Wednesday, August 28, 2013

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड



        परवा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित झाला.दीपिका पादुकोणच्या निमित्ताने माझे पाहणे झाले.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर मी थियेटर मधून बाहेर पडलो.सिनेमाची कथा,गाणी,संवाद या गोष्टींवर नेहमी होते ती चर्चा झाली.सिनेमा कसा आहे, कोणाचा अभिनय कसा आहे इत्यादी पिसे काढून झाल्यावर आम्ही तिथून मार्गस्थ झालो.आता पिक्चर कसा आहे वगरे हे मुद्दे थोडे वादग्रस्त असू शकतात,कारण कोणाला काय आवडावे किव्वा काय आवडू शकेल याचा ताबा आपल्याजवळ नसतो.अर्थात याच वेगवेगळ्या चवी जश्या पाहणार्यांच्या असतात तश्याच त्या दिग्दर्शक गायक आणि लेखक  यांच्या देखील असतातच.त्यामुळे सिनेमा कसा होता याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न नक्कीच नाहीये.

        तर हा आणि असे अनेक सिनेमे पाहिल्यावर कथा,दिग्दर्शन,संवाद,गीते आणि कलाकार हे नियमित निकष तर आपण चित्रपटाचा दर्जा ठरवायला नेहमीच वापरतो असे लक्षात येते.पण या पलीकडे जावून मला अजून एक गोष्ट पक्की समजली आहे की ज्या तर्हेने हे लोक आपल्याला भारत दर्शन घडवतात ते पाहून खरच आपला देश इतका भारी आहे यावर विश्वास बसत नाही.म्हणजे या 'चेन्नई एक्स्प्रेस' ने दक्षिण भारत ज्या पद्धतीने दाखवला आहे ते पाहून आपण निसर्ग बघायला परदेशी का जातो असे वाटण्याइतपत शंका येते.आता याचा अर्थ मी वरचेवर परदेशी जातो अशातला भाग नाही,पण असा दक्षिण भारत बघितल्यावर बाहेर जायची आवश्यकता आहे आहे का ? दुधसागर धबधबा किव्वा रामेश्वरम या गोष्टी जितक्या कॅमेर्याला सुंदर दिसतात तितक्याच त्या आपल्या डोळ्यांना सुंदर दिसू शकतात का ? आणि याच 'चेन्नई एक्स्प्रेस' च्या पार्श्वभूमीवर त्यानंतर प्रदर्शित झालेला 'मद्रास कॅफे' हा त्याच दक्षिण भारताचे सर्वार्थाने वेगळे दर्शन घडवतो.

'रोजा' किव्वा 'मिशन कश्मिर' या चित्रपटात दाखवलेले काश्मीर खरच भारतात तसेच्या तसेच आहे का ? म्हणजे 'कश्मिर कि वादियो मे ' मध्ये वगरे गाडी चालवत असताना खरच मेंढ्यांचा कळप मध्ये येतो या गोष्टी काल्पनिक नाहीयेत ना ? आणि 'माचिस' सिनेमात दाखवलेले काश्मिर हे एकाच ठिकाणी असून वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण का वाटते ? दक्षिणेचा अरबी समुद्र आणि दादर चौपाटीवर उभे राहिल्यावर दिसणारा अरबी समुद्र एकच आहे का ? किव्वा कदाचित कॅमेर्या समोर आल्यामुळे सौंदर्य जास्त खुलत असेल का ? 'दिल चाहता है' मध्ये दाखवलेले गोवा शहर प्रत्यक्षात सुद्धा तितकेच सुंदर आहे का ? किव्वा 'कहानी' मध्ये दिसणारे कोलकाता शहर अगदी दाखवले तसेच असेल तर त्याच्यासारखे वेगळेपण कोणाचेच नसेल.आणि हेच कोलकाता शहर 'युवा' मध्ये पहिले कि त्याचे वेगळेपण नक्की जाणवते. अर्थात 'परिणिता' मध्ये पडद्यावर आलेले पश्चिम बंगाल दोन्ही सिनेमाला छेद देणारे आहे.'सरफरोश' मध्ये दाखवलेले राजस्थान फक्त वाळवंटाखेरीज खूप जास्त गोष्टींचे दर्शन घडवते.'जब वी मेट' मध्ये दाखविलेली हिमाचल प्रदेशातील ठिकाणे आपल्याला थक्क करतात.अनेक सिनेमातून समोर आलेले 'पंजाब' खरच इतके सधन आणि सर्वच बाबतीत मुबलक आहे का ? 'तारे जमीन पर' मध्ये दाखवलेले सिमला खरच इतके स्वच्छ आणि सुबक आहे यावर पाहूनही विश्वास बसत नाही. 'बर्फी' मध्ये दाखवलेले दार्जीलिंग भारतात आहे याचीच मुळात चाहूल लागून देत नाही. म्हणजे तिथे असलेले रस्ते ब्रिटीश कालीन चर्च आणि कायम धुक्याने आच्छादलेले शहर. 'लगान' किव्वा 'हम दिल दे चुके सनम' मध्ये दाखवलेला विजय विलास राजवाडा गुजरात सारख्या ठिकाणी आहे यावर विश्वास बसत नाही.जिथे गरबा या नृत्य प्रकाराशिवाय फारशी माहिती नसताना या सिनेमामुळे अश्या गोष्टी पाहायला मिळत आहेत याचा आनंद जास्त होतो.'अशोका' मधील करीना आणि शाहरुख यांच्या पलीकडे जावून जर बेडाघाट किव्वा अहिल्या फोर्ट बघण्याची इच्छा झाली असेल तर मध्यप्रदेशाची श्रीमंती घरबसल्या बघता येण्यासारखे आहे.'Black' सिनेमा मध्ये पाहण्यासारख्या इतर अनेक गोष्टी असल्या तरी निसर्गरम्य सिमला नजरेतून सुटत नाही.

'गुरु' किव्वा 'रावन' या सिनेमांनी दाखवलेले केरळ तर केवळ अचंबित करणारे आहे. म्हणजे निसर्गाचे वाटप करीत असताना भारताने देवाशी देखील दादागिरी केली असावी असा संशय यावा.जयपूर आणि राजस्थाननी प्रत्येक सिनेमामधील लग्नासाठी आपापले महाल दिले असावेत.प्रत्येक सिनेमात हावडा ब्रिज ज्या पद्धतीने दाखवला जातो त्या आणि तितक्याच पद्धतीने माझे त्याबद्दलचे आकर्षण वाढते.अगदी 'आराधना','मेरा नाम जोकर' पासून ते 'मै हु ना' आणि 'परिणिता' पर्यंत बॉलीवूडने दार्जीलिंग ची साथ सोडली नाही.कारण सौंदर्याला पर्याय नसतो.
‘जोधा अकबर' मध्ये दाखवलेले आग्रा,अजमेर,जयपूर हि ठिकाणे आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासाची उजळणी करीत असतात.'रांझना' मध्ये दाखवलेले 'उत्तर प्रदेश' आणि 'वाराणसी' आधुनिक आणि पारंपारिक भारताची संस्कृती अधोरेखित करतात.पण वाराणसी हे शहर फक्त संस्कृती आणि परंपराच जपते का असा प्रश्नही पडतो कारण प्रत्यक्ष तिथे जावून पाहिल्याशिवाय हे प्रकरण काय आहे हे समजणे अवघड आहे.पण तोपर्यंत बॉलीवूडने मला हेच दाखवले आहे.

        नासा,वाशिंग्टन आणि फ्लोरिडा या गोष्टी पाहून झाल्यानंतर वाई आणि मेणवली घाट हि ठिकाणे पाहणे किती सुखावह असते हे 'स्वदेस' बघताना वाटते.आणि म्हणूनच कदाचित हा सिनेमा जास्त प्रेक्षणीय वाटतो.
        'फना' चित्रपटात दाखवलेले फत्तेपूर सिक्री,दिवाण ए आम,लाल किल्ला या गोष्टी क्वचितच टीव्ही वर पाहिल्या जातात पण हि ठिकाणे या चित्रपटाने अतिशय जवळून आणि योग्य प्रकारे दाखवली आहेत.अर्थात काजोल च्या अस्तित्वात या गोष्टी दुय्यम ठरतीलही कदाचित पण दुर्लक्षित होवू शकत नाही एवढे मात्र नक्की.

