Monday, February 5, 2018

'सूर्य' वाहून नेणारा रथ - कोणार्कचे 'सूर्यमंदिर'



दोन जंगलांच्या भेटीमध्ये मिळालेली उसंत सत्कारणी लावण्याच्या हेतूने आणि वाट वाकडी न करता नवीन गोष्टी पाहण्याची संधी मिळाल्याने पुन्हा एकदा या सुजलाम सुफलाम भूमीचे अंतरंग अनुभवायचा योग आला.भीतरकनिका हे जंगल पाहून झाल्यानंतर पुढली निसर्गभेट हि थेट 'चिलिका' सरोवरामध्ये होणार होती.पण या दरम्यान असलेल्या चोवीस तासांना योग्य न्याय देण्यासाठी वाटेत लागणारे 'कोणार्क' आणि त्याच्या बाजूला वसलेले 'पुरी' या दोन्ही ठिकाणांना दिलेली भेट अविस्मरणीय ठरली.

'भितरकनिका' साधारण १७५ किलोमीटर अंतरावर 'कोणार्क' हे ठिकाण आहे.'कोणार्क' चे सूर्यमंदिर हि इयत्ता पाचवीच्या सहामाही परीक्षेत भरलेली गाळालेली जागा सोडली तर त्यापलीकडे काहीच कल्पना नव्हती.पण प्राचीन भारतीय स्थापत्य कला पाहण्याची इतकी सहज मिळालेली संधी सोडण्यात कोणतेच शहाणपण नव्हते.आम्ही सकाळी भितरकनिका सोडले.दुपारी कोणार्कला पोहोचलो तेव्हा सूर्य माथ्यावरून पुढे सरकला होता.जिथे गाडी थांबली तिथेच जेवून घेतले.साधारण भारतातील कुठल्याही मंदिर बाहेर किव्वा प्रेक्षणीय स्थळाबाहेर मांडलेली दुतर्फा दुकाने आणि तेथे मिळणाऱ्या नेहमीच्या वस्तू यांची मांदियाळी होती.साधारण पाचशे मीटर अंतरावर कोणार्कचे सूर्यमंदिर उभे होते.मंदिराच्या पाठीमागे निळाशार समुद्र पसरला होता.जितकी लोक पाहायला आली होती साधारण तितकेच गाईड म्हणून वावरणारे लोक देखील पहायला मिळत होते.तो पाचशे मीटरचा रस्ता ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यात देखील एक मजा होती.

दुपारी दोन वाजता गरम भजी,आईसक्रीम,वाफाळता चहा किव्वा तिखट मीठ लावलेली थंडगार काकडी या सर्व ठिकाणी तितकीच गर्दी होती.आपल्या लोकांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.सूर्य मंदिर म्हणल्यावर डोळ्यासमोर येणाऱ्या रथाच्या चाकाच्या असंख्य प्रतिकृती विक्रीस होत्या.पण डोळ्यासमोर असलेले साक्षात सूर्यमंदिर सोडून दुकानांमध्ये घुटमळण्याचा मोह मी आवरला.आणि सूर्य देवतेला समर्पित असलेल्या आणि १३व्या  शतकात उभारलेल्या सूर्य मंदिराच्या मुख्य कमानीतून प्रवेश केला.

सूर्यमंदिर डोळ्यासमोर उभे होते.उजव्या बाजूला लावलेल्या माहिती फलकावरील माहिती वाचण्यात पहिली दहा मिनिटे घालवली.आणि मंदिर पाहण्यास सुरुवात केली.शंभर फुटी रथावर विराजमान झालेले सूर्यमंदिर पाहताक्षणी कळून येत नाही.मात्र एकेकाळी सुमारे दोनशे फुटाचे असलेले बांधकाम आता तितकेसे शिल्लक नाहीये.


 
डोक्यावर धारण केलेल्या काळ्या रंगाच्या मनोऱ्यामुळे 'काळा पॅगोडा' अशी ओळख असलेले सूर्यमंदिर स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.मंदिरा जवळ जाताच रथाच्या चाकावरील सुंदर कलाकुसर खिळवून ठेवते.रथाच्या समोरील बाजूस रथाला ओढणारे अश्व पाहायला मिळतात.गायत्री,ब्रिहती,उष्णीह,जगती,त्रिष्टुभ,अनुष्टुभ आणि पंक्ती या सात अश्वांनी ओढला जाणारा रथ इथून स्पष्ट दिसतो.रथाला बारा फुटी व्यासाची एकूण चोवीस चाके आहेत.प्रत्येक चाकावर असलेली कोरीव कलाकुसर हि थांबून पाहणे वेळेअभावी शक्य नव्हते पण जमेल तितके आणि जमेल त्या सर्व प्रतिमा डोळ्यात साठवून आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करत होतो.

रथावर असलेल्या सूर्यमंदिराचे डागडुजीचे काम चालू आहे.त्यामुळे जागोजागी लोखंडी खांब आणि सुतळ्या पहायला मिळतात.मंदिराच्या आवारात इतर छोटी मंदिरे देखील पहायला मिळतात.मंदिराच्या आवारात दोन विहिरी देखील बांधलेल्या आहेत.याच बरोबर दक्षिणेला 'भोगमंडंप' अर्थात जेवायची जागा बांधलेली आहे.याखेरीज मायादेवी मंदिर आणि वैष्णव मंदिर या वास्तू फिरताना नजरेस पडतात.अर्थात या गोष्टी आत जाऊन पाहण्याइतपत वेळ नसल्याने फोटो काढून आम्ही पुढे निघालो.




मंदिराच्या मागील बाजूने मंदिर पाहताना जवळ जवळ संपूर्ण भाग डागडुजीत लपेटला गेलेला दिसतो.मात्र मंदिराचा वरील भागाचे काम चालू असल्याने खाली असलेल्या रथाचे व्यवस्थित निरीक्षण करता येते.आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि आम्ही पुन्हा रथासमोर येऊन ठेपलो.सूर्य म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रतिमा म्हणजे पूर्वेकडून उगवणारा गोळा जो दिवसभर पश्चिमेकडे धावत असतो.अगदी त्याचप्रमाणे हे सूर्यदेवतेचे रथरुपी मंदिर पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातून वेगात बाहेर पडते आणि पश्चिमेकडे प्रयाण करते अशा आशयाचे दृश्य पहाटे सूर्योदयाला किव्वा सूर्यास्तासमयी पाहता येऊ शकते.कारण रथाच्या पाठीमागे अथांग उपसागर पसरलेला आहे.



शक्य तितके कॅमेऱ्यात टिपून आम्ही महाद्वार ओलांडून बाहेर आलो.दुपारचे तीन वाजून गेले होते.युनेस्को ने 'जागतिक वारसा' म्हणून मान्यता दिलेले भारतातील हे अजून एक ठिकाण.मंदिराचा बऱ्यापैकी भाग दुरुस्तीखाली आहे पण भव्यता आणि नाजूकपणा याचा पूर्णपणे अनुभव आपल्याला घेता येतो.त्या काळ्या पॅगोडाचा निरोप घेऊन आम्ही पुरीकडे प्रयाण केले.

पूर्वेच्या किनाऱ्याला संलग्न असलेल्या रस्त्यावरून आम्ही पुरी मध्ये दाखल झालो.यावेळी सूर्य समुद्रात मावळात नव्हता याचेच जास्त अप्रूप होते.कारण लहानपणापासून समुद्र म्हणजे कोकण या समीकरणात मोठे झालेलो आम्ही कायम सूर्यास्त हा समुद्रातच पाहिलेला.पश्चिम किनारपट्टी हीच कायम अंगवळणी पडलेली.इथे सूर्योदय समुद्रातून होतो याचे आकर्षण जास्त.

संध्याकाळी बरोबरचे सामान खोलीवर टाकून फिरायला बाहेर पडलो.पुरी म्हणल्यावर जगन्नाथ मंदिर पहायचे निश्चित होते.सूर्यमंदिराप्रमाणेच 'जगन्नाथ रथ ओढत नेऊ' हि कवितेची ओळ फक्त आठवत होती.याचा अर्थ असा होता कि एखादे अवघड काम सगळे मिळून एकत्र करूयात.पण हे जगन्नाथाचे मंदिर प्रत्यक्ष पहायला मिळेल याची तेव्हा कल्पना सुद्धा नव्हती.अगदी दर्शनाला मुद्दाम पुण्यातून उठून मी नक्कीच इथे आलो नसतो पण चालून आलेली संधी दवडू नये.आणि याच मुद्द्यावर आम्ही मंदिराकडे निघालो.

