Friday, December 6, 2019

काळवीट !

 

मध्य आणि दक्षिण भारतातील जवळपास सर्वच जंगलात कमी अधिक फरकाने आढळणारा प्राणी म्हणजे हरीण.सफारी दरम्यान काही वेळातच तसा दुर्लक्षित होतो हा बहुतेक सर्वांचाच अनुभव.मुबलक संख्या आणि सहज दृष्टीक्षेपात येत असल्याने तितकेसे नावीन्य रहात नाही.

अर्थात हा फोटोतला प्राणी तो नाही. जातकुळी तशी हरणाचीच पण रंग आणि शिंगांची रचना यामुळे याचे वेगळेपण अधोरेखित होते.शरीर बांधणी अगदी हरणाचीच पण रंग पूर्णतः वेगळा.टायगर रिसर्व,बगीरा लॉज,बायसन रिसॉर्ट अशी प्राण्यांवरून ठेवलेली नावं बरीच आहेत. मात्र या प्राण्यांच्या तुलनेत हा हरणाचा भाऊ तसा कुठेच बसत नाही.तरी गुजरात मधील वेलावदार येथील अभयारण्याला याचे नाव देण्यात आले आहे.


 

ब्लॅकबक अर्थात काळवीट.नजर जाईल तिथपर्यंत असलेल्या कुरणावर कळपाने फिरणारा हा प्राणी.तुकतुकीत त्वचा आणि शाळेत असताना शार्पनर मधून पेन्सिल फिरवल्यावर येणाऱ्या शंकाकृती लाकडी साली प्रमाणे किव्वा लोखंडी स्क्रूच्या खाली असलेल्या अणकुचीदार भागाप्रमाणे असलेली निमुळती होत जाणारी रेखीव शिंग लांबून लक्ष वेधून घेतात. गवताची उंची जरी जास्त असली तरी त्यातून सरकणारी ही शिंग या प्राण्याची हालचाल नजरेस आणून देतात.

तोच घबरट स्वभाव,त्याच सावध हालचाली,तीच भेदरलेली नजर.पण लांबवर पसरलेल्या कुरणाला छेद देणारा रस्ता ओलांडणारा हा कळप पाहताना स्तब्ध व्हायला होते एवढे निश्चित.

काळवीटाचं वर्णन करताना 'भाई' चा उल्लेख एकदाही केला नाही यासाठी तुम्ही माझं कौतुक सवडीनं कराच पण संधी मिळाल्यास या ‘ब्लॅकबक राष्ट्रीय उद्याना’ला नक्की भेट द्या.नानाविध शिकारी पक्षी,स्थलांतर करून आलेले पक्षी आणि तरस,लांडगे,खोकड यांसारख्या अपमार्जकांसोबत ( scavenger ) राहणारी ही काळवीट देखील तितकीच लक्षात राहतील.

हृषिकेश पांडकर

०६.१२.२०१९

Blackbuck National Park | Gujrat , India | November 2019

 

Monday, November 25, 2019

बगळ्यांची माळ फुले

 

अतिशय अर्थपूर्ण लिखाण आणि तितक्याच ताकदीचे वसंतरावांचे गायन या दोन मजबूत आघाड्यांवर उभे असलेले 'बगळ्यांची माळ फुले, अजून अंबरात' हे गीत. या गीतांमुळे साहजिकच बगळ्यांचे सौंदर्य वाढले आणि पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला.त्यामुळे उडणारा पक्षांचा थवा पहिला की हे गीत सहजच आठवते.


 

पण वर्णन बगळ्याचे आहे म्हणून इतर पक्षांच्या सौंदर्याला मर्यादा असण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही.किंबहुना बगळ्यापेक्षा हा उडणारा थवा मला जास्त भावला.पक्षाचा आकार,समांतर उडण्याची पद्धत आणि लयीत होणारी पंखांची उघडझाप प्रमाणबद्धता सिद्ध करत होती.

