Wednesday, July 30, 2014

'पाऊस'




पाऊस म्हणजे धरीत्रीने पांघरलेला हिरवा शालू.
पाऊस म्हणजे भरलेल्या कचाराकुंडीतून ओथम्बुन वाहणारा कचरा. 

पाऊस म्हणजे स्वच्छ न्हावून निघालेली बाईक.
पाऊस म्हणजे स्पीडोमीटर,हेडलाईट आणि सीट या मध्ये छान साठलेले पाणी.

पाऊस म्हणजे ओल्या मातीचा सुगंध.
पाऊस म्हणजे ओल्या राहिलेल्या कपड्यांचा दमट वास. 

पाऊस म्हणजे खिडकीतून दिसणाऱ्या सरींचा खेळ.
पाऊस म्हणजे सदैव वाळत घातलेल्या कपड्यांमुळे  खिडकी लावण्याची नसलेली सोय.

पाऊस म्हणजे अनवाणी चालताना मिळणारा नितळ ओलावा.
पाऊस म्हणजे चिखलाच्या पाण्यामुळे खाजणारा पाय. 

पाऊस म्हणजे गाडीवरून जाताना सरींचा होणारा मनमुराद वर्षाव. 
पाऊस म्हणजे चष्म्यावर पाणी साचून येणारे अंधत्व.

पाऊस म्हणजे  टपरीवरची गरम भजी आणि कडक चहा.
पाऊस म्हणजे चहाच्या कपात टपरीच्या पन्हाळीतले न चुकता टपकणारे पाणी. 

पाऊस म्हणजे रिकामे रस्ते,धो धो पाऊस आणि आपण.
पाऊस म्हणजे गच्च ट्राफिक,मोठे सिग्नल,तुडुंब गर्दी,धो धो पाऊस आणि आपण 

पाऊस म्हणजे दुपारचे दाबून जेवण आणि पांघरुणात जाऊन झोप.
पाऊस म्हणजे दाबून जेवल्यावर पांघरुणात झोपल्यावर खिडकी उघडी राहिल्याने टीव्हीवर पडलेले पाणी आणि झोपेचे खोबरे. 

पाऊस म्हणजे अनवाणी तुडवलेला चिखल.
पाऊस म्हणजे ऑफिसला जाताना नकळत  माखलेले 'Formal Shoes'

पाऊस  म्हणजे भिजताना मागच्या सीटवर कमरेला धरून बसलेली सुंदर मुलगी.
पाऊस म्हणजे रद्दी विकायला जाताना मागच्या सीटवर चिंब भिजलेली ती रद्दी. 

पाऊस म्हणजे भिजत,चिखलात माखत खेळलेला  'Football'.
पाऊस म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी 'Duckworth Lewis'ची ती  हाक. 

पाऊस म्हणजे बसच्या खिडकीत बसून चेहेऱ्यावर उडणारे पाण्याचे तुषार.
पाऊस म्हणजे बसच्या धक्काबुक्कीत विसरलेली छत्री. 

पाऊस म्हणजे पुलावर उभे राहून कणीस खात बघितलेले पाणी.
पाऊस म्हणजे पाणी वाहून गेल्यावर अडकलेल्या अनंत प्लास्टिकच्या पिशव्या. 

 पाऊस म्हणजे 'पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली'
पाऊस म्हणजे 'ती गेली तेव्हा रिमझिम'. 

पाऊस म्हणजे वर्षा विहाराचा शॉवर.
पाऊस म्हणजे  धरणे भरायचा नळ.

पाऊस म्हणजे 'ओलावा'…आणि पाऊस म्हणजेच 'ओल'… 
इच्छा फक्त इतकीच … 

'ओलावा' इतकाही नसावा की त्याची 'ओल' लागावी.





                                                                                                हृषिकेश पांडकर
                                                                                                ३०-०७-२०१४

5 comments: