स्लम डॉग मिलेनियर मधील रेहमानच्या 'रिंगा रिंगा' नंतर लीलाबाइंच्या बाजीरावांचा 'पिंगा' पाहण्याचा योग आला. अर्थात हा नशिबाने आलेला योग होता कि 'आलिया भोगासी' मधला 'भोग' होता हे सुज्ञ वाचकास सांगणे न लागो.
गाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघण्याचे धाडस आम्ही सर्वांनीच दाखवले. आणि आज हे
पाहण्यासाठी माझ्यासोबत काही विशेष लोक हजर होते.त्यामुळे गाणे हे ऐकण्यास आणि पाहण्यात
मला कसे वाटले त्यापेक्षाही याबद्दल माझ्या बरोबर असणार्यांना कसे वाटले हे जाणून घेण्याची
मला प्रचंड घाई झाली होती.गाण्याचे स्क्रीनिंग संपले.आम्ही सातही जण त्या अंधाऱ्या
खोलीतून बाहेर न येता तिथेच थांबून राहिलो.
गम्मत कशी असते बघा,योग हा गाणे अथवा सिनेमा पाहण्याचा नव्हताच.आनंदाची गोष्ट हि
होती कि माझ्याबरोबर असलेल्या त्या सहा व्यक्तींमुळे आणि त्यांनी केलेल्या गाण्यावरील
टिपण्णीमुळे झालेलया मनोरंजनाची कुठल्याही समाधानाशी तुलना नव्हती.आम्ही सातही जण तिथेच
गोल खुर्च्या मांडून बसलो होतो.अर्थात या लोकांसमोर मी म्हणजे चहा आणून देण्यासाठी
आलेला आणि ग्लास रिकामे होईपर्यंत वाट पाहणारा मुलगा वाटत होतो.पण ते हि नसे थोडके
असे ते वातावरण होते.
त्या पडद्यावर झालेल्या चार पाच मिनिटाच्या गाण्याचे तासभर चाललेले अवलोकन मी आयुष्यभर
विसरू नाही.लक्षात राहतील तेवढ्या आणि तशाच्या तश्या कमेंट तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची
खूप इच्छा झाली आणि कागदाला पेन लावला.
मी सोडून सहा लोक होते.आम्ही गोलाकार बसलो होतो.मधे चहाची किटली आणि सात ग्लास
उपडे घातले होते.कुठलाही बडेजाव नव्हता.खोलीत प्रसन्न वातावरण होते.कोण पहिले सुरु
होतंय यासाठी कान आसुसलेले होते आणि तेवढ्यात माझ्या उजव्या हाताला बसलेल्या व.पु.नी
मिश्किल हास्य आणि थोड्या खार्ज्यातील आवाजात बोलायला सुरुवात केली.
सौंदर्य कसं असावं ? किव्वा सौंदर्य हे कोणासाठी आहे हो ?
अर्थातच ज्यांना मोत्याची चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी.वर्तमानात
जगत असताना इतिहास जाणून घेण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहेच.पण तो योग्यरीत्या जाणून
घेणे तितकेच महत्वाचे. वर्तमानात वावरताना तोंडी लावल्यासारखा इतिहास जाणावा.इथे मात्र
साहेबांनी इतिहासाचेच लोणचे घातले आहे.काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या
अत्तराच्या बाटल्या असतात.जसा मूड होईल तसं अत्तर वापरायचं किव्वा जसा मूड व्हावासा
वाटत असेल तसं अत्तर निवडायच.इतिहाससुद्धा हवा तसा आणि मनाप्रमाणे उघडायचा याला ऐतिहासिक
किव्वा इतिहासावर आधारित सिनेमा काढणे म्हणत नाहीत भन्साळी साहेब.
एखाद्याला मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का ? रंगवता येत असेलही पण त्या 'एखाद्याने किव्वा एखादीने' खरच मैफिलीत रंगावे अशी गरज आहे का ?
किव्वा असे दाखवायचे आहे का ? या गोष्टीच ज्याला माहित नाहीयेत त्याने पुढचा विचार का करावा
हे संजयला का उमगले नसावे याचे राहून राहून आश्चर्य वाटत.भन्साळी साहेबांना एकच विचारणं
आहे…बाबा …इतिहास घडवणं एकवेळ सोपं आहे,ते तू कर.पण इतिहास बदलण्याच्या वाटेला तू का लागलास ? कृष्णान जरी बासरीसहित आपल्याला पाठवलं असलं तरीपण प्रत्येकवेळी सहाही छिद्रातून
संगीतच बाहेर येईल असं नाहीना.
सर्वजण जोरदार हसले...मला पण हसू आले. व.पुंच्या शब्द्सामर्थ्याला आणि भन्साळीच्या
मूर्खपणाला दाद देऊन मी चहाचा कप उचलला.
हसणं थांबलं आणि प्र.के.अत्र्यांनी सुरुवात केली.
अरे वाह महाराष्ट्रातील संस्कृती म्हणली कि लावणी आणि नऊवारी यापलीकडे काहीही शिल्लक
नाही असा भास व्हावा इतका दळीद्रीपणा दाखवला आहे.गाण्याचे नाव पिंगा आणि नाच मात्र
लावणीचा..कमाल..
