Thursday, August 29, 2019

Risking life for living life... !

'कामाला बाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पड' हे वाक्य तसं कोणालाच नवीन नाही. वाढती वाहतूक,अपघाताची भीती आणि आपण कितीही काळजीपूर्वक गाडी चालवत असलो तरी दुसऱ्याच्या चुकीने होणारे अपघात या आणि अशा अनंत बाबी लक्षात घेऊन जवळच्या लोकांकडून आलेले 'कामाला बाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पड' हे काळजी वाहणारे वाक्य. कामाला येणे-जाणे हे मूळ कामापेक्षा जिकिरीचे वाटू लागले आहे. हि सध्याची वस्तुस्थिती.आणि याच वस्तुस्थितीला अंगवळणी पडतच हल्लीच्या कॅलेंडरची पाने उलटली जात आहेत.

तर हे आपले काम किती दमवणारे आहे आणि वाहतूक,गर्दी,खराब रस्ते त्यात पाऊस या गोष्टींना सामोरे जात आपण हे समर्थपणे निभावतोय अशी भावना मनात येत असतानाच हे वरचे दृश्य माझा डोळ्यासमोर होते.

 

फोटो पाहताना मिळणारे समाधान या फोटो मागच्या वास्तवाची जाणीव झाल्यावर भीषण वाटू लागते.हा फोटो भारताच्या पूर्वेला असलेल्या जगातील सर्वात मोठ्या खारफुटी जंगलातील आहे.बंगालच्या उपसागराच्या मुखाशी असलेला गंगा,ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात वसलेल्या सुंदरबन या जंगलातील हे दृश्य..

मी प्राणी पक्षांच्या शोधार्थ निवांत बोटीवरून फिरत होतो.समोर ही छोटी नाव आडवी आली.खाडीचा भाग असल्याने लाटा अजिबात नव्हत्या.पण वाऱ्याच्या मंद वेगासोबत पाण्यावर येणाऱ्या हलक्या तरंगामुळे किंचित हेलकावे घेणारी ही नाव मजेशीर वाटत होती.अथांग खाऱ्या पाण्याचा रत्नाकर आणि निमुळत्या वाटेने जमिनीवर घुसलेले पाणी यामुळे तयार झालेला हा खाडीचा प्रदेश.नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे संपूर्ण पसरलेली दलदल आणि या दलदलीवर असलेले हे खारफुटी जंगल.

मासेमारी हा इथला मुख्य व्यवसाय.किनाऱ्यालगतचे मासेमार स्वतःची छोटी नाव घेऊन या खाड्यांमध्ये आपली जाळी टाकतात आणि हीच यांची उपजीविका.खाड्यांमधून फिरताना अनेक झाडांवर लाल फडके बांधलेले दिसते. याचा अर्थ असा की या जागेवर वाघाने माणसावर हल्ला केला आणि यात माणसाने आपला जीव गमावला आहे.हेच मासेमार जे आपल्या पोटाची खळगी भरायला इथे येतात ते या वाघाच्या हल्ल्याचा बळी ठरतात.आता पर्यंत अनेक लोकांनी आपले प्राण यात गमावले.अनेक ठिकाणी बांधलेली ही लाल फडकी त्या भयानक हल्ल्याची जाणीव करून देतात.

या जीवघेण्या रोजनिशीच्या तुलनेत आपला कामावर जाण्याचा प्रवास नक्कीच सुखकर आणि सुरक्षित होता आणि आहे याची पदोपदी खात्री वाटत होती.दलदलीच्या किनाऱ्याला बोट थांबवून लावलेले जाळे काढताना अनेक माणसांवर पाठीमागून वाघाने हल्ला केल्याच्या घटना इथे घडल्या.काही वेळेस तर चालत्या नावेत झेपावून डोळ्यादेखत माणसे ओढून नेली गेली हि सुंदरबनची वस्तुस्थिती.

तिऱ्हाईत पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदरबन तितकेच रहस्यमय देखील आहे हेही तितकेच खरे.मनुष्य भक्षक वाघाची दहशत अजूनही येथे अनुभवायला मिळते.अर्थात याचे प्रमाण आता काहीसे कमी झाले आहे. स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी वन विभागाकडून घेतली जातीये.

