अजूनही एखाद्या मंगल कार्याचे यश तेथे
असलेल्या जेवणाच्या चवीवर ठरते असे ज्यांचे ठाम मत आहे त्यांच्यासाठी ....
" उद्या पासून सकाळी पळायला जायचे "...हे वाक्य आदल्या दिवशी संध्याकाळी
म्हणणे जेवढे अवघड असते त्यापेक्षा कित्त्येक पटींनी त्याच रात्री म्हणणे अवघड असते....आणि
दुसर्या दिवशी सकाळी ते आचरणात आणणे तर त्यापेक्षाही.... पण नवीन वर्षाची सुरुवात आणि वाढते पोट अशा दोन्ही गोष्टींची सोबत लाभल्याने पहाटे उठणे तितके अवघड गेले नाही... मे महिन्याचा उन्हाळा असला तरीही सकाळी ५ ला थंड पाण्यात हात घालणे जीवावरच येते.....आज तर जानेवारी आहे...पण इलाज नाही....पोट बेसिनला टेकतय....
मोठ्या कष्टाने आवरून घराबाहेर पडलो..दशभुजा मंदिरापर्यंत तरी जाऊन येऊ असा धाडसी निर्णय घेऊन पळायला सुरुवात केली...मंदिराजवळ पोहोचलो...छातीचा भाता झाला होता...अजून नीटसे उजाडले देखील नव्हते..तिथेच २ मिनिटे बाकावर बसलो आणि परतायला निघालो....तेवढ्यात मंदिराच्या मुख्य दारातून खाली उतरणारा एक जिना मला दिसला आणि कुतूहलापोटी मी त्या जिन्यावरून खाली उतरून गेलो.
१० /१२ पायर्या उतरल्यावर असे लक्षात आले कि मागे कुठलाच जिना नव्हता....मागे फक्त अंधार होता....छातीचा भाता देखील आता शांत झाला होता....थोडे चालत पुढे आलो....आता अजिबात थकवा जाणवत नव्हता....हाताची घडी घालून चालावे इतपत थंडी जाणवत होती..तसा शुकशुकाटच पण...बम्बातून येणारा धूर आणि विस्तवाचा धगधग आवाज शांततेचा भंग करत होता....धुक आणि धूर यातील फरक फक्त वासानी जाणवण्याइतपतच होता...काकड आरती आटपून येणारे लोक शांतपणे परतत होते...लांबून येणारा स्त्रोत्र पठणाचा अस्पष्ट आवाज चालताना साथ देत होता....पूर्वेला नुकतंच सरलेल धुकं दिवस सुरु झाल्याचे संकेत देत होत....घराभोवती पळणाऱ्या कोंबड्यांचा आवाज आणि हो फक्त कोंबड्याच नाही तर एका कोंबडीमागे पळणाऱ्या ३/४ पिल्लांचा पण.....घराच्या सज्जा मध्ये झोपलेले लोक उठून अंथरुणाच्या घड्या घालताना दिसत होते..काल रात्री लावलेला मारुतीच्या मंदिरातील तेलाचा दिवा विझत आला होता...अगदीच एखाद्या घराच्या खिडकीतून स्वयंपाक घरात पेटलेली चूल फक्त दिसत होती...दिसत होती कसली .....विस्तवामुळे ती चुलच असावी असा अंदाज....ओसरीला टेकवून उभी केलेली सायकल टायर ट्यूब ने ओसरीच्या खांबाला बांधून ठेवली होती.
आता बरचसं उजाडलं आहे...समोर पर्वतीवरचे मंदिर आता स्पष्ट दिसत आहे....घरातून मुलांचे श्लोक म्हणण्याचे लयबद्ध आवाज....नुसत्या आवाजावरून असे वाटावे कि....एक छोटा मुलगा ज्याची नुकतीच मुंज झाली आहे....आणि फक्त एक छोटी शेंडी डोक्यावर आहे...धोतर घातले आहे..आणि देवापुढे मांडी घालून हाताने जानव्याशी खेळत लयबद्ध एखादा गीतेचा अध्याय म्हणतोय...पक्ष्यांची किलबिल थोडी तीव्र झाली आहे ..अगदी चटका नाही..पण अंगावर आल्यावर बरे वाटावे इतपत उन आलेले...मुलांची शाळेत जायची धावपळ...खाकी हाफ चड्डी ,खाकी टोपी,पांढरा सदरा आणि हातात पुस्तक किव्वा कापडी पिशवी..मधूनच शेजारून धूळ उडवत जाणारा टांगा..रस्त्यांना पण जरा जाग आलीये..थोडे पुढे गेल्यावर दिसणाऱ्या घाटावर कपडे धुण्यासाठी जमलेल्या स्त्रिया..आणि आपल्यालाही पुढे असेच करायचे आहे या जाणीवेने आलेल्या काही लहान मुली...बंबाचा आवाज शमलेला पण धुराचा ओघ तसाच..घराबाहेरील कट्ट्यावर मुलीची वेणी घालत बसलेली आजी..घरातील ओसरीमध्ये असलेल्या लाकडी खांबाला लटकवलेली टोपी..आणि त्याच लाकडी खांबा खाली ठेवलेला तांब्याचा गडू आणि फुलपात्र.. त्याच्या समोरील खांबाला लाटकविलेला कंदील ज्याची काच धुराने काळी ठिक्कर झाली आहे.....शेजारी असलेली रिकामी आराम खुर्ची आणि त्याच्या बाजूला ठेवलेली तपकिरीची आणि पानाची डबी...
थोडा पुढे गेल्यावर....सायकल वरून जाणारे गृहस्थ नजरेस पडले....काळी टोपी,शुभ्र पांढरे धोतर...आणि काळा कोट...खांद्याला शबनम...बहुदा मास्तर असावेत..काही मंडळी उन्हाकडे पाठ करून शेकत बसलीयेत गप्पा मारत..मगाशी दिसत असलेली ओसरी आता नवीन शेणानी सारविणे चालू आहे...आणि सारवताना जास्तीचे शेण खाली पडत आहे...त्याच्याच शेजारच्या घरातून घाईने येणारे एक गृहस्थ...हातात ८ आकाराची काठी..डोक्यावर पगडी,काळा कोट..वहाणा म्हणतात तश्या काहीश्या चप्पला...हातात अर्धवट घेतलेली पिशवी..संपूर्ण डोळेदेखील झाकले गेले नसावे इतका पुढे आलेला काळ्या आणि जाड काड्यांचा मोठा चष्मा ज्याची दोरी दोन्ही कानाच्या मागे गेलेली...कानावरील केस आणि हातावरील केस यांची घनता साधारण सारखीच.... भरभर घराबाहेर येऊन आपल्या सायकल वर बसून क्षणार्धात डोळ्याआड...बहुतेक खालच्या आळीतील वैद्याकडे हिशोबनीसाचे काम करीत असावेत..थोडा पुढे गेलो तर जरा मोठ्या ठिकाणी आलो बहुदा हा चौक असावा..एका बाजूला ५/६ गायी बेमालूम पणे रस्त्यात बसल्या आहेत..चौकातील सायकल चे दुकान नुकतेच उघडले असावे कारण जवळून जाताना उदबत्तीचा वास आणि नुकतेच दुकानाबाहेर पाणी शिम्पडल्याचा वास येतोय...सकाळची वेळ असूनही आणि दुकानात असूनही दुकानदार बनियन वरच बसला आहे..आणि हाताखालचा पोर्या आदल्या दिवशी दुरुस्त न झालेल्या सायकल बाहेर आणून ठेवताना दिसतोय...
तिथून थोडा पुढे आलो..आणि लाल महाल नजरेस पडला..कोणताही पुतळा नव्हता त्यामध्ये..कोणतेही चौथरे बांधलेले नव्हते..फक्त एक रम्य वास्तू होती..ज्याच्या भिंतीवर कोणाचेही नाव नव्हते..ज्याच्या बाहेर शेजारी रहाणार्यांनी सडा शिंपडला होता आणि पायरी वर २ दिवे लावले होते...तसाच पुढे आलो...थेट शनिवार वाड्याच्या बुरुजाच्या सावलीत उभा राहिलो...बुरुजाच्या बाजूला गवत उगवले होते आणि गवतावर दवाचे थेंब...त्या दवामुळे पाय ओले होत होते...स्वच्छ रस्ता होता मातीचा....पेशव्यांच्या गणपती मंदिरात नुकतीच आरती झाल्याचे संकेत मिळत होते..ब्राह्मण सर्व आवरून निघायच्या तयारीत होता...उन्ह डोळ्यावर आली होती..
तसाच पुढे गेलो..आणि मगाशी दिसणारी नदी पुढ्यात येऊन ठेपली...समोर नदी आणि पाठीमागे शनिवारवाड्याचे भव्य प्रवेशद्वार.....दोन्ही गोष्टी थेट दिसत होत्या ....मगाशी नदीवर जितकी गर्दी होती तेवढी मात्र आता नव्हती....फक्त काही म्हशी डुंबत होत्या...काही ४/५ लोक अंघोळ करत होते..नदीचे पत्र इतके विशाल होते कि मंदिरातून येणाऱ्या पायर्या थेट नदीत जात होत्या...तसाच पुढे आलो..समोर एकाच ओळीत ७/८ टांगे उभे होते..अगदी बग्गी होती अशातला भाग नाही पण ३ लोक व्यवस्थित बसतील अशी व्यवस्था असावी. इथे थोडी गर्दी जाणवत होती..कारण एकाच दृष्ट्क्षेपात ६/७ लोक सहज दिसत होती...शेंगदाणे आणि गुडदाणी विकणाऱ्या काही आज्जी रस्ताच्या कडेला बसल्या होत्या...तसाच पुढे आलो..समोर काही लोक रस्त्यावर बसून केस कापून घेत होते..२ मिनिटे तिथे उभा राहिलो..आणि पुढे सरकलो..सूर्य माथ्यावर आला होता..रस्ते देखील मोकळे जाणवत होते..वर्दळ कमी झाली होती..कुत्री झाडाच्या सावलीत बसली होती..मधूनच एखादा टांगा गेला कि उगीच उठून घोड्यांवर भुंकायचा बिचारा प्रयत्न करीत होती...आणि पुन्हा येऊन बसत होती.टांग्यामुळे उडालेली धूळ हळू हळू बसत होती..आणि मी पुढे सरकत होतो..जरावेळाने पुढे आलो आणि एका रस्त्याच्या दुतर्फा दुकाने दिसू लागली...
चांभार, सोनार ,विविध नक्षीच्या टोप्या, लहान मुलांच्या खाकीच्या चड्ड्या,खेळण्याची दुकाने ज्यांच्या बाहेर लाकडी बैलगाड्या,भोवरे,पतंग,आसारी टांगून ठेवलेल्या... कदाचित शाळेची वेळ असावी म्हणून गर्दी नव्हती तिथे...मात्र बाकीच्या ठिकाणी लगबग दिसत होती..तिथून ते पहात पहात पुढे आलो...पुढे रस्तावर मुले गटागटाने चालत होती..बहुदा शाळा सुटल्या असाव्यात..मुलांच्या हातातील चिंचा पहिल्या आणि आपल्याला देखील पोट आहे याची अचानक जाणीव झाली.समोर असलेल्या देवळात गेलो आणि थंड पाणी घेऊन बाहेर पडलो.थोडे चालत गेल्यावर रस्ताच्या कोपर्यावर एका मोठ्या कढईत जिलेबी तळणारा तो अजस्त्र देह माझ्या नजरेतून सुटला नाही....३ विटांवर ठेवलेली कळकट्ट कढई...करवंटीला भोक पाडून त्यातून चक्राकृती येणारे ते पीठ आणि तळल्यावर काढून ठेवण्यासाठी असलेली ती परात या गोष्टी डोळ्यात साठवून मी तिथून निघालो...जेवणाची वेळ टाळून गेली होती...डावीकडे वळल्यामुळे किमान सूर्य डोळ्यावर तरी येत नव्हता..आणि सावल्या लांब होत होत्या..तसाच पुढे चालत होतो..उजवीकडे मान वर करून पहिले कि पर्वती वरचे मंदिर दिसत होते..आणि मान थोडी खाली केली कि वर्तक मंगल कार्यालय,दामले वाडा, सहस्रबुद्धे वाडा, वैद्य कोटणीस... अशा पांढऱ्या रंगाने हाताने लिहिलेल्या पाट्या वाचत मी चालत होतो...सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीत चालले होते.कुठेही घाई किवा गर्दी नव्हती...थोडे चालल्यावर डाव्या बाजूला एक मोठा वाडा नजरेसमोर आला...दरवाजा सताड उघडाच होता...रस्त्यावरून थेट तुळशी वृंदावन आणि आतील गोठा स्पष्ट दिसत होता...विश्रामबाग वाडा असावा...बाहेर स्वच्छ पांढरे कपडे घातलेले मुनीम बसले होते.."कोण हवंय ??? उगीच रस्त्यात थांबून यायची जायची वाट अडवू नका....कामाचा असेल तर बोला" असा नाकातून काढल्यासारखा आवाज ऐकल्याचा भास झाला आणी मी काढता पाय घेतला... सकाळी घाई घाईत निघालेले सायकलस्वार आता मात्र संथ गतीने घराकडे सायकल मारताना दिसत होते.सावल्या धूसर होत होत्या आणि नाहीश्या झाल्या...मी तसाच चालत होतो..उन्हाचा चटका संपून त्याची जागा थंड वारा घेत होता....चालण्यात सुसह्यपणा जाणवत होता..
पर्वतीला वळसा घालून थोडे पुढे गेलो आणि अतिशय रम्य दृश्य नजरेसमोर आले...समोर छोटेसे तळे होते आणि त्याच्या मध्यभागी चौथरा होता ज्यावर गणपतीची मूर्ती होती...आजूबाजूला झाडी होती आणि तळ्यापर्यंत जाण्यासाठी पायवाट होती...तिथूनच नमस्कार केला आणि माघारी आलो..सूर्य अस्ताला जात होता..आणि मी पुन्हा हाताची घडी घालून चालू लागलो.सकाळी एका घरात लटकविलेला कंदील पाहिला होता...आता देखील कंदिलच बघत होतो पण या वेळी तो पेटविलेला होता...रस्त्यावर शांतता होती..एखादी सायकल,एखादा टांगा आणि गुरांना पुन्हा गोठ्यात नेणारा गुराखी यांसारखे काही मधून मधून डोळ्यासमोर येत होते.साधारण सूर्यास्त झाला होता ..अंगणात असलेले तुळशीवृंदावन ओले झालेले दिसत होते..बहुदा तिन्हीसांजेची पूजा नुकतीच झालेली असावी...थोडे पुढे गेलो आणि शुभंकरोती चे अस्पष्ट बोल कानावर पडले...थोडा पुढे जातो तोच पावकी आणि निमकी म्हणल्याचा आवाज स्पष्ट येऊ लागला...मिट्ट काळोख झाला होता...फक्त अंधुकसे कंदील आणि एखाद्या घरातील चुलीचा धूर या खेरीज प्रकाश दाखवणारा कोणीच नव्हतं....असेच थोडे पुढे चालून गेलो आता गोठ्यातल्या गायी देखील स्तब्ध होत्या..घोड्यांना टांग्यापासून मुक्त बांधले होते...कोंबड्या नाहीश्या झाल्या होत्या...मारुतीच्या देवळातील दिवा तेवढा तेवत होता ..बाकी सर्व अंधार....
समोरचे काहीही दिसत नव्हते ..मागे वळून पहिले पण मागेही तसेच....तसाच सरळ चालत गेलो आणि समोर पायऱ्या दिसत होत्या..त्या चढून वर आलो तर ..समोर भरपूर दिवे चमकत होते..खूप गर्दी होती.सिग्नल्स चालू होते..होर्न चे आवाज येत होते ...पोलीस होते...एकदम खाडकन कानाखाली बसावी तसे झाले आणि लक्ख प्रकाश पडला कि आपण खंडोजीबाबा चौकात आलो आहोत...एक रस्ता अलका थियेटर कडे जातो ...एक रस्ता वैशाली कडे जातो...आणि एक रस्ता आपल्या घराकडे...
...आता चालण्याचे त्राण नव्हते..आणि रस्तेही मातीचे नव्हते…..
- हृषिकेश पांडकर
No comments:
Post a Comment