Tuesday, March 18, 2014

'स्कूल संसद' - सरळ मार्गी गेलेली गोलाकार संसद



लहान मुले म्हणजे ओल्या मातीचा गोळा..आकार द्यावा तसा वळतो आणि वाढतो देखील असे म्हटले जाते.भावी पिढीच्या किव्वा भावी समाजाच्या उत्कर्षाची मुळे सद्य पिढीच्या लहान मुलांवर  अवलंबून असतात असे समजले जाते. या पुस्तकी आणि ठोकळ भाषेतून प्रात्यक्षिक आणि वर्तमानात प्रवेश करणाऱ्या या पाच आठवड्यांनी माझे तीस वर्षाचे नागरिकशास्त्र आणि पंचाहत्तर मार्कचे सामाजिकशास्त्र चमच्यानी ढवळून काढावे तसे ढवळून काढले.
शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन एखादा उपक्रम करावा अशी कल्पना डोक्यात येउन चालू झालेला विचार अशा एका समाधानावर येउन विसावेल याची तसूभर देखील कल्पना केली नव्हती.यशाच्या समाधानावर रेंगाळताना कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची उजळणी करणे या सारखा देखावा नाही.अर्थात कार्यक्रमाच्या तयारीत माझा हातभार तसुभरच असेल पण यशाचा आनंद घेताना मी माझा स्वार्थ मनमोकळेपणाने जोपासला.

 तर वरील परिच्छेदात वर्णन केलेली प्रत्येक गोष्ट हि मागच्या आठवड्यात झालेल्या तीन दिवसांच्या त्या समारंभाची आहे,जेथे भविष्याची शिदोरी म्हणून ज्यांना बघितले जाते अश्या चिमुरड्यांनी यशस्वी भारताचे स्वप्न खासदारांच्या खुर्चीत बसून रंगवले.
            आपल्या सभोवताली घडणार्या दैनंदिन प्रक्रियेत निर्माण होणारे प्रश्न चर्चा करून कसे सोडवता  येतील हे मुलांकडून काढून घेणे हीच कदाचित या प्रकल्पामागची पुसटशी प्रेरणा असू शकेल.आणि समाजाचे आपण घटक आहोत या जाणीवेतून सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करणे हे आपले कर्तव्य समजणे हा अधोरेखित हेतू असावा.

            या संपूर्ण विचारांती शाळेतील मुलांची एखादी संसद घेता येईल का या प्रश्नावर आम्ही येवून पोहोचलो होतो.आणि याच विचारांनी आमचा सुमारे चाळीस दिवस ताबा घेतला होता.शाळांच्या परवानगीने सुरुवात झालेला हा प्रवास खूप गोष्टी शिकवणारा होता.
        या संपूर्ण प्रकाराला 'स्कूल संसद' असे बारसे झाले. माध्यमिक शाळेतील मुलांसाठी संसदेतील सत्राप्रमाणे सत्र आयोजित करून त्यातून ठराव पास करणे आणि त्यानुसार बजेट जाहीर करणे असे प्राथमिक स्पर्धात्मक ध्येय ठरले.शाळेला संपूर्ण संकल्पना समजावून देणे..त्याचे प्रेझेन्टेशन त्यांच्यासमोर दाखवणे आणि त्यांना आवडले तर त्यांच्या सहभागाची परवानगी घेणे या कामांनी वेग घेतला.१४ शाळांनी परवानगी दिल्यावर शाळांचा आकडा आम्ही थांबवला.पहिल्याच वर्षी आलेला इतका प्रतिसाद पुढच्या कामाचे प्रोत्साहन ठरला होता.आणि तीच कदाचित पुढच्या यशाची नांदी होती.

        शाळांची संमती झाल्यावर पुढचा विषय होता कि शाळेतील दहा मुलांची यादी मिळवणे जे या संसदेत खासदार म्हणून येतील.एक स्पर्धा म्हणून शाळांनी आपले दहा विद्यार्थी खासदार पाठवले.अर्थात सगळ्यांनी दहा पाठवलेच अस नाही काहींनी कमी देखील पाठवले.वक्तृत्व,निबंध,नाट्यवाचन या स्पर्धात नाव द्यायची वेळ शाळेत असताना आली होती पण एखाद्या स्पर्धेसाठीची नाव घेण्याची हौस देखील यावेळी भागवून घेता आली.

            प्रत्येक शाळेसाठी एक विषय या प्रमाणे १४ शाळांना १४ स्वतंत्र विषय होते.याचा अर्थ प्रत्येकी  एक विषयासाठी ती शाळा 'सत्ताधारी पक्ष' म्हणून काम पाहणार होती. आणि बाकीचे तेरा पक्ष अर्थातच विरोधक.प्रत्येक शाळेसाठी एक मार्गदर्शक दिला होता.अर्थात हा मार्गदर्शक  आमच्यातलाच होता.आणि माझ्या सुदैवाने मला एका शाळेकरिता हि संधी मिळाली होती.एका विषयावर शाळेत जावून त्या मुलांना त्या विषयाबाबत मार्गदर्शन करणे आणि त्या मुलांशी थेट संवाद साधणे या सारखी सुवर्णसंधी मिळणार होती.असे बाकीच्या १३ शाळांमध्ये देखील घडले. स्वतः अभ्यास करून मुलांना त्याबाबत सांगणे हि गोष्ट वाचताना जितकी सोप्पी वाटते तितकी ती नकीच नव्हती.पण जितकी ती वाचताना आनंददायी वाटते त्यापेक्षा कित्येक पटीने ती प्रत्यक्षात असते याचा या पंचवीस दिवसात याची देही याची डोळा अस म्हणण्या पेक्षा सर्वांगाने प्रत्यय आला.