भारतातील चारधामांपैकी एक म्हणजे जगन्नाथ मंदिर.कृष्ण,बलराम आणि सुभद्रा या तीनही देवतांचे देवालय.एका अरुंद गल्लीतून आम्ही चालत होतो.समोर मंदिराचा कळस आणि झेंडा व्यवस्थित दिसत होता.गल्ली संपवून आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि मंदिराची भव्यता डोळयासमोर आली.



ज्या रस्त्यावरून जगन्नाथ रथ ओढत नेला जातो तोच हा रास्ता.जो आजही भक्तांनी ओसंडून वहात होता.दुतर्फा शेकडो दुकाने आणि पथारीवाले दृष्टिक्षेपास येत होते.साधारण मंदिराबाहेर असलेला देखावा इथेही तसाच होता पण याचे प्रमाण थोडे जास्तच होते.स्थापत्य,सांस्कृतिक भव्यता आणि त्याबरोबर आलेले मांगल्य अनुभवण्याकरिता मोबाइल आणि चपलांचा तात्पुरता त्याग करून आम्ही पद्धतशीर रांगेने आत निघालो.

पूर्वेच्या मुख्य प्रवेशद्वार समोर अतिशय सुरेख सूर्य खांब अर्थातच 'अरुण स्तंभ' उभारलेला आहे.हा स्तंभ मुळतः कोणार्कच्या सूर्यमंदिराबाहेर स्थित होता मात्र नंतर याचे स्थलांतर येथे करण्यात आले.खांबाची उंची सुमारे तेहेतीस फूट असून त्याचा परीघ साधारण सव्वा सहा फूट इतका आहे.मंदिरात प्रवेश करण्याअगोदर भावी याचे दर्शन घेऊन मग पुढे मार्गस्थ होतात.



तुपात असलेल्या वाती,जळत असलेले कपूर,प्रसाद म्हणून देवाण घेवाण होत असलेले साखर फुटाणे,धूप,अगरबत्ती,वाहिलेले हार आणि तत्सम सर्व घटकांच्या मिश्रित गंधाने मंदिराचे आवार दरवळले होते.भाविकांची गर्दी बऱ्यापैकी होती.पण मुख्य देवतांची प्रतिमा दिसायला कष्ट पडले नाहीत.मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या धातूच्या किव्वा पाषाणातील मूर्तींप्रमाणे इथली मूर्ती नाहीये.इथली कृष्ण,बलराम आणि सुभद्रेची प्रतिमा लाकडात कोरली गेलेली आहे.

दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात आलो आणि प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली.मुख्य मंदिराच्या बाजूला विविध देवदेवतांची छोटी मंदिरे आहेत.कृष्णाच्या लीला भिंतींवर रंगवण्यात आलेल्या आहेत ठिकाणी कोरलेल्या देखील पहायला मिळतात.मुख्य मंदिराच्या कळसाचा मोठा भाग पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे मंदिराला 'पांढरा पॅगोडा' असेही म्हटले जाते.मुख्यतः चढत्या क्रमाने असणारी चार मंदिरे सर्वप्रथम दृष्टीक्षेपात पडतात.मात्र प्रत्यक्षात आत गेल्यावर आजूबाजूला असलेली बाकीची छोटी मंदिरे देखील त्यावर असलेल्या कलाकुसरीने लक्षात राहतात.

त्या अर्ध्या तासात स्थापत्य अविष्कार आणि भक्ती साठवून आम्ही बाहेर पडलो.सुमारे आठ वाजून गेले होते.पण भाविकांची रांग तशीच अविरत वहात होती.दुपार प्रमाणेच एक वेगळे ठिकाण पहिल्याच आनंद होता.तंगडतोड बऱ्यापैकी झाल्यामुळे भुकेने मर्यादा सोडल्या होत्या.मगाशी आलेल्या निमुळत्या गल्लीत असलेल्या एका छोटेखानी खानावळीत पोटाचे रिचार्ज केले आणि हॉटेलचा रस्ता धरला.

