Tuesday, February 7, 2017

कोरीव कलेचा करिष्मा - खजुराहो

        दोन आठवड्यापूर्वीच कोल्हापूर जवळच्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर नावाचे शिवमंदिर पाहण्याचा योग्य आला.कलात्मक कोरीव काम,पौराणिक कथा,असंख्य कोरलेली शिल्पे आणि खांबांवर उभारलेले प्राचीन शिवमंदिर.त्या अचंब्यातून बाहेर पडेपर्यंत पुढच्या स्थापत्य आविष्काराने साद घातली.

        उत्तर मध्यप्रदेशात स्थित सतना या शहरापासून सुमारे दोन अडीच तासावर पसरलेल्या पन्ना या व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली.जंगलसोबतच तिथून वीस किलोमीटर वर असलेल्या छत्रपूर जिल्ह्यातील 'खजुराहो' मंदिराला भेट दिली. भारतातील किंबहुना जगातील नावाजलेल्या शिल्पकलेतील आणि स्थापत्य कलेतील अविष्कारांपैकी एक अशा या वास्तूला भेट देता आली.

        पुस्तकातील वाचन,टीव्हीवरील प्रक्षेपण किव्वा गप्पांमधील माहिती या पेक्षा डोळ्यांनी दिलेली पावती हि सर्वात चोख असते.त्यामुळे याची देही याची डोळा या शिल्पकलेचा आनंद घेणे हे स्वर्गीय सुख होते.

          पन्ना मधील सकाळची सफारी पूर्ण करून जेवण उरकून आम्ही खजुराहोला निघालो.साधारण ४५ मिनिटे प्रवास करून या वास्तूच्या परिसरात पोहोचलो.दुपारचे सव्वा दोन झाले होते.

        तिकिटे,चेकिंग,गाईड,कॅमेरा या गोष्टींची पूर्तता करून खजुराहोच्या मंदीर समूहात पहिले पाऊल टाकले.नजर जाईल तिथपर्यंत असलेले प्रांगण आणि रेखीव,कोरीव आणि आकर्षून घेणारी,झाडांच्या गर्दीतून वर डोकावणारे मंदिरांचे कळस डोळे दिपवणारे होते.

        सुरुवातीला खजुराहो बद्दल थोडी माहिती सांगतो.साधारण इ.स.पु ९०० ते ११५० मध्ये चंदेला राज्यांच्या राजवटीत ८५ मंदिरे येथे उभारण्यात आली.कला,शृंगार,देव देवतांची श्रद्धा,शौर्य याची प्रचिती देणाऱ्या असंख्य शिल्पांनी मढलेली हि ८५ मंदिरे उभारण्यात आली होती.दुर्दैवाने त्यातील फक्त २० मंदिरे आज उभी आहेत.शत्रूंची आक्रमणे,निसर्गाचे नानाविध रंग आणि अंतर्गत कलह अशा कारणाने आपण उरलेल्या ६५ मंदिरांना मुकलो असे म्हणायला हरकत नाही.सन १८३८ मध्ये गोरा इंजिनियर TS Burt याने खजुराहो मधील मंदिरांचा नव्याने शोध लावला.

        आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही पहिल्या कोरीव नमुन्याकडे निघालो.मंदिर प्रतिकृती असलेली पहिली वास्तू म्हणजे 'देवी मंडप'.संपूर्ण कळसाची डागडुजी केल्यामुळे त्यावर सिमेंटचे अस्तित्व पहायला मिळते.मात्र मूळ  बांधकामाच्यावेळी कुठेही सिमेंट अथवा कशाचाही भेगांमध्ये लिंपण्याकरिता वापर केलेला नाही.दगडाचे परस्पर विरोधी साचे करून एकमेकात अडकण्याची सोय केली गेली.त्यामुळे दोन शिळा एकमेकांना जोडण्यासाठी कोणतेही तिसरे माध्यम वापरलेले नाही.याची पुनर्बांधणी गेल्या शंभर वर्षाच्या काळातच झालेली आहे.



        याच्या शेजारी नजरेस येतो तो 'वराह मंडप'.मंदिर समुदायाच्या दक्षिणेस असलेला हा वराह मंडप.साधारण इ.स.पु. ९०० ते ९२५ च्या दरम्यान याची बांधणी केली गेली चंदेला साम्राज्याचा राजा 'यशोवर्मन' याने वराहाचा पुतळा येथे लावला अशी माहिती समजते.प्रतिहारा राज्यांचा पराभव करून येथील वराहाची स्थापना केली गेली.



        वराह हा विष्णूचा तिसरा अवतार.या मंडपाची बांधणी हि एकाच दगडातून केली गेली आहे.यामध्ये दोन मीटर उंच आणि तीन मीटर लांब असा वराहाचा पुतळा मध्यभागी बसविण्यात आलेला आहे.

