सामान्य माणसाचा सोमवार
पुढे येणाऱ्या आठवड्याभराच्या नोकरीच्या ओझ्याचा डोलारा पेलण्याने सुरु होतो.तेच 'मंडे
मोटिव्हेशन' चे फोटो, तीच गुडमॉर्निंगची फुलं, रविवारी झालेल्या ट्रिप,पार्ट्या,भेटीगाठी
यांच्या स्टेटसरूपी उरलेल्या पाऊलखुणा व्हॅट्सऍपभर विखुरलेल्या असतात.सगळं कसं नियमित,सुरळीत
चालू असते आणि हिमा दास सारखी खेळाडू आपल्या कामगिरीने या रटाळ आणि त्याच त्याच दिनक्रमाचा
कायापालट करते.चर्चेचा,स्टेटसचा आणि बातम्यांचा ओघ तिच्या बाजूने वाहायला सुरुवात होते.
इतके दिवस तितकीशी माहित
नसलेली हिमा दास सर्वांकडून अचानक देशाभिमानाने मिरवली जाऊ लागते.हीच कदाचित सोशल मीडियाची
ताकद असू शकते आणि यात काहीच आक्षेपार्ह्य नाही.तिच्या कौतुकात निम्मा दिवस सारतो आणि
चंद्रयानाच्या बातमी येऊन धडकते.
पहिल्या चंद्रयान मोहिमेत
काय झाले,ते केव्हा झाले याचा मागमूसही नसताना 'काहींच्या झेंड्यावर चंद्र असतो तर
काहींचा झेंडा चंद्रावर असतो' या सारख्या वाक्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया रंगू लागतो.यातही
गैर नक्कीच काही नाही.एवढ्या मोठ्या गोष्टीचे कौतुक आपण नाही करणार तर कोण हे हि तितकेच
खरे असते पण कौतुक करण्याआधी चांद्रयान म्हणजे नक्की काय हे जाणण्याचा मी माझ्या बाजूने
प्रयत्न केला.
पांढऱ्या शुभ्र धुराच्या
ढगातून उभारी घेत निळ्याशार पसरलेल्या आकाशातील कापशी ढगाला छेदून पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण
भेदून बाहेर पडणारे GSLV Mk III हे दृश्य विलोभनीय होते.ते भूतलावरून निसटत असताना
इसरो च्या शात्रज्ञांच्या चेहेर्यावरील आनंद आणि एकमेकांना टाळ्या देत तो साजरा करतानाचे
व्हिडीओ किव्वा फोटो अंगावर शहारे आणणारे होते.त्यानंतर सर्वांच्या प्रतिक्रिया मेसेज,नरेंद्र
मोदींचे २ शब्द आणि बरेच काही.पण वास्तविक हे चंद्रयान -२ नक्की काय होते याची माहिती
कुठेच वाचायला मिळाली नाही अथवा ऐकायला मिळाली नाही हे काहीसे निराशाजनक वाटले.
असो,पण या यशाने जर मला
मनापासून आनंद होत असेल तर हे यश नक्की काय आहे हे जाणून घेणे देखील माझ्यासाठी तितकेच
महत्वाचे आहे असे मला वाटते.
एकतर हे चांद्रयान-२
होते तर चंद्रयान -१ मध्ये नक्की काय झाले ? या वेळेस आपण प्रथम चंद्रावर काही उतरवणार
आहोत तर मग आधीच्या मोहिमेत आपण नक्की काय केले ? या वेळेस प्रत्यक्ष व्यक्ती उतरणार
कि अजून काही ? हे आणि असे अनेक प्रश्न ते तिरंगा लावलेले GSLV Mk III धुराच्या प्रत्येक
ओघाबरोबर मागे फेकत होते.
दोन वर्षांपूर्वी 'नासा'
ची 'हॉल ऑफ फेम' बघत असताना चंद्रावर आपला नंबर केव्हा हि उत्सुकता होतीच आणि आता ती
पूर्ण होणार याचा आनंद जास्त आहे.
तर सर्वप्रथम हे चंद्रयान
१ नक्की काय होते ते मी जाणून घेतले.
चंद्रयान १ हे भारतीय
अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे
अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा
मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची
प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर
२२,२००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी
यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.१४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री
साधारण ८ वाजता यानाला जोडलेला 'मून इम्पॅक्ट प्रोब' यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला.
जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन
क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे
प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील
चौथा देश बनला आहे.याचा अर्थ आत्तापर्यंत आपला मून इम्पॅक्ट प्रोब फक्त चंद्राला स्पर्शीला
गेलेला आहे आणि याला तिरंगा लावला असल्याने तिरंगा तिथवर पोहोचला असे म्हणता येईल मात्र
सर्वार्थाने अजून आपण चंद्रावर तिरंगा रोवलेले नाही.
या माहितीवरून पर्वा झेपावलेल्या चंद्रयान-२ विषयीचे
औत्सुक्य अजून वाढले आणि त्या विषयी माहिती घेणयासाठी मी उतावळा झालो होतो.
चंद्रयान-२ हि भारताची
चंद्रावरील दुसरी मोहीम.जिची बांधणी पुन्हा एकदा इसरो तर्फेच झाली.२२ जुलै २०१९ रोजी
दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून याने उड्डाण
केले गेले .चंद्रयान-२ हे GSLV Mk III या यांच्या साहाय्याने पूर्णत्वाला नेले जाईल.Geosynchronous
Satellite Launch Vehicle Mark III (GSLV Mk-III),also referred to as the Launch
Vehicle Mark 3 (LVM3) is a three-stage medium-lift launch vehicle developed by
the Indian Space Research Organisation (ISRO)). थोडक्यात काय तर १०० टक्के भारतीय
बनावटीचे वाहन चंद्रावर उतरणार याचे समाधान अधिक.
GSLV Mk-III |
याच यानासोबत 'विक्रम'
नावाचा लँडर आणि 'प्रग्यान' नावाचा रोव्हर
देखील असेल जे प्रत्यक्षरित्या चंद्रावर उतरतील यालाच कदाचित चंद्रावरील 'सॉफ्ट' लँडिंग
असे म्हणता येईल.नावावरून पाहता लँडर म्हणजे जो लँड होऊन तिथेच स्थिरावेल असा आणि
रोव्हर म्हणजे जो तिथे उतरून सभोवतालची पाहणी करेल आणि तेथील अपेक्षित माहिती आपल्याकडे
पाठवेल.अर्थात रोव्हरचा फिरण्याचा वेग सेकंदाला साधारण एक सेंटीमीटर इतका असेल. या
फिरतीचा एकूण अवधी १४ दिवस असेल तर विक्रमचा एकूण अवधी १५ दिवसांचा असेल असे वाचनातून
निष्पन्न झाले.
मुख्य यानापासून विलग
होऊन पुढला साधारण ३० एक किलोमीटरचा प्रवास हि दोनही वाहने आपापला करतील आणि ती गोष्ट
खऱ्या अर्थाने माझ्यासाठी कुतूहल निर्माण करणारी असतील.
थोडे वाचल्यावर अधिक
माहिती मिळाली ती अशी कि चांद्रयान -२ चे उड्डाण हे २०११ मध्ये होणे अपेक्षित होते
ज्यामध्ये रशियात बनलेला लॅण्डर आणि रोव्हर वापरला जाणार होता. मात्र रशियाने इसरो
मधून माघार घेतल्याने आपणच स्वदेशी बनावटीचे हे दोन भाग बनवले आणि २०१९ मध्ये मोहीम
पूर्णत्वाला नेली.झेपावलेला पक्षी हा सुमारे ३८५० किलोचा आहे जो बाहेर पडून ३ विभागात
विभागला जाईल.या मोहिमेचा एकूण खर्च सुमारे १४१ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका आहे.
बऱ्याच कवींच्या कवितेचा,प्रेमिकांच्या
आणाभाकेचा किव्वा आई-आजींच्या गोष्टीचा बहुतांशी भाग असलेला किंबहुना गाभाच असलेल्या
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आज खऱ्या अर्थाने आपला ठसा उमटवायला भारत सज्ज झाला.पुढल्या
महिन्यात ती कामगिरीही यशस्वी पार पडल्याची बातमी नक्की येईल.त्याची वाट तमाम भारतीय
आणि इतर देश देखील तितक्याच आतुरतेने बघत असतील.इसरो मधील शास्त्रज्ञांची इतक्या वर्षाची
पराकाष्ठा अखेर पूर्णत्वाला येईल यापेक्षा अभिमानाचा मोठा क्षण तो कोणता ?
हजारो किलोमीटर दूर असलेल्या
यानाचा देखभाल आणि प्रवास इथे बसून घडवून आणायचा तेही तिथे कोणतीही प्रत्यक्ष व्यक्ती
नसताना या सारखा मोठा अचंबा नाही.'रॉकेट सायन्स' 'रॉकेट सायन्स' म्हणतात ते हेच असावे
जे खऱ्या अर्थाने अनाकलनीय असते हेच खरंय..!
'चंदा रे चंदा रे ..कभी
तो जमीपर आ ..बेठेंगे बाते करेंगे ' हे तितकंसं शक्य नाही पण आपण आता त्याच चंद्रावर
जाऊन त्याची भेट घेणार आहोत याचा आनंद आणि अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही.'नासा'
च्या अंतराळवीरांच्या गोष्टी ऐकल्यावर किव्वा निल आर्मस्ट्राँगच्या चंद्राच्या गोष्टी
ऐकल्यावर आपण चंद्रावर कधी पोहोचणार याचे उत्तर आता आपल्याकडे आहे.
कित्त्येक वर्ष या यशासाठी
झटणाऱ्या आणि त्या यशाची चव आम्हा सर्वांना चाखण्यास देणाऱ्या मोहिमेतील प्रत्येकाचे
मनापासून अभिनंदन.पुढल्या मोहिमेत प्रग्यान रोव्हर ऐवजी एक भारतीय व्यक्ती चंद्राला
स्पर्श करेल हि अपेक्षा तुमच्याकडून बाळगणे आता नक्कीच गैर नाही आणि त्यासाठी हार्दिक
शुभेच्छा देखील.
या दोन्ही मोहिमांची
इत्यंभूत माहिती गुगल आणि इतर माध्यमात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेच.उत्सुकतेपोटी आणि
कौतुक म्हणून नक्की वाचा आणि पहा.आनंद आणि अभिमान जर बाळगणार आहोतच तर हे यश नक्की
काय आहे ते एकदा जाणून तर घेऊयात :)
हृषिकेश पांडकर
२९.०७.२०१९
मोहिमेची पूर्वतयारी,काम
चालू असतानाची काही क्षणचित्रे खाली दिलेल्या लिंकवर व्हिडीओरुपी पाहता येतील वेळ असल्यास
नक्की पहा.
https://youtu.be/FdVVvs3WGC0