प्रवास आणि पायपीट यांच्या संमिश्र थकव्यावर कोणार्क आणि पुरीचे मंदिर अलगद चादर घालत होते.उद्याचा सूर्य समुद्रातून उगवताना पहायचा या कुतूहलापोटी गादीला पाठ टेकवली आणि दिवसाचा निरोप घेतला.दिवस नक्कीच सत्कारणी लागला होता.भक्ती,श्रद्धा,धर्म या गोष्टींशिवायही मंदिरात पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात याची प्रचिती पुन्हा एकदा नव्याने आली.कोणाची सत्ता कुठे होती किव्वा कोणत्या राजाने कुठे राज्य केले यावर तेथील स्थापत्यशैली पहायला मिळते.

तर एकाच दिवसात कृष्ण आणि धवल या दोनही पॅगोड्यान्ना  भेट दिल्यानंतर पुन्हा एकदा हरित निसर्गाकडे निघायची वेळ झाली होती.दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही पुरी सोडले.आणि 'चिलिका'च्या खाऱ्या पाण्यातील पक्षी साद घालू लागले.

नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा लिहितो,संधी मिळाल्यास दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट द्या कारण भारतीय संस्कृतीचे आणि त्यानुरुप बदलणाऱ्या अनेक गोष्टींचे वैविध्य पाहण्याची इच्छा असेल तर या दोन्ही वास्तू आपल्या यादीत बऱ्यापैकी वर येऊ शकतात.



हृषिकेश पांडकर
०५.०२.२०१८

Tuesday, January 30, 2018

दलदलीत उमललेले कमळ - 'भितरकनिका'

विविधतेत एकता अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या राष्ट्रात संस्कृती,परंपरा,कला,धर्म,भाषा इतकीच विविधता नक्कीच नाहीये.या व्यतिरिक्तही भौगोलीक परिस्थिती,पर्जन्य,हवामान आणि त्यानुरूप बदलणारे वन्य आणि वनस्पती जीवन यातही प्रचंड विविधता जाणवते.याच वैविध्यतेमुळे पर्यटनात स्थळांमध्ये आपला देश अष्टपैलू ठरला आहे.आणि म्हणूनच कदाचित आपल्यापेक्षा वेगळे बाहेर काय पहायला मिळू शकेल याचा विचार डोकावतो.अर्थात प्रत्येक देशात त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य आहेच पण आपल्या देशात असलेले हे सर्व प्रकारचे वैचित्र्य अचंबित करून सोडते.

मध्य आणि दक्षिणेकडील जंगलांचे नमुने पाहून झाल्यावर देशाची एकच दिशा शिल्लक राहिली होती जिथल्या जंगलाचा प्रत्यक्षदर्शी अनुभव मी कधीच घेतला नव्हता.आणि ती म्हणजे पूर्व.

६८व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आलेली सुट्टी पदरात पाडून या पूर्वेच्या जंगलात भटकंतीचा मुहूर्त लागला.तसे पहायला गेले तर सुंदरबन हे सर्वात प्रसिद्ध असलेले पूर्वेचे जंगल.मात्र याच रांगेत असलेले भितरकनिका हे तितकेसे अंगवळणी न पडलेले जंगल फिरावे हा सर्वप्रथम आलेला विचार.आणि याच विचारातून पुढे आलेले नाव म्हणजे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान.

भारताच्या पूर्वेला पसरलेल्या अथांग बंगालच्या उपसागराला खेटलेल्या या जंगलात जाण्याचा हा पहिलाच अनुभव.वाघ नसला म्हणून काय झाले असंख्य पक्षांच्या जाती,विविध उभयचर आणि सर्वात मुख्य म्हणजे जंगलाचा सर्वात वेगळा प्रकार आणि तो म्हणजे खारफुटीचे जंगल.ज्याला इंग्रजी मध्ये 'मॅन्ग्रूव्ह' या नावाने ओळखले जाते.सुंदरबन खालोखाल ज्याचा नंबर लागतो तेच हे खारफुटीचे जंगल.

सुट्ट्यांच्या तारखा,तिकिटांची जमवाजमव,राहण्याची व्यवस्था या सगळ्यावर मात करून जेव्हा निघायचा दिवस येतो त्या क्षणासारखा आनंद नाही.

