आठवडा किती मजेशीर चाललाय याचा हिशोब लावतोय..
श्रद्धा,करुणा,क्रूरता,भक्ती,मांगल्य,अमांगल्य
राष्ट्रप्रेम,यश,अपयश,लहरीपणा,निर्लज्जपणा हे सगळं अनुभवतोय..
एक वेळ आधी कोंबडा कि आधी अंड हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल..पण
आधी रंगारी कि आधी टिळक या प्रश्नावर विघनहर्त्याने देखील हात टेकले..
१२५वे वर्ष आणि १ डझन दिवसांचा मुक्काम या दुधारी योगायोगावर बाप्पा विराजमान झाले.
इतके दिवस वाळत पडलेला पाऊस येताना घेऊन आले..
पावसाचं एक वेळ ठीक आहे हो..त्याचे सध्या दिवस तरी आहेत..
पण ३०,६० आणि ९० च्या नशेवाचून ओस पडलेले हायवे पुन्हा नशाधीन होण्याच्या मार्गी आहेत..
राम रहीम म्हणत 'समाजसेवा' करणाऱ्यांची 'सेवा' समाजासमोर आली..
डोळ्यावर पट्टी असूनही न्यायदेवता आज न्यायाला जागली..
तिकडे युरोपात साइना सिंधू देशासाठी झुंजल्या..
पहिल्या चारात दोन दोन तिरंग्यांनी माना उंचावल्या..
१९६२ च्या पुनरावृत्तीची धमकी देणाऱ्या कपटी ड्रॅगनची एक नाही चालली.
डोकलामचा हट्ट धरलेल्यांची माघार मात्र आपल्यासाठी विजयसदृश्य ठरली.
विनायकाच्या मुक्काम पूर्वाधातच इतक्या गोष्टी घडल्या..आज तर खुद्द मातोश्री येऊन पोहोचल्या
मायलेक मिळून उत्तरार्ध खुलवतील..किमान यासर्वांचा याचिदेही याचीडोळा प्रत्यय तरी घेतील..
सगळ्यात भाग घेऊनही एक त्रयस्थ म्हणून आपण या गोष्टी अनुभवत असतो..
कधी कधी यालाच 'रुटीन' म्हणतो..तर कधी याच गोष्टी 'फॉर अ चेंज' म्हणून जगतो..
रोलर कोस्टर रोलर कोस्टर म्हणजे अजून काय वेगळ असतं..
बोगदा सुरु झाला कि समोरच्या शेवटाचा उजेड दिसतो..
बोगद्या बाहेर आलो कि पुढच्या बोगद्याच्या अंधार..
- हृषिकेश पांडकर
No comments:
Post a Comment