          विष्णूचे एकूण दहा अवतार होते.त्यातील बरेचसे अवतार आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे होते.त्यातीलच वराह हा तिसरा अवतार.आपल्या चार भक्कम पायांवर उभे राहून पृथ्वीचे संरक्षण करणारी वराहाची मुद्रा लक्षवेधक आहे.या वराहाच्या पाठीवर सुमारे ६७५ विविध आकारात प्रतिमा कोरलेल्या पहायला मिळतात.हिंदू देवी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.



        वराह मंडप हा भक्कम व्यासपीठावर बांधलेला असून मध्यभागी मंडप सदृश्य एखादा आहे.छताच्या बाजूला पिरॅमिडच्या आकारात निमुळता होत गेलेला पहायला मिळतो.चौदा खांबांवर उभा राहिलेला हा वराहमंडप पायऱ्या चढून आत जाऊन पाहता येतो.मंडपाचे पूर्ण बांधकाम सँडस्टोनचा वापर करून केलेले आहे.वराहाच्या नाकाच्या आणि तोंडाच्या मधल्या जागेत देवी सरस्वतीची प्रतिमा कोरलेली आढळते.तिच्या हातात वीणा आहे.सरस्वतीचे शिल्प मुखावर असण्याचे कारण म्हणजे सरस्वती हि वाणीचे प्रतीक समजली जाते.



        तिथूनच पाठीमागे पहिले असता डोळ्यासमोर येते ते म्हणजे लक्ष्मण मंदिर.खजुराहो मध्ये सर्वात जास्त योजनाबद्ध बांधलेले मंदिर म्हणून याची ओळख सांगितली जाते.आखीव रेखीव आणि सुबक नक्षीकामाने भरगच्च असलेले मंदिर पहिल्या नजरेतच खिळवून ठेवते.येथे सर्वात मोठ्या असलेल्या पहिल्या तीन मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो.चंदेला राज्यांनी बांधलेलं सर्वात जुने मंदिर अशी देखील याची ओळख आहे.वराह मंडपापासून मागे पाहिल्यावर जरी हे मंदिर दिसत असले तरी देवी मंदिराच्या बर्रोब्बर समोर याचे स्थान आहे.या मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला चंदेला साम्राज्याचे चिन्ह असलेला सिंह मूर्तिरूपात विराजमान आहे.



        हे मंदिर पहायला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या गाईडने आम्हाला या मंदिराचा आणि पर्यायाने खजुराहोच्या निर्मितीचा इतिहास सांगितला.तो ऐकत ऐकत आम्ही लक्ष्मण मंदिराच्या पायर्यांजवळ येऊन पोहोचलो.

          हेमवती हि वाराणसी मधील ब्राह्मण पुजाऱ्यांची मुलगी.अतिशय सुंदर आणि मोहक.नुकतीच तारुण्यात आल्याने सौन्दर्य अधिकच खुलत होते.एका पौर्णिमेच्या रात्री कमल तलावात अंघोळीस उतरली होती.पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशापुढे हेमवतीचे नितळ रूप अजूनच शोभून दिसत होते.मंद प्रकाशात खुलणारे हेमवतीचे रूप पाहून चंद्रदेव देखील अचंबित झाला.तिच्या मोहकतेने चंद्रदेवाला भुरळ घातली.तिला भेटण्याकरिता साक्षात चंद्रदेव भूतलावर अवतरले.त्यांचे प्रणय मिलन झाले.आणि यातून पुढे हेमवतीने गर्भ धारण केले.कुटुंब आणि इतर लोक यांच्या रोषापायी हेमवती घाबरून गेली आणि तिने थेट चंद्रदेवासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.यावर चंद्रदेव तिला म्हणाले कि 'तू काही काळजी करू नकोस,आपला होणारा मुलगा हा खजुराहोचा पहिला राजा असेल आणि तो इथे या खजुराच्या वनात मंदिरे बांधेल.जी मंदिरे प्रेम,उत्कट भावना,कला,सामर्थ्य यांचे दर्शन घडवतील.मात्र मुलाच्या भविष्यासाठी आणि तुझ्या सुरक्षिततेसाठी तू ताबडतोब वाराणसी सोड'.आणि चंद्रदेवाच्या सांगण्यानुसार हेमवतीने वाराणसी सोडले आणि ती इथे म्हणजेच खजुराहोला येऊन पोहोचली.इथे तिला पुत्रप्राप्ती झाली.मुलाचे नाव होते 'चंद्रवर्मन'.चंद्रवर्मन पित्याप्रमाणेच हुशार आणि शूर.वयाच्या सोळाव्या वर्षीच वाघ सिंहांना मोकळ्या हाती गारद करण्याचे कौशल्य आत्मसात असलेल्या चांद्रवर्मनने या खजूरच्या जंगलात सुमारे ८५ मंदिरांची उभारणी सुरु केली.तलाव,बगीचे,वाटिका यांनी सुशोभीकरण केले.अशा रीतीने खजुराहोचा जन्म झाला.या मंदिरावर दैनंदिन जीवनातील प्रसंग रेखाटलेले आहेत.जे लक्ष्मण मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना पहायला मिळतात.



        या कथेवर आम्ही मंदिराचे बाह्यावरण पाहण्यास सुरुवात केली.लक्ष्मण मंदिर हे सुमारे तीस मीटर लांब आणि तेवढेच म्हणजे तीस मीटर उंच आहे.बाहेरील भिंतींवर राजा आणि प्रजेच्या मुद्रा कोरलेल्या आहेत.दरबारातील दृश्ये,प्रजेचा न्यायनिवाडा करण्याचे प्रसंग,मिरवणुका अतिशय नाजूक आणि अचूक कोरलेल्या पाहावयास मिळतात.

        मंदिराभोवती प्रदक्षिणा मारत असताना मंदिराच्या उजव्या बाजूला निमुळता बोळ आहे.येथे असलेल्या भिंतीवर प्रणय दृश्ये रेखाटलेली आहेत.शाही दरबारातील प्रसंग,स्त्री पुरुष संबंधांचे प्रतीकात्मक रेखाटन,या बरोबरच मनुष्य आणि प्राण्यांच्या शारीरिक संबंध देखील येथे कोरलेले पाहावयास मिळतात.राजदरबारातील गायक,तसेच गायनाला साथ करणाऱ्या वादकांचा लवाजमा,दाढी असलेले सरदार,कारभारी,मुनीम,दिवाणजी,राजासमोर नाचणारी लहान मुले,शिकारीच्या दृश्यात बाण लागून घायाळ झालेले हरीण,आपल्या बाणाने हरणाचा वेध घेतला या आनंदात असलेले शिकारी,तसेच घोड्यावरून आपल्या सावजाचा पाठलाग करणारा शिकारी,युद्वक्रमणाला सज्ज असलेली सेना,घोडदळ,पायदळ,हत्तीची फौज या सारख्या अनंत दृश्यांचे कोरीव आणि नाजूक शिल्प चहूबाजूला पहायला मिळतात.शिल्पाचे बारकावे अवर्णनीय आहेत.प्रत्येकाच्या चेहेर्यावरील भाव वेगळे,नाकाची रचना डोळे,हनुवटी यांचे आकार अतिशय चोख कोरलेले आहेत.



        वाटेल तितके आणि वाटेल तसे मनमुराद फोटो घेऊन आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.आता आत जाण्याची वेळ होती.पायऱ्या चढून वरच्या चौथऱ्यावर आलो.या मोठ्या चौथऱ्यावर चार कोपऱ्यात चार छोटी मंदिरे बांधलेली आहेत आणि मध्यभागी मुख्य लक्ष्मण मंदिर उभारलेले आहे.मुख्य मंदिर एखाद्या मोठ्या पर्वतासारखे भासते.खजुराहो मधील बहुतेक सगळी मंदिरे हि उत्तर भारतीय 'नागर' या हिंदू स्थापत्य प्रकारात बांधलेली आहेत.

        मंदिर बांधण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली येथे पहावयास मिळते.गर्भगृह,आत जाण्यासाठी असलेला समतोल द्वारमंडप,शिखर अशी मंदिराची विविध अंग येथे पहावयास मिळतात.गर्भगृह म्हणजे मंदिरातील गाभारा आणि द्वारमंडप म्हणजे गाभाऱ्यात जाणारा मार्ग.

        थोडे आत गेल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो.यावर नमूद केलेले आहे कि लक्ष्मण मंदिराचे बांधकाम हे राजा 'यशोवर्मन'च्या  अधिपत्याखाली झालेले आहे.विष्णूने प्रतिहरा राज्यकर्त्यांकडून वैकुंठाची प्रतिमा हस्तगत केल्यानंतर ती इथे येऊन बसविण्यात आली.मंदिराचे नाव लक्ष्मण आणि यामध्ये वैकुंठाची प्रतिमा बसविण्यात आली आहे या गोष्टी गोंधळून टाकतात.राजा यशोवर्मनने एक तलाव देखील बांधलेला आहे.यांचे वर्णन 'समुद्रापेक्षा मोठे' असे केलेले आढळते.या तलावाचे नाव 'बिल्वर नावा' असे आहे.याच्या शेजारी अजून एक तलाव आहे यांचे नाव 'शिवसागर' असे आहे.अर्थात हे दोनही तलाव मंदिरापासून तसे दूर असावेत कारण मंदिर पाहत असताना तलाव दृष्टीक्षेपात येत नाहीत.