        वयाच्या आकड्याचा फुगा मुलांच्या पहिल्या भेटीत टाचणी लावावी तसा फुटला.कदाचित विषयाच्या ज्या मुद्द्यावर आपण पूर्णविराम देतो तिथे लहान मुले समास सोडून नवीन परिच्छेद सुरु करतात अशी परिस्थिती होती.आम्ही दिलेल्या २ पानी माहितीवर मुलांनी अभ्यास करून अधिक माहिती गोळा करणे अपेक्षित होते आणि ते काम मुलांनी चोख बजावले देखील.
            तयारीचे २५ दिवस लग्नाच्या खरेदी,मेहेंदी,संगीत या प्रमाणे उडून गेले.मुलांनी तयार केलेले त्यांच्या विषयाचे अहवाल त्यांनी जमा केले.कुठेही जीवावर आलाय म्हणून लिहून दिलय अशी भावना नव्हती.बक्षीस मिळावे या साठी चालू असलेली तयारी असेलही कदाचित पण कष्टाची प्रचीती प्रत्येक पानावर होती.

प्रत्यक्षात कारभाराचा दिवस उजाडला.एस.एम. जोशी सभागृहाला गोल संसदेचे स्वरूप आले होते.आपापले विषय समर्थपणे मांडणारे सत्ताधारी पक्ष आणि त्यांची उलट तपासणी घेणारे विरोधी पक्ष सभागृहात बसले होते.कदाचित दिल्लीच्या संसदेतील राग,लोभ,मोह,मद आणि मत्सर याची उणीव इथे भासत होती पण काहीतरी नवीन पाहायला मिळेल आणि शिकायला मिळेल या विचाराने आपली मत मांडणारे चिमुरडे त्या त्या शाळेच्या अर्थात त्या त्या पार्टीच्या गणवेशात शिस्तबद्ध दिसत होते.सभापतींनी खासदारांना शांत राहावे अशी विनंती करायची वेळच आली नव्हती कारण समंजसपणा हा वयानुसार कमी होत जातो.
            आदरणीय परीक्षक,सन्माननीय सभापती,संसदीय सचिव,माननीय खासदार आणि आम आदमी अशा थाटात संसदेचे कामकाज सुरु झाले.त्या वेळी वाजलेले बावन्न सेकंदाचे राष्ट्रगीत आज खर्या अर्थी भारत भाग्यविधाता या लयीत वाजत होते.संसदीय सचिवांनी संसदेचे कामकाज सुरु करावे असे जाहीर केले आणि एका वेगळ्याच आणि अद्भुत कार्यकारणीला सुरुवात झाली.

            मुलांनी आपापल्या परीने आपले मुद्दे मांडले.इतर पक्षांनी शांतपणे सर्व मुद्दे ऐकून घेतले.खासदारांनी त्यावर केलेले प्रतिप्रश्न आणि सत्ताधारी पक्षाने शिताफीने राखलेले आव्हान डोळ्यांचे आणि कानांचे समाधान करीत होते.खरी संसद अशी चालते का असे राहून राहून वाटत होते.निरागसता आणि बेधडकपणा यांचा अप्रतिम संगम पाहण्यास मिळत होता.बाळबोध विचारातील प्रगल्भता आणि मुद्दा मांडत असताना स्वविचारांवरील आत्मविश्वास यांचा तो खेळ त्याच उत्साहात तीन दिवस रंगला होता. दोन शाळांमधील राहणीमानाचा दर्जा कदाचित कमी जास्त होता पण विचारांचे पारडे पोरांनी तोलून धरले.

        एखादा मुद्दा पटला नाही म्हणून होणारी निराशा आणि आपला मुद्दा समोरच्याला पटला याचा तो आनंद चिमुरड्यांच्या चेहेर्यावर झळकत होता.पण नैराश्याची प्रतिक्रिया किव्वा आनंदाचा जल्लोष यातील एकही गोष्ट मुल्लांनी प्रदर्शित केली नाही.कारण संसदेच्या पावित्र्याची कल्पना कदाचित दिल्लीमधील खासदारांना नसेल पण वार्षिक परीक्षेत नागरिकशास्त्राचा लेखी पेपर लिहिणाऱ्या या भविष्यातील नागरिकांनी ती तंतोतंत पाळली.
            आपल्यासमोर बसलेले मान्यवर परीक्षक किती मोठे आहेत याचे जरासेही दडपण न घेता किव्वा भाषेच्या आणि बोलण्यातील चुकांना न जुमानता आपला मुद्दा किव्वा प्रतिप्रश्न बेधडक विचारणाऱ्या मुलानाचे कौतुक करावे तितके कमी होते.आणि हे सर्व चालू असताना संसदेत चालू असलेला सावळा  गोंधळ मात्र कुठेच बघायला मिळाला नाही.

