Sunday, July 15, 2018

'विम्बल्डन' - हिरव्या गालिच्यावरील राजेशाही थाट



शाळेत असताना 'मॅच घ्यायची का' असा प्रश्न विचारल्यावर खेळ हा क्रिकेटचं आहे हे अध्याहृतच होते.तिथे फक्त 'तुमच्या बॅटिंगला तुमच्या बॅटी आणि आमच्या बॅटिंगला आमच्या','बॉलसाठी कॉन्ट्री करू' या जुजबी पण पिनपॉईंट किकऑफ मिटिंगवर अनंत मॅचेस लावल्या आणि खेळलो.लहानपण दत्तक घेतलेल्या या खेळापुढे बाकीचे खेळ बाईंनी वर्गात प्रश्न विचारल्यावर उत्तर न येणाऱ्या मुलांसारखे दडपून गेले होते.जसे वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांच्या उत्तराने बाईंचे समाधान केले अगदी तसेच या बावीस यार्डच्या खेळाने माझे बालपण सुसह्य केले.

पुढे आठवी नववीत शिकायचा योग्य आल्यावर 'होरायझॉन वाईड' झाले ज्याला आपण शिंग फुटली असे म्हणतो किव्वा हल्लीच्या प्रगल्भ मराठीत 'दात आले' असे म्हणतो.तर या उमेदीच्या काळात क्रिकेट व्यतिरिक्तही खेळ असू शकतात याची खात्री पटायला सुरुवात झाली होती.

जुनमध्ये शाळा सुरु होण्याची लगबग.नवीन कपडे,नवीन दप्तर,कापरे व्यवस्थित कापून मनासारखी खाकी कव्हर घातलेली वह्या पुस्तकं,दर दोन वर्षांआड नवीन असलेला रेनकोट,कोरा करकरीत गणवेश आणि त्या सोबत आपसूकच येणारे नवीन बूट-मोजे.एवढी दांडगी तयारी असूनही बुटात जाणारे चिखलाचे पाणी,संध्याकाळी घरी येताना विनाकारण भिजल्याने न वाळणारे युनिफॉर्म या गोष्टी पहिल्या चाचणी पर्यंत सवयीच्या होऊन जायच्या.पंधरा ऑगस्टचे झेंडावंदन हि पहिल्या चाचणी परीक्षेच्या आधीची शेवटची सुट्टी.शाळा सुरु झाल्यापासून ते या सुट्टीपर्यंतचा पाऊस हा वाढदिवसाच्या ओढीने सुरु व्हायचा आणि ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम उठला तरी श्रावणापर्यंत रेंगाळायचा.

हि प्रस्तावना करायचा प्रपंच का ? तर याच कालावधीत एका खेळाच्या आवडीने बारसे धरले आणि तो म्हणजे टेनिस.रॅकेट-बॉल,कमरेच्या उंचीची जाळी आणि २ लोक एवढाच लवाजमा होता पण त्याचे आकर्षण कालानुरूप वाढत गेले.याची सुरुवात झाली ती याच जुलै महिन्यातील विम्बल्डन या स्पर्धेमुळे.



पॉईंट मोजायला कमी आणि सोपे.फक्त टाय ब्रेकरला गांगरून जायला व्हायचं.पण हळूहळू ते कोडेही सुटत गेले.खेळाडू,रेकॉर्ड या गोष्टी लक्षात रहायला लागल्या पण सर्वात जास्त अप्रूप वाटायचे ते या विम्बल्डन स्पर्धेचे. वर्षातून एक वेळा लंडन मध्ये होणारी टेनिस खेळाची सर्वात मानाची आणि शिस्तबद्ध स्पर्धा.खेळाच्या आकर्षणापेक्षा या स्पर्धेचे आकर्षण म्हणून पाहणे जास्त व्हायचे.

मैदानाची मांडणी,ते समतोल कापलेले गवात,दुतर्फा लटकवलेले रोलेक्सचे घड्याळ इथपासून ते दोन पॉईंट्स मध्ये चिडीचूप बसणारे प्रेक्षक,आज्ञाधारक बॉल बॉय,भरकटलेले चेंडू शिताफीने आणि चपळाईने पकडून आपल्या जागी विसावणाऱ्या त्या चिमुरड्या या आणि अश्या बऱ्याच गोष्टींचे अप्रूप वाटायचे आणि वाटतेही.