असो, लिहिण्याचा खटाटोप या करीत कि पोटापाण्यासाठी करावी लागणारी मेहनत आपण ज्या तोऱ्यात सांगतो, वाहनांची गर्दी, धूळ, खड्डे, पाऊस आणि अंतरे या गोष्टी आपण नेहमी सांगतो त्या तुलनेत या मासेमारांच्या दिनचर्येचे अप्रूप आणि कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

फोटोतील समाधानामागे असलेली भीषणता हीच येथील स्थानिकांची दिनचर्या आहे.

निसर्गाच्या सौन्दर्यासोबत उलगडत जाणारी रहस्यमयता अनुभवण्याची संधी मिळाल्यास अजिबात सोडू नका कारण जंगल या शब्दासोबत आपण रंगवलेले चित्र या सुंदरबनाच्या बाबतीत सर्वार्थाने भिन्न वाटत राहते.

 

ह्रिषीकेश पांडकर

२९-०८-२०१९

 

Sundarban | India | August 2019

 

Tuesday, August 6, 2019

तुम्हाला कोण व्हायचंय ?


महाराष्ट्रात पाऊस पडण्याचे महिने जरी समान असले तरी प्रत्येक जिल्ह्याचा पाऊस हा कमीअधिक प्रमाणातील आहे.आणि याच प्रमाणानुसार तिथल्या लोकांची तो झेलण्याची पद्धत देखील निराळी आहे.तसे महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्या पावसात भिजावं किंबहुना ज्यांच्या पावसात मी भिजलोय अशी हि दोनच. पुणे आणि मुंबई.

आता तुम्हाला पावसाळ्यातील मुंबईकर व्हायचंय का ? तसं असेल तर दरवर्षीच्या पावसाळ्यात एकदा तरी रात्रभर धो धो पावसात अडकून उपाशी किव्वा फार फार तर एखाद्या वडापाववर राहणे क्रमप्राप्त आहे.कारण तुमच्या सहनशीलतेचा परीक्षा अनुभवानेच येणे गरजेचे आहे.एरवी मामला बिकट आहे.' काय जीवघेणा पाऊस आहे' हि तक्रार अस्सल पावसाळी मुंबैकरांखेरीज मुंबई बाहेरचे लोकच जास्त करतात.मुंबईतला पाऊस,तुंबलेले रस्ते,पाण्यातून वाट काढत शक्य तितक्या उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत.कारण या शुल्लक गोष्टींचा अभिमान बाळगला पाहिजे अशी काही अट नाही.किंबहुना पावसाळ्यातला मुंबईकर व्हायला हि अट लागतच नाही.ती अट पुण्याला.तिथे अभिमान पाहिजे.उलट मुंबईला कोणी दर पावसाळ्यात तीच अवस्था होणारी बेटांची बशी म्हणलं तर तुम्ही त्याला 'बशी कसली सालाबाद तुंबणार डबकं आहे हे' असं म्हणून मोकळे व्हा...

कितीही मरणाचा पाऊस असला तरी गळ्यापर्यंतच्या पाण्यातून चालत जाणे,मारिन ड्राइव्ह वर २५ फुटी लाट जरी अंगावर येत असेल तर सेल्फी घेणे किव्वा रेल्वे प्लॅटफॉर्म दुथडी भरून वाहत असेल तरी तितक्याच हिरीरीने गर्दी करणे या गोष्टी तुमच्या रक्तात असणे आवश्यक आहे.

दरवर्षींच्या पावसाळ्यात तंतोतंत अनुभव घेऊनही 'प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे आणि 'तुला सोतावर भरोसा नाय काय' अशा विधानांचा वापर करता येणे तितकेच आवश्यक आहे.
पूर येणे,मिठी नदी मर्यादा सोडून वाहणे,पावसामुळे पूल कोसळणे,रेल्वे गाड्या रुळावरून कमी आणि पाण्यातून जास्त चालणे यासारख्या आपत्तीतही 'MumbaiRain','UniteMumbai','MumbaiNeverStops','SpiritOfMumbai' यासारखे हॅशटॅग वापरत त्यांना सामोरे जाण्याची हिम्मत तुमच्यात असेल ना तर मात्र पावसाळी मुंबईकर होण्यासारखं सुख नाही तुम्हाला सांगतो.



आता तुम्हाला पावसाळी पुणेकर व्हायचंय का ? जरूर व्हा. आमचे काहीही म्हणणे नाही पण मुख्य सल्ला असा कि पुन्हा विचार करा.आणि अगदीच नाईलाज किव्वा आग्रह असेलच तर मात्र छत्री कसून तयारी केली पाहिजे.आणि एकदा तयारी झाली की त्यासारखं समाधान नाही.

पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि कुठल्याही बाबतीत मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे पुण्याच्या हवामानाचा इतिहास काय ? पुण्यात धरणे किती ? पुण्यात एकूण नद्यांची संख्या किती ? मुळा  नदी मोठी कि मुठा ? आपण किती पावसाळे पाहिले आहेत ? वगैरे गोष्टींचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.असो म्हणजे ६१ च्या पुरातील पुरग्रस्तांचे पुनर्वसन यशस्वी कि अयशस्वी ? या विषयावर आपण स्वतः आधार कार्ड रिन्युवल चे फोटो काढण्याच्या खिडकीवर कामाला आहोत हे विसरून मत ठणकावता आलं पाहिजे. पुनर्वसन , सरकारचे यश कि अपयश ठोका...

पावसाळ्यात दिवसातून एकदा तरी बाहेर कितीही पाऊस तांडव करत असला तरी 'छे छे ६१च्या पुराइतकं हे भयानक नाही तेव्हा आम्ही कसे वाचलो आम्हालाच माहित' हे वाक्य फर्ग्युसन कॉलेज,बँका,रुपाली,वैशाली ,गुडलक अगदी हनुमान टेकडी किव्वा प्रभात रस्ता कुठेही ऐकायला मिळेल.त्या वेळे इतकं भयानक नाहीये.  

पावसाळ्यातील पुणेकर व्हायला कशाचातरी जाज्वल्य अभिमान हवा.नुसता नाही जाज्वल्य...तो खडकवासला धरण किव्वा मुळा मुठा नदी यांचाच असला पाहिजे असेही नाही.अति पावसामुळे झेड-ब्रिज,बाबा भिडे पूल कसा बंद झाला,नदीपात्रातल्या गाड्या पाण्यावर कश्या तरंगू लागल्या किव्वा पाणी सोडल्यामुळे ओंकारेश्वरला गढूळ पाण्याचा अभिषेकाचा कसा झाला याचा असला तरी चालेल,पण जाज्वल्य अभिमान पाहिजे.व्हाट्सअँप वर मतभेद व्यक्त करायला या जाज्वल्य अभिमानाची फार मदत होते.म्हणजे उत्तराखंडच्या पुराच्या वेळी १९६१ सालच्या पुराचा अभिमान, मुंबईत पडलेल्या पुलाच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील पाईप फुटीमुळे घरात शिरलेल्या पाण्याचा अभिमान अशी त्या त्या अभिमानाची वाटणी आपल्याला करता येते.आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून पावसाळी पुणेकर म्हणून मान्यताच मिळत नाही.अधून मधून व्हाट्सअँप किव्वा फेसबुकवर स्टेटस रुपी आणि इतर ग्रुप वर आलेल्या फॉरवर्ड फोटोरूपी आपले मत नोंदवायची स्वातंत्र्य शैली कमावणे हे अत्यंत आवश्यक आहे.

पावसाळी पुणेकर मरमर करत, जीवाचा आटापिटा करत, बोंबलत पावसात कधी बाहेरच पडत नाही.धोधो कोसळणाऱ्या पावसात गॅलरीत सुद्धा न जाता फार फार तर ओट्याच्या वरची खिडकी उघडून पाऊस आणि चहाचा कप यांचा फोटो टाकणे,सुट्टीच टाकून घरी असाल तर पाऊस,भजी,चहा आणि प्रेम या चौकोनात बसेल इतपत चारोळी लिहिणे यापलीकडे पुणेकर सरत नाही.

खरा पावसाळी पुणेकर पाऊस किती झाला हे हवामान खात्याच्या आकड्यांवरून कधीच ठरवत नाही.चड्ड्या वाळायला लागणारा वेळ,पाण्याखाली गेलेले पूल,सिंहगडवर झालेली जोडप्यांची गर्दी या मापदंडांवरून पावसाची तीव्रता ठरवतो.

