गोष्टी प्रथमदर्शनी जितक्या समजतात त्यापेक्षा जास्त त्या पुढल्या वेळी पाहताना
कळतात.जितक्या जास्त वेळा पाहू तितक्या वेळा काहीतरी नवीन पाहिल्याचा बोध मला होतो.
ही गोष्ट एका पंचवीस मिनिटांच्या बाळबोध टीव्ही मालिकेची आहे.
शाळेत असताना साधारण सहा वाजता टीव्हीवर लागणार ‘Mr.Bean’
नावाचा तो अर्ध्या तासाचा कार्यक्रम मी न चुकता बघायचो.कथानक,संगीत,नेपथ्य,भव्यता किव्वा तत्सम यापैकी एकही गोष्ट त्यामध्ये नाहीये.पण
तेव्हा पाहताना मजा वाटायची.
नंतर कॉलेज,क्लासेस,नोकऱ्या या मध्ये पुन्हा पाहण्याचा योग आला नाही.मागच्या आठवड्यात पुन्हा सगळे
भाग पाहिले.खूप नाहीयेत पंचवीस मिनिटांचे पंधराच भाग आहेत.पण ते पाहताना आजही कमालीचा
आनंद मला मिळाला.नवीन गोष्टी शिकलो.
आहे तशी किरकोळच गोष्ट.एका करामती माणसाने दैनंदिन जीवनात घातलेले
घोळ आणि ते निस्तरताना होणारी मजा इतकाच काय तो कथेचा गाभा.पण आधी सांगितल्या प्रमाणे
प्रत्येक वेळी पाहिल्यावर नव्याने गोष्टी कळत गेल्या.
प्रस्तावना तशी ऐसपैस झाली.मूळ मुद्द्यावर येतो.तर Mr.bean
पहात असताना एक गोष्ट लक्षात राहिली ती म्हणजे विनोद निर्मिती
करण्यासाठी प्रत्येक वेळी भाषेचा वापर किव्वा अंगविक्षेप केलाच पाहिजे असे अजिबात नाहीये.कमालीचा
हजरजबाबीपणा आणि पुस्तकी शिक्षणामधून कधीच न मिळणारी हुशारी bean
ला कायम दिशा दाखवते.
थोडं Bean बद्दल सांगतो.हा माणूस अतिशय टिपिकल ब्रिटिश व्यक्ती आहे.वयाने ३५-४० चा असावा.लग्न झालेले नाहीये.घरात एकटा राहणारा.अतिशय
आचरट,हट्टी,कंजूस,भयंकर अस्ताव्यस्त,मुलखाचा आळशी,प्रचंड स्वार्थी आणि चिंधीचोर असा हा Bean.अर्थात या झाल्या त्याच्या स्वभावाची नकारार्थी बाजू.पण या उलट
हा माणूस प्रचंड हुशार,हातातले काम पूर्ण करणारा (कुठल्याही मार्गाने),कुठल्याही बिकट परिस्थितीवर मात करणारा असा आहे.एकटाच रहात असल्याने
दैनंदिन जीवनात येणाऱ्या सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देणारा आणि त्यात येणाऱ्या
अडचणींना खुबीने हाताळणारा Bean पाहणे कायमच हलकेफुलके वाटते.पण याच दैनंदिन गोष्टी नक्की कश्या
केल्या जातात हे बहुदा त्याला माहित नाहीये.आणि त्यामुळे कोणतीही छोटी गोष्ट करण्यात
त्याला अडथळे येतात.वय वाढले मात्र बुद्धी तशीच राहिली आहे असे वाटण्याइतपत बालिश चाळे
Bean
करत असतो पण कमालीचा युक्त्या वापरून ते काम तो पूर्ण करतो हे
पाहताना मजा येते.'रोवान ऍटकिन्सन' हा शिक्षणाने जरी इलेक्ट्रिकल इंजिनियर असला तरी विनोदी अभिनयामुळेच
हा सर्वश्रुत आहे आणि राहिलाही.
स्वतःची गाडी लावण्यासाठी दुसऱ्याची गाडी ढकलून जागा करणे.रांगेत उभे असताना समोर
असलेल्या लोकांना त्रास देऊन त्यांना रांगेतून बाहेर पडण्यास भाग पडणे.लहान मुलांना
त्रास देणे,वयस्कर व्यक्तींना किव्वा अगदी पेशंटला सतावणे या सारख्या कुरापती काढणारा Bean
आणि प्रेमाच्या बाबतीत कायम अयशस्वी ठरणारा किव्वा बरोबर असलेल्या
जिवाभावाच्या टेडीवर जिवंत असल्याप्रमाणे वागणूक देणारा Bean
कधी कधी केविलवाणा आणि हळवा देखील वाटतो.सीट खाली लावलेले च्युईंगम
कानात बोळे म्हणून वापरणे,सँडविच मध्ये लागणारी पाने स्वतःच्याच मोज्यात घालून कुटणे या
सारखे चाळे देखील बिनधास्तपणे करणारा Bean.स्वतःचे काम करीत असताना दुसऱ्याची जरा देखील पर्वा न करणे हा
याचा स्थायीभाव.आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय किव्वा गैरसोय होतीये याची किंचितही
जाणीव न ठेवणे.आणि हे सर्व करीत असताना आपण कुठेच काही चुकत नाहीयोत किव्वा आपण केलेली
चूक ही कोणाच्या लक्षातही आलेली नाहीये असा सोज्वळ चेहेरा करणारा Bean
सुसह्य वाटतो.
