सहामाही परीक्षांचे निकाल
जे लागायचे ते लागून गेले होते.शाळेतील आणि घरातील वातावरण आता निवळले होते.प्रगती
पुस्तकावर पालकांची सही करून पुन्हा ती शाळेत पोहोचली होती.थोडक्यात काय तर सहली,स्पोर्ट्स आणि स्नेहसंमेलन सुरू होण्याअगोदर असलेला विसावा आम्ही
अनुभवत होतो.ऑक्टोबरचा शेवट असल्याने शाळेचे स्वेटर घालायचे दिवस चालू होते.शनिवारी
असलेली सकाळची शाळा नकोशी झाली होती.अर्थात शाळा नकोशी होण्यापेक्षाही सकाळचे उठणे
असह्य होत होते.कारण शाळा नकोशी व्हावी अशी वेळच कधी आयुष्यात आली नव्हती.
सातवीत होतो त्यामुळे अजूनही हाफ चड्डीचा गणवेश होता.पुढच्या
इयत्तेपासून म्हणजे आठवीपासून पूर्ण चड्डी असायची.सकाळचा एखादा क्लास आणि मग शाळा असा
सर्वसामान्य दिनक्रम होता.सायकलने शाळेत जात होतो आणि यंदा दिवाळीत नवीन सायकल घेतली
होती त्यामुळे ती चालवत शाळेत जाणे हेच काय ते धाडसाचे काम असायचे.शाळा तशी दूर नव्हती
पण कर्वे रस्त्यावर उड्डाणपूल अजून झाला नसल्याने गर्दी नक्की असायची.दुपार विभाग असल्यामुळे
दुपारी ११.२० पर्यंत शाळेत पोहोचण्याचे उद्दिष्ट असायचे.बरोबर एक आठवीतला
मित्र पण असायचा.दोघे एकत्रच जायचो.
प्राथमिक शाळेत असताना एकाच रिक्षात असल्यामुळे मैत्री झाली
होती.अन्यथा मैत्री व्हावी अशी वैचारिक साम्यता काही फार नव्हती.हा तसा लांबून यायचा.डहाणूकर
कॉलोनी म्हणजे तेव्हा तसे लांबच वाटायचे.पण सायकल मारत हा माझ्या घराजवळ यायचा आणि
आम्ही दोघे पुढे जायचो हा नित्यक्रम.अभ्यासात काही फार हुशार नव्हता.पण पु.लं देशपांड्यांच्या
कथाकथनाची भारी हौस.त्यावेळी 'वॉकमन' बाजारात आले होते.याच्याकडे पण तो आला होता.त्यात सदैव कान घालून
बसलेला असायचा.अंतूबर्वा,सखाराम गटणे,चितळे मास्तर,नंदा प्रधान,तो, असा मी असामी आणि बाकी सर्व.तो काही बाही सांगायचा त्यामुळे
हे साधारण माहीत होते.कानाला लावलेला
"वॉकमन" चालू असताना त्याबरोबर स्वतः संपूर्ण म्हणण्याची त्याची सवय मला
मात्र त्रासदायक व्हायची.धडे वाचावे त्याप्रमाणे तो 'मी आणि माझा शत्रुपक्ष' वगरे मोठ्याने म्हणायचं.पु लं विषयी अपार प्रेम त्यांच्या सर्व लिखाणाचे प्रचंड कौतुक,आणि सर्व लेखन मुखोद्गत. मी मात्र या बाबतीत तास बाळबोधच होतो.पुढे
पु.ला आणि सुनीताबाईंचे २-३ धडे आम्हाला मराठीच्या अभ्यासक्रमाला होते हेच काय ते पु.ल विषयीचे
माझे ज्ञान.पु.ल ना भाई म्हणतात आणि ते सिनेमा नाटकात काम करतात एवढी माझी जुजबी माहिती.पण
या मित्राचे मला अप्रूप वाटायचे.रोज ते कानात घालून सायकल वर जाताना ऐकणार.सगळी कॅसेट
तोंडपाठ प्रसंगानुरूप एखाद्या पुस्तकातले एखादे वाक्य ऐकवणार,मला कायम अचंबा वाटायचा.