सर्व्हिस करताना प्लेयर तोंडानी आवाज का करतात ? खिशात ठेवलेल्या चेंडूंमुळे खेळाडूंना पळताना अडचण होत नाहीका? १५,३० या नंतर ४० का येतात ? या सारखे अनुत्तरित प्रश्न मी कायमच अनुत्तरित ठेवले.त्याला काही कारणे असतीलही पण जाणून घेण्याची कधी गरजच नाही वाटली.

फायनल संपल्यावर दुसऱ्या मिनिटाला रांगेने मैदानात येणारे लोक.त्या समारोप समारंभाची पाचव्या मिनिटाला होणारी संपूर्ण तयारी.बक्षीस देण्याआधी इंग्लंडच्या राजाराणीने आस्थेने केलेली त्या छोट्या बॉल बॉय आणि बॉल गर्लची चौकशी या गोष्टी नेहमीच्याच पण तितक्याच जवळच्या वाटत आल्या.सामन्यांच्या अंतिम क्षणामध्ये पॉईंट मिळाल्यावर अथवा गमावल्यावर खेळाडू पेक्षा त्याच्या जवळच्यांचे टिपलेली मुद्रा बघण्यात का कोण जाणे पण जास्त मजा वाटत आली.जिंकल्यावर कप मिळतो हि समजूत त्या गोलाकार थाळीने पार पुसून टाकली.



सामना पाहताना स्ट्रॉबेरी आणि क्रिम खाणारे असंख्य चाहते हे देखील या स्पर्धेचे वैशिष्ट्य समजले जाते.क्रिकेट सामन्यांचा जिव्हाळा असल्यामुळे बाऊंड्री बाहेरील वर्तुळवर लावलेल्या प्रयोजकांच्या जाहिराती हा खेळाचाच भाग वाटत आला आहे.मात्र याचा अगदी विरोधाभास इथे पाहायला मिळतो.त्या टेनिसी कोर्टच्या आवारात एकाही जाहिरातीचे फलक किव्वा प्रयोजकांचे बॅनर पहायला मिळत नाहीत हि कमालीची कौतुकास्पद बाब आहे.

सेंटर कोर्टला असलेली छताची सोय तितकीशी जुनी नाही.मी पहायला लागल्यापासून हा प्रकार पाहण्याचा योग फारसा आला नाही.मात्र पावसामुळे सामन्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून केलेली व्यवस्था प्रत्यक्ष अमलात आणताना पहायला भारी वाटते.



सामना पाहात असताना मला त्या चुणचुणीत बॉल बॉय आणि बॉल गर्लचं देखील विशेष कौतुक वाटते.निवडक शाळांमधून निवडलेले विद्यार्धी या कामासाठी पात्र ठरतात.नंतर यांच्याबद्दल वाचल्यावर समजले कि शाळेच्या मुख्याध्यापकांनी निवडलेले नहे ठराविक विद्यार्थी इथे येऊन हि भूमिका बजावू शकतात.या नंतर त्यांची टेनिसच्या नियमांवर लेखी परीक्षा घेतली जाते.एवढाच काय तर शिस्तीचा भाग म्हणजे लग्न झालेल्या महिला खेळाडूंची नावे नवऱ्याच्या नावासहित लिहिली जातात.



राजेशाही घराण्याला बसण्यासाठी सेंटर कोर्ट वर रॉयल बॉक्स बनवलेला आहे.तिथे मान्यवर व्यक्तीच बसू शकतात.यात जर इंग्लंडची राणी किंवा राजा आला असेल तर खेळाडूला सामना संपल्यावर अभिवादन करणे नियमानुसार बंधनकारक आहे असे सांगितले जाते.इथेच आपला सचिन बसला होता हि गोष्ट अजूनही तितकीच जवळची आणि अभिमानास्पद वाटते.

एखादा खेळाडू एखाद्या स्पर्धेपुरता लक्षात राहिला.सॅम्प्रास,बेकर,स्टेफी,हिंगीस,नवरातिलोव्हा,विलियम्स भगिनी,फेडरर,नदाल,जोकोव्हिच यासारखे खेळाडू दरवर्षी छाप पाडत आले.दुहेरीत भारताच्या पेस,भूपती,सानिया या लोकांनी ठसा उमटविला पण वैयक्तिक देश म्हणून आपलं नाणं कधीच खणखणलं नाही.

