Friday, February 5, 2021

निरागस

 बालपणातील रूप खऱ्या अर्थी निरागस असतं असं म्हणतात मग ते मनुष्याचे असो की वन्य प्राण्याचे. त्यात ते मोकळं आणि स्वैर असलं तर अधिकच खुलत असावं.

मांजराची जातकुळी असल्यामुळे रंगीत आणि गुबगुबीत कापसाचा गोळा भासावा असे ते दृश्य.


 

आईच्या निगरणीमध्ये बेफिकिरीत रस्ता ओलांडणारी ही पिल्लं या लाकडी ओंडक्यावर बाललीला दाखवत होती. समवयस्क असल्याने अंगापिंडाने देखील साधारण सारखीच. नकळत एकमेकांसमोर उभी ठाकल्याने एकाने आरश्यात आपले प्रतिबिंब पहावे अशी काहीशी मुद्रा.

कॉर्बेट सारख्या विस्तीर्ण जंगलात असे क्षण तसे दुर्मिळच. सकाळची थंडी विसाव्याला निघण्याच्या वेळी डोकावलेली तिरकस उन्ह झेलत मार्गक्रमण करणारे हे कुटुंब माझी सकाळ तेवढी उबदार करून गेले याचे समाधान अधिक.

जंगल कायमच आनंद देते. त्यात हे क्षण आठवणी म्हणून कैद होतात. गेल्या संबंध वर्षाच्या पार्श्वभूमीवर या वर्षाची सुरुवात तरी निश्चितच सुखावह झाली. बघुयात पुढे काय काय कसे कसे पहायला मिळतंय..

गेल्या वर्षाचा शीण झटकण्यासाठी जंगलात जायची इच्छा असेल तर जिम कॉर्बेट ला जायचा नक्की विचार करा कारण दिल्ली जवळ असूनही राजकारणाची बाधा अजूनही न झालेल्या जागा तशा कमीच..आणि त्यातलीच ही एक. रामगंगा नदी ओढणी सारखी अंगावर घेणारं हे कॉर्बेट जंगल कायमच जवळचं वाटत राहतं. 

- हृषिकेश पांडकर

 

No comments:

Post a Comment