पुणे ते जबलपूर हा रेल्वे प्रवास तितकासा लहान नक्कीच नाही.किमान अठरा
तास तरी लागतातच.संगतीनुसार प्रवासाची मजा ठरते हे देखील तितकेच
खरे आहे.पण रात्रीच्या वेळी जेव्हा गप्पांना मुरड घालून शांत राहावे
लागते अशा वेळी झोपेची किव्वा संगीताची आराधना करण्याखेरीज अजून काही
आपल्या हातात नसते.संगीताची आराधना करावी इतका मी रसिक नाही.आणि झोपेची
आराधना करावी इतका अरसिक तर नक्कीच नाही.अशा
वेळी काळानुरूप जमलेले विचार हिरवा सिग्नल लागल्यावर
सुटलेल्या दुचाक्यांसारखे घाईने एकत्र सुटतात.तसेच काहीसे विविध विचार
डोक्यात येत असतात.आणि अशाच एका विचाराने माझ्या त्या रात्रीचा ताबा
घेतला होता.
प्रवासाला निघालो आहे या पार्श्वभूमीवर उगीचच भारताचा नकाशा डोळ्यासमोर येत होता.आणि नकळत नकाशाची तुलना मी करू लागलो होतो.म्हणजे रिकाम्या वेळेत माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही पाहू शकता.का कोणास ठाउक पण भारताचा नकाशा हा घरी असलेल्या फ्रीज प्रमाणे आहे असं मला नेहमी वाटते.कदाचित तुम्हालाही हे पटेल.
फ्रीजच्या सर्वात वरच्या बाजूला डीप फ्रीजर असतो जेथे बर्फ जमा
होतो.जसे आपले
काश्मीर म्हणजेच उत्तर भारत.फ्रीजच्या उजव्या बाजूला
दारावर पाण्याच्या बाटल्या असतात ज्याप्रमाणे बंगालचा
उपसागर पसरला आहे.म्हणजे पाणीच पाणी.डाव्या बाजूला कोकम सरबत ,लोणची,जॅम ,कैरीचे पन्हे वगरे ठेवलेले असते.जशी संपूर्ण डाव्या बाजूला असलेली कोकण
किनारपट्टी,गोवा,कर्नाटक पर्यंत.म्हणजे जेवण करीत असताना तोंडीलावण्याने चव
बदल व्हावी आणि जेवणात रंगत यावी त्याच प्रमाणे आयुष्याच्या
जेवणात देखील या ठिकाणांनी चव बदल नक्की होते असा माझा ठाम समज आहे.फ्रीज च्या सर्वात
खालच्या भागात कायम हिरव्या भाज्या रचलेल्या असतात.अगदी
त्याचप्रमाणे आपला दक्षिण भारत.सदैव हिरवागार आणि निसर्गाने कोणताही आखडता हात न घेता
ठेवलेली कन्याकुमारी,केरळ हि ठिकाणे.त्याच्याच वरच्या कप्प्यात दुध,ब्रेड या गोष्टी असतात.ज्या वेळच्या वेळी संपतात आणि नवीन
येतात.अगदी नियमित बदलणारे आणि योग्य प्रमाणात येणारे असे हे पदार्थ.अगदी तसेच
आहे महाराष्ट्राचे देखील,म्हणजे चार महिने उन्हाळा, चार महिने हिवाळा आणि चार
महिने पावसाळा.याच्या वरच्या कप्प्यात कदाचित शिळे राहिलेले
अन्न म्हणजे कालचा भात,वाडग्यात उरलेले पिठले किव्वा सकाळी मळून ठेवलेली कणिक या
गोष्टी असतात ज्या मध्ये मी कधी फारसा रस घेत नाही.आणि अगदी तसेच आहे हे
मध्यप्रदेशाचे ...अगदी भारताच्या मध्यभागी स्थित असलेला पण
का कोणास ठाऊक पर्यटनाच्या दुर्बिणीतून थोडा दुर्लक्षित झालेला हा असा
मध्यप्रदेश मला कायमच ओसाड किव्वा निरस वाटत आला आहे.समुद्र नाही,बर्फ नाही,हवामान तसे बरेचदा उष्णच,फार काही निसर्ग नसेल असा उगीचच आणि न पाहता करून घेतलेला
समाज या गोष्टींमुळे मध्यप्रदेश,विदर्भ,आणि उत्तर प्रदेशात फार काही पाहता
येईल याची अशा नव्हती.