परीक्षा हॉल मध्ये शेजारच्याचा पेपर चोरून बघण्याचा प्रयत्न असेल,चर्च मध्ये प्रार्थनेसाठी गेल्यावर केलेल्या करामती असतील,
मित्रांना पार्टी साठी घरी बोलावल्यावर त्यांचे असणारे आदरातिथ्य
किव्वा घराला रंग देताना चालवलेले डोके असेल, यातून Beanची सर्जनशीलता दिसून येते.आणि असे अनेक प्रसंग आहेत.हे सर्व
करत असताना प्रत्येक प्रसंगात नामानिराळे राहण्याचे याचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
एखाद्या सेल च्या दिवशी दुकानात सर्वप्रथम पोहोचण्यासाठी वापरलेली युक्ती,खरेदी केलेले सामान घरी नेण्यासाठी गाडीत केलेली व्यवस्था किव्वा
चूळ भरण्यासाठी गाडीच्या वयपरच्या पाण्याचा केलेला वापर या गोष्टी पाहणे मजेशीर आहे.प्रवासाच्या
वेळी लहान बॅग आहे म्हणून झालेली गैरसोय आणि त्यातून कमी सामान नेण्यासाठीची खटपट आणि
नंतर खाली ठेवलेली मोठी बॅग मिळाल्यानंतरची मजा या गोष्टीचा अप्रतिम अभिनय Beanने केलेला आहे.
पोहण्याच्या तलावात उडी मारतानाची धावपळ.पाण्यात उतरल्यावर बाहेर येतानाचा गोंधळ
या गोष्टी मनोरंजनाबरोबरच Bean च्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख करून देतात.म्युझियम पहायला गेलेला
Bean
बॉबीचे फोटो काढतो तो प्रसंग मजेदार साकारला आहे.न्हाव्याच्या
भूमिकेतील Bean बघताना झालेल्या चुका झटकून इंग्लंडच्या राजाचा मुखवटा चढवून कडेकडेने पळून जाणारा
किव्वा लायब्ररी मधल्या पुस्तकाची चाळणी करणारा Bean पाहताना त्याच्यातील बालिशपणा सर्वार्थाने दिसून येतो.रात्री
झोपताना घरातला दिवा बंद करण्याची पद्धत किव्वा स्वतःच्या गाडीचा दरवाजा लॉक करण्याची
युक्ती पाहिल्यावर आपल्यालाच हतबल झाल्यासारखे वाटते.शाळेच्या प्रयोगशाळेत जावून नसते
उद्योग करून घोटाळा करणारा किव्वा लहान बाळाला धडकगाडीत बसवणारा Bean
पाहिल्यावर लहान मुलांच्या खोड्या काढायची वृत्ती समोर दिसून
येते.
ट्रिपला गेल्यावर कॉफी बनवायची पद्धत असेल किव्वा सिनेमागृहात सिनेमा बघणे असेल
प्रत्येक ठिकाणी वेगळेपणा दाखवला आहे.आईस स्केटिंगच्या कार्यक्रमात केलेल्या माकड चाळ्यांना
कशाचीही उपमा देता येऊ शकत नाही.प्रेयसी सोबत सिनेमा बघणे किव्वा जादूचे प्रयोग बघणे
या गोष्टी प्रेयसीलाच कशा महागात पडतात हे आपल्याला पदोपदी जाणवते.सिनेमाला येताना
प्रेयसी साठी कोल्डड्रिंक न आणणे व स्वतः आणलेले चोरून पिणे.तिच्यासाठी छोट्या पाकिटात
पॉपकॉर्न आणणे या गोष्टी पहायला विनोदी आहेतच शिवाय स्वभावाचे पैलू दाखवणाऱ्या आहेत.
या मजेशीर गोष्टींखेरीज अजून काही गोष्टी बघायला मिळतात.ते म्हणजे इंग्लंड मधील
दैनंदिन जीवनातील घटनाक्रम.सध्या घरटी एखादी व्यक्ती परदेशात असली तरी या गोष्टी टीव्हीवर
पाहण्याचे माझे अप्रूप कमी होईल असे वाटत नाही.वाहतुकीचे नियम, तिथली शाळा कॉलेजेस,चर्च,लायब्ररी,सिनेमागृह,कपडे धुण्याची सार्वजनिक जागा,हॉटेल,न्हाव्याचे दुकान किव्वा म्युझियम पासून ते अम्युझमेंट पार्क
पर्यंत सगळ्या गोष्टी Bean मध्ये पहायला मिळतात.आणि या गोष्टी दाखवत असताना त्यातले बारकावे
टिपले आहेत.
Bean चा तो खर्जातला आवाज फार कमी वेळा ऐकायला मिळतो.अर्थात संवाद
काहीच नाहीयेत पण 'I am Bean' एवढं एकच वाक्य उच्चरल्यावर सुद्धा
त्याचा तो वेगळेपणा दिसून येतो.त्याचा कायम ठरलेला पेहेराव,तोच
मळखाऊ कोट, घाण झालेले बूट आणि पोटावर बांधलेली पॅन्ट.एखादी गोष्ट
मनासारखी न झाल्यास कपाळावर पडणाऱ्या असंख्य आठ्या या परिचित आणि आपल्याशा होऊन जातात.
Mr.Bean हा कार्यक्रम विनोदी म्हणून दाखवला जातो हे सर्वश्रुत आहेच.पण
ते साकारण्यासाठीची Rowan Atkinson ची मेहनत चार्ली-चॅप्लिन ची
आठवण नक्की करून देते.पण यात विरुद्ध स्वभाव दाखवले आहेत.म्हणजे चार्ली हा गरीब दाखवला
आहे मात्र यात Bean हा सर्वात हुशार आणि बेरकी दाखवला आहे.
कार्यक्रमाचा इतिहास थोडा वाचला तर असे समजते कि Bean
हा परग्रहवासी दाखविण्याचा कदाचित मानस असावा.कार्यक्रमाच्या
सुरुवातीच्या नामावलीमध्ये लंडन मधील St Paul's चर्च समोर Bean आकाशातून पडतो.त्यानंतर उठून तो उभा राहतो.त्याच्यावर स्पॉटलाईट
घेतला आहे.याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित हा विनोदी प्रकार दाखवण्याचा
प्रयत्न.
ऍटकिन्सन जेव्हा ऑक्सफर्ड महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच Bean
या व्यक्तिरेखेची कल्पना डोक्यात आली.'वाढ झालेल्या शरीरातील लहान मूल'
हा या पात्राचा गाभा आहे. Mr.Bean या नावाची मजा अशी आहे कि Mr. हा शब्द त्याच्या पासपोर्ट वर 'Name'
या जागी लिहिलेला आहे आणि ‘Bean’
हे त्याचे आडनाव आहे.तसेच हा माणूस जरी नोकरी करताना दाखवला
नसला तरी कथानकानुसार ही व्यक्ती लंडनच्या राष्ट्रीय संग्रहालयात शिपायाचे काम करत
असते.अर्थात ही माहिती कार्यक्रमात कुठेच दाखवलेली नाही.
थोडं वेगळं लिहिण्याचा खटाटोप करण्यामागे एकच विचार होता.कार्यक्रम विनोदी आहेच
त्यामुळे हसायला येईलच.पण बाकीच्या छोट्या गोष्टी एकदम समजल्या कि त्यातली मजा अजून
प्रकर्षाने जाणवते.
Bean च्या बाबतीत आपण काय बघत आहोत हा प्रश्नच नाहीये,पण आपण कसे पहात आहोत यावर त्यातून मिळणाऱ्या मनोरंजनाचा आलेख
ठरतो.मनोरंजनाची व्याख्या ही व्यक्तीनुसार बदलते पण कोणत्या गोष्टीतून मनोरंजन करून
घ्यावे याचे संपूर्ण अधिकार आणि ताबा हा त्या त्या व्यक्तीकडेच अबाधित असतो.त्यामुळे
Mr.Bean
कदाचित तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकेल पण वर्णन केलेले सर्व प्रसंग
पाहताना ते बारकाईने पहा स्वभावानुरूप होणार विनोद हा प्रत्येक ठिकाणी अधोरेखित होत
असतो.
हृषिकेश पांडकर
१०-०८-२०१६
खाली Mr.Bean कार्यक्रमाची व्हिडीओ लिंक देत आहे वेळ मिळाल्यास नक्की पहा.यात
नसलेले भाग युट्युब वर नक्की पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=PY0uJFu6rl0
Mr Bean हा अतिशय आवडीचा वल्ली आहे.
ReplyDeleteत्याची परत आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ह्रिषिकेष
Dhanyavaad Galya :)
Deleteसोमवारीच मी Mr. बीन चा हॉलिडे पहिला.
ReplyDeleteआधी एकटा बघायचो आता मी आणि मिहीर (वय ४) मिळून पाहतो. :)
हि लिंक पहा यावर त्यांचे जुने जुने परफॉर्मन्स आहेत.
The Story of Mr. Bean - The life of Rowan Atkinson
https://www.youtube.com/watch?v=_FE45iWX0do
Pahato nakki
Delete'मि.बिन'मी नेहमीच परत परत पाहतो,आधुनिक युगातील 'चार्ली चॅप्लिन'चा अवतार म्हणजेच'मि. बिन'
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete