Tuesday, January 25, 2022

'अन्नसाखळी'

 जंगल का आवडते याला अनेक कारणं आहेत. प्रत्येक भेटीत या कारणात भरच पडत राहते. काही नविन गोष्टी पहायला मिळतात. काही जुन्याच गोष्टी नव्याने पहायला मिळतात. भौगोलिक परिस्थिती आणि त्यानुसार बदलणारा निसर्ग यांच्या कलेने बदलणारी तिथली जीवसृष्टी हे जंगलात जाण्याचे प्रमुख आकर्षण असते. अशाच एका नव्या शैलीच्या जंगलात भटकण्याची संधी मिळाली आणि पर्यायाने नवीन जीवसृष्टी अनुभवायला मिळाली. 


 

पुस्तक,टीव्ही आणि गप्पा यांच्या आधारावर कायमच रुक्ष वाटणारे थार चे वाळवंट इतक्या गोष्टी सामावून बसले आहे याचा उलगडा प्रत्यक्ष भेटीत लगेचच होतो. याच वाळवंटातील जीवसृष्टीचा हा एक प्रासंगिक नमुना फोटोद्वारे उलगडण्याचा प्रयत्न.

नजर जाईल तिथवर दिसणारे निष्पर्ण पठार. पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेवरील सिंध प्रांताची काही तुरळक वस्ती आणि याच वस्तीमधील एका गुराख्याची मरून पडलेली एक मेंढी. आता मेंढी मारली आहे की मेली याचा काही खात्रीपूर्वक पुरावा नाही पण विस्कटलेला देह प्राणहीन असल्याची खात्री देत होता.

या मेंढीच्या देहाभोवती जमलेले खवय्ये पाहताना आमचा वेळ कसा सरला कळले देखील नाही. दोन खऱ्या अर्थी स्कॅव्हेंजर (मृत देहाची विल्हेवाट लावत त्यावरच आपला उदरनिर्वाह करणारे) आणि एक तितकाच बेमालूम शिकारी.

डावीकडे पाठमोरे बसलेले सिनेरियस गिधाड आणि मेंढीच्या देहावर आपला जठराग्नी शमविणारा पंजाब रेवन हे दोघे स्कॅव्हेंजर आहेत आणि त्यांच्या मध्यात राजेशाही थाटात असलेला शिकारी म्हणजे ईस्टर्न इमपीरियल ईगल म्हणजे गरूड आहे.

हा भोजन समारंभ आम्ही सुमारे वीस मिनिटे पहात होतो. गरुड जेव्हा खात होता तेव्हा गिधाडं बाजूला प्रतीक्षेत होती. मग दोन घास गरुडाने खाल्ले. मग रेवन खायला आला. आता हा जो पंजाब रेवन आहे तो जरी दिसायला कावळ्या सारखा असला तरी तो कावळा नाहीये. हा पक्षी भारताच्या वायव्येस आणि पाकिस्तान मधील काही भागात आढळतो. हे क्रमाक्रमाने खाणारे जीव बघून निसर्ग नियमाचे आणि शिस्तीचे उगीच कौतुक वाटत होते. याच चौघांच्या शेजारी युरेशियन गिधाड पण या भोजन कार्यात होते पण कुठेही खाण्यासाठी तू तू मै मै जाणवली नाही.

तो मांसाचा ढिगारा संपायला किव्वा संपवायला किती वेळ लागेल याचा अंदाज नाही पण माझ्या डोळ्याचे आणि कॅमेऱ्याचे पोट भरल्यावर आम्ही तिथून निघालो.

निसर्गाच्या अन्नसाखळी ची एक बाजू बघून आम्ही निघत होतो. एकाच ठिकाणी शिकार,शिकारी आणि आयत्या शिकारीवर डोळा ठेवणारे तीनही जीव एकाच फ्रेम मध्ये साठवून आम्ही परतलो.

असेच काहीसे वेगळे अनुभव हे जंगल कायमच पुढयात ठेवत आले आहे. आपण फक्त ते साठवून ठेवायचे आणि नव्याने निसर्गाला सामोरे जायचं इतकंच...

हृषिकेश पांडकर

२५.०१.२०२२

Death is the firewood that keeps the fire of life burning.

Indian sheep

Cinereous Vulture

Eastern Imperial Eagle

Punjab Raven

Desert National Park | India | Jan 2022

 

Wednesday, January 12, 2022

खाबा किल्ला

 काही गोष्टी बघायच्या म्हणून कधीच ठरवल्या जात नाहीत, पण त्या वाटेवरून जाताना आपलं लक्ष वेधून घेतात. जैसलमेर म्हणलं कि डोळ्यासमोर येतात ते बॉलीवूडने कॅमेऱ्याने दाखवलेले डोळे दिपवणारे भव्य राजवाडे आणि त्याच बॉलीवूडने दाखवलेल्या १९७१ च्या 'बॉर्डर' वरील आठवणी. या व्यतिरिक्त उंटावरून रेतीच्या समुद्रात मारलेल्या फेऱ्या आणि डेसर्ट सफारीच्या नावाखाली वाळू उडवत मारलेली वाळवंटातील चक्कर. या पलीकडे जैसलमेर आणि माझी ओळख कधीच नव्हती.


 

या वेळेस जैसलमेरला गेलो ते याच वाळवंटातील वन्यजीवन अनुभवायला. तो वन्यजीवांचा अनुभव नंतर सावकाश उलगडीनच. हे वन्यजीवन अनुभवायला जात असताना जैसलमेरच्या नैऋत्येला साधारण २०-२५ किलोमीटर वर कुलधारा नावाचं एक छोटंसं गाव लागते. दुतर्फा असलेले शुष्क वाळवंट, मधेच उगवलेली काटेरी झुडपे, क्षितिजावर तरंगणारे मृगजळ आणि नजर जाईल तिथपर्यंत बाणासारखा, वाळवंट छेदणारा गडद डांबरी रस्ता.या व्यतिरिक्त फारशी कुठलीही हालचाल नसलेले ओसाड असे गाव म्हणजे हे कुलधारा. तसही राजस्थान आणि भुताखेतांच्या गोष्टी यांची संगत तशी बरीच जुनी पण प्रत्यक्षात अशा गावातून जायची संधी मिळेल असे वाटले नव्हते. कुलधारा या गावाबद्दल नंतर वाचले तेव्हा समजले कि गावकऱ्यांच्या मते शापित आणि झपाटलेले गाव म्हणून याची ओळख आहे. पण याच गावातून जात असताना वळणदार रस्त्यावरून सोन्यासारख्या उन्हात चमकणारा खाबा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.

प्रत्यक्षदर्शी टुमदार असलेला किल्ला मी आतून पहिला नाही पण १३व्या शतकातील आठवणी तशाच जपणारा खाबा किल्ला आणि आजूबाजूचे भग्नावशेष इतिहासाची साक्ष देत राहतात. एका रात्रीत उजाड आणि निर्मनुष्य झालेल्या या गावाची आठवण ठेवणारा खाबा किल्ला या थार वाळवंटाचे आणि कुलधाराचे आकर्षण ठरत राहतो एवढे नक्की.

गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी किव्वा कुलधारा आणि खाबा बद्दल असलेल्या दंतकथा यांचा खरेखोटेपणा ठरवणारा मी कोणीच नाही पण पिवळ्या चुनखडकामुळे 'गोल्डन सिटी' अशी बिरुदावली मिरवणारे जैसलमेर जर का बघणार असाल तर रेतीच्या समुद्रात पाय ठेवण्यापूर्वी हे रहस्यमय कुलधारा गाव आणि त्याची राखण करणारा हा खाबा किल्ला नक्की पहा. किल्ल्याच्या तटबंदीवर मुक्तविहार करणारे असंख्य मोर आणि मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेला किल्ल्याचा कळस कायमचा स्मरणात राहतो.

हृषिकेश पांडकर

१२.०१.२०२२