तर एव्हाना माझी चालू असलेली तुलना नकळत झोपेमध्ये बदलू लागली होती आणि मी गाढ झोपलो देखील.त्यानंतर मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा गाडी महाराष्ट्र पार कडून मध्यप्रदेशात आली होती.सकाळी नऊ वाजता असलेले रखरखीत उन माझ्या कालच्या विचारांना आणखीन बळकटी देत होते.आणि त्याच विचारांमधे मी जबलपूर स्टेशन वर पाय ठेवला.
उतरल्या नंतरचा नाश्ता,बांधवगड पर्यंतचा प्रवास,तिथे उतरविलेले सामान,त्यानंतर केलेली अंघोळ या गोष्टी वर्णन करण्यासारख्या जरी असल्या तरी वाचण्यासारख्या नक्की नाहीत.
तर बांधवगड मध्ये मी आलो होतो.इंटरनेट,टुरीस्ट गाईड,मित्रांचा अनुभव यांच्या नुसार बांधवगड हि एक "National Tiger Sanctury " आहे,आणि अनेकविध पक्षी देखील आपण तेथे पाहू शकतो.या माहितीचे पाठबळ घेऊन जंगलात गेलो तेव्हा खरा मध्यप्रदेश मला उलगडत होता.
पहाटे साडेसह वाजता ओपन जीप मधून जंगलात प्रवेश केला तिथेच ट्रीपचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.गर्द झाडी आणि त्यामधून जाणारा जीपचा रस्ता.रात्रीच्या ड्युटी वर असलेला वॉचमन सकाळी आपली जबाबदारी दुसर्या वॉचमन ला देतो.त्याचप्रमाणे धुक्याची जागा उन्ह घेत होती.अर्थात उन्ह जमिनीवर पोहोचणार नाहीत याची काळजी जंगल घेत होते.आणि तरीदेखील खोडकर मुलाप्रमाणे दोन पानांमधून वाट काढीत जमिनीवर पोहोचलेले उन्हाचे कवडसे उन आल्याचे संकेत देत होते.
तयार झालेल्या रस्त्यावर स्पष्टपणे दिसणारे वाघाचे पंजे कुतूहल आणि भीती लक्षात आणून देत होते.गणेश पेठेतील रस्त्यावर मोठ्या अविर्भावात भर रस्त्यावर बसलेल्या गायी आणि त्याच अविर्भावात किव्वा त्याच थाटात शेकड्याने बागडणारी हरणे पाहताना 'एक घनदाट जंगल होते'अशी पंचतंत्रातील गोष्टीची सुरुवात डोळ्यासमोर येत होती.वाघाची प्रचंड ओढ असूनही झाडाच्या शेंड्यावर बसलेले स्थलांतरित पक्षी कॅमेर्याशी संवाद करीत होते.
'निरव शांतता' या शब्दाचे चालू असलेले प्रात्यक्षिक आमच्याच बोलण्याने भंग होत होते.झाडात झालेली पानाची सळसळ लक्ष वेधत होती.मधेच एखादा हत्ती आपण सर्वात 'रॉयल' प्राणी का आहोत हे अधोरेखित करीत होता.'कुठेही जा आम्ही असणारच' असे सांगणारी अनंत माकडे नजरेस येत होती.
