या पक्षाबद्दल लिहिताना पहिला शब्द माझ्या डोक्यात आला तो हाच, 'शापित राजकुमार'. याची कारणं आणि त्यामागचा माझा विचार पुढे वाचताना उलगडेलच पण या पक्षाबद्दल आधी थोडे लिहितो.
मी आधी जेव्हा ग्रेट हॉर्नबिल बद्दल लिहिले होते तेव्हा उल्लेख केला होता कि एखादे जंगल किती समृद्ध आणि सधन आहे हे ठरविण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या पक्षांच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती पहिल्या जातात. म्हणजेच ग्रेट हॉर्नबिल प्रमाणेच हा माळढोक देखील प्रमुख निर्देशक प्रजाती आहे. माळरान आणि काहीसे वाळूचे रण यांचा समावेश असलेले जंगल हे या पक्षाचे वास्तव्याचे ठिकाण. म्हणजे साधारण काळवीटाला जे जंगल लाभते तेथे याचे वास्तव्य आढळते.
रंग रूप, उंची आणि शरीराची ठेवण याबद्दल गुगलवर सहज आणि भरपूर माहिती उपल्बध आहे. या तांत्रिक माहितीत फारसं न शिरता जरा मजेशीर निरीक्षण नोंदवावे म्हणून हा लेखन प्रपंच. माळढोक हि तर शहामृगाची जातकुळी. उडणाऱ्या जीवांमधील सर्वात जड असलेल्या पक्षात या पक्षाचा समावेश होतो. डोक्यावर असलेली काळी टोपी हि याची ओळख.
शापित राजकुमार लिहिण्यामागचा कारण म्हणजे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता असावा यासाठी चर्चेत आणि स्पर्धेत मोराबरोबर असलेला पक्षी म्हणजेच हा माळढोक. पक्षितज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी या पक्षाची शिफारस राष्ट्रीय पक्षी म्हणून केली होती. थोडक्या मुद्द्यांवरून राष्ट्रपक्षी म्हणून हुकलेले पद आणि कालानुरूप मोठ्या प्रमाणात घटलेली संख्या हे वास्तव काहीसे खिन्न करते.
सध्या राजस्थानचा राज्यपक्षी पद भूषविणारा माळढोक अंतरराष्ट्रीय पक्षांच्या सूचित गंभीररित्या धोक्यात आहे. जेमतेम शेकड्याने शिल्लक असलेले जीव नजीकच्या काळात पहायला देखील मिळतील कि नाही याची शाश्वती नाही. पूर्वी महाराष्ट्रात सोलापूर, नान्नज येथे पहायला मिळणारा माळढोक आता राजस्थान खेरीज शिल्लक नाही. घटणारे जंगलाचे प्रमाण, विजेच्या तारांना धडकून होणारे मृत्यू आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारी या तीन कारणाने रोडावलेली संख्या क्लेशदायक आहे.
राजस्थान मधील डेझर्ट राष्ट्रीय उद्यानात जोडीने मिळालेला हा फोटो. सुमारे दहा मिनिटभर डोळेभरून पाहून घेतला. डौलदार चाल आणि प्रत्येक चालीसोबत लकबीने होणारी मानेची हालचाल शहामृग आणि कांगारुंची आठवण करून देत राहते.
सरकारी यंत्रणेच्या साहाय्याने माळढोकचे जतन आणि संवर्धन करण्यात आपण जर यशस्वी ठरलो तर पुढल्या पिढ्या या सुंदर पक्षाला प्रत्यक्षात पाहू शकतील. अन्यथा हे फोटो आणि आठवणी यातच हा राजकुमार लोप पावणार हे नक्की. मला नेहमी असे वाटते कि मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पात जाऊन ज्या ओढीने आपण पट्टेरी राजा डोळे भरून पाहतो त्याच ओढीने एकदा हा माळढोक वाळवंटातल्या मृगजळाच्या पडद्यावर पाहून, माळढोक हा डॉक्टर सलीम अलींनी सुचवलेला भारताचा राष्ट्रीय पक्षी का आहे याचे प्रत्यंतर आल्याखेरीज रहात नाही
Note :
Rajasthan government has launched ‘Project Great Indian Bustard’ with an aim of constructing breeding enclosures for the species and developing infrastructure to reduce human pressure on its habitats.
हृषिकेश पांडकर
२३.०२.२०२२
Great Indian Bustard - India's most critically endangered bird.
GIB | India 2022