        मंदिराच्या उजव्या खांबाला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.मंदिर हे खजुराहोच्या दक्षिण पूर्व भागात उभारलेले आहे.गणेशाचे शिल्प जवळून बघितल्यास अतिशय जिवंत भासते.या मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे कि याला आठ हात असून यातील एका हाताचे नुकसान झालेले आहे.गणेश प्रतिमेच्या खाली हत्तीच्या शिल्पांची रांग कोरलेली आहे.आणि त्या रांगेखाली 'कीर्तिमुखांची' रांग पहावयास मिळते.मंदिराचे रक्षण करण्याकरिता इथे कीर्तिमुख कोरलेली आहेत.



        मंदिराच्या दक्षिण बाजूच्या भिंतीवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे.मंदिराची बाह्य भिंत विविध पट्ट्यांमध्ये विभागलेली आहे.तळाला ओळीने हत्ती कोरलेले आहेत.संपूर्ण हत्तींनी मंदिर पेललेले आहे असा त्याचा मतितार्थ त्यातून व्यक्त होतो.दोन हत्तीच्या मध्ये एक एक योद्धा पहावयास मिळतो.हे योद्धे देखील मंदिराच्या रक्षणार्थ कोरलेले आहेत.हत्तीच्या कोरीव ओळीच्या वरच्या बाजूला विविध फुले आणि पाने कोरलेली आहेत.या नैसर्गिक रांगोळीने हि संपूर्ण ओळ व्यापलेली आहे.मंदिराचा पाया हा प्रणयशिल्पांनी कोरलेला आहे.यात स्त्रियांची नटतानाची शिल्पं पहावयास मिळतात.यात मैथुन शिल्पं देखील आहेत.

        या नंतरच्या टप्प्यात भारतीय पुराणातील देवांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.हिंदू पुराणातील सात प्रमुख पुरुष देवतांच्या प्रतिमा लक्ष वेधून घेतात.प्रत्येक कलाकृती हि अतिशय कोरीव आणि नाजूक आहे.या सात देवतांच्या शिल्पानंतर उत्तर दिशेच्या शेवटाला दहा हातांच्या दुर्गादेवीचे विलोभनीय शिल्पं पहावयास मिळते.दहा हातांची दुर्गादेवी आणि प्रत्येक हातात विविध आयुधं कल्पकतेने साकारलेली आहेत.मंदिरात सुमारे २३० विविध प्रकारच्या मुद्रा कोरलेल्या आढळतात.कुठलीही वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा दोन किव्वा अधिक वेळेला कोरलेली नाही.यातूनच शिल्पकारांची वैविध्यपूर्ण कलाकारी दिसून येते.

        खजुराहो मादक,कामुक आणि प्रणय शिल्पांसाठी जरी जगभर प्रसिद्ध असले तरी या एकूण सर्व शिल्पश्रीमंती मध्ये फक्त दहा टक्के शिल्पं हि या प्रकारात मोडली जातात.या सर्व मैथुन शिल्पांपैकी सर्व शिल्पं साधारणतः लक्ष्मण मंदिर आणि कंदरीया महादेव मंदिरावर कोरलेली आहेत.

        कपडे काढणारी स्त्री,अंघोळी नंतर स्वतःचे आवरणारी तरुणी,आरशासमोर उभे राहून नटणारी स्त्री,किंबहुना आरसा हातात धरून त्यात एकटक पाहणारी स्त्री,प्रणयक्रिडेत लीन असलेले जोडपे,आपल्या उघड्या आणि कमनीय बांध्याला न्याहाळणारी ललना,आपल्याच पाठीला स्पर्श करून डोळे मिटलेली युवती,पवित्र रोपट्याला दोन्ही हातांनी पाणी घालणाऱ्या दोन पाठमोऱ्या स्त्रिया,टाचेवर उभे राहून चोरून पाहणारी स्त्री,तळपायात रुतलेला काटा काढण्यात मग्न झालेली तरुणी या सारखी शिल्पं बघताना शिल्पं घडवणाऱ्या शिल्पकारांच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो.



        मंदिराच्या दक्षिण खिडकीवर रेखाटलेली कामसूत्रातील युगुलांची प्रणयशिल्पे मातंगेश्वर मंदिरातूनही दिसू शकतात.शिल्पांची वेशभूषा देखील तितकीच मोहक आहे.उत्कृष्ठ रचना पहावयास मिळते.शिल्पांच्या अंगावरील दागिन्यांचे बारकावे मोहून टाकतात.स्त्रियांच्या कंबरेची घळ,वक्षस्थळे,रेखीव गळा आणि मान,कमनीय बांधा आणि या सर्वांवर शिताफीने कोरलेले दागिने शिल्पाला अतुलनीय बनवितात.





        जीवन साजरे करण्याचा आनंद शिल्पातून व्यक्त होताना दिसतो.जगणं कसं साजरं करावा यांचे सगळे पैलू येथे पहावयास मिळतात.प्रणयशिल्पे ही समृद्धी आणि आनंदाची प्रतीके आहेत.कुंडलिनी नावाची ऊर्जा आपल्या मणक्याच्या मुळाशी असते आणि ती ऊर्जा जागृत करण्याकरिता विविध पद्धती आहेत.



        इथून पुढे गेल्यावर आठ दिशांचे रक्षण करणारे अष्टधीकपाल आपल्याला पहायला मिळतात.आठ दिशांचा प्रत्येकी एक असा नेमून दिलेला अधिकारी आहे त्यांची शिल्पं येथे कोरलेली आहेत.उत्तरेचा कुबेर,दक्षिणेचा यम,पूर्वेचा इंद्र,पश्चिमेचा वरुण,अग्न्येयचा अग्नी,नैऋत्येचा निरती,वायव्येच्या वायू आणि ईशान्येचा ईशान अशा आठही दिशा रक्षकांची शिल्पे कोरलेली आहेत.



        मंदिराचे बाह्यावरण पूर्ण करून आम्ही आत निघालो.लक्ष्मण मंदिर हे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये गाभाऱ्याच्या दारावर विष्णूची प्रतिकृती कोरलेली आहे.या शिल्पाच्या डाव्या बाजूला मत्स्य,वराह आणि वामन हे तीन अवतार रेखाटले आहेत.तर उजव्या बाजूला कूर्म,नरसिंह आणि परशुराम हे तीन अवतार कोरलेले पहायला मिळतात.



        गाभार्याच्या दाराला सात शाखा आहेत.छताला सुरेख कोरीव काम केलेले पहायला मिळते.यावर नैसर्गिक सौंदर्यापासून ते विष्णूच्या सर्व अवतारांपर्यंत प्रत्येक गोष्टी बघायला मिळतात.काही ठिकाणी नाजूक फुलांचे नक्षीकाम केलेले आहे.यावरच मध्यभागी लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे.तर त्याच शिल्पाच्या डाव्या बाजूस ब्रह्मदेव कोरलेले आहेत आणि उजव्या बाजूस शिव कोरलेले पहायला मिळतात.गाभार्याच्या भिंती दोन रांगांच्या भित्तिचित्रांनी कोरलेल्या आहेत.यावर मुख्यत्वे कृष्णाच्या बाललीला कोरलेल्या आहेत.कालियामर्दन,माखन चोरी करणारा बाळकृष्ण अतिशय रेखीव पद्धतीने कोरलेला आहे.याच ठिकाणी यशोवर्मन राजाने प्रतिहरा राजांकडून मिळविलेल्या वैकुंठाचे शिल्प लावलेले आहे.

        गाभार्याच्या आतमध्ये तीन मुखी विष्णूची प्रतिमा आहे.मूर्तीला चार हात आहेत.प्रत्येक हातात स्वतंत्र अस्त्र आहे.तीन मुखामधील मधले मुख हे माणसाचे आहे,तर एका बाजूला वराह आणि दुसऱ्या बाजूला सिहांचे मुख आहे.या मंदिराची अजून एक खासियत म्हणजे सर्व प्रणयशिल्पे ही मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेली आहेत.मंदिराच्या आतील बाजूस ही शिल्पे पहायला मिळत नाहीत.



        गाभाऱ्यातील शिल्पकला पाहून आम्ही बाहेर निघालो.आता संपूर्ण मंदिर पाहून पूर्ण झाले होते.पुढेच मंदिर पहायला सुरुवात करण्यापूवी पाणी पिण्यासाठी थांबलो.आणि आत्तापर्यंत पाहिलेल्या खजुराहोच्या स्थापत्यकलेविषयी कुतुहलात्मक उजळणी केली.

        खजुराहोचे स्थापत्य हे मुख्यत्वे उत्तर भारतीय 'नागर' स्थापत्यकलेवर आधारित आहे.शिखराला चारही बाजूंनी दुय्यम खांबांनी सुशोभित केलेले आहे. ज्याला 'उरूश्रींग' असे म्हणतात.मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक द्वारमंडप असतो ज्याला 'अर्धमंडप' असे संबोधले जाते.मंदिराबाहेरील विश्व् आणि आतील भाग यांना जोडणारा तो भाग असे समजले जाते (संक्रमण कक्ष).त्यानंतर येतो तो मंडप.अर्धमंडप आणि महामंडप यांच्यामधल्या भागाला मंडप असे म्हणतात.ही बांधकाम शैली शक्यतो छोट्या मंदिरांमध्ये पहायला मिळत नाही.महामंडपाच्या नंतर 'अंतराळ' येतो.मंदिराचा गाभारा आणि मुख्यमंडपाला जोडणारा भाग म्हणजेच अंतराळ.गाभाऱ्यात मंदिराच्या मुख्य देवतेची प्रतिमा स्थित असते.गाभारा आणि गर्भगृह साधारण समान असते.गर्भगृह बर्रोब्बर शिखराच्या खाली असते.मंदिराच्या सर्वात खाली असलेल्या व्यासपीठाला अधिस्थान असे म्हणतात.याच अधिस्थानावर संपूर्ण मंदिर उभारलेले असते.





