Wednesday, January 12, 2022

खाबा किल्ला

 काही गोष्टी बघायच्या म्हणून कधीच ठरवल्या जात नाहीत, पण त्या वाटेवरून जाताना आपलं लक्ष वेधून घेतात. जैसलमेर म्हणलं कि डोळ्यासमोर येतात ते बॉलीवूडने कॅमेऱ्याने दाखवलेले डोळे दिपवणारे भव्य राजवाडे आणि त्याच बॉलीवूडने दाखवलेल्या १९७१ च्या 'बॉर्डर' वरील आठवणी. या व्यतिरिक्त उंटावरून रेतीच्या समुद्रात मारलेल्या फेऱ्या आणि डेसर्ट सफारीच्या नावाखाली वाळू उडवत मारलेली वाळवंटातील चक्कर. या पलीकडे जैसलमेर आणि माझी ओळख कधीच नव्हती.


 

या वेळेस जैसलमेरला गेलो ते याच वाळवंटातील वन्यजीवन अनुभवायला. तो वन्यजीवांचा अनुभव नंतर सावकाश उलगडीनच. हे वन्यजीवन अनुभवायला जात असताना जैसलमेरच्या नैऋत्येला साधारण २०-२५ किलोमीटर वर कुलधारा नावाचं एक छोटंसं गाव लागते. दुतर्फा असलेले शुष्क वाळवंट, मधेच उगवलेली काटेरी झुडपे, क्षितिजावर तरंगणारे मृगजळ आणि नजर जाईल तिथपर्यंत बाणासारखा, वाळवंट छेदणारा गडद डांबरी रस्ता.या व्यतिरिक्त फारशी कुठलीही हालचाल नसलेले ओसाड असे गाव म्हणजे हे कुलधारा. तसही राजस्थान आणि भुताखेतांच्या गोष्टी यांची संगत तशी बरीच जुनी पण प्रत्यक्षात अशा गावातून जायची संधी मिळेल असे वाटले नव्हते. कुलधारा या गावाबद्दल नंतर वाचले तेव्हा समजले कि गावकऱ्यांच्या मते शापित आणि झपाटलेले गाव म्हणून याची ओळख आहे. पण याच गावातून जात असताना वळणदार रस्त्यावरून सोन्यासारख्या उन्हात चमकणारा खाबा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.

प्रत्यक्षदर्शी टुमदार असलेला किल्ला मी आतून पहिला नाही पण १३व्या शतकातील आठवणी तशाच जपणारा खाबा किल्ला आणि आजूबाजूचे भग्नावशेष इतिहासाची साक्ष देत राहतात. एका रात्रीत उजाड आणि निर्मनुष्य झालेल्या या गावाची आठवण ठेवणारा खाबा किल्ला या थार वाळवंटाचे आणि कुलधाराचे आकर्षण ठरत राहतो एवढे नक्की.

गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी किव्वा कुलधारा आणि खाबा बद्दल असलेल्या दंतकथा यांचा खरेखोटेपणा ठरवणारा मी कोणीच नाही पण पिवळ्या चुनखडकामुळे 'गोल्डन सिटी' अशी बिरुदावली मिरवणारे जैसलमेर जर का बघणार असाल तर रेतीच्या समुद्रात पाय ठेवण्यापूर्वी हे रहस्यमय कुलधारा गाव आणि त्याची राखण करणारा हा खाबा किल्ला नक्की पहा. किल्ल्याच्या तटबंदीवर मुक्तविहार करणारे असंख्य मोर आणि मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेला किल्ल्याचा कळस कायमचा स्मरणात राहतो.

हृषिकेश पांडकर

१२.०१.२०२२

 

No comments:

Post a Comment