दर वर्षी नेमाने येणाऱ्या या दोन आठवड्यांचे अप्रूप नक्कीच असते.अर्थात टेनिस या खेळाशी मी एक खेळ म्हणून तितकासा जवळचा नक्कीच नाहीये.पण या विम्बल्डनच्या निमित्ताने हा खेळ जवळचा वाटू लागला.

एखाद्या खेळाची स्पर्धा कशी भरवावी नियोजन,मान्यवरांचे आदरातिथ्य,खेळाडूंची सोय,प्रेक्षकांची व्यवस्था आणि यासोबतच खेळाचे नियम,खेळ खेळण्याव्यतिरिक्त असलेले तिथले सोपस्कार या गोष्टी कायम स्मरणात राहतात.

गोऱ्यांच्या देशात खेळ पहायला येण्यासाठी सुद्धा ठराविक ठिकाणी विशिष्ट गणवेश घालावा लागतो त्याला विम्बल्डनचे मैदान देखील अपवाद नाही.

हे सामने पाहताना मला अजून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे खेळाडू वापरत असलेले टर्किश टॉवेल आणि त्यावर असलेला तो विम्बल्डनचा लोगो.का कोण जाणे पण खेळाडू चेहरा पुसून तो टॉवेल त्या बॉल बॉय किव्वा गर्लकडे फेकतो ते पहायला मला भयानक आवडते.ती लहान पोरं पण तितक्याच अदबीने आणि न चुकता तो झेलतात प्रत्येक पॉइंटला खेळाडू मागे वळला कि त्याला टॉवेल हवा नको हे विचारतात.हा भाग पाहताना मजेशीर वाटतो.अर्थात हा खेळाचाच भाग आहे त्यामुळे त्यांना त्याचे कौतुक नसेल पण इथे घरबसल्या पाहताना मला तरी हे वेगळे वाटते.सर्वात आश्चर्यकारक बाब मला नंतर समजली आणि आनंद वाटलं की हे सगळे टॉवेल भारतात बनवले जातात.



ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशात मैदानी सामने पाहताना दिसणारी असंख्य उडणारी कबुतर आपल्याला नवीन नाहीत.पण मग हाच अनुभव विम्बल्डनचे सामने पाहताना का येत नाही ? सामना चालू असताना एकही कबुतर किव्वा तत्सम पक्षी उडताना का दिसत नाहीत ? याचाही बंदोबस्त या लोकांनी हुशारीने केलेला आहे.'रुफस द हॉक' नावाचा बहिरी ससाणा पक्षी या लोकांनी पाळाला आहे.जो प्रत्येक सामन्याआधी त्या भागात घिरट्या घालतो.याच्या भीतीने भोवतालची कबुतरे इथे फिरकतच नाहीत.किव्वा स्पर्धेदरम्यान इथे घरटी करण्याचा विचार सुद्धा करत नाहीत.हा देखील या स्पर्धेचा वेगळाच भाग आहे.कधी विम्बल्डन स्पर्धा चालू व्हायच्या आधी जेव्हा त्याची जाहिरात टीव्हीवर येते ना तेव्हा ती नीट पहा.हा उडणारा शिकारी पक्षी किमान एकदा तरी दाखवतातच.दर वेळी हाच पक्षी का दाखवतात याच्या मुळाशी गेल्यावर मला त्या मागची गोष्ट समजली.थोडे अनाकलनीय आणि चमत्कारिक आहे पण गेले कित्येक वर्ष हि गोष्ट चालू असल्याने त्यात तथ्य असल्याचे नक्कीच जाणवते.