        यानंतर पुढच्या मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो.लक्ष्मण मंदिराच्या मागील बाजूस हे मंदिर डोळ्यासमोर येते.

          खजुराहो म्हणल्यावर जे मंदिर सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे हे मंदिर 'कंदरिया महादेव मंदिर'.याच्या दरवाज्यावर फुलांचे मोठे तोरण कोरलेले आहे.स्वागत करण्यासाठी सज्ज असलेले प्रवेशद्वार वाटावे अशी ती रचना.संपूर्ण फुलांचे तोरण हे एकाच दगडात कोरलेले आहे.गुप्त नृत्यकक्षात प्रवेश करणारे द्वार अशी या दाराची ओळख सांगितली जाते.आधी वर्णिलेल्या जवळ जवळ सगळ्या नागर स्थापत्य कलेतील सर्व गोष्टी येथे पहायला मिळतात.



        मंदिराचा संपूर्ण भाग हा कोरीव कामाने मढलेला आहे.त्रिशूल आणि नाग धरलेल्या महादेवाची कोरीव प्रतिमा अफलातून आहे.शंकराच्या डाव्या बाजूला विष्णू तर उजव्या बाजूला ब्रह्मदेवाची प्रतिमा साकारलेली आहे.ब्रह्मा विष्णू आणि महेश येथे सर्वप्रथम एकत्र पहावयास मिळतात.या तिघांच्याही प्रतिमा बैठकावस्थेत आहेत याचा अर्थ असा कि ते तिघेही ध्यानस्थ बसलेले आहेत.इथेच पुढे एका स्त्रीची प्रतिमा कोरलेली आहे.हे शिल्प बाजूने पाहिल्यास स्त्रीचे मुख क्रोधीत असल्यासारखे वाटते मात्र समोरून पहिले असता त्यावरील भाव बदलेले पहावयास मिळतात.हीच येथील शिल्पातील वैशिष्ट्ये आहेत.
        थोडे पुढे गेल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा बघायला मिळते ती म्हणजे चार फुटी सदाशिवची.महामंडपात असलेल्या या सदाशिवच्या प्रतिमेला चतुष्पाद असे संबोधले जाते.सदाशिव हा शिवाचाच एक अवतार म्हणून ओळखतात.शैव व्यवस्थेचे चार भाग म्हणजे यांचे चार भाग असे मानले जाते.अमरिकतूल,नटराज आणि त्रिपुरकंटक यांच्या प्रतिमा देखील कोरलेल्या पहायला मिळतात.

        इथूनच पुढे शिवाची प्रतिमा कोरलेली आहे.यामध्ये प्रतिमेस चार हात असून एका हातात धनुष्य,एकात बाण,एका हातात कुऱ्हाड तर शेवटच्या चौथ्या हातात हरीण धरलेले दिसते.अंधारमय,शांत आणि थंड अशा गाभाऱ्यात शिवाची प्रतिमा कोरलेली आहे.इथे पुजारी नाही.त्याचे कारण मी पुढे येणाऱ्या मातंगेश्वर मंदिराच्या माहितीमध्ये नमूद केलेले आहे.

        कंदरिया महादेव मंदिर हे खजुराहो मधील सर्वात मोठे आणि भव्य मंदिर आहे.चंदेला राजघराण्यातील 'विद्याधर' राजाने या मंदिराची उभारणी केली.मंदिराची उंची साधारण ३१ मीटर इतकी आहे.तर मंदिराचे नुसते व्यासपीठच मीटर उंचीचे आहे.मंदिराची रचना हि मेरू पर्वतासारखी केलेली आहे.



        मंदिराच्या आतील बाजूस तीन मंडप किव्वा तीन दालने आहेत.जी क्रमवार वाढत गेलेली आहेत.ज्यामध्ये सर्वात लहान दालन हे शिवाचे आहे.त्यानंतरचे दालन हे पार्वतीचे आहे.मध्यभागी आहे ते गर्भगृह (शब्दशः अर्थ गर्भाशय) जिथे शिवलिंग पहावयास मिळते.येथील मधला भाग हा अंतर्गत जोडलेला आहे;ज्याला समोर आणि बाजूला सज्जे बांधलेले आहेत.सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मधल्या भागात अंधार झालेला आहे आणि त्यामुळे याला गुहेचे स्वरूप आलेले आहे.हे स्वरूप मंदिराच्या बाह्यांगाशी संपूर्णपणे विरोधाभास करते.



        मंदिराचा गाभारा बघून बाहेर आल्यावर कंदरिया महादेव मंदिर शेजारीच छोटे महादेवाचे मंदिर आहे.यामध्ये शार्दुलाची प्रतिमा पाहायला मिळते.येथे योद्धा आणि सिंहाचे शिल्प कोरलेले आहे.शेजारी शार्दूल आणि व्याल किव्वा याला यांचे भित्तीचित्र रेखाटले आहे.या शिल्पाचा देह सिंहाचा असून मुख हे वाघ किव्वा हत्तीचे आहे.अशी कलाकृती ताकदीचे प्रतीक समजली जाते.अशी शिल्पे आपल्या उच्च आणि आकांशा दर्शवतात.इथे दोन माणसे या प्रतिमेशी युद्ध करताना दिसतात.हे शिल्प खजुराहो मध्ये अनेक ठिकाणी सापडते.या प्राण्याशी लढणारा एक माणूस त्याच्या पायाशी आहे आणि एक मुखाजवळ.मुखाजवळील माणूस गिळंकृत होतो.याचाच अर्थ असा कि स्वप्न,इच्छा,आकांशा या गोष्टींचे आपण गुलाम आहोत आणि यावर जो मत करण्याचा प्रयत्न करतो त्याचा अंत अटळ आहे.अशा प्रकारचा विचार यातून व्यक्त केला गेला आहे.


        याच्या शेजारी असलेले मंदिर म्हणजे जगदंबा देवीचे मंदिर.सुमारे ..पु.१००० ते १०२५ या कालखंडात हे मंदिर बांधलेले आहे.जे विष्णूला समर्पित केले गेलेले आहे.यामध्ये जगदंबी देवीची प्रतिमा कोरलेली आहे.सणासुदीला गावातील लोक या देवीची पूजा करतात.या मध्ये देखील मुखमंडप - महामंडप - गर्भगृह अशी नागर स्थापत्य रचना अवलंबली आहे.याची रचना तंतोतंत खजुराहो मधीलच चित्रगुप्त मंदिराप्रमाणे आहे.इथे असलेले हे एकमेव मंदिर आहे ज्याला प्रदक्षिणा मार्ग नाही.त्यामुळे हे मंदिर 'नीरध्र' पद्धतीचे आहे असे समजले जाते.याच मंदिरात वराह मंदिरात वर्णिलेली कथा भित्तचित्ररूपात कोरलेली आहे.



        इथे स्त्रियांची लक्षणीय शिल्प कोरलेली आहेत.तसेच विशेष गोष्ट म्हणजे ब्रह्मा,विष्णू आणि महेशाची आपल्या पत्नीसमवेत असलेली शिल्पे येथे पाहावयास मिळतात.



        याच्या पुढे गेल्यावर चित्रगुप्त मंदिर नजरेस येते.मात्र वेळेअभावी आम्ही हे मंदिर संपूर्ण पाहू शकलो नाही.तरी मिळालेल्या माहितीनुसार चित्रगुप्त मंदिर हे खजुराहो मधील एकमेव सूर्यमंदिर आहे.याची बांधणी देखील साधारण जगदंबा मंदिराच्या बरोबरीनेच पूर्ण झाली.या मंदिराला प्रदक्षिणा घेत असताना लक्षात येते कि मंदिराच्या बाह्यावरणावर दोन पट्ट्यात शिल्पकला केलेली आहे.सर्वात वरच्या भागात प्रणयशिल्पे कोरलेली आहेत.मंदिराच्या सज्जावर (बाल्कनी) विविध अशा सत्तर प्रतिमा कोरलेल्या आहेत.



        दक्षिणेकडील पहिल्या पातळीवर सर्वात प्रसिद्ध अशी अकारामुखी विष्णूची मूर्ती नजरेस येते.वर वर्णिल्याप्रमाणे याचे स्थापत्य जगदंबा मंदिराप्रमाणेच आहे.मंदिराचे अष्टकोनी छत हे मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे.इथे दोन मीटर उंच सूर्यदेवाची प्रतिमा आहे.तसेच इथे सप्ताश्वरथ (सात घोड्यांचा रथ) पाहायला मिळतो.

        चित्रगुप्त मंदिराची माहिती घेऊन आम्ही सर्व मंदिरांच्या मध्यभागी असलेल्या हिरवळीवर आलो.सूर्य एव्हाना कंदरिया महादेव मंदिराच्या पाठीमागून अस्ताला निघाला होता.या जागेवरून सर्व मंदिरे नजरेस येत होती.मंदिर समूहातून परतण्याची वेळ झाली होती.एक चहा घेतला आणि या समूहाच्या बाहेर आलो.बाहेरच्या बाजूस म्हणजे लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेस असलेले मातंगेश्वराचे शिवमंदिर बघायचे बाकी होते.



