काल संध्याकाळची गोष्ट, वाण्याच्या दुकानात जाण्याचा योग आला. योग यासाठी म्हणतोय कि सूर्यास्तानंतर उघडे असलेले दुकान पाहणे गेले तीन महिने दुरापास्त झाले होते ते काल पहिले.तर वाण्याच्या दुकानात गेलो होतो मॅगी घ्यायला.नेहमीचा वाणी बंद असल्याने जरा लांब जावे लागले होते.
मॅगी या शब्दाचा उच्चार करताना मास्कचा मुख्य भाग दोनदा जिभेवर आला.वैतागून मास्क खाली केले आणि काका मॅगीचं चारवालं पाकीट द्या असं सांगितलं.शेजारच्या आजोबांच्या चिक्कीचा गूळ आधी चाखून मग वजन करता करता दुकानदार काका म्हणाले, 'नो मॅगी, आता चायनाचा माल ठेवणार नाही'.अजून काय हवय सांगा.मी जरा गोंधळून गेलो. म्हणलं छान आहे काका चीनच्या वस्तू ठेवणार नाही हे उत्तम आहे पण मॅगी चीनची नाहीये. नेस्टले कंपनी स्वित्झर्लंडची आहे. काका कपाळावर आठ्यांचं जाळं विणत म्हणाले "अरे बाबा न्यूडल म्हणजे चीनचा पदार्थ. चिनी माल बंद म्हणजे बंद. तुम्ही पण नका घेऊ" माझंच काहीसं चुकलं, किव्वा मीच देशद्रोही असल्याच्या अविर्भावात तिथून काढता पाय घेतला.
लावलेल्या गाडीपर्यंतचे अंतर कापत असताना मॅगी चायनीज कशी या विचारात मी पुरता बुडालो. केवळ माझं नशीब बलवत्तर म्हणून दुकानवाल्या काकांनी साखरेला चिनी म्हणतात म्हणून साखर आणि दालचिनी मध्ये चिनी आहे म्हणून दालचिनी अजूनही बॅन केली नव्हती.
चायनीज कंपनीचे मोबाईल फोन,इलेक्ट्रॉनिक वस्तू,मोबाईल ची ऍप्लिकेशन्स,प्लास्टिकच्या वस्तू इथपर्यंत असलेला बॅन मी एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून समजू शकत होतो पण किराणा मालाच्या दुकानातील मॅगी बंद हा पेच मात्र मला काही केल्या सुटेना.
त्यात सकाळी कानावर आलेली बातमी अशी कि सर्व हॉटेल्स मधून चायनीज पदार्थांवर बंदी आणावी. स्वस्त आणि चमचमीत मिळते या दोन मुद्द्यांवर संबंध तारुण्यात हातगाडी एवढ्या 'ड्रॅगन','हॉट चायनीज','गोल्डन चायनीज','रेड हॉट' या आणि अशा अनंत टपऱ्यांवर चायनीज च्या नावाखाली वाट्टेल ते खाल्ले.चायनीज भाषेतील शेजवान हा शब्द सोडला तर चीन या देशाजवळ जाणारा एकही घटक त्यात नव्हता आणि इथून पुढेही नसेल. बरं तिथे काम करणारे आणि आचारी वर्ग देखील चायनीज वंशाचे असायची सुतराम शक्यता नाही.ही झाली टपऱ्यांची परिस्थिती, मोठ्या हॉटेल्स मध्ये देखील मिळणारे चायनीज आणि मूळ चीन मध्ये मिळणारे चायनीज याचा खरंच काही संबंध असेल असे मला वाटत नाही. तरी देखील आपण हे नावापुरते चायनीज पदार्थ बंद करून खरंच काही साध्य करू शकणार आहोत का ?
कुरापती करणाऱ्या चिन्यांना शह हा दिलाच पाहिजे आणि आपण तो नक्कीच देऊ पण चीन हा देश आणि भारतातील चायनीज पदार्थ या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत हे मुळात जाणून घेऊयात.उगीचच जिनपिंग ,यूहान ,कोविड-१९,गलवान व्हॅली या शब्दांच्या ओझ्याखाली बिचाऱ्या गोबी मंचुरियन आणि ट्रिपल शेझवान यांची गळचेपी का करावी नाही का
हृषिकेश पांडकर
१९.०६.२०२०
No comments:
Post a Comment