पुणे-कोलकाता-भुवनेश्वर असा प्रवास संपवून ओडिसा राज्यातील केंद्रपाडा गावात वसलेल्या या अभयारण्यात दाखल झालो.खाडीमध्ये पसरलेले हे जंगल.निमुळत्या वाटेने घुसलेले समुद्राचे पाणी आणि त्यातून तयार झालेल्या पाण्याच्या रुंद गल्ल्या आणि यातच दडलेले हे सुंदर वन्यजीवन म्हणजे भितरकनिका अभयारण्य.भितर म्हणजे आतील भाग आणि कनिका म्हणजे सुंदर.ज्याचे अंतरंग सुंदर आहे असे हे भितरकनिका.आणि अर्थातच नावाला तंतोतंत जागणारा अनुभव जंगल न्याहाळताना पदोपदी येत राहतो.

निळाशार असलेला समुद्र जेव्हा खाडीरूपाने भूतलावर शिरतो तेव्हा त्याचा रंग बदलतो.मात्र तेच निळे आकाश आणि गर्द हिरवळीने नटलेले दुतर्फा जंगल आपल्याला रहस्यमय ठिकाणी आणून सोडते.



जिप्सी ने जंगलात फिरणे आता सर्वश्रुत आहेच.पण अशा ठिकाणी आणि तितक्याशा गाजावाजा न झालेल्या शांत आणि एकांतात एका बोटीने फिरणे हा अनुभव खरंच अविस्मरणीय ठरतो.

कोणते प्राणी-पक्षी पहिले,झाडांची माहिती,राहायचे ठिकाण याबाबत तांत्रिक आणि पुस्तकी माहिती देण्यापेक्षा आलेल्या अनुभवाचे आणि वेगळेपणाचे वर्णन करायची संधी सुटू नये म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप.

पहाटे सहाला उठून राहण्याच्या ठिकाणापासून बोटीच्या बंधाऱ्यापर्यंत चालत येतानाचा अनुभव पण मजेशीर होता.कोकणाचा भास व्हावा असे छोटेसे गाव.एकाच निमुळता रस्ता जो थेट पाण्याला आणून सोडतो.रस्त्याच्या दुतर्फा असलेली झोपडीवजा उभारलेली आणि शेणाने सारवलेली टुमदार घरे.अंगणात बांधलेल्या आणि नुकत्याच उठलेल्या शेळ्या.अनोळखी लोकांना पाहून आमच्यावर भुंकणारे गावातली कुत्री.पेटवलेले बंब आणि त्याची साक्ष देत धुक्याशी स्पर्धा करणारा त्याचा धूर.त्यातूनच किंचितसा डोकावणारा आणि तितकासा प्रखर नसलेला लोहगोल.

समुद्र इतका जवळ असूनही थंडी वाजायची हि कदाचित माझी पहिलीच वेळ.एका खांद्यावर कॅमेरा आणि एक हात खिशात अशा अवस्थेत चालत जाऊन बोटीवर बसलो.अथांग पसरलेले ते खाडीचे पात्र.दुतर्फा असलेली गर्द आणि हिरवीगार झाडी.किनाऱ्यावर असलेला संपूर्ण दलदलयुक्त गाळ.भरती ओहोटी नुसार कमी जास्त होणारे पाणी.पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या काही वनस्पती.मधूनच पाण्यातून आलेले एखादे झाड.काही ठिकाणी धुकं पांघरलेले पाणी.आणि यात संथपणे हेलकावे खात निघणारी आमची बोट.फक्त आमची बोट.



भारतात मिळणाऱ्या किंगफिशर पक्षांच्या जातीमधील सर्वात जास्त प्रजाती येथे पहायला मिळतात आणि याचा प्रत्यय पहिल्या अर्ध्यातासातच आला.पाण्यावर वाकलेल्या नाजूक फांदीवर बसणारे विविध किंगफिशर बघणे आणि पक्षाला चाहूल लागून न देता बोटीवरून फोटो टिपणे याची सर दुसऱ्या कशालाही नाही.

काही क्षणातच धुकं विरळ होत गेले आणि उन्हाची तिरीप थेट पाण्यावर विसावली.नुकतेच निघालेले ऊन आणि वातावरणात आलेली ऊब याचा फायदा घेऊन पक्षांची हालचाल वाढली.यातच काही हरणे पाण्याअडून चरताना दिसत होती.आणि मग रात्रभर पाण्यात बुडालेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी आपले अजस्त्र शरीर पाण्याबाहेरील चिखलात वाळत घालायला सुरुवात करतात.भारतातील लांबीने सर्वात मोठ्या असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे पहायला मिळतात.यांची लांबी सुमारे वीस फुटापर्यंत असते.यांच्याच बरोबरीने त्यांची पिल्ले देखील मोठ्या संख्येने पहायला मिळतात.



