खारुताई , खारुताई
पळापळीची किती घाई..!
इवलीशी ताई, काम खूप मोठे,
पाठीवर पाहुद्या
ना रामाची बोटे...!!
इथपासून सुरु झालेली माझी आणि खारीची ओळख पुढे मलबार जायंट स्क्विरल (शेकरू) मार्गे फ्लायिंग स्क्विरल पर्यंत येऊन पोहोचली. भुईमुगाची शेंग तोंडात धरलेली आणि टिचकी वाजवली तरी डोळ्यादेखत नाहीशी होणारी वीतभर खार पाहण्यात बालपण सरलं. पुढे पश्चिम घाटामधील जंगलात 'मलबार जायंट स्क्विरल' पाहण्याची संधी मिळाली. त्या वीतभर खारीच्या चांगली दुप्पट ते तिप्पट आकाराची आणि झुपकेदार शेपटी असलेली हि खार प्रत्यक्ष पाहताना खूप भारी वाटले होते.
या फोटोची गोष्ट ही पर्वाची. मध्य भारतातील अभयारण्यातील. जानेवारीतील संध्याकाळच ती त्यामुळे संध्याकाळ आणि रात्र यामध्ये फारसा वेळ दवडत नाही. शक्य तितक्या लवकर सूर्य अस्ताला जातो आणि रात्र आपली चादर ओढते.थोडक्यात काय तर अंधार लवकर पडतो.काही वेळा नंतर त्या अंधाराची पण नजरेला सवय होते आणि नजर काहीशी स्थिरावते. अशाच स्थिरावलेल्या नजरेला अचानक एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडालेली ही पक्षी सदृश्य आकृती दिसली. घुबड म्हणावं तर पंखांची उघडझाप नाही, वटवाघूळ म्हणावं तर तितका मोठा आकार नाही. बरं कुठला वेगळा पक्षी म्हणावं तर पक्षाप्रमाणे हालचाल देखील नाही. कन्नी ला कापलेला पतंग जसा वजनाने तरंगत अलगद झाडात अडकतो अगदी तशीच काहीशी ही आकृती झाडात सहज उतरली.
मग नंतर दिव्याच्या प्रकाशात नीट पाहिल्यावर समजले कि ही आकृती फक्त उडत नाहीये तर झाडावर उतरल्यावर तुरुतुरु चालतीये देखील.आणि हीच होती त्या श्रीरामाच्या खारीची पुढची आवृत्ती अर्थात फ्लयिंग स्क्विरल (उडती खार). अगदी पक्षाप्रमाणे उडणार नाहीत मात्र पंखरूपी पडद्यामुळे हवेत तरंगण्याची क्षमता असणारा हा प्राणी. मुख्यत्वे निशाचर असल्याने दिवस सहज दिसणे तसे दुरापास्तच.
तशीच झुपकेदार शेपूट आणि मिशा असलेले तोंड यामुळे खारीच्याच कुटुंबातील असल्याची खात्री होते.अंगाला असलेल्या पडद्यारुपी पंखांमुळे हिचे वेगळेपण स्पष्ट होते.
शक्यतो रात्रीच्या वेळी पाहण्याची संधी मिळाली तर नक्की पहा.आपल्या छोट्या खारीसारखीच ही पण लाजाळू आणि घाबरट असते. पण शांतपणे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तरंगत उतरणारी ही खार प्रत्यक्ष पहायला मजेशीर वाटते.
हृषिकेश पांडकर
२०.०१.२०२०
Flying squirrel | Pench , India | January 2020