Sunday, February 6, 2022

मेरी आवाज ही पहचान है

शोक करावा तर का ? आणि करू नये तर का ? या संभ्रमात पडायची माझी पहिलीच वेळ...

मेरी आवाज ही पहचान है....हे शब्द दीदी आपल्यात नाहीत हे कधी जाणवूच देणार नाहीत. जर किनाऱ्यावर बेमालूम येऊन विसावणार्या लाटांची गाज, उगवणारा सूर्य, कलेकलेने वाढत जाणारी चंद्रकोर आणि सर्व ध्वनींना आपल्याला सामावून घेणारे सात स्वर जर कधीच नाहीसे होऊ शकत नाही,तर याच सात स्वरांनी घट्ट बांधलेला दिदींचा स्वर अस्ताला जाईलच कसा ? जी गोष्ट जो आनंद आणि जे समाधान आपल्याला कधी मोजताच आलं नाही ते आता संपलं असं आपण म्हणूच शकत नाही.


 

मी लता मंगेशकरांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही. आमची ओळख फक्त या सात स्वरांच्या माध्यमातून झालेली आणि कालानुरूप घट्ट होत राहिलेली आणि वृद्धिंगत होईल असा विश्वास असलेली. जर आज त्या आपल्यातून देहरूपी निघून गेल्या असल्या तरी आपली त्यांच्याशी असलेली खरी ओळख आणि नात तसाच अबाधित आणि चिरकाल असेल.

दीदी गायिका नव्हत्याच मुळी, साक्षात सरस्वती ने भूतलावर मारलेला फेरफटका असावा कदाचित. त्या आल्या जी संगीत साधना करायची ती केली आणि आपल्या मार्गी परतल्या. लता हे आपण त्यांना नाव दिलं. आपण तेवढे नशीबवान ठरलो की या फेरफटक्याचे आपण साक्षीदार ठरलो.

जेव्हापासून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी कळायला लागले तेव्हा पासून यातील एकही दिवस असा गेला नाही की टीव्ही, रेडिओ किव्वा रस्त्यावर लागलेल्या 'ए मेरे वतन के लोगो' मधील 'अब हम तो सफर करते है' ला नकळत आवंढा गिळला गेला. यात शब्दांची जादू आहेच पण या जादुई आवाजाने भावनांचा कडेलोट केलाय.

आता त्या गाणं गाऊ शकणार नाहीत ही परिस्थिती गेली ४/५ वर्ष होतीच आणि ती अंगवळणी सुद्धा पडली होती पण त्यांनी इतकी वर्षे लुटलेलं हे सगळं एवढं सोनं सामावून घेईल एवढी आपली झोळीच नाहीये. त्यामुळे केवळ देह झिजून गेला म्हणून दीदी आपल्यात नाहीत या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाहीत.

आज संध्याकाळी अग्नी दिला तो ठराविक काळाच्या मुदतीसाठी अवतरलेल्या त्या देहाला. पण दीदींनी दिलेला आणि पसरविलेला स्वरांचा सुगंध तसाच चिरंतन राहील. थोडक्यात काय तर 'मेरी आवाज ही पहचान है' पासून सुरू झालेला प्रवास 'शायद फिर इस जनम मे मुलाकात हो न हो' इथे येऊन विसावला.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

०६.०२.२०२२

हृषिकेश पांडकर

 

No comments:

Post a Comment