इतका वेळ शोधत असलेली नजर अखेर धन्य झाली.चट्टेरी पट्टेरी वाघ साक्षात समोर होता.भारताचा राष्ट्रीय प्राणी आपल्यालाच का म्हणतात हे त्याच्या प्रत्येक पाउला तो सांगत होता.सुमारे अडीच फुट उंचीच ते वाघाचं पिल्लू,पिल्लू म्हणण्याइतपत नाजूक नक्कीच नव्हतं.सगळ्यात मोठ्या आकाराच्या फुगवलेल्या फुटबॉलच्या मापाचा तो चेहेरा आणि चार फुट लांब असे ते पिल्लू आमच्या नजरेला पडले होते.कुठल्याही बंदिस्त वातावरणात न वाढल्याने आलेली नैसर्गिक तुकतुकी राजेशाही थाटाचे प्रदर्शन करीत होती.कितीही लहान असला तरी वाघ म्हटल्यावर वाटणारी भीती आमच्या चेहेर्यावर स्पष्ट झळकत होती.पाच फुटांवर वाघ उभा आहेंनी हातात कॅमेरा आहे हे वर्णन वाचणे किती सोपे आहे.पण डोळ्यांनी दिसत असलेले बारकावे आणि झूम करण्याची काडीमात्र आवश्यकता नसूनही माझा कॅमेरा एकही फोटो टिपू शकला नाही.जरा धक्क्यातून सावरल्यावर फोटो काढणे शक्य झाले.पिंजर्यात ठेवलेला गरीब वाघ हजार वेळा पहिला होता,पण जंगलात फिरणारा मोकळा वाघ पाहण्याचा योग पहिल्यांदाच आला.सुनिता बाईंच्या 'व्याघ्रदर्शनाची ' प्रकर्षाने आठवण झाली.
जंगलाचा अनुभव आधीदेखील माझ्यासाठी सुखावह राहिला आहे.आणि या वेळी तो अजून सुखद झाला.काही गोष्टी जितक्या जास्त बघू किव्वा अनुभवू तितक्या जास्त समजतात असे म्हणतात.आणि जंगल हि त्यातलीच एक गोष्ट असावी.नाईलाजाने जंगलाचा निरोप घेतला आणि बाहेर पडलो.
'वनवासाला जाणे हि शिक्षा असू शकते का ?' हा उगीचच विचार डोकावून गेला.
"Madhyapradesh - A Tourist Destination " यावर माझा आता विश्वास बसायला सुरुवात झाली होती.
आमचा पुढचा टप्पा होता भेडाघाट.बांधवगड पासून दोन अडीच तासांवर भेडाघाट नावाचे ठिकाण आहे.नर्मदा नदीमधील बोट फेरी या पलीकडे काहीही बघण्यासारखे नाहीये.आणि कोजागिरीची रात्र असल्याने रात्री देखील बोट फेरी घेता येईल हा त्यातल्यात्यात बोनस.केवळ बोट फेरी घेण्यासाठी तिथे का जावे ? या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुम्हाला पुढे मिळेल.कारण मलाही हाच प्रश्न होता.आणि आता मला असे प्रश्न पडत नाहीत.निदान भेडाघाटच्या बाबतीत तरी...
तर तीन तास प्रवास करून आम्ही संध्याकाळी साधारण ५ वाजता भेडाघाट ला पोहोचलो.स्वारगेट पासून शनिवारवाड्यापर्यंत इतकाच त्या गावाचा व्याप असेल.मी लोकसंख्या म्हणत नाहीयेसाधारण आकारमान सांगायचा प्रयत्न.लोकासंख्या कमीच असणार.नर्मदेच्या तीरावर वसलेले एक छोटेसे गाव.ज्याला नर्मदेचा एक मोठा घाट आहे.
संध्याकाळी हॉटेल वर समान टाकून रात्रीच्या बोटीची चौकशी करण्यासाठी आम्ही त्या घाटावर आलो.रात्री साडे दहा वाजता शेवटची बोट असते अशी जुजबी माहिती मिळाली.आणि आज कोजागिरी निमित्त जरा गर्दी म्हणता येईल इतपत लोकं घाटावर होती.संध्याकाळचे सात वाजले होते.आरतीची तयारी चालू होती.मी सहज विचारले कि कोणतेही मंदिर जवळपास नसताना हि कुठल्या देवाच्या आरतीची तयारी चालू आहे ? तेव्हा असे लक्षात आले कि नर्मदेच्या घाटावर उभे राहून नर्मदा नदीची महाआरतीरोज सात वाजता केली जाते.नदीची आरती पाहणे हि गोष्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होती.
नदीत पणत्या सोडणारी लोकं,नदीकडे पाहून आरती ओवाळणारी
लोकं या गोष्टी विलक्षण होत्या.नदीचे विशाल पात्र,संथ वाहणारी नर्मदा आणि
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र या तीन गोष्टी भेडाघाट ला चार चांद
लावत होत्या.आणि हो तर कदाचित फक्त सुरुवात होती.
रात्री अकरा वाजता आम्ही नौकाविहार सुरु केला.चंद्र माथ्यावर आला होता.थंडी बोचरी नाही पण जाणवेल इतकी नक्की होती.बोटीने आपली जागा सोडली आणि नर्मदेचे विस्तीर्ण पात्र चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले आम्ही पाहत होतो.
रात्री अकरा वाजता आम्ही नौकाविहार सुरु केला.चंद्र माथ्यावर आला होता.थंडी बोचरी नाही पण जाणवेल इतकी नक्की होती.बोटीने आपली जागा सोडली आणि नर्मदेचे विस्तीर्ण पात्र चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले आम्ही पाहत होतो.
समोरचे दृश्य असे होते की,विशाल पत्रात संथ चालणारी आमची बोट,पाण्यात पडून ओला झालेला चंद्रप्रकाश,दुतर्फा असलेले विविधरंगी संगमरवरी कडे,आणि त्या संगमरवरावर चंद्रप्रकाश पडल्याने चमकून डोळे दिपवणारा तो संगमरवर.सोनेरी रंगाच्या संगमरवरावर पांढराशुभ्र चंद्रप्रकाश पडल्यावर जो रंग तयार होतो त्या रंगाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहणे हि गोष्ट फक्त इथेच पाहायला मिळू शकते.इतके विविधरंगी संगमरवर कसे असू शकतात ? बर ते व्यवस्थित ओळीने असून त्याच्या मधून आपण बोटीने जाऊ कसे शकतो ? हे दुपारच्या उन्हाने काळे का पडत नाहीत ? किव्वा तत्सम प्रश्न आपल्याला येथे अजिबात पडत नाहीत.कारण आपण त्या मनस्थितीतच नसतो.
हीच फेरी आम्ही दिवसा पण केली,यावेळी त्या काड्यांची भव्यता जाणवत होती.नर्मदेचे पात्र अजून विस्तीर्ण दिसत होते.पांढराशुभ्र संगमरवर आणि त्याचे पाण्यातील प्रतिबिंब डोळ्याचे पारणे फेडते हे मात्र नक्की.सोनेरी सगम्रावरचे प्रतिबिंब पहिले कि सोनेरी पाणी पहिल्याचा भास होतो.तोच धीरगंभीर पाण्याचा प्रवाह.संथगतीने पाणी कापत जाणारी आमची बोट,आणि दोन कड्यांमधून जाणारा तो प्रवाह.
बोट राईड आता संपली होती...आम्ही सावकाश बोटीतून उतरलो...आणि हॉटेल मध्ये परतलो..
'Indian Ocean' असे नाव धारण करणारे आपल्या नावात 'Ocean' असून 'मा रेवा थारो पानी निर्मल' असे म्हणतात तर मी तर या चमत्कारापुढे अतिशय लहान आहे....
मध्यप्रदेशात पाहण्यासारखे काय आहे या माझ्या बावळट प्रश्नाला कडक उत्तर मिळाले होते...
घरी आल्यावर पाणी घेण्यासाठी फ्रीज उघडला आणि डीप फ्रीजर
च्या खालच्या कप्प्यात पेढ्यांनी भरलेला बॉक्स ठेवलेला होता...
ह्रषिकेश पांडकर
२०-११-२०१२
ह्रषिकेश पांडकर
२०-११-२०१२
hey mast lihile aahes .. Photos pan apratim !!
ReplyDeletechhan zala aahe bhai lekh...keep it up!
ReplyDeleteIt was pleasant to read this one...
ReplyDeletemast lihilays !!
ReplyDeleteSahi lihila ahes re... dar veles tu pravas varnan lihilas ki asa hota jayla pahije lagech... ani sarvat avadaleli upma "अशा वेळी काळानुरूप जमलेले विचार हिरवा सिग्नल लागल्यावर सुटलेल्या दुचाक्यांसारखे घाईने एकत्र सुटतात" kharach asa asata at least aplya punyat tari... :)
ReplyDeletesaglach apratim......hidusthan ka dil dekho......INDIA has a BEAUTIFUL HEART......mast lihilay re pandya....freez ughadtana roj SAMGRA BHARATDARSHAN....:):):)keep it up....keep wrting...:):):)
ReplyDelete