तो गुरुवारचा दिवस होता.सकाळचं आटपून शाळेत जायला निघालो.खाली हा मित्र येऊन उभा
होताच.आज थोडं लवकरच आला होता.आम्ही पण थोडे लवकर घरातून निघालो. १०.३० ची वेळ होती सकाळची.नित्याची घाई रस्त्यावर दिसत होती.ऑफिसेस,कॉलेज आणि बाकीचे व्यवहार सुरू होते.आम्ही पण शाळेकडे निघालो.मारुती
मंदिर जवळ आल्यावर सहज एक विचार डोक्यात आला आणि मी मित्राला विचारले.'काय रे तू पु.लंचा एवढा
मोठा चाहता आहेस त्यांना कधी पाहिले आहेस का ? पुण्यातच असतात की.' या अचानक प्रश्नाने तो थोडं स्तब्ध झाला.'अरे वेडा आहेस का..आपल्याला
कसे भेटतील आणि का भेटातली पु.ल ?" मलाही आता त्याच्यात
तथ्य वाटू लागले आणि माझा प्रश्न आता मलाच हास्यास्पद वाटू लागला.मी तो नाद सोडला आणि
पुढल्या सिग्नलवर पाय टेकवला.
या सिग्नलला थांबलो
असताना मित्रानेच मला विचारले की "आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे भेटले तर उत्तमच
नाही भेटले तरी हरकत काय आहे ? मला त्यांच्या घराचा पत्ता माहितीये." मी उत्साहाने म्हणालो
" हो मग नक्की जाऊ शाळा सुटल्यावर";यावर तो म्हणाला की शाळा झाल्यावर कशाला आज शाळेला न जात थेट
तिकडेच जाऊ". मी थोडं गोंधळलो.शाळा बुडवणे आणि ते ही न सांगता एवढे धाडस करायची
सवय अजून लागायची होती.पण मित्र आता इरेला पेटला होता.आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात
ही करावीच लागते या हिशोबाने मी आणि त्याने शाळा बुडवायचा निर्णय घेतला.
परिस्थिती कशी असते बघा.कोणत्या तरी गुरुवारच्या दिवशी.शाळेला
निघून शाळा बुडवणे.ते ही कोणाला न सांगता आणि कोणाला तरी भेटण्याच्या इचछेने.आणि एवढे
करून भेट होईल याची शाश्वती नाही.त्या व्यक्तीची पूर्व परवानगी तर नाहीच नाही.आणि व्यक्ती
साधी सुधी नाही तर साक्षात पु.लं...
मनाची तयारी करून शाळेचे वळण चुकवले आणि थेट मित्राच्या माहितीत
असलेले पु.लंचे घर गाठले.एव्हाना ११ वाजून गेले होते.सायकलचा स्टॅन्ड लावून त्या बैठ्या घराच्या
दारापाशी आलो आणि समोर मोठी पाटी आढळली.मित्राने मोठ्याने वाचली "पु.लं.देशपांडे
आता येथे वास्तव्यास नसून ते आता भांडारकर रस्त्यावरील 'मालती माधव' येथे स्थायिक झाले आहेत".
माझी निराशा लपत नव्हती.एखाद्या धाडसी कार्यात विघ्न येतातच अशा अविर्भावात आम्ही
पुढेच मार्गक्रमण सुरू ठेवले.भांडारकर मार्ग काही लांब नाही.आणि आता शाळाही नसल्याने
दिवसभर फुकटच होतो.काहीतरी खास करणार आहोत असा विश्वास मला तर पूर्ण होता त्यामुळे
भांडारकर रास्तच काय पण अगदी शनिवारवाड्यापर्यंत सायकल हाकायला लागली असती तरी बेहेत्तर
होते.मित्राला थोडा आत्मविश्वास कमीच होता.त्याचे म्हणणे होते की पु.लंच्या घराबाहेर
नक्की सिक्युरिटी असणार.शिवाय ते पुण्यात असतील की नाही काहीच कल्पना नाही.बर असले
तरीही आपल्याला का आत सोडतील? असे अनेक प्रश्न.पण जायचं ठरवलं होता त्यामुळे कर्वे रस्ता,लॉ कॉलेज रस्ता आणि सरते शेवटी भांडारकर रस्त्यावर येऊन पोहोचलो.
बरोब्बर ११.३० वाजले होते.डाव्या बाजूला मालती-माधव लिहिलेले दगडी बांधकाम
दिसत होते.एखादे सामान्य घर असावे तसे घर होते.दरवाजात सिक्युरिटी सोडा पण कुत्रं देखील
नव्हते.सायकल तिथेच भिंतीला टेकवली दप्तराचे बंद व्यवस्थित केले.आणि एकमेकांकडे पाहून
मालती माधव मध्ये निघालो.
लोखंडी दार हळूच ढकलून आत गेलो.आणि लाकडी दरवाजासमोर येऊन उभे
राहिलो.दरवाजा सताड उघडा होता.हे सर्व चालू असताना मित्र कायम पुढे होता.दोघंही घाबरतच
पुढे जात होतो.आणि उघडा दरवाजा पाहत असताना
दारावर असलेली पु.लंची सही दिसली आणि पोटात गोळाच आला.दरवाजावर नेम-प्लेट म्हणून पु.लंची
सहीच लावली होती.लाकडी दारावर लावलेली सही पाहून वाहत असलेला मित्राच्या चेहेऱ्यावरचा
आनंद शब्दात वर्णन करणे शक्यच नाही.आम्ही दबकतच दारात गेलो.बेल असली तरी दिसली नाही.मित्राने
सावकाश कडी वाजवली आणि आवंढा गिळला.
