दिवाळीचा कौटुंबिक सोहळा उरकल्यानंतर हा वेगळाच फराळ चाखण्याची संधी मिळाली.गोव्यात
काय पहावे,काय करावे,काय खावे आणि काय प्यावे हे सांगण्यास मी अजिबात पात्र नाहीये.पण
त्याव्यतिरिक्तही गोव्यात 'निसर्ग' नावाची एक अशी संपत्ती दडलेली आहे जी कदाचित खाण्यापिण्याच्या
नशेत अनुभवायची राहून गेली असं वाटायची वेळ येऊ देऊ नका इतकंच सांगण्यासाठी हे लिहिण्याचा
केलेला खटाटोप.
मडगाव आणि पणजीपासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या निबिड अरण्यात वसलेले हे तांबडी-सुरला
गाव.भगवान महावीर आणि बोन्डला अभयारण्याच्या छायेत वसलेले.आणि याच जंगलात राहण्याची
संधी मिळाली.यथायोग्य पाऊस झाल्यामुळे आणि थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाल्याने पक्ष्यांची
रेलचेल होती.स्थलांतरित होणारे पक्षी काही प्रमाणात निघाले होते आणि स्थलांतर होऊन
येणारे पक्षी यायला सुरुवात झाली होती.त्यामुळे स्थित आणि स्थलांतरित असे दोन्ही पक्षी
पाहण्याचा योग आला.
भगवान महावीर अभयारण्य |
जंगलातून पायी फिरण्याचा अनुभव वेगळाच होता.सूर्यास्तापर्यंत कधीही न थांबणारा
पक्षांचा आवाज.आणि समजा क्षणभर विश्रांती घेतलीच तरी वाळलेल्या पानावर पाय पडून भंग
होणारी शांतता या गोष्टी अनुभवायला विलक्षण वाटतात.असंख्य माहित नसलेले पक्षी,माहित असलेल्या पक्षांचे विविध प्रकार हे प्रत्यक्ष पाहणे यासारखा
आनंद नाही.बऱ्याच वेळा तर केवळ आवाजावरून पक्षी असल्याची चाहूल लागते,साधारण पक्षांचे वास्तव्य तसे उंचीवरच असते आणि झाडांच्या जाळीमुळे
पक्षी पटकन नजरेस येणे कर्मकठीण.फक्त इथेच पहायला मिळू शकणाऱ्या पक्षांच्या नावापुढे
मलबार हा शब्द जोडला गेलेला आहे.विविध रंग,शारीरिक बदलानुसार पिसे आणि रंगांमध्ये होणार बदल,लिंगातील फरकामुळे येणारे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण हे पाहणे आनंददायी
आहे.(प्रत्यक्ष दिसणारा पक्षी आणि इंटरनेट किव्वा पुस्तकात पाहिलेला पक्षी यात कमालीची
तफावत असते हे मला डोळ्यासमोर बसलेल्या पक्षाला पहिले कि हमखास जाणवते.)
सकाळची थंडी झटकायला उन्हाचा आडोसा शोधणे कठीण होते जेव्हा एकमेकात गुंतून तयार
झालेले झाडांचे छत उन्हाची एकही तिरीप जमिनीवर येऊ देत नाही.गोव्यासारख्या ठिकाणी या
गोष्टी कमालीच्या मजेदार वाटतात.पुस्तकात दिसणारे पक्षी रिसॉर्टच्या आवारात पहायला
मिळाले.
कोकणाप्रमाणेच अरुंद आणि नागमोडी रस्ते.दुतर्फा असलेल्या घनदाट करण्याची पहिली
ओळ जेमतेम दिसेल इतके दाटीवाटीने वाढलेले जंगल.पानांमधून आलेला सूर्यकिरण कोळ्याच्या
जाळ्यावर पडून चमकणारा तो जाळ्याचा भाग.मधूनच
येणारी सुतारपक्षाची ठोकाठोकी या गोष्टी विलक्षण आणि गूढ वाटतात.इतर जंगलांप्रमाणे
जिप्सीने फिरायचे नसल्याने चालत फिरणे बऱ्याचवेळा अपरिहार्य आहे त्यामुळे जंगल निरीक्षणाचा
वेगळाच भाग अनुभवायला मिळतो.वस्ती कमी असल्यामुळे रस्त्यावरची वर्दळ तशी तुरळकच.एखाद्या
ठिकाणी रस्त्यात आपली गाडी लावावी आणि शेजारी असलेल्या पायवाटेने जंगलात जावे इतके
साधे सोपे समीकरण.चालत जंगलात शिरताना असंख्य प्रजातीचे जीव जंतू नजरेस येतात.मान वर
काढलेला सरडा,विविध प्रकारच्या मुंग्या,अगणित रंगांची आणि आकारांची फुलपाखरे,सरलेल्या पावसाच्या आठवणी जपणारे गांडूळसदृश्य अळ्या,काही ठिकाणी शेणावर ताव मारणारे बारीक किडे,नशिबाची साथ असेल तर फांदीवर लटकलेला एखादा साप आणि तत्सम.