बोलून चालून भन्साळी,दीपिका आणि प्रियांका शेवटी..पण प्रतिकृती मात्र पार वास नसलेल्या
झेंडूच्या फुलासारखी आहे.मोहक सुवासासाठी हपापलेली रसिकता या बिनवासाच्या आणि भडक रंगाच्या
दरिद्री आहेराचा कसा स्वीकार करणार ?उलट तिच्या भावनांची कोमलता दुखावल्याचा उद्धटपणा केल्याचे पाप
या भन्साळीच्या पदरी यायचे दुसरे काय.
मी दिग्दर्शक कसा झालो..मी संगीतकार कसा झालो आणि सरतेशेवटी मी इतिहासकारही कसा
झालो हे प्रश्न भन्साळीने आत्मपरीक्षण म्हणून एकदा पुन्हा सोडवावेत एवढी माफक अपेक्षा
बाळगायला काय हरकत आहे ?
पुन्हा एकदा मंडळी हास्यरसात बुडाली आणि पुढच्या टिपण्णीकडे मी कान टवकारले.
शेजारी द.मा.मिरासदार बसले होते.चहाच्या घोटासोबत स्मितहास्य करून मिरासदार सर
म्हणाले,आमच्या ग्रामीण महाराष्ट्रात संस्कृती म्हणजे काय असा प्रश्न
जर कोणाला विचारला तर चिमुरड पोर पण घडाघडा सांगेल.पण आज त्याच पोराला..'बाळ, हा बघ आपल्या पेशव्यांचा इतिहास'
असे म्हणून जर हि पडद्यावरची कवायत दाखवली तर पोट्टी खुळी होऊन
जातील नाहीतर काय.गावाकडे पेशव्याची मस्तानी दिसायला सुरेख होती या पलीकडे माहित नाही.आणि
या पलीकडे इतिहासातही काही नाही.पण हे असले सिनेमे गावाकडे पाहिले गेले तर त्यांना
हे पण कळेल कि मस्तानी सुंदर तर होतीच पण ती बेंबी खाली साड्या नेसायची आणि तिची सवत
म्हणजे काशीबाई ती पण सुंदर असून ती देखील बेंबी खाली साड्या नेसायची आणि दोघी एकत्र
नाचायच्या तेही भर दरबारात.हि गोष्ट अवघ्या
महाराष्ट्राच्या गळी कशी उतरवणार हा भन्साळी ?
नऊवारी साडी या पोषाखाच्या नावाखाली भरजरी वस्त्र १८ व्या शतकात होती ?
आम्हाला कधी संदर्भ लागला नाही. बर इतिहास मांडताय ना तुम्ही.मग
त्याच्याशी साधर्म्य असलेल्या गोष्टी दाखवा ना.“There is
no attention paid to the anthropological aspect in the song'' हेच खरे.असे म्हणून मिरासदार सरांनी हातातला कप घशात रिता केला.
एवढं होतंय न होतंय तोच शेजारच्या आराम खुर्चीवर बसलेले व्ही.माडगुळकर सर पुढे
होऊन म्हणाले.प्रसंगाच गांभीर्य ठेवून गोष्टी दाखवणे यात खरं कौशल्य आहे.एखाद्या अलिशान
बंगल्यात भयपट दाखवताना घराबाहेर विहीर दाखवण्याचा अट्टाहास करू नये.विहीर रात्री भीतीदायक
वाटते हे जरी सत्य असले तरी दारात लावलेल्या मर्सिडीज शेजारी विहीर असावी या सारखी
लिबर्टी घेवून केलेला मूर्खपणा प्रेक्षकांनी पैसे देवून सहन करावा हे तितकेसे रुचत
नाही.
एवढ्या अलिशान वाड्यात नाचणारी मस्तानी सौंदर्याची परिसीमा होती असा इतिहासात उल्लेख
आहे.पण सिल्कची साडी नेसून काशीबाईबरोबर खांद्याला
खांदा लावून नाचल्याचा उल्लेख नसावा.दोघींनाही अगदी तशीच आणि जरीची भरजरी साडी मिळणे
हे कदाचित पानिपत जिंक्ण्यापेक्षाही थोर काम पेशव्यांनी केले असे तर भन्साळी साहेबांना
सुचित करायचे नसेल ना? असो एकूण काय तर प्रेक्षकांनी पदरचे पैसे खर्च करून कस्टमाइझ
केलाला इतिहास पाहणे.आणि हि आमची संस्कृती अशी होती या बाबत आश्चर्य व्यक्त करणे याखेरीज
कुठलीही शक्यता यातून निर्माण होऊ शकत नाही.
प्रत्येकाने केलेल्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नव्हते.माझा पहिला चहा केव्हाच संपला
होता आता दुसर्याची वेळ होती.आणि तेवढ्यात पलीकडे टेकून बसलेले बाबासाहेब पुरंदरे सर
हलकेसे खोकून सांगू लागले.
अरे ..काय आपला इतिहास.आणि काय हि चालवलेली ओंगळवाणी चेष्टा.दिल्लीचे तख्त राखणाऱ्या
पेशव्यांचा इतका मोठा इतिहास आज मंगळागौरीच्या तीन मिनिटाच्या गाण्याने पार लाचार झाल्यासारखा
भासतोय.अरे कशी होती मस्तानी कशा होत्या काशीबाई.एकीच्या सौदर्याला पेशवा भुलला आणि
दुसरी अस्सल मराठमोळा खानदानीