माझ्या उभ्या आयुष्यात शाळा सुरू झाल्यापासून एवढी सुट्टी कधीच अनुभवली नाही..
सुट्टी असूनही त्याला सुट्टी म्हणवत नाही..
एप्रिल महिना झाला पण परीक्षा नाही..
आंबे आले पण नेहमीचा गोडवा नाही..
स्विमिंग शिकणाऱ्यांची जत्रा,क्रिकेट कोचिंग क्लासेस,उन्हाळी सुट्ट्यांची शिबिरे यांचा साधा मागमूसही नाही..
सुट्टी असूनही त्याला सुट्टी म्हणवत नाही..
शाळेभोवती तळे साचून एक दिवस सुट्टीची अपेक्षा करणारे सगळे चिमुरडे याच सुट्टीच्या कचाट्यात सहज अडकून पडले...
भोलानाथ बापडा तरी काय करील या प्रश्नाचे उत्तर त्यालाही न उमगले..
टीव्ही,इंटरनेट आणि मोबाईल यात आई बाबा ताई दादा अन आजी आजोबाही रमले..
आमचं ग्राउंड,सुट्टीच्या सहली,भाऊ बहिणींचा सहवास आणि किमान मित्र मैत्रिणीबरोबरचा धुडगूस हाच सुटीचा श्वास असलेले बालचमू चार भिंतीतच कोंडले...
त्या वयाला काय समजते हो लोकडाऊन,पॅनडेमिक अन सोशल डिस्टनसिंग..
आपण फक्त सांगायचे नो शाळा,नो ट्रिप,नो मित्र,नो खेळ आणि नथिंग..
'सुट्टी आहे तर बागेत तरी जाऊयात ना' या निरागस इच्छेला माझ्याकडची उत्तरे तरी संपली...
'नाहीतर मला आजीकडे तरी सोड' या मागणीने पोरंही आता थकली...
'एक दिवस सिनेमाला तरी जाऊ न'..या त्यांच्या साहजिक मागणीला देखील मी आता मनोमन घाबरतो..
'तोच सिनेमा तुला टिव्हीवर दाखवतो' हे उत्तरं द्यायलाही आता सपशेल ओशाळतो...
सुट्टी म्हणल्यावर पायाला भोवरा बांधणारी मुल आज इतकी संयमित कशी याचा काही केल्या हिशेब लागेना..
आश्चर्य,कौतुक की असहायता यातील नक्की कोणते भाव चेहेऱ्यावर मिरवावेत हेच काही केल्या कळेना..
या दिवसात तुमच्या देखील नक्की लक्षात आले असेल पोरांनी आजारी पडल्याचे देखील निमित्त काढले नाही..
कदाचित या संकटाचा सामना करण्याची बुद्धी आणि शक्ती परमेश्वराने यांना थोडी जास्तच दिली....नाही ??
या लढ्यात अग्रस्थानी असलेल्या डॉक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी आणि सर्व यंत्रणांचे कौतुक आभार आहेतच...
पण त्याच संयमाने आणि धीराने साथ देणाऱ्या या चिमुरड्यांचे कौतुक निसटता कामा नये...
एखादा पुरस्कार मिळाल्यावर 'आई-वडिलांना' जसे श्रेय देणे स्वाभाविक अन साहजिक आहे..
अगदी तसेच या करोना दिव्यातून बाहेर पडल्यावर या चिमुरड्यांच्या संयमाचे श्रेय देखील अधोरेखित करूयात..
आपल्या घुसमटीला फुंकर घालायला आणि मनोरंजन करून घ्यायला तसे भरपूर पर्याय आहेत..
प्रश्न फक्त या बालचमुंचा उरतो ज्यांना या सुट्टीची कारणेच मुळात अनभिज्ञ आहेत...
स्टे होम स्टे सेफ..
- हृषिकेश पांडकर
०२.०५.२०२०
No comments:
Post a Comment