Thursday, April 13, 2017

Bharatpur Bird Sanctuary

 चालत फिरण्यासाठी कशी जागा असावी असं जर कोणी मला विचारलं तर हा फोटो हे माझे उत्तर असेल.प्रथमदर्शनी हि जागा पाहिल्यावर माझ्या डोक्यात आले ते म्हणजे 'गोंद्या आला रे आला' चे ते दृश्य.तशीच ती घोडागाडी,लपलेले दामोदर आणि बाळकृष्ण हे चापेकर बंधू,टांग्याबरोबर पळणारा त्यांचा साथीदार आणि राणीच्या राज्याभिषेकाच्या हीरक महोत्सवावरून परतणार 'रँड' अधिकारी आणि लेफ्टनंट आयर्स्ट.डोळ्यासमोर बंदुकीचे चाप ओढले जावेत.टांग्यातील गोरे गतप्राण व्हावेत.क्षणिक आर्त किंकाळी उमटावी आणि पुन्हा तीच शांतात. 

 


प्रत्यक्षात मात्र हा जो रस्ता दिसतोय ना अगदी तसाच रस्ता इथून पुढे ४-५ किलोमीटर आहे.पायघड्या घालाव्या त्याप्रमाणे पसरलेली झाडाची पान.त्यावरून चालताना उन्हाची तिरीपही डोक्यावर येऊ नये म्हणून दुतर्फा वाकून उभी राहिलेली बाभळीची झाडं.क्वचितच रस्त्यावरून जाणारी हि टांगासदृश्य सायकल.कानावर अविरत येणारी पक्षांची किलबिल.पावलोगणिक येणार वाळलेल्या पानांचा आवाज.

आग्रा-बिकानेर या वाहत्या महामार्गाला काटकोनात वळणारा भरतपूर अभयारण्यातील निर्मनुष्य रस्ता आहे.संधी आणि वेळ दोन्ही गोष्टी मिळाल्यास या पक्षांच्या दरबाराला नक्की भेट द्या.आपण करतो तो मॉर्निंग वॉक आणि इथला मॉर्निंग वॉक यात कमालीचा फरक जाणवतो 🙂

Bharatpur Bird Sanctuary | India

 

Monday, April 10, 2017

पाऊलखुणा

 परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले.


 

पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून परतला आता फक्त जुन्या आठवणी अंगाखांद्यावर मिरवत री-डेव्हलोपमेंटची' वाट बघत असलेले काही जुने वाडे राहिलेले दिवस ढकलत आहेत.

वाड्याच्या माडीला लावलेल्या लोखंडी गजांवर असलेली इंग्लंडच्या राणीची कोरीव प्रतिमा साहेबांच्या पुण्याची आठवण करून देत होती.एकसंध आणि मजबूत कठड्यावर असलेली राणीची प्रतिमा पाहून १५० वर्ष गोऱ्यांनी हुकूमत राखली आणि जाता जाता अनंत ठिकाणी आपली छाप सोडून गेले त्यातीलच हा एक भाग.

गोरे परतून आता ७० वर्ष होतील पण त्यांनी सोडलेल्या या पाऊलखुणा पाहताना वेगळीच मजा येते.असा कधी रिकामा वेळ मिळाला तर एकदा या पुणे ११ किव्वा पुणे ३० च्या जुन्या पुण्यातून पायी फिरा, IT हब किव्वा विद्येचे माहेरघर असणारे हे आताचे पुणे पूर्वीपासूनच गडगंज श्रीमंत होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही