Tuesday, August 28, 2012

..( भाग - ३ )


                कॅम्प ४ सर केल्यावर वेध लागतात ते 'सागरमाथ्याचे'.इथून पुढे त्याने सांगण्यास सुरुवात केली आणि आमची उत्सुकता देखील उत्तरार्धाकडे सरकली.

             
कॅम्प ४ सोडला तो मध्यरात्री.कारण शक्यतो शेवटची चढाई मध्यरात्रीत केली जाते.कारण दुपारी १२ नंतर हवामान झपाट्याने बदलते आणि बर्फाचे वादळ किव्वा avalaunch या सारख्या गोष्टी किव्वा बर्फाचे कडे कोसळून रस्ते block होणे या सारख्या गोष्टी घडतात.या गोष्टी टाळण्यासाठी पुढचा प्रवास हा मध्यरात्री पासून सुरु केला जातो.अर्थात हा अनुभवातून आलेला अंदाज आहे.पण अंदाज आणि खात्री यातील फरक निसर्ग आपापल्या परीने स्पष्ट करत असतोच.पण मुद्दामून आगीत उडी मारण्यात काय अर्थ आहे.

    त्याने चौथा कॅम्प सोडला, आणि तो 'south col' पर्यंत पोहोचला.अर्थात तो जेव्हा सर्वप्रथम 'south col' असे म्हणाला तेव्हा मला 'south col' म्हणजे काय हे माहित असायचे कारणाच नव्हते.तेव्हा त्याने त्याचे स्पष्टीकरण दिले कि..'south col' हि अशी जागा आहे कि एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर यांच्या दरम्यान असलेल्या रांगेचा सर्वात कमी उंचीचा बिंदू.म्हणजे दोन शिखरांचा मध्ये जो  'V' आकार तयार होतो तर त्या 'V' चा सर्वात खालचा भाग म्हणजेच 'South col'...शंका निरसन झाल्याने मी समाधानाचा आणि चहाचा घोट घेतला आणि 'south col' वरून चालायला सुरुवात केली.






            'South Col' सोडल्यानंतर साधारण ९००/१००० फुटांवर 'एव्हरेस्ट बाल्कनी' नावाची एक जागा आहे.अर्थात आपल्या डोक्यात बाल्कनी ची कल्पना आहे .तशीच काहीसे इथे पण आहे.म्हणजे गिर्यारोहकांना विश्रांती घेण्यासाठी असलेली हि  जागा.म्हणजे छोटेसे पठार आहे.जेथे उभे राहून तुम्हाला संपूर्ण भोवतालचा परिसर पाहता येतो.अर्थात हि बांधलेली  जागा नसून हि निर्माण झालेली जागा आहे.बाल्कनी मधून दिसणाऱ्या तिबेट चे वर्णन ऐकताना क्षणभर पायाखाली बर्फ लागतोय कि काय असा भास होऊन मी बावळटासारखे पायाकडे पहिले.या बाल्कनी पासून शिखर १२०० फुटावर आहे.बाल्कनी मध्ये सर्वप्रथम ऑक्सिजन सिलिंडर बदलला जातो.





 

           'एव्हरेस्ट बाल्कनी' मध्ये काहीसा विसावा घेऊन आम्ही आमचे ऐकणे पुढे चालू ठेवले.भले तिकडे बर्फ पडत असेल पण आम्ही बसलेल्या खोलीत येणारा उन्हाचा कवडसा थंडगार एव्हरेस्ट सफरीवर उबदार पांघरून घालत होता.आम्ही बाल्कनी मधून चालायला सुरुवात केली.

  

   'एव्हरेस्ट बाल्कनी' सोडल्यानंतर सर्वप्रथम जी चढाई असते त्याला 'साउथ समिट' असे म्हटले जाते.शेवटच्या चढाईचा मध्य असावा कदाचित.ज्याच्या नावातच 'समिट' हा शब्द आहे तिथून खरे समिट लांब नसेल असा निरागस आणि मोघम अंदाज लावून मी 'साउथ समिट' ऐकत होतो.या भागातून चालताना दगडाचा भाग जास्त असतो.म्हणजे समजा वार्याच्या अतिवेगामुळे ताजा आणि भुसभुशीत बर्फ उडून गेला असेल तर.या 'साउथ समिट' वरून चालत असताना उजव्या हाताला सुमारे ५००० फुटाची दरी आहे जी थेट तिबेट मध्ये उतरते आणि डाव्या बाजूला उंच कडा आहे.आणि या दोघांमधून ३० अंशाच्या कोनात चढाई करणे क्रमप्राप्त असते.हे सांगत असताना मी ३० अंश, ५०००  फुट याचा गणिती हिशोब लावून आश्चर्य व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत होतो.

 आणि हे चालू असताना माझा मित्र आश्चर्याने म्हणाला कि 'अरे हे कसे शक्य आहे ?...काही काय '..यावर तो त्याला म्हणाला कि 'अरे हो..वाटल्यास एकदा जावून पाहून ये'....या वाक्यानंतर मात्र माझी एकाग्रता आणि आमची शांतता भंग पावली...'एकदा जावून पाहून ये '...या म्हणण्यावर आम्ही काय बोलणार होतो.हे म्हणजे ४ फुटी स्विमिंग पूल मध्ये टायर लावून पोहत असलेल्या एखाद्या मुलाला अरे 'इंग्लिश  खाडी एकदा पोहून बघ...किती छान वाटते ते' असे म्हणण्यासारखे होते.अर्थात यावर त्यालाही हसू आले...या वेळात उरलेला चहा आणि ताटली मधील २ उरलेली बिस्कीट संपवून हात झटकून आम्ही पुन्हा 'साउथ समिट' वर येऊन पोहोचलो.


               'साउथ समिट' हा टप्पा पार केल्यानंतर पुढची चढाई असते ती 'हिलरी स्टेप' कडे जाण्याची. या मधल्या वाटेचे वर्णन करीत असताना त्या वाटेचा अवघडपणा त्याच्या प्रत्येक शब्दातून बाहेर पडत होता.अतिशय निमुळती वाट म्हणजे बरोब्बर एका माणसाचे एक पाऊल फक्त कसेबसे बसू शकेल इतका निमुळता हा रस्ता ज्याच्या दोन्ही बाजूंना खोल दरी आहे.दरी मंजे एक बाजू सुमारे १०००० फुट खाली नेपाल मध्ये उतरते आणि दुसरू बाजू ८००० फुट खाली तिबेट मध्ये उतरते.अश्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे किती भयावह असू शकेल याचा अंदाज न लावणे इष्ट.म्हणजे समोर दिसत असलेली 'हिलरी स्टेप' जितकी प्रसिद्ध आहे तितकाच हा  'साउथ समिट' ते 'हिलरी स्टेप' हा प्रवास कुप्रसिद्ध असू शकेल असे म्हणायला हरकत नाही.


 
                'हिलरी स्टेप' म्हणजे एव्हरेस्ट या विषयाबद्दल मला माहित असलेला दुसरा शब्द.कारण एव्हरेस्ट सर्वप्रथम कोणी सर केले ? '' या प्रश्नांचे इयत्ता ३री मध्ये असताना वाचलेले म्हणजे 'एडमंड हिलरी आणि 'तेनसिंग नोर्गे'.तर त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली हि हिलरी स्टेप.याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी त्याला या स्टेप बद्दल विचारले असता त्याने सांगायला सुरुवात केली.हिलरी स्टेप हि खरच एक पायरी आहे.मात्र त्याची उंची साधारण ४० फूट इतकी असून संपूर्ण कातळ खडक आहे .साधारण  'साउथ समिट' आणि एव्हरेस्ट माथा यांच्या मध्ये हि हिलरी स्टेप आहे.
               
हि स्टेप चढताना आलेला अनुभव सांगताना तो म्हणाला कि, हिलरी स्टेप चढताना ३ टप्प्यात चढायची असते म्हणजे सर्वप्रथम डावा पाय रोवायचा त्यावर भार देऊन उजवा पाय वर ठेवायचा आणि मग लगेच उजव्या यावर भार देऊन डावा पाय थेट वर ठेवायचा.एवढ्या तीन छोट्या टप्प्यात हिअरी स्टेप चढली जाते.आता इतकी छोटी आणि सोपी गोष्ट असूनही हि हिलरी स्टेप इतकी प्रसिद्ध कशी ? या माझ्या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर प्रचंड आश्चर्यकारक होते.


तो म्हणाला कि...हिलरी स्टेप समुद्रसपाटीपासून सुमारे २८८४० फुट उंचीवर आहे,त्यामुळे ऑक्सिजन चे प्रमाण अतिशय नगण्य असते.गिर्यारोहकाच्या शरीराची त्यावेळेची परिस्थिती इतकी बिकट असते कि थोडासाही जोर देऊन पुढे जाणे हे केवळ अशक्य असते.आणि या करणा मुळेच हिलरी स्टेप चढत असताना १/२ प्रयत्नांत तुम्हाला ती पार करता आली नाही तर तुमच्यात इतकी ताकदच शिल्लक रहात नाही कि तुम्ही ती चढून पुढे जाऊ शकाल.काही गिर्यारोहक तिथूनच परत आले आहेत.हे ऐकून परत आलेल्या लोकांच्या दुखाची पातळी काय असू शकेल याचा अंदाज लावत मी हिलरी स्टेप पार केली.



 
               हिलरी स्टेप हा एव्हरेस्ट च्या मार्गातील शेवटचा अडथला मानला जातो.आणि आता चढाई असते ती माथ्याची.....
              
आता फक्त ३०० फुटांवर शिखर आलेले असते, अतिशय सावध गतीने पुढची चढाई करावी लागते, शरीर प्रचंड थकलेले असते, झोपेच्या अभावामुळे शरीरातील त्राण नाहीसे झालेले असतात.मात्र  काही फुटांवर आलेले स्वप्न पूर्ण होणार असते.तो देखील आता सागरमाथ्याच्या समीप येऊन पोहोचला होता.आणि आमची उत्सुकता अजिबात ताणून न धरता त्याने एव्हरेस्ट सर केले....
              
अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले.आणि त्या क्षणी नकळत पुढचा प्रश्न माझ्या तोंडी होता कि 'तुझी पहिली भावना काय होती ?'
              
त्याला हा प्रश्न अनेकांनी विचारला असेल, पण एवढं सगळं सांगून झाल्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर देतानाचा त्याचा उत्साह कमालीचा वेगळा होता.त्याने सांगायला सुरुवात केली.तो म्हणाला "मी साधारण सकाळी ९.३० - १० च्या सुमारास  शिखर सर केले,आनंद तर साहजिकच होता,पण व्यक्त करायची अजिबात ताकद नव्हती.शिखराला नमस्कार केला...तिरंग्या समवेत एक फोटो काढला आणि केवळ १५ मिनिटे थांबून परतीचा आरंभ केला"...एका श्वासात २ वर्षाचा प्रवास त्याने संपवला होता...

            
एव्हरेस्ट माथ्यावरून काय दिसत असेल आणि कसे...या वर त्याने घेतलेला क्षणभर वेळ माझ्या प्रश्नाचे निम्मे उत्तर देऊन गेला होता.५ मजली इमारतीच्या गच्ची मध्ये उभे राहून खालचे बघणारे आम्ही किव्वा १०० मजली 'Eiffel Tower  ' वरून खालचे paris बघणारे लोक या सर्वांच्या कित्त्येक पट पुढे गेलेला तो म्हणाला कि सुर्यकीरणांनी हिर्यासारखा चकाकणारा संपूर्ण बर्फाळ प्रदेश.नजरेच्या खालच्या बाजूस उतरलेले ढग.बोट दाखवून अंदाज व्यक्त करता येईल असे नेपाळ आणि तिबेट.... आणि पृथ्वीचा आकार गोल आहे..ह्या भौगोलिक वाक्याचे याची देही याची डोळा असे घडलेले दर्शन.कारण शिखरावरून क्षितिजा कडे बघितले असता पृथ्वी गोल आहे याची खात्री पटते. 


               एव्हरेस्ट सर करायचे स्वप्न पूर्ण झाले होते.मोहिमेसाठी केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी फळास आली होती.गिर्यारोहणाचा परमोच्च बिंदू असलेले एव्हरेस्ट शिखर सर झाले होते.आणि जगातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचल्याचा आनंद होताच."शिखरावर पहिले पाऊल टाकले तेव्हाचा अनुभव कसा होता ?"..या प्रश्नावर त्याने उत्तर दिले कि "एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवण्याची परवानगी नाहीये,एव्हरेस्ट माथ्याला देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे पाय ठेवण्याचा प्रश्नच येत नाही,आपण फक्त फुलं वाहायची आणि बुद्ध लोकांच्या प्रार्थनीय असलेल्या पताका वाहायच्या आणि वंदन करून नतमस्तक व्हायचे "...


                                                                                        - क्रमश:
           

No comments:

Post a Comment