अगदी भल्या पहाटे नाही पण फटफटायला सुरुवात झाल्यानंतर आणि सूर्य दिसायच्या आधीच्या प्रकाशात टिपलेली हि मुद्रा.दिनचर्येचा प्रारंभ करीत निघालेले क्रेन अर्थात क्रौंच पक्षी.क्रेन म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे सारस क्रेन.मात्र हा सारस नाही हा सामान्य क्रौंच आहे.यालाच युरेशियन क्रेन असेही संबोधले जाते.

अन्नशोधार्थ किव्वा स्थलांतरासाठी रवाना झालेल्या या थव्याने माझ्या सफारीची आणि दिवसाची सुरवात चांगली केली.दिवस जसा उलगडत गेला तसा हा पक्षी वेगवेगळ्या रूपात पहायला मिळाला पण उडताना दिसलेला हा थवा जास्त काळ स्मरणात राहील हे नक्की.


हृषिकेश पांडकर

२५.११.२०१९

 

No one is free, even the birds are chained to the sky. 

Common crane | Velavdar , Gujrat | 2019

 

Monday, September 30, 2019

बिरबल भवन

 

गड आला पण सिंह गेला ही गोष्ट वाचून सिंहगडाचा तो तानाजी कडा पाहणे किव्वा बाजीप्रभुंचा तो खिंडीतील पराक्रम वाचून तो पावनखिंड पाहणे यासारखा दुसरा आनंद नाही. वाचलेली ऐतिहासिक गोष्ट ज्या जागेवर उलगडली ती जागा प्रत्यक्षदर्शी पाहणे हि गोष्ट मला वैयक्तिकरित्या खूप मजेशीर वाटते. याचा पुनःप्रत्यय आला तो आग्र्याहून सुटका या कथेची शेकडो वेळा उजळणी केल्यावर आग्र्याचा तो किल्ला पाहिल्यावर. 

 


 

या झाल्या महाराजांच्या कथा. महाराजांच्या इतिहासासोबतच लहानपणी वाचनात आलेल्या गोष्टी म्हणजे अकबर आणि बिरबलाच्या. बिरबलाची खिचडी,मूर्खांची यादी,सर्वोत्तम पाणी,किव्वा आंधळ्यांची संख्या या आणि अशा अनेक कथा डोक्यात घेऊन मी फतेहपूर सिक्री ला गेलो होतो. अतिशय हुशार,हजरजबाबी आणि विनोदी पद्धतीने अकबराच्या शंकांचे निरसन करणारा बिरबल राहत असलेली जागा म्हणजेच हे बिरबल भवन.

फतेहपूर सिक्रीच्या अनेक भव्य वास्तूंमधील शाबूत असलेली हि बिरबलाची राहण्याची वास्तू. जोधाबाईंच्या महालाच्या जवळच असलेली दोन घुमटांची इमारत भव्य किव्वा नेत्रदीपक अशी नक्कीच नाहीये पण त्या पुस्तकातल्या गोष्टी वाचून गेल्यामुळे तो चतुर राजा इथेच रहायला होता हि कल्पना मजेशीर वाटत राहते.

निमुळत्या रस्त्याने चालत पुढे आल्यावर नजरेस येणारे हे प्रशस्त आवार आणि हि टुमदार घुमटाकृती वास्तू कुतूहल निर्माण करत राहते. दुर्दैवाने वास्तूच्या आतील भागात फारसे काही शिल्लक नाहीये पण हे लांबून खुणावणारे जुळे घुमट जवळ गेल्यावर अधिक भव्य वाटायला लागतात.

फतेहपूर सिक्रीच्या या प्रांगणात अनेकविध वस्तू आहेत.प्रत्येक वस्तूला आपापला असा एक स्वतंत्र इतिहास आहे. पण त्या अकबर-बिरबलाच्या गोष्टींमुळे मला या वास्तूचे अप्रूप जास्त होते.

इतिहासाबद्दलची आवड नावड याबाबत विविध मते असू शकतात पण स्थापत्य कलेचा आनंद घेण्यासाठी या सिक्रीला आवर्जून भेट द्या. मुघल स्थापत्यकलेचा वरचष्मा असणारे हे प्रांगण डोळ्याचे पारणे फेडत राहते यात दुमत नाही.

 

हृषिकेश पांडकर

३०. ०९. २०१९

 

Fatehpur Sikri | Agra | India