        आम्ही हे मंदिर सर्वात शेवटी पहिले याचे कारण म्हणजे खजुराहोच्या सर्व मंदिरांमध्ये हे एकमेव मंदिर असे आहे कि जेथे आजही पूजा व्यवस्थित होते.जिवंत मंदिर म्हणून याची ओळख आहे.त्यामुळे गावातील सर्वांना दर्शनासाठी सदैव उघडे असणारे मंदिर म्हणून हे खजुराहोच्या इतर मंदिरापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लक्ष्मण मंदिर आणि मातंगेश्वर मंदिर यामध्ये मोठी भिंत घातलेली आहे.



        या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या गाभाऱ्यात अडीच मीटर उंचीचे शिवलिंग आहे.मंदिराला यथायोग्य पुजारी असून इथे यथासांग पूजाअर्चा केली जाते.हिंदू पुराणाप्रमाणे असा समज आहे कि ज्या मंदिरातील प्रमुख देवतेची मूर्ती जर अखंड स्वरूपात शिल्लक नसेल तर त्या मंदिरात पूजा केली जात नाही.आणि म्हणूनच संपूर्ण खजुराहो मध्ये मातंगेश्वराच्या मंदिराखेरीज प्रार्थनीय मंदिर आम्ही पाहिले नाही.

        मातंगेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही रस्त्यावर आलो.एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता.संधिप्रकाश आणि काळोख यांचे मिश्रण कंदरिया महादेवाच्या शिखरावर तरळत होते.आम्ही चालत गाड्यांपाशी आलो.अविश्वसनीय कलाकृती,नाजूक बारकावे असलेली अनंत शिल्पे,पुराण,रूढी,परंपरा,सण,उत्सव,देव,देवता अश्या अनेक बिंदूंनी जोडलेल्या शिल्पांनी मंत्रमुग्ध करून सोडले होते.



        खजुराहोची जगभरातील ओळख जरी मैथुन आणि प्रणय शिल्पे एवढीच असली तरी इथे प्रत्यक्ष पाहिल्यावर समजते कि या प्रकारची फक्त १० ते १५ टक्के शिल्प हि 'कामसूत्र' या शब्दवर आधारलेली आहेत.थोडक्यात काय तर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण करून स्वच्छ मानाने आत जावे.आणि याच हेतूने प्रणय शिल्पे अन इतर शिल्पे मंदिराबाहेरील भिंतींवर कोरलेली आहेत.





        सूर्य अस्तास गेला होता.आम्ही खजुराहोचे प्रांगण सोडले.स्थापत्य कलेमध्ये जगातील नावाजलेल्या नमुन्यांपैकी एक अशा कलाकृती आज पहायची संधी मिळाली.पुन्हा एकदा आपल्या भारतातील सांस्कृतिक श्रीमंतीचा पाहुणचार घेतला होता.अशा अजून अनेक गोष्टी पाहायच्या आणि अनुभवायच्या शिल्लक आहेतच.काही गोष्टींचे नुसते वर्णन वाचून अंदाज येईलच असे नसते.त्यामुळे संधी मिळाल्यास या स्वप्नवत दुनियेला नक्की भेट द्या.कारण लोक काय सांगतात यापेक्षा आपण काय पाहतो यावर बराचश्या गोष्टी अवलंबून असतात.

        तूर्तास खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याला रोखण्यासाठी काच वर सरकवली आणि गाडीने छत्रपूर सोडले...




    हृषिकेश पांडकर  
 ०७.०२.२०१७

8 comments:

  1. Sunder! Varah Shilp, ashtbhuja Ganapati Murti, Laxman Mandir, Suryast Foto vishesh lakshvedhi, perfect highlights!!! Keep this work going! :)

    ReplyDelete
  2. Thank you so much Sachin dada for kind words.
    Keep reading :)

    ReplyDelete
  3. समृद्ध लेखणीच्या करिष्म्याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा !
    जोडीला असणाऱ्या सुंदर छायाचित्रांनी लेखात उठावदार रंग भरलेत.
    Guide ने सांगितलेली एकूणएक गोष्ट विस्तृतपणे आणि तंत्रशुद्धरीत्या शब्दबद्ध केली आहेस त्यामुळे तिथे कधीही न गेलेल्या व्यक्तीला देखील हा सगळा अमूल्य ठेवा अनुभवल्याचा भास होईल.
    पन्ना आणि खजुराहो सफर खरोखर न विसरता येण्याजोगा अनुभव होता.
    Keep Writing !!

    ReplyDelete
  4. Dhanyavaad Yogesh !
    Writing about Khajuraho itself an amazing experience.Hope this information will be useful for future visitors too.
    Keep reading mitra :)

    ReplyDelete