        तामिळनाडूच्या निलगिरी टेकड्या तर बॉलीवूडनी दत्तकच घेतल्या आहेत.'दिल से' मधून घडलेले हे तामिळनाडूचे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते.'३ इडियटस' ने दाखवलेले सिमला हे फक्त थंड हवेचे ठिकाण नसून अजून बर्याच गोष्टी पाहण्याचे पर्यटन स्थळ आहे.'सरफरोश' ने दाखवलेले विरप्पनचे जंगल बघितल्यावर या जंगलात लपणे किती सोप्पे आहे असे वाटून विरप्पन सापडला नाही यात तथ्य असल्याचे जाणवते. 'रंग दे बसंती' किव्वा 'दिल्ली ६' ने दाखवलेले दिल्ली हे एकच शहर इतके भिन्न असूच कसे शकते असा संभ्रम निर्माण होतो. मात्र दोन्ही सिनेमे पाहिल्यावर दिल्ली विषयीचे आकर्षण वाढते एवढे मात्र नक्की.कदाचित एखाद्या शहराची नवीन ओळख निर्माण करण्याचे काम बॉलीवूड अनेक वर्ष करीत आल्याचे जाणवायला लागले आहे.

        मुंबई तर बॉलीवूडचे माहेरघर आहे.कारण प्रत्येक सिनेमाची सुरुवात इथे होते आणि पर्यायाने शेवटही.अर्थात रीळातील मुंबई आणि प्रत्यक्षातील मुंबई यात जरी फरक असला तरी जी मुंबई आपण पहिली नाही ती कदाचित सिनेमाने सोप्या भाषेत दाखवली.म्हणजे मुंबई हेच शहर 'कोर्पोरेट','पेज ३' या मधे दिसते तसे 'मुंबई मेरी जान' मध्ये दिसत नाही.किव्वा 'कंपनी' मध्ये दाखवलेली मुंबई आणि 'Fashion' मध्ये दाखवलेली मुंबई यात कमालीची तफावत आढळते.
        भारतात राहून देखील संपूर्ण भारत आपण पाहिलेलाच नाही,असे प्रत्येकवेळी हे असले सिनेमे पाहताना मला कायम वाटते.कदाचित बॉलीवूडचे सिनेमे पाहण्यामागे हाच हेतू प्रबळ होत चालला आहे.प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष जावून पाहता येइलच असेही नाही पण या ७० एम एम च्या पडद्यावरून या गोष्टी पाहण्यात देखील वेगळीच मजा आहे.कदाचित सत्यघटनेवर आधारित सिनेमे जास्त येवू लागल्याने त्या त्या ठिकाणाचा चित्रिकरणाकरिता केला जाणारा वापर वाढू लागला आहे आणि म्हणूनच या जागा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

        सिनेमा बघण्याचे उद्देश पुष्कळ असतात पण नकळत काही गोष्टी डोळ्यासमोर आल्याने नवीन शिकल्याचा किव्वा अनुभवल्याचा भास मला दरवेळी होतो.आणि म्हणूनच कदाचित मला या गोष्टीचे प्रचंड अप्रूप आहे.हिरो किव्वा हिरोइन एखाद्या पिक्चर मधून किती पैसे मिळवतात या बद्दल फारसे आकर्षण नसले तरी चित्रीकरणाच्या निमित्ताने ते ज्या प्रकारे फिरतात या बद्दल हेवा मात्र नक्की वाटतो.

        चित्रीकरणाचे ठिकाण हि गोष्ट सिनेमाच्या यशात किव्वा अपयशात ग्राह्य धरली जात नसेलही पण 'सिनेमा का बघावा ?' या उत्तरात नक्की ग्राह्य धरली जावू शकते. 


                                                                                        हृषिकेश पांडकर
                                                                                        २८ /०८ / २०१३

6 comments:

  1. kamaal... lagech visualize zala sagla vachta vachta...
    ani asa lekh 'photography' chi aawad/passion aslela fakt tuch lihu shakto he satya ahe :) photography preminna vishesh aawdel ha lekh :)

    Dusra mhanje pratyek director cha wegla perspective he jari aapan bajula thevla tari kewal cinematography sathi cinema baghnari lok pan kahi kami nahit. Cinema bhukkad asla tari aajkal lok cinemala chaar shivyaa hasadun 'pan bhari locations dakhvle ahet..' ase reviews detat.

    ReplyDelete
  2. Bollywood thru ghadanare prekshniya BHARAT DARSHAN changlya prakare shabdankit kele ahes. 70mm madhye he picturization enjoy karnyachi maja kahi aurach. Yakarta nivadak hindi chitrapat big screen var avarjun baghavet, yat shanka nahi !!

    Reply

    ReplyDelete