Thursday, May 2, 2019

Beauty with the beast !

 नळावरची भांडण आपल्याला नविन नाहीत. किंबहुना आपल्याकडे नळावरच सर्वात जास्त भांडण होतात. पिण्याच्या पाण्याचा नळ असो किव्वा कपडे धुण्याचा इथली भांडण कोणाला चुकली नाहीत.इतकेच काय तर नद्यांचे पाणी अडवून पाण्याच्या प्रश्नावरून रंगलेले राजकारण देखील आपल्याला नविन नाही. यातच भर म्हणजे तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल असे म्हटले जाते. पाण्याच्या हक्कांवरील वाद इतका विकोपाला जातोय हे किमान या फोटोवरून तरी वाटत नाही आणि कदाचित हाच निसर्गाचा निष्पापपणा किव्वा अलिखित नियम इथे अधोरेखित होत राहतो हे पाहताना सुसह्य वाटत राहते.


 

मध्य भारतातातील मे महिन्यातील भर दुपारची हि वेळ.तापमानाचा पारा ४६ अंशावर येऊन टेकलेला. पानझडी होऊन पर्णविरहित झाडांच्या वाळक्या फांद्यातून मार्गक्रमण करत पाण्याच्या शोधार्थ असलेले वन्यजीव हक्काने येतात असा हा पाणवठा.नुसता मोर किव्वा नुसता वाघ आधी पाहण्याचा योग्य आला होता. मात्र नजरेच्या एका टप्प्यातच हि दोन राष्ट्रीय आकर्षणे उभी राहतील असे कधी वाटले नव्हते.

एका बाजूला सौन्दर्याचा मानंदांड असलेला देखणा मोर आणि त्याच्याच समोर कर्तृत्वाने राजपद सिद्ध केलेला रुबाबदार असा जंगलाचा राजा वाघ.एक भारताचा राष्ट्रीय पक्षी आणि दुसरा भारताचा राष्ट्रीय प्राणी.दोघेही तहान भागविण्यासाठी पाणवठ्यावर आले तेव्हाचा हा फोटो.फोटो जरासा नीट लक्ष देऊन पाहिलत तर पाण्यात असलेली मगर देखील दिसू शकते.त्यामुळे भूचर,उभयचर,जलचर आणि हवेत उडणारे अशा चारही जीवांनी एकाच ठिकाणी दर्शन दिले.

जंगलातून फिरत असताना अर्थातच मोरापेक्षा वाघ दिसण्याचे आकर्षण जास्त असते यात शंकाच नाही आणि याला कारणेही तशीच आहेत. मात्र या मुळे मोराचे महत्व तसूभरही कमी होण्याचे कारण नक्कीच नाही. म्हणूनच हि दोन्ही राष्ट्रीय अभिमानाची प्रतीके एकाच ठिकाणी पाहणे हा अनुभव कायमच स्मरणीय राहील एवढे निश्चित.

हृषिकेश पांडकर

०२.०५.२०१९

Beauty with the beast !

Tadoba | India | May 2019

 

No comments:

Post a Comment