विम्बल्डन पहायचं अजून एक कारण जे वयपरत्वे अजून प्रबळ होत चाललंय ते म्हणजे महिला खेळाडूंचे सौन्दर्य.प्रश्न लपवायचा किव्वा लाज वाटण्याचा नाहीये कारण जे आहे ते उघड आहे.रशिया,झेक,स्वीझर्लंड आणि अशा इतर बऱ्याच राष्ट्रांच्या महिला खेळाडू खेळाने तर आपली छाप सोडतातच पण त्यांचे सौन्दर्य देखील तितकेच आकर्षित करते किंबहुना जास्तच.विलियम्स भगिनी ताकदीच्या जोरावर सहज मात करताना दिसतात.पण मग बाकीच्या सौन्दर्यवतींपुढे या दोघी निव्वळ ताकदीच्या जोरावर जिंकल्या असे चित्र उभे राहते.अर्थात यात त्यांच्या खेळातील कौशल्य मला हिरावून घ्यायचं नाहीये पण एक तिऱ्हाईत प्रेक्षक या नात्याने मी माझ्या मनाची समजूत काढत असतो.थोडक्यात काय तर टेनिस पाहण्याचे अजून एक बळकट कारण म्हणून हि गोष्ट माझ्यासमोर आहे. 

खेळ म्हणून सामना पहायला मजा येतेच.पण त्या खेळाच्या स्पर्धेसंबंधी असलेली हि वेगळीच माहिती जाणून मग ती पाहण्यात आता जास्त मजा वाटू लागलीये.मला हि स्पर्धा कायमच एक राजेशाही थाट वाटत आलाय.खेळाडूंचा रुबाब तर असतोच पण त्या सोबत प्रेक्षकांचा पण एक वेगळाच ऐट असतो.सेंटर कोर्टला तिकीट मिळवून फायनल पाहण्याच्या आनंदाचे आणि कर्तृत्वाचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसावं असे ते दृश्य असते.

सर्वात जुनी टेनिसची स्पर्धा अशी जिची ओळख आहे आणि चार ग्रँडस्लॅम पैकी गवतावर खेळली जाणारी एकमेव स्पर्धा अशी जिची ख्याती आहे अशा या सोहोळ्यात एकदा प्रत्यक्ष जावून या हिरवळीवर सामना बघायची नक्कीच इच्छा आहे.ती संधी कधी मिळेल याचा अंदाज नाही पण त्या टीव्हीत दाखवलेल्या चेंडूच्या टप्प्यानुसार मान वळवणाऱ्या प्रेक्षकात एकदातरी बसावे अशी मनोमन आकांशा आहे.त्या फुलांच्या गुछ्यात लावलेल्या दोन रॅकेटच्या विम्बल्डन लोगोला जवळ जाऊन न्याहाळायची इच्छा आहे.ग्रास इस ऑलवेस ग्रीनर ऑन द अदर साईड असे म्हटले जाते पण इथे प्रत्यक्ष आल्यावर कदाचित दोनही बाजूचे ग्रास तितकेच ग्रीन असेल का ? हि गोष्ट प्रत्यक्ष पाहिल्यावर नक्की सांगेन.



असो,तर या स्पर्धेच्या या वर्षीच्या अंतिम सामन्याची वेळ जवळ येऊन ठेपलीये.आपले विठू माउली पुण्यातून केव्हाच मार्गस्थ झालेच आहेत.शाळेचे वय हातातून निसटल्याने स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचे महत्व आराम करणे या पलीकडे राहिले नाही.यंदा फुटबॉल चा विश्वकरंडक पण आहेच.आणि फ़ुटबाँल आणि टेनिस या दोन्ही खेळांच्या दिग्गज स्पर्धांचा अंतिम सामनाही एकाच दिवशी रंगणार आहे.दोन्हीकडच्या हिरवळीवर कोणाचा विजय होईल हे वेळच ठरवेल पण तूर्तास एक प्रेक्षक म्हणून किमान पाहण्याची संधी तरी आपण दवडू नये असे वाटते.

चला तर मग या अंतिम सामन्यात काही नवीन गोष्टी पहायला आणि अनुभवायला मिळतायेत का या ओढीने पहायला बसुयात.कारण ज्या खेळाची सुरुवातच मुळात 'लव ऑल' या शब्दाने होते त्या खेळाचा शेवट हा आनंददायी नक्कीच असेल...नाही का ?



- हृषिकेश पांडकर






Tuesday, July 10, 2018

ट्रमलबाक

 एखाद्या उंच कड्यावरून स्वतःला झोकून देत शेजारच्या थेंबाशी स्पर्धा करत बेफान होऊन पुढल्या अडथळ्याला भिडत सरतेशेवटी समांतर जलप्रवाहात विलीन होणारे अनेक धबधबे पाहण्याचा योग्य आला होता.धबधबा म्हणलं कि स्वछंद आणि मोकळे उधळलेले फेसाळ पाणी जे कपारीतून वाट काढत विस्तीर्ण जलाशयात विलीन होते.या प्रवासात मोकळ्या वाऱ्याशी स्पर्धा हि असतेच पण इथल्या या धबधब्याची गोष्ट निराळी आहे.