दोघेजण स्तब्ध उभे होतो.खरंच पुलं भेटले तर काय ?
आपण इथे का आलोय ? आपण कोण आहोत ? आणि एवढे करून मला काही फार पुलंची माहिती देखील नाही.जे काय
आहे ते मित्राला,मी फक्त सोबत.एकतर हे दरवाजापर्यंत जात येईल याचीच कल्पना नव्हती.त्यात
इथे तर दरवाजा उघडच होता.आपण यायला चुकलो की काय असे वाटावे तर दारावर ठसठशीत पाटी
लावलेली होती.आणि घरात कोणी नसावे या शंकेला उघड्या दराने आधीच उत्तर दिले होते.त्यामुळे
जे काय होईल त्याला आता सामोरे जायचे एवढेच आमच्या हातात होते.कुतूहल,आनंद,भीती आणि कुठलेसे दडपण असे भाव माझ्या मित्राच्या चेहेऱ्यावर
स्पष्ट दिसत होते.
कडी वाजवल्यावर पाच-सहा सेकन्द सरली आणि समोरून सुनीताबाई चालत
आल्या.पुढे जे काय संवाद झाले (अर्थात संवाद म्हणण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच बोलल्या
आम्ही दोघंही मूग गिळून उभे होतो) ते कायम स्वरूपी जपले गेले एवढे मात्र निश्चित.
सुनीताबाईंनी विचारले "काय पाहिजे ?".मित्र पुटपुटला ”पु.लंना भेटायचे आहे”.बाईनी हसून विचारले
"हो पण काम काय आहे ?" मित्र धिटाईने म्हणाला ''नाही फक्त भेटायचे आहे". सुनीताबाईंनी हसून आम्हाला आत यायला सांगितले.
आम्ही दारातून आत पाय टाकला.थेट गाभाऱ्यात पाय टाकावा अशी भावना मित्राच्या चेहेऱ्यावर
होती.आम्ही आता हॉल मध्ये उभे होतो.नजर नुसती भिरभिरत होती.असे वाटले की पु.लं कुठेतरी
आतल्या खोलीत बसलेले असतील आणि काकू त्यांना बोलावून आणतील.पण घर न्याहाळत असताना आमच्या
डाव्या बाजूला लाकडी विभाजन भिंतीवजा; नक्षीदार चौकट लावलेली होती.आणि त्याच्या पलीकडे साक्षात पु.लं
काहीतरी वाचत बसलेले होते.
आजी म्या ब्रह्म पाहिले अशा थाटात आम्ही दोघे आ वासून एकटक त्यांच्याकडे
बघत उभे राहिलो.काहीसे पांढरे झालेले केस,अंगात पातळ पांढरी बंडी,बर्मुडा आणि जाड काड्यांचा डोळ्यावर लावलेला चष्मा.लाकडी आराम
खुर्ची त्याला लावलेले नायलॉनचे कापड आणि शेजारी स्टुलावर ठेवलेले तांब्याभांड.आम्ही
स्तब्ध होतो. पु.लनी आम्हाला पाहिले आणि स्मित हास्य करून विचारलं "काय
रे पोरांनो,काय झाल ?" मित्राने मानेनंच "काही नाही" असा सांगून पटकन ''नमस्कार" अस ओझरते म्हणाला. पु.लं फक्त हसले.पुलंनी विचारले
"शाळा सुटली का" ?
मित्राने उत्तर दिले ''हो''..खरे बोलावे तरी पंचाईत आणि खोटे बोलावे तरी पंचाईत,
मित्राने वेळ मारून नेली.पुलं पुन्हा म्हणाले "सकाळची का
?"
पुन्हा मित्रानेच बाजू सांभाळली "हो". माझा बोलायचा
संबंधच नव्हता.सगळं स्वप्नवतच चालू होते.पुन्हा पुलं म्हणाले "कुठली शाळा ?"
"अभिनव मराठी,कर्वे रस्ता" इति मित्र,पुलं हसून म्हणाले "वाह".
आता बोलायला आमच्या कडे काहीच शिल्लक नव्हते.परिस्थितीमुळे काही
सुचण्याची सुतराम शक्यता देखील नव्हती. बर काम काय होते त्यालादेखील आमच्याकडे उत्तर
नव्हतं.आणि तेवढ्यात पु.लं म्हणाले "बोला,काय काम काढले ?".माझ्या पायाखालची जमीन सरकली.मित्राने धैर्याने तोंड दिले.तो
म्हणाला "नाही फक्त भेटायला आणि पाहायला आलोय".पु.लं ही हसले.आणि मला हायसे
वाटले..पु.लं म्हणाले "थांबा जरा", सुनीता अगं पोरांसाठी
बर्फी आण जरा."..बसा रे पोरांनो पाणी घेणार ?" असा विचारून त्यांनी हातातले पुस्तक बाजूला ठेवले.मित्र हळूच
पुटपुटला "नाही ठीके".आणि हे होत असतानाच सुनीता बाई आतून वाटीत काजूकतली
घेऊन आल्या.दोन दोन वड्या आमच्या हातावर ठेवल्या आणि आत गेल्या. आम्ही मुकाट्याने संपवल्या.
इतर वेळी आवडीने खाणारा मी आता मात्र तोंडचे पाणीच पळाले होते.वडी संपताक्षणी मित्राने
माझ्याकडे पाहिले.बोलायला तसेही काही नव्हतेच मित्र स्वर्गीय सुखात न्हाऊन निघाला होता.मित्राने पु.लं
ना सांगितले."सर येतो",पु.लं हसतच म्हणाले "ठीके.. .सावकाश जा रे"..आम्ही
अक्षरशः पळतच बाहेर आलो आणि थेट सायकलींपाशी येऊन थांबलो.
दिवस सत्कारणी लागला होता..किंबहुना आयुष्य सत्कारणी लागल होत.मित्राचा आनंद
चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत होता.एकमेकांना काय बोलावे हे सुद्धा नीट काळात नव्हते.थंडी
असूनही तळहातावर घाम जाणवत होता. आनंद व्यक्त करण्याचे फार मार्गही सुचत नव्हते.शाळा
तशीही बुडाली होती.घरी जायची सोय नव्हती.आणि शाळा बुडवल्यामुळे काही बोलणे शक्य नव्हते.त्यामुळे
घरचे सगळेच अनभिज्ञ होते आणि अजूनही आहेतच.मित्राच्या डोक्यातली एक खंत त्याने सांगितली
की "भाईंच्या पाया पडू शकलो नाही राव ".जिथे हालचाल करायचे देखील भान नव्हते
तिथे पाया पडायचे सुचणे सुद्धा अवघड दुरापास्तच.
इतके दिवस मित्राच्या तोंडून ऐकलेले पु.लं आज प्रत्यक्षात पाहिले होते.महाराष्ट्राचं
लाडकं व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे अशा पुलंना आज साक्षात पहिल्याच आनंद फार मोठा
होता.मित्राने घट्ट मिठी मारली आणि "आपले काम झाले रे" असे म्हणाला.तिथून
थेट शाळेजवळच्या ग्राऊंडवर आलो आणि डबा खाऊन घेतला.खाऊन घेतला म्हणजे फक्त उघडला कारण
पोट तर आधीच भरले होते.
त्याच पंधरा मिनिटांच्या आठवणीत पुढेच तीन-चार तास काढले आणि घरी परतलो एक
अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन.कधीच न विसरू
शकणारी ती १५ मिनिटे आयुष्यभर लक्षात राहतील हे मात्र निश्चित.त्या पंधरा
मिनिटांनी दाखवलेले पु.लं मी अजुनही आयुष्यभर उलगडत बसलोय.
माझ्यापेक्षा जास्त आनंद आणि समाधान माझ्या मित्राने कमावले होते यात शंका नाही.फक्त
त्याच्या भावना मी तुमच्या समोर ठेवल्या.त्याने अनुभवलेला प्रसंग तुमच्यासमोर यावा
यासाठीच हा लिहायचा खटाटोप.त्याच्या मनात राहिलेली शाळा बुडवल्याची खंत माझ्यावाटे
त्याने आज आपणासमोर मांडली ...मी केवळ निमित्त !
बुडवलेल्या शाळेनेच आज सर्वात जास्त शिकवले :)
तळटीप :
( परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसात या मित्रासोबत खोळंबून राहण्याची वेळ आली होती.त्यावेळी त्याने ही त्याची भाईंची आठवण मला सांगितली.सांगत असताना तो इतका गुंतून गेला होता की त्याने मलाच त्याच्या सोबत भूतकाळात नेले.मी शरीराने प्रत्यक्षात तिथे त्या जागी कधीच नव्हतो पण त्याने मला ती पंधरा मिनिटे अनुभवायला दिली.पाऊस थांबला आणि तेव्हाच त्याचा हा अनुभव तुम्हा सर्वांसमोर मांडायचे ठरवले.)
हृषिकेश पांडकर
२९.०६.२०१६