध्ये जाताना होत होता.होणारा भास आणि वास्तव यात आता फक्त काही मिनिटांचाच अवधी शिल्लक होता.

वेगस म्हणजे तो सात किलोमीटरचा पट्टा आहे ज्याला 'Las vegas Strip' असे म्हटले जाते.त्याच रस्त्यावरून मी बसने हॉटेलवर निघालो होतो.डिसेंबरच्या थंडीत पडलेले दुपारी बाराचे ऊन पावसाळ्यात सिग्नलला एखाद्या ट्रकच्या सायलेन्सर शेजारी उभे राहिल्यावर मिळणारे समाधान देत होते.पण दुतर्फा असलेला नजारा यातील एकही ऋतूचा थांगपत्ता लागू देत नव्हता.

प्रवासाचा शीण बोर्डिंग पास बरोबरच कचर्यात टाकल्यामुळे मावळणारा सूर्य उगवणाऱ्या चंद्राच्या साक्षीने काय दाखवणार याची उत्सुकता सोबत घेवूनच मी हॉटेल मध्ये चेकइन केले.
स्ट्रीपच्या एका टोकाला हॉटेल असल्यामुळे संपूर्ण रस्ता पालथा घालून हॉटेलच्या दारात येवून ठाकलो.सामान घेवून लॉबी मध्ये गेलो.सुमारे दोन इंचाचे गालिचे संपूर्ण हॉटेलभर अंथरले होते.काचेचा दरवाजा उघडला आणि बाहेर थंडी आहे की ऊन याचे गणित चुकविणारा सुखद वार्याचा झोत अंगावर आला.हॉटेलचा संपूर्ण तळमजला दिव्यांनी न्हावून निघाला होता.'लक्ष्मी लॉटरी सेंटर' अशा पडदा लावलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर जायची वेळ कधी आली नाही पण तो काचेचा उघडलेला दरवाजा आणि त्या अड्ड्यावरचा तो मळलेला पडदा पलिकडची दुनिया तांत्रिकदृष्ट्या सारखीच पण तितक्याच कमालीची विसंगती मी न्याहाळत होतो.हॉटेलचा संपूर्ण तळमजला नजर जाईल तिथपर्यंत कसिनो ने व्यापला होता.मी आवंढा गिळला आणि खोलीचे दर लावले.




 सूर्याने दिवसभर काम चोख बजावले होते.सुर्य अस्ताला टेकला आणि रस्त्यावरच्या दिव्यांनी शहराचा ताबा घेतला.'Gambling City' या नावाखाली वावरणाऱ्या रस्त्यावर मी पहिले पाऊल ठेवले.आणि या नावाला न्याय देण्यासाठी समोरचा रस्ता सज्ज होता.थंडी असूनही फार जाणवत नव्हती.आता आपल्यापेक्षा कमी कपडे घालणाऱ्या सुंदर मुली जर थंडीची फिकीर करत नसतील तर माझ्यासारख्याने थंडी थंडी म्हणून त्याचा बाऊ करणे बरोबरही दिसत नाही.रस्त्यावर असलेल्या गर्दीतील प्रत्येक चेहेरा पाहण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता.कारण सवयीच्या गोष्टी दुर्लक्षित होतात कदाचित, पण ज्या गोष्टींची सवय नसते त्या गोष्टी निरखुनच पाहणे योग्य.त्यामुळे गर्दी असली तरी त्याचा त्रास होत नव्हता.

दुतर्फा रोषणाईने न्हावून निघालेली ती हॉटेल्स,त्यांच्या तळमजल्यावर असलेले अलिशान कसिनो,कुठल्याही हॉटेलमध्ये फुकट मिळणारा प्रवेश,कुठेही आणि कितीही वेळ थांबण्याची असलेली मुभा,कंटाळा येईपर्यंत फोटो काढण्याची परवानगी आणि नजर जाईपर्यंत पसरलेले सौंदर्य घड्याळ आणि पर्यायाने वेळेशी असलेली नाळ तोडून टाकत होते.इथे 'Time is Money' हे समीकरणच नाहीये.इथे Time + Money = Vegas हे एकाच सूत्र सगळ्या गणितांसाठी वापरले जाते.

असच फिरता फिरता एका हॉटेलच्या कसिनोमध्ये 'High Stakes Poker' लिहिलेल्या दालनात आलो.दालन हा शब्द मुद्दामच वापरला कारण शंभर एक लोक शांतपणे खुर्चीवर बसून पोकर खेळत होती.किमान १०० अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे ६००० रुपये हि प्राथमिक किंमत लावून तुम्ही खेळू शकता.लोक आनंदाने खेळत होते.हातात दारूचा ग्लास,तो पुढ्यात आणून देणाऱ्या सुंदर तरुणी,पत्ते पिसून वाटणार्या देखण्या अप्सरा,जिंकलो तर आनंदच आणि हरलो तरी आनंदच होता.'वय वर्ष अठरा' एवढी एक अट सोडली तर बाकी कुठलीही अट या रस्त्याला नाही.८० वर्षाच्या म्हातारी पासून २५ वर्षाच्या तरुणीपर्यंत सगळ्या वयातील लोक जुगारी आनंद उपभोगत होते.कुठेही घाई किव्वा गोंधळ दिसत नव्हता.प्रत्येक खेळणारे,तिथे काम करणारे सगळेच कायम हसतमुख आणि आनंदी दिसत होते.आणि कदाचित हीच या शहराची किमया आहे.

जगातील विविध शहरांची प्रतीकात्मक उभारणी करून हॉटेल्स बांधलेली आहेत.पॅरिस,अमेरिका,इजिप्त,वेनिस इत्यादी प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या वास्तु त्या त्या ठिकाणी गेल्याची जाणीव करून देतात.त्या ठिकाणचे वैशिष्ट्य इतक्या कल्पकतेने रचले आहे की वेनिसची प्रतिकृती असलेल्या हॉटेल मधून फिरत असताना त्यांनी रंगवलेले आकाश,सभोवताली नदीतून फिरणार्या त्या होड्या,त्यावर वल्हवत असताना गाणी म्हणणारे नावाडी आणि त्यात बसलेली सुंदर जोडपी.अक्षरशः हजारो मैलावर असलेले इटली मधील वेनिस साक्षात डोळ्यासमोर येते.इजिप्तचे हॉटेलच मुळात पिरॅमिडमधे बांधलेले आहे त्यामुळे त्या भव्य त्रिकोणी वास्तूत असलेल्या हजारो खोल्या डोळ्याचे पारणे फेडतात.पॅरिस कसीनोच्याबाहेर असलेल्या कॅफे मधे बसलेले वाइन पिणारे लोक पाहिले की अमेरिकेतून फिरताना देखील उगीचच 'Champ De Mars' मधून फिरल्याचा भास व्हावा.



          या रस्त्यावर करमणूक सोडून काहीही नाही.पण हा रस्ता ज्याप्रकारे जपला आहे ते पाहून अचंबा वाटतो.जगभरातील विविध देशाचे लोक चालताना दिसत होते.एकतर भरजरी कपडे किव्वा कपडेच नाहीत या दोनच अवस्था येथे पहायला मिळतात.विलक्षण सौंदर्य आणि पोशाखाची पद्धत यांचा मिलाप म्हणजे दुधात साखर होती.



         फोटो काढावे की डोळ्यात साठवावे अशी दुहेरी मानसिकता अनुभवायला मिळत होती.अर्थात दोन्ही गोष्टी मनसोक्त करून झाल्याखेरीज तिथून निघणे शक्य नव्हते.'Ballegio' नावाच्या हॉटेल समोर असलेल्या कारन्ज्याचा तो 'शो' थक्क करणारा होता.म्हैसुरच्या वृंदावन गार्डन मधील कारंजी पहिली होती पण शेकडो स्क्वेअर फूटांच्या जागेत पसरलेला तो नयनरम्य कारन्ज्याचा जादुई देखावा तोंडात बोटे घालायला लावणारा होता.अर्थात रस्त्यावर उभे राहून हे पहाणे आणि ते ही एकही पैसा खर्च न करता हे     माझ्यासारख्या पुण्यातल्या माणसाला अजुनच आनंददाई वाटत होते.रात्रभर ठराविक अंतराने होणारा तो शो पाहणारे लोक तल्लीन होऊन ते बघत होते.काही प्रेमी युगुल गळ्यात गळे घालून त्याचा आनंद घेत होते तर काही नुसतेच शेजारी उभे राहून.लग्न झालेल असाव कदाचित.काही फोटो काढण्यात मग्न.थोडक्यात काय तर रस्त्यावर फिरणारा एकही व्यक्ती समाधानाखेरीज परतत नव्हता.



खर्या अर्थाने वाइन,वेल्थ आणि वुमन या ३ 'Ws' वर संपूर्ण शहराचा उभा राहिलेला मनोरा पाहताना आश्चर्य आणि कुतुहल याची जाणीव पदोपदी होत होती.या स्ट्रिपच्या एका बाजूला सर्वात शेवटी 'Welcome To Vegas' अशी मोठी पाटी लावलेली आहे.या पाटीसमोर उभे राहून फोटो काढण्यासाठी असलेली गर्दी या शहराच्या प्रसिद्धीची प्रचीती करून देते.

          या संपूर्ण स्ट्रिपवर तीन ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेले पूल आहेत.या पुलाला दोन्ही बाजून जाळी लावलेली आहे,पूल ओलांडत असताना दोन्ही बाजूला दिसणारी रोषणाई निमिशार्धासाठीसुद्धा डोळे बंद करण्याची मुंभा देत नाही.वाहनांनी वाहणारा रस्ता आणि पर्यटकांनी ओथंबणारा फुटपाथ लोकप्रियतेची पावती
फाडत असतो.

          या शहराच्या maintenance चा खर्च कुठून निघतो,फक्त पर्यटन हाच जर
इथल्या आर्थिक व्यवस्थेचा स्त्रोत असेल तर हा पुरेसा आहे का ? जुगार खेळणार्या लोकांचा पराभव हे इथल्या लोकांचे उपजीविकेचे साधन आहे का ? या अनुत्तरीत प्रश्नांनी माझ्या विचारशक्तीला ताण दिला.

          या दोन रात्री आणि तीन दिवसाच्या माझ्या मुक्कामात अनंत आठवणी आणि अनुभव गोळा करून मी या अलीबाबाच्या गुहेचा निरोप घेत होतो.सकाळी उठून पुन्हा त्याच रस्त्यावरून विमानतळावर वर येणे थोडे जड जात होते.पण उस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो...त्यामुळे या ग्लाससभर उसाच्या रसानी मी तृप्त होऊन परतत होतो.

शारीरिक तारुण्य जपणे एका मर्यादेनंतर शक्य नसते पण मानसिक तारुण्य खरच चिरतरुण राहू शकते.त्यामुळे या पन्नास राज्यांच्या महासत्तेला भेट देण्याची संधी मिळाली तर हे पश्चिमेचे वाळवंट नक्की बघा.कारण अमेरिका म्हणल्यावर बाकीची  पर्यटनस्थळे एका बाजूला आणि 'लास वेगस' एका बाजूला.

आज पु.ल पाहिजे होते..त्यांच्या लेखणीतील वेगस अनुभवायची खूप इच्छा होती.पु.ल.नी वेगस पाहिले नाही हे कोणाचे दुर्दैव माहित नाही पण या अद्भुत शहराची सफर त्यांच्या लेखणीतून निसटली हे आपले दुर्दैव नक्की..!

    विमानतळावर असलेली 'What happens here stays here' ची पाटी खूप काही सांगून जाणारी होती.या तीन दिवसांचा सारांश केबिन लगेज बरोबर बांधून मी विमानात बसलो..



           विमानाने वेगस सोडले आणि अचानक 'मृगजळ' म्हणजे काय याची व्याख्या डोळ्यासमोरून तरळली.वाळवंटातील उन्हात लांबवर होणारा पाण्याचा भास म्हणजे 'मृगजळ'.ज्याचे अस्तित्व मात्र कधीच नसते.फक्त एक फसवे असे उन्हातील पाणी.आज मात्र मी या 'मृगजळाला' अनुभवले होते.अशाच एका वाळवंटात असलेले 'लास वेगस' नावाचे मृगजळ.
           
                                                                                                  हृषिकेश पांडकर
                                                                                                            ०
४-०१-२०१५


16 comments:

  1. As usual.....अप्रतिम....तुझ्या अमेरिका सफरीचं एक पुस्तक होऊ शकेल पांड्या....विचार कर....:):)

    ReplyDelete
  2. mast re .. lai bhari....
    sagale Vegas ubhe keles dolya samor..... :)

    ReplyDelete
  3. लास वेगास --मृगजळाची '' मुग्ध मधुर '' शब्दांची दृक चव चाखूनच ---डोळ्यावर, अमेरिकेच्या आपल्या''ह्यापी जर्नीच्या ''मृगजळाची '' झिंग '' चढल्याचा-- आभासी भास --- भारतातील यंदाच्या आगळ्या वेगळ्या'' यु के सदृश्य'' घरच्या थंड वातावरणाला अधिकच--'' फ्रेश '' उबदारपणा देवून गेला. पु ल च्या नजरेची--- झलकही पहावयास मिळाली……………….! .डॉ . अरविंद वैद्य ---पुणे

    ReplyDelete
  4. एकदम मस्त रे आता लास वेगास बघायची इच्छा झाली आहे... खरच पु.ल. नी हे सर्व बघायला पाहिजे होता तू त्यांची कमी भरुन काढ ...

    ReplyDelete
  5. Ya lekhachi vaat pahatach hoto...nehemipramane masta...PuLa nni lihila nahi pan tu lihilela tari vachayla milala yatach anand ahe. If you visit next time, make sure you visit the old strip where it all started. The strip you visited is not the original one...

    ReplyDelete
  6. What a articulately written and expressed the moments with astonishing power of your mind.
    Pandya, think twice about your whats app status " If you are good at something..never do it for free"....
    Far bhari ahe vegas and your blog is just inches behind that only because its a free to read.hehehe....Keep posting...

    ReplyDelete
  7. Apratim!!! Tu jya prakare saglya goshtin chi mandani kartos te khup ch apratim asta!! Aj paryant kelelya Likhana cha ek pustak chhaplas tar amhala nakki awdel.. Krupaya nakki vichar karawa...

    ReplyDelete
  8. Pandya,

    Mastt lihilays... tithe kam karnarya kinva bhetlelya ekdya vyaktivishayi... tithlya mansanchya types vishayi vachayala aankhi awadla asta. karan Rojgar ha ankhin ek interesting aspect ahe ya jagacha. plus mala vatla vegas chya kahi films adhi pahilya hotyas ka? tyachyat ani pratyakasha pahanyat kiti pharak padto he pan vachayala awadla asta :):)

    bhashecha babtit mala honestly asa watla ki Pu. La Greatach ahet pan tu halu halu tyanchya varnanshailichya palikade jaun aplya bhashet goshit mandtatoys je khup jast mahatvacha ahe. Mhanje 1980-90 madhye vegas pahilela manus aani aaj pahilela manus yanchya varnanat jo mulbhut pharak asel to ata janvu laglay je phar changla ahe.

    baki mastt...kshin borading paas barobar takun dila awadla !! ;);)

    cheers,
    Kshitij Patwardhan

    ReplyDelete
  9. Very very nice :) kp it up Hrishikesh.

    Grishma..

    ReplyDelete
  10. Beautiful!

    And as always, nicely penned down thoughts!

    KUDOS!

    ReplyDelete
  11. मित्रा अप्रतिम लिखाण आहे.
    तुझ्या लिखनाचे पुस्तकमधे रूपांतर लवकरच होवो ही सदिच्छा.

    ReplyDelete
  12. Too good! We are fortunate enough having you visited this place. :)

    ReplyDelete
  13. आज पु.ल पाहिजे होते..त्यांच्या लेखणीतील वेगस अनुभवायची खूप इच्छा होती.पु.ल.नी वेगस पाहिले नाही हे कोणाचे दुर्दैव माहित नाही पण या अद्भुत शहराची सफर त्यांच्या लेखणीतून निसटली हे आपले दुर्दैव नक्की..!

    best...

    ReplyDelete
  14. Ekhadya goshtikade baghanyachi drusti aani tya anushangane manat umatanaare bhav kagadaawar utarawatana milanaari shabdanchi sath ekhadyalach nashibane labhate....very well written... Superb

    ReplyDelete