पुण्याबाहेरून आलेले लोकं पुलावर उभे राहून भिजत कणीस खातात,सिंहगडवर भिजायला जातात,धरणातून सोडलेल्या पाण्याचे फोटो टाकतात मात्र हाडाचा पावसाळी पुणेकर फार फार तर ऑफिस मधून लवकर आल्याच्या आनंदात असतो,वर्क फ्रॉम होम करतो किव्वा अगदीच आनंदाचा कडेलोट म्हणजे सुट्टी घेतो.बाकी आल्याचा चहा,कांदाभजी या गोष्टींचा उपभोग घेत कोसळणाऱ्या पावसाळा खिडकी बंद ठेऊन पाहत राहतो.आणि हे जमले पाहिजे.

पक्का पावसाळी पुणेकर जून मध्ये पाऊस नाही म्हणून गळा काढतो,जुलै मध्ये पाऊस छान झाला म्हणून गोडवे गातो, तोच पाऊस ऑगस्ट मध्ये रेंगाळला म्हणून समाधानी असतो आणि गणपतीच्या मिरवणुकीत खो घालतो म्हणून कुरकुर करतो.आणि एवढे झाले तरी 'जुलै ची सरासरी पार केली तरी यंदा उजनी भरलेच नाही' म्हणून नाराज असतो.  

पावसातून दुचाकी चालवताना शेजारच्या चारचाकीने पाणी उडवले तर शक्य तितका त्रासलेला चेहरा करता येणे आणि आपली हि निराशा त्या चारचाकीवाल्याला लक्षात आणून देणे हि कला अवगत असणे गरजेचे आहे.तुम्ही जर चार-चाकीत  असाल आणि तुमच्या हातून पाणी उडले तर 'पावसात पाणी उडणारच त्यात काय इतके,पावसाळ्यात पाणी नाहीतर काय चहा उडेल ?' हे भाव तुम्हाला ठामपणे आणि तितक्याच सक्षमपणे प्रदर्शित करता आले पाहिजे.दुचाकी वाला अगदीच गुंड दिसत असला तर 'काय हल्लीची लोकं दोन थेंब उडाले तरी इतकी कटकट करतात' हे आपले मत त्याच्यावर लादता आले पाहिजे.

अगदी भर पावसात तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एखाद्या पुलावर जायची वेळ आलीच तर पुलावर थांबलेल्या, कणीस खाणार्यांकडे किव्वा फोटो काढणाऱ्यांकडे शक्यतितक्या तुच्छतेने पाहता आले पाहिजे.त्या सोबतच 'यात काय फोटो काढायचेत आम्ही लहानपणापासून पाहत आलोय' असे भाव चेहेऱ्यावर आणता आले पाहिजेत.पाऊस नसेल तरीही केवळ बाकीच्यांच्या मुर्खपणामुळे आपले कपडे खराब होतील म्हणून नखशिखांत रेनकोट घालून बाहेर पडण्याची दूरदृष्टी असणे हि खऱ्या पावसाळी पुणेकरांची ओळख आहे.

पावसात उघड्यावर लावलेल्या गाडीकडे पाहून 'अरे गाडी उगीचच भिजतीये' हा निराशाजनक सूर काढण्यापेक्षा 'चला गाडी छान धुवून निघाली' हा समाधानाचा विचार डोकावणे हेच पावसाळी पुणेकरांचे लक्षण आहे.

थोडक्यात काय तर बाहेर ढगफुटी जरी झाली तर खिडकीतून त्याचा आनंद घेत आपण किती आणि कसे पावसाळे पहिले याची उजळणी जो करतो तोच खरा पावसाळी पुणेकर.

आता तुम्हाला कोण व्हायचंय हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.कारण पाऊस जरी सगळी कडे सारखा पडत असला तरी प्रत्येकाची भिजण्याची पद्धत वेगवेगळी असू शकतेच नाही का..
वरील लेख वाचताना पदोपदी पुलंची आठवण येईल..अर्थात हा केवळ योगायोग अजिबात समजू नका.कारण या लेखाचा गाभाच पुलं आहेत :)




हृषिकेश पांडकर
०६.०८.२०१९