याच गोष्टी न्याहाळण्यात सूर्य डोळ्यावर येत असतो.बोट तशीच संथ तरंगत असते.शांत आणि थंड वाटणारे पाणी आता चमकत असते.मगाशी पानांवर विसावलेल्या दवबिंदूंचे आता सूर्यकिरणांमुळे मोती झालेले असतात.

एवढ्यातच एखाद्या पाण्यावर आलेल्या झाडावर उन्ह अंगावर घ्यायला निश्चित पडलेला साप डोकावताना दिसतो.ऋतूंप्रमाणे स्थित्यंतर करणारे पक्षी काही परत येणारे तर काही जाणारे डोळ्यासमोरून उडत असतात.गाळ आणि पाणवनस्पतींमुळे पाणी निरभ्र नक्कीच नाहीये.त्यामुळे अंगावर येणार पाण्याचा गडद रंग प्रत्येक वेळी गंभीर वाटत राहतो.



सूर्याकडे मान वर करून पहायची वेळ होते तेव्हा पक्षांची सकाळ संपलेली असते.इतकावेळ चाललेला किलबिलाट ओसरू लागतो.सकाळी असलेला गारवा नाहीसा होत असतो.सकाळची सफारी संपते ती दुपारच्या ओढीने.कारण तरंगणाऱ्या बोटीवर उलगडणारी जंगलाची सकाळ आणि संध्याकाळ या दोन भिन्न गोष्टी असतात.

सकाळची सफारी उरकून मनसोक्त फोटो काढून आम्ही बोटीतून उतरून पुन्हा त्याच गावातून चालत येत होतो.सकाळची लगबग उरकून गाव आता स्थिरस्थावर होत होते.मगाशी लागलेले बंब आता नुसतेच धगधगत होते.

आमच्या त्या टुमदार घरात परतलो.शेळीच्या दुधाचा आणि किंचित खारट असलेला पण वाफाळता चहा घेऊन घराबाहेर असलेला त्याच खाऱ्या पाण्याच्या तळ्यावर खुर्च्या टाकून चहा घेण्यासारखा आनंद नव्हता..



त्यानंतर ओडिसी पद्धतीचे जेवण,काहीशी आळसावलेली शांत दुपार,कॅमेरा चार्जिंगसाठी असलेला अट्टाहास, पाहायला मिळालेल्या वन्यजीवांच्या प्रजातीवर झालेला उहापोह आणि यातच सकाळी भल्यापहाटे उठल्यामुळे येणाऱ्या झोपेची सावली या गोष्टीत वेळ कसा निसटतो याचा अंदाजच येत नाही.तेवढ्यात दुपारच्या सफारीची वेळ होते.

पुन्हा एकदा तो सफारीचा क्षण आला मात्र यावेळी प्रहर संध्याकाळचा होता.पुन्हा तोच गावातला रस्ता पालथा घालून आम्ही बोटीवर येऊन बसलो.दुपारचे तीन वाजत आले होते.जंगल तसे निपचित होते.पक्षांना अजून जाग नव्हती.बोटीने किनारा सोडला.काही वेळातच जंगलाला जाग आली.कडक उन्हात फिरणारे शिकारी पक्षी झाडाच्या उंच शेंड्यावर दिसत होते.कॅमेऱ्याची लेन्स जरी तोकडी पडली तरी प्रतिमा साठवण्याचे काम डोळे चोख बजावत होते.पुन्हा तेच जंगल होते पण सूर्य यावेळी अस्ताला जात होता.सकाळी दिसलेले सर्व पक्षी ठराविक अंतराने दर्शन देत होते.पाण्यातील पक्षांचा समावेश अर्थातच सर्वात जास्त होते.बगळे,करकोचे,बदके झाडून सगळे हजेरी लावत होते.खारफुटीच्या जंगलात आढळणारे पक्षी आणि प्राणी नशिबाच्या आलेखानुसार कमी जास्त दिसतात.पण पक्षांनी आम्हाला निराश केले नाही एवढे मात्र नक्की.

दुपार संध्याकाळ मध्ये बदलत होती.सूर्य झपाट्याने उतरणीला लागला होता.थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळची सफारी जेमतेम दोन अडीच तासच होती.उन्हाची जागा थंड वाऱ्याने घेतली होती.पक्षांचे बाणाच्या आकारात उडणारे थवे माघारी परतताना दिसत होते.सकाळी पहुडलेल्या मगरी खोल पाण्यात नाहीश्या झाल्या होत्या.



अंधार पडायच्या आत आम्ही किनाऱ्याला लागलो.नावाड्याने बोट लाकडी ओंडक्याला बांधली आणि आम्ही उतरलो.आता थंडी जाणवत होती.गर्द झाडीमुळे सभोवताल काळवंडला होता.मगाशी चालू असलेली पक्षांची लगबग आता नाहीशी झाली होती.गावातला तो रस्ता देखील आता शांत होता.दिवेलागणीच्या खुणा दिसत होता.सहाच्या आसपासच वाजले होते पण गावाला अंधाराने कवेत घेतले होते.आम्ही राहायच्या ठिकाणी पोहोचलो.

नवीन पहिल्याच आनंद होताच पण त्याबरोबर नवल देखील तितकेच होते.इतर जंगलांच्या तुलनेत तसूभरही हे जंगल मागे राहिलेले नव्हते.आणि भारताच्या पूर्वीचे जंगलाने माझ्या मनातली जागा कायमची पक्की केली.

थोडे आडवाटेला असल्याने तितकेसे प्रकाशझोतात न आलेले जंगल नक्कीच आहे. मात्र निसर्गाने वरदहस्त ठेवताना कुठेच आखडता हात घेतलेला नाहीये.पुन्हा एकदा तेच सांगावेसे वाटते कि संधी मिळाल्यास नक्की भेट द्या.खाऱ्या पाण्यावर फुललेल्या या हिरवळीवर नांदणाऱ्या जीवसृष्टीचा हेवा वाटल्याखेरीज राहणार नाही.'पश्चिम घाट' आणि 'मलाबार' यांच्या सौन्दर्याला खांद्याला खांदा लावून उभा असलेला हा पूर्वीचे समुद्रकिनारा डोळ्याचे पारणे फेडतो.

                                                                               हृषिकेश पांडकर
                                                                              ३०/०१/२०१८

Friday, January 19, 2018

Liberty Enlightening the World !


न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीच्या मध्ये पसरलेल्या समुद्रातील बेटावर उभी असलेली हि स्वतंत्रदेवता एका हातात मशाल आणि एका हातात पुस्तक घेऊन उभी आहे.अमेरिका म्हणल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येतं त्यातील एक म्हणजे हि बाई.


 

विस्तीर्ण जलाशयात असूनही स्तब्ध उभी असलेली स्त्री पाहणे मजेशीर वाटते.कॅमेऱ्यासमोर कुठलेही हातवारे न करता आणि सर्वात मुख्य म्हणजे न हसणारी कदाचित हि पहिलीच आणि अर्थातच शेवटची बाई असावी.

न्यूयॉर्क स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर हा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहणे कमालीचा अनुभव ठरतो.राष्ट्राच्या आग्नेयेला पाहात जगभरातील लोकांचे खुल्या मनाने अमेरिकेत स्वागत करणाऱ्या या स्वातंत्रदेवीला अजूनतरी ट्रम्पच्या व्हिसा पॉलिसीचा अंदाज नसावा.नाहीतर विदेशींच्या स्वागताचे इतके अगत्य किमान तिच्याकडून तरी अपेक्षित नाहीये.

बाकी पुतळ्याची ढीगभर माहिती गुगल वर आहेच.तीच इथे लिहिण्यात मजा नाही.पण संधी मिळाल्यास नक्की भेट द्या.प्रत्यक्ष बेटावर उतरून पुतळा पाहण्यापेक्षा अलीकडून संपूर्ण नजारा पाहणे हि खऱ्या अर्थाने पर्वणी ठरते. डोळ्याला आणि कॅमेऱ्याला देखील.

काही जणी जवळ जाऊन पाहण्यापेक्षा लांबूनच अधिक सुंदर दिसतात.त्यातलेच हे काहीसे..

Statue of Liberty | New York | USA November 2017