भर उन्हात चौकातील सिग्नलला थांबायला सावलीची जागा मिळणे,आपण लिफ्ट जवळ पोहोचताच त्याच मजल्यावर लिफ्ट थांबलेली असणे,पेट्रोल पंपावर गेल्यागेल्या आपलाच नंबर लागणे किव्वा कोणतीही गाडी न हलविता सहज पार्किंग करायला येईल अशी सुटसुटीत जागा मिळणे या आणि अशा अनंत सुखाला चटावलेला मी यापेक्षा वाढीव आणि अवाजवी ऐषोआरामाची अपेक्षा ठेवत नाही.छोट्या छोट्या गोष्टीतून समाधान आणि पर्यायाने आनंद घेण्याची हि गोडी लावली ती पु.लं.नी लिहिलेल्या दैनंदिन जीवनातील बारीक सारीक गोष्टींनी.
विनोदी लिहिण्यासाठी जड शब्द,अलंकारिक भाषा आणि नावाजलेले प्रसंग यांची गरज अजिबात नसते.किंबहुना सकाळी उठल्यापासून ते रात्री पाठ टेकवेपर्यंत आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी,प्रत्येक व्यक्ती,त्यांच्या हालचाली यांचे चाणाक्ष आणि कलात्मक पद्धतीने निरीक्षण करून त्यातून निर्माण केलेला सहज पचणारा आणि मनापासून दाद मिळवणाऱ्या विनोदाचे जनक म्हणजे भाई.
महाराष्ट्रासारख्या चोखंदळ राज्यात कला,क्रीडा,राजकारण आणि सिनेमा या सर्व आघाड्यांवर प्रत्येकाची स्वतंत्र आवड असतेच आणि आहे.या प्रत्येक क्षेत्रात सर्वांची सर्वात प्रिय व्यक्ती आहे तसेच नावडती व्यक्ती पण असतेच.एखाद्याची प्रिय व्यक्ती दुसऱ्याची नावडती नक्कीच असू शकेल.पण भाईंच्या बाबतीत हे पडताळे पार फोल ठरतात.कारण ज्या लोकांचा पुलंच्या साहित्याशी कोणत्याही कारणाने संबंध आला आहे ती व्यक्ती नेहमीच पु.लं.चा चाहता म्हणूनच राहील याची खात्री असते.विनोद पटला नाही किव्वा रुचला नाही याची तर शक्यताच नसते. समजला नाही हि गोष्ट शक्य आहे.मात्र पु.लं.चे साहित्य आवडले नाही अशी एकही व्यक्ती या उभ्या महाराष्ट्रात नाही हे उघड सत्य आहे.सामान्य माणसाच्या सर्वात जवळ जाणारा आणि 'हो हे माझ्या बाबतीतही घडले आहे' असे वाटणारे अनंत प्रसंग आपल्या लेखणीतून सर्वांपुढे आणणारे 'भाई' उगीच महाराष्ट्राचे 'लाडके व्यक्तिमत्व' ठरलेले नाहीत.
विनोदी लेखनाचा मानदंड आणि फक्त लेखनचं नाही तर 'कला' या क्षेत्रात मोडणाऱ्या जवळजवळ सर्व अंगात पारंगत असलेल्या या अवलियाचे हे जन्मशताब्दी वर्ष.पु.ल. म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी हि त्यांची मुद्रा आणि त्यांच्या या अखंड आनंद देणाऱ्या कलाकृती कायमच आपल्या सोबत राहतील.भाईंची हि मुद्रा रेखाटणाऱ्या माझ्या बायकोचे लै लै कौतुक...बाप काढलं आहेस चित्र ...कमाल !!!
हृषिकेश पांडकर
१०-१२-२०१८