समुद्र किनारा आणि तुरुंग यांचा जेव्हा एकत्रित उल्लेख होतो तेव्हा फक्त सावरकरच आठवतात.कारण मी त्याच इतिहासात वाढलोय.जेव्हा या दोन गोष्टींचा संदर्भ येतो तेव्हा अंदमानचे ते भव्य सेल्युलर जेल आणि अथांग सागराजवळ मातृभूमीकडे परत नेण्याची साद घालणारे विनायक दामोदर सावरकर यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.हीच गत माझी झाली जेव्हा जगाच्या पश्चिम टोकावरील पॅसिफिक महासागरात उभे असलेले अलकटराझ तुरुंग डोळ्यासमोर होते.वास्तविकतेत या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत पण भारतीय मन स्वस्थ बसू देत नाही.
गोल्डन गेट ब्रिजच्या पार्श्वभूमीवर दिसणारा बेट सदृश्य देखावा म्हणजेच हे पूर्वीचे अलकटराझ तुरुंग आणि सध्याचे राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक.अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जुना आणि व्यवस्थितपणे कार्यरत असलेला दीपगृह येथे पहायला मिळतो.कदाचित हाच दीपगृह या बेटाकडे लक्ष वेधण्यास कारणीभूत ठरतो.
बेटाचा संपूर्ण आकार खूप मोठा नाहीये मात्र तेव्हाच्या काळचे तुरुंग,परेड मैदान,कैद्यांचे इस्पितळ,दीपगृह आणि अधिकाऱ्यांची काही घरे या गोष्टी नक्की पहायला मिळतात.या खेरीजही बऱ्याच गोष्टी इथे जतन करून ठेवलेल्या आहेत.
या बेटाचे नाव 'पेलिकन आयलंड' म्हणून प्रसिद्ध होते.'पेलिकन' या पक्षाला पुरातन स्पॅनिश भाषेत 'अलकटराझ' असे संबोधले जात असे म्हणूनच या भागाचे नाव अलकटराझ म्हणून प्रसिद्ध झाले.नावाप्रमाणेच इथे पेलिकन या पक्षाची संख्या साहजिकच खूप आहे.पाण्यावरील पक्षांच्या वैविध्यतेसाठी सुद्धा हे ठिकाण आकर्षण ठरू शकते.
तर कधी जगाच्या पश्चिम टोकावरील 'गोल्डन गेट ब्रिज'ला भेट देणार असाल तर मातृभूमीला परतण्यापूर्वी हे तरंगते तुरुंग नक्की पाहून या.अगदी काला -पानी नाही पण निळ्याशार समुद्रावरील तरंगता इतिहास नक्की पाहता येईल.
- हृषिकेश पांडकर
That's all the freedom we can hope for - the freedom to choose our prison to visit
Alcatraz Prison | USA
No comments:
Post a Comment