Racquet Tailed Drongo |
इथल्या जंगलांचा साचाच काहिसा भिन्न आहे.साधारणतः इथे गर्द झाडी आहे,माळरान आहे,दलदलीचा भाग आहे,खाडीचा भाग असल्याने झुवारी नदी जवळ खारफुटीचे जंगल आहे.आपल्याला
काय बघायचे ते आपण ठरवायचे.कान्हा,बांधवगड,ताडोबा,पेंच या मध्यभारतातील जंगलातील अनुभव आणि कॉर्बेट मधील उत्तर
भारतीय जंगलाचा अनुभव यातील काहिसा मिश्रा अनुभव इथे येतो.अगदी टिक किव्वा सालाची झाडे
नजरेस येत नाहीत पण विविध प्रकारच्या साम्यतेमुळे
बरेचदा या जंगलांची आठवण होते.अर्थात तरीदेखील या सर्व जंगलांनी आपापले वेगळेपण अबाधित
ठेवले आहे.दक्षिण भारतातातील काबिनी,बांदीपूर,नागरहोळे किव्वा अगदी दंडेली,आणशी यासारखी जंगले देखील याच पठडीतली असून ती सुद्धा प्रमाणात
मलबार भागातच येतात.
जंगलाची घडण वेगळी असल्याने साहजिकच जंगलात
वाढणाऱ्या प्राण्यापक्षांमध्येही भिन्नता आढळते.सस्तन प्राणी तितकेसे नजरेस येत नाहीत.पण
पक्षी,सरपटणारे प्राणी आणि कीटकांनी जंगल श्रीमंत बनवले आहे.
झुआरी नदीतील फेरीचा अनुभव खूप वेगळा होता.गंगेतून बोटीने फिरणे,नर्मदेतून बोटीने फिरणे आणि हुगळी नदीतून बोटीने फिरणे या अनुभवापेक्षा
खूप वेगळा निसर्ग पहायला मिळतो.गंगेचे घाट,नर्मदेचे खडक आणि हुगळीचा हावडा पूल या गोष्टींसमोर झुआरी नदीतून
दिसणारे खारफुटीचे जंगल खूप वेगळे होते.विस्तीर्ण पात्र समुद्राकडे अरुंद होत गेले
असून दुतर्फा खारफुटीचे जंगल आढळून येते.दलदल सदृश्य प्रदेश असल्याने काठावर बसलेले
बगळे,करकोचे आणि भरपूर शिकारी पक्षी लक्ष वेधून घेतात.भरती ओहोटीच्या
समीकरणावर आणि चंद्राच्या मार्गक्रमणावर पक्षांच्या हालचाली बदलतात हि नवीन माहिती
मिळाली.झुआरीच्या चार तासाच्या त्या भेटीत सहा वेग वेगळे किंगफिशरचे प्रकार पहायला
मिळाले.दलदलीच्या त्या काट्याकुट्यात पंजा एवढा तो पक्षी चोरासारखा लपतो आणि पनीर मध्ये
काटा चमचा घुसवावा तास तो नदीतून शिकार करतो हे दृश्य पाहण्यासारखे असते.
झुआरी नदीतील फेरी |
साधारण तीन-चार दिवसाची सुट्टी असेल आणि हा वेगळा निसर्ग बघायची इच्छा असेल तर
नक्की विचार करा.कारण गोवा म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येते त्यापेक्षा अगदी वेगळा हा
सगळा प्रकार आहे.खेटून समुद्र असूनही इतका थंडावा अनुभवण्याची कदाचित हि माझी पहिलीच
वेळ. राहण्याची जागा देखील भर जंगलात असल्याने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना उगीचच
शहरी जीवनाचा देखावा बघावा लागण्याची शक्यताच नव्हती.
बोन्डला अभयारण्यात प्राणी संग्रहालय आहे.पण जंगलात असलेले मोकळे प्राणी पक्षी
पहात असताना पिंजऱ्यातले वन्यजीव पाहणे कष्टप्रद वाटू शकते.मात्र या बोन्डला अभयारण्यात
पोहोचत असतानाच वाटेत असंख्य पक्षी नजरेस पडत असतात त्यानंतर तिथे जाऊन संग्रहालय बघायची
इच्छा देखील झाली नाही.पर्णहीन फांदीवर बसलेले मलबार ट्रोगॉन किव्वा थव्याने उडणारे
हॉर्नबिल बघणे स्वर्गीय आनंद देतात.एकाच झाडावर बसलेले ड्रॉन्गो पक्षाचे तीन प्रकार,विविध प्रकारचे फ्लायकॅचर्स आणि नकळत दिसणारे पक्षी खऱ्या अर्थाने
जंगलात असल्याची साक्ष देतात.
या खेरीज तामडीसुरला मध्ये असलेले प्राचीन शिव मंदिर नक्कीच पाहण्याजोगे आहे.उन्ह
उतरल्यावर पक्षी कॅमेऱ्यात बसणार नाहीत असा निर्णय घेऊन आम्ही हे मंदिर पाहण्यास गेलो.अतिशय
रम्य परिसरात हे मंदिर वसलेले आहे.आस्तिक नास्तिक किव्वा इतर कुठलाही भेदभाव ( समजा
असेल तर ) बाजूला ठेऊन एक कलाकृती आणि ऐतिहासिक साक्ष म्हणून या वस्तूला नक्की भेट
द्या.
शिव मंदिर |
सूर्यास्तानंतरच्या जंगलाचा पायी अनुभव घेण्याची हि माझी पहिलीच वेळ.किर्रर्र अंधारात
हे घनदाट अरण्य तुडवण्यासारखी मजा नाही.घुबड आणि नाईटजार यांसारखे निशाचर शोधण्यासाठी
केलेला अट्टाहास मजेदार होता.चांदण्या रात्रीच्या वेळी दिसणारे जंगल कदाचित टळटळीत
सूर्यप्रकाशातील जंगलापेक्षा आल्हाददायक भासते.बॅटरीच्या प्रकाशात समोर काय चमकेल याचा
नेम नसताना केलेली पायपीट अविस्मरणीय होती.या रात्री फार गोष्टी पहायला मिळाल्या नसल्या
तरी सरतेशेवटी ४-५ प्रकारची घुबडे आणि नाईटजारचे दोन प्रकार पदरी पाडूनच आम्ही जंगल
सोडले.फक्त वन्यजीवनच नाही तर आकाश दर्शन करण्यासाठी देखील हि जागा तितकीच योग्य आहे.निरभ्र
आकाश आणि मानवनिर्मित एकही दिव्याचा झोत न येणारे अथांग क्षितिज संपूर्ण तारकांचे दुकान
समोर मांडून ठेवते.सप्तर्षी आणि काही ठराविक ग्रह तारे सोडले तर मी या बाबतीत 'ढ'च.पण ज्यांना याची माहिती आहे किव्वा माहिती करून घ्यायची आहे
अशा लोकांसाठी नंदनवनच.
सस्तन प्राण्यांचे आकर्षण असल्यामुळे मध्य,उत्तर आणि दक्षिण भारतातील जंगले पाहण्याचे प्रमाण थोडे जास्त
आहे.पण इतके वैविध्यपूर्ण जंगल बघायचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा जंगलांना पर्याय नाही.कदाचित
सुंदरबनचे जंगल खारफुटीच्या बाबतीत यापेक्षाही प्रगल्भ असेल पण त्या खेरीज असलेली संपत्ती
तिथे नाही.थोडक्यात काय तर आपल्याच चारही दिशांना भौगोलिक परिस्थिती आणि पर्जन्यमानानुसार
तयार झालेले वनवैभव आणि पर्यायाने वन्यवैभव किमान एकदा तरी अनुभविण्यास काहीच हरकत
नाहीये एवढे निश्चित.
Yellow-browd Bulbul |
ऐन थंडीचा मोसम चालू आहे.क्रिसमस,नववर्षच्या सुट्ट्यांच्या चर्चा सुरु होतीलच,अशाच एखाद दोन सुट्ट्यांचा आधार घेऊन एकदा 'हे' गोवा देखील पाहून घ्या.कारण 'गोवा' असं गूगलवर टाकल्यावर
जे फोटोस समोर येतात त्या व्यतिरिक्तही अजून खूप गोष्टी या गोव्यात दडलेल्या आहेत...चला तर मग समुद्र,दारू,मासे या पलीकडले गोवा पाहुयात
:)
हृषिकेश पांडकर
१७/११/२०१६