 

हिमाच्छादित पर्वत राजीच्या मांदियाळीत वसलेला स्वित्झर्लंडचा हा प्रदेश.अनेक ग्लेशीयरनी सजलेला आल्प्स पर्वत.या ग्लेशीयरच्या वितळलेल्या पाण्याची नैसर्गिक विल्हेवाट लावणारी पर्वताच्या अंतर्गत भागातली जादुई घळई म्हणजेच 'ट्रमलबाक' धबधबा.

शब्दांच्या गुंतागुंतीत हा भौगोलिक चमत्कार समजणे अपेक्षितच नाहीये म्हणून विस्तृत लिहितो.

स्वित्झर्लंड देशाच्या राजधानी जवळ वसलेल्या लॉटरब्रूनन नावाच्या व्हॅली मध्ये हा भौगोलिक चमत्कार दडलेला आहे.मुळातच ज्या व्हॅलीचे वर्णन ७२ धबधब्यांची व्हॅली असे केले जाते तिथल्या निसर्गाचे वर्णन करायला शब्द तोकडे पडले नाहीत तरच नवल. या लॉटरब्रूनन व्हॅली मध्ये असलेल्या ग्लेशीयरचे वितळलेले पाणी माथ्यावरून पायथ्याला आणणारा हा डोंगरामधील वेगवान प्रवाह म्हणजेच 'ट्रमलबाक' धबधबा.

सेकंदाला वीस हजार लिटर इतक्या वेगात वाहणारे आणि त्या चिरलेल्या कातळातून मार्ग बनवून मार्गक्रमण करणारे पाणी.आणि हे पाहण्यासाठी तोच उभा कातळ आतून पोखरून बांधलेल्या लिफ्टने वर जाऊन पाहण्याची केलेली सोय हे म्हणजे निसर्गाच्या किमयेला विज्ञानाच्या सहाय्याने कौतुक करण्याची आणि पाठ थोपण्याची दिलेली संधीच आहे.

अंधारमय कपारीत प्रवेश केल्यावर वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा कपारीवर होणार आघात आणि आवाज धीरगंभीर पण अवर्णनीय वाटतो.नैसर्गिक असूनही शिस्तबद्ध वाहणारे पाणी पाहताना मजा येते.

या प्रवाहात मुख्यतः Eiger , Mönch आणि Jungfrau या पर्वतराजींवरील बर्फ वितळून जलप्रवाह येतो.हाच धबधबा पाहण्यासाठी पायऱ्यांची देखील व्यवस्था केलेली आहे ज्या दुसऱ्या बाजूने पर्वताच्या गाभ्यात जातात.

बाहेर उभे राहून अंदाजही येऊ न शकणाऱ्या या भौगोलिक चमत्काराची प्रचिती जवळ जाऊन पाहिल्याखेरीज येत नाही.इथे निसर्गाचा वरदहस्त नक्कीच आहे पण हे निसर्गाचे देणं जवळून पाहण्याची केलेली सोय देखील तितकीच वाखाणण्याजोगी आहे.या धबधब्याला भेट देणार असाल तर पायऱ्या आणि लिफ्ट या दोन्ही माध्यमांनी पाहून या.

नैसर्गिक सौन्दर्याचा मानदंड समजल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडचे कौतुक कायमच बर्फाच्छादित शिखरे,हिरवळीवर पसरलेली कौलारू घरे,दुतर्फा वाहणारे निर्झर झरे या दर्शनी गोष्टींनी होत राहिले आहे आणि ते रास्तच आहे.मात्र या अभेद्य पर्वतराजीत दडलेला फेसाळ प्रवाह देखील डोळ्याचे पारणे तितक्याच ताकदीने फेडतो यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय इथून पाय निघत नाही.

- हृषिकेश पांडकर

Water is the most perfect traveler because when it travels it becomes the path itself..

Trummelbach Fall | Lauterbrunnen | June '18