        तीन दिवसाच्या या चर्चेत भारतासमोरील १४ ज्वलंत प्रश्नांचा ताज्या आणि कोवळ्या विचारांनी केलेला तो उहापोह एका मुद्द्यावर येउन स्थिरावला...कोण जिंकला कोण हरला यापेक्षाही मुलांना काय मिळाले.मुलांकडून आम्हाला काय मिळाले या गोष्टी जास्त समाधानकारक होत्या.स्पर्धकांसाठी स्पर्धेचे यश निकालावर अवलंबून असते हे जितके खरे आहे त्यापेक्षाही म्हणजे बक्षीसापेक्षाही मुलांना मिळालेला अनुभव आणि विचार मांडण्याचा मंच हि कदाचित त्यांच्यासाठी शिदोरी असू शकेल.संसदेचे कामकाज कसे चालते याचे प्रात्यक्षिक कदाचित याहून जवळून बघायला मिळणे अवघडच.
        निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सत्तेच्या स्वार्थासाठी आश्वासंनांची माळ घालणाऱ्या आणि फक्त वयाच्या अटीत बसणाऱ्या खासदारांपेक्षा निरागस विचारांच्या, स्वार्थाचा मागमूसही न जोपासता आपल्या विचारशक्तीला न्याय देऊन समाजहितासाठी आपली भूमिका मांडणार्या या चिमुरड्या खासदारांच्या हातीच सत्ता द्यावी असा विचार आल्याशिवाय रहात नाही.

        कुठल्या शाळेने काय जिंकले यापेक्षाही सर्व शाळांनी संसद जिंकली हि एकच आठवण घेऊन मी तिसर्या दिवशी सभागृह सोडले....तेवढीच आपल्या अनुभवांच्या आणि आठवणीच्या खात्यात अजून एक आठवण आणि अनुभव जमा.....स्कूल संसदच्या रूपाने...

इतक्या साध्या आणि सरळ गोष्टी या लहान मुलांना व्यवस्थित समजतात मग निवडणूक लढविण्यासाठी संविधानात वयाची अट का बरी घातली असेल असे नकळत वाटून जाते.विचार बाळबोध नक्की आहे..पण आज मुलांनी पुन्हा विचार करण्यास भाग पाडले एवढे मात्र नक्की.


                                                                                           हृषिकेश पांडकर 
                                                                                           १८-०३-२०१४

12 comments:

  1. Koni kay jinkale yapeksha ...... Sarv skool's ni sansad jinkali.......ani Yach sansadela shabadat utarun , sir punha akada tumhi sarvanchi man jinkalit...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. भन्नाट कल्पना... आणि ही कल्पना उत्कृष्टरित्या राबवली गेली आहे ते दिसतेच आहे तुझ्या सुरेख लिखाणातून आणि ‘दीपस्तंभ’ म्हटलं की काम चोखपणे पार पडणारच... यात शंकाच नाही.

    ReplyDelete
  4. Hrishi, tuze saglech lekha khup chan, asata ta, khup sunder asatata, mana madhe tya visyache, sunder chitra ch dolaya madhe avtar te, mala kharach ABHIMAN aahe ki tuzaa sarkahaya cha mi mitra aaahe, Vishay ya chi madani, Bhashechi madani, khu pa Sunder Zaleli aahe, tu ja padhtine liheto....tyala kharach Toda, nahi....asech khup lihita ja.....aani aamahala anand de ta ja....Hats off to you...Sir..

    ReplyDelete
  5. Uttam .. sampurn activity parat dolyasamor ubhi rahili

    ReplyDelete
  6. masta lehla ahe.......pan ek kala nahi ke tuzya vatela konta vishay hota te....mulan sathi........








    ReplyDelete
  7. Hi Hrishikesh,

    सर्वप्रथम हि कल्पनाच खूप सुंदर आणि मुलांसाठी खूप वेगळी आहे… नागरिक शास्त्राची नुसती पुस्तके वाचून देशाचा कारभार कसा चालवतात याचा उलगडा कधीच होत नाही. हा तुमचा उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहेच.
    आणि त्या शाळांनीही तुम्हाला सहकार्य केले हे खूप महत्वाचे. तुम्हा सार्यांचे खूप अभिनन्दन.
    अश्विनी वैद्य

    ReplyDelete
  8. Very well written. Your words are in perfect sync with the event. As I was reading through, I was able to relive those moments of the event.

    ReplyDelete
  9. mastch... program attend karu shakle nahi yachi khant hoti.. pan tuza lekhanane ti khant thodi bahut kami keli... very well written...

    ReplyDelete
  10. खूप छान ब्लॉग... तुमच्या कारयाच नकीच कौतुक आहे..

    ReplyDelete
  11. काय भन्नाट कल्पना आणि उपक्रम आहे. असे उपक्रम जर सगळीकडे झाले तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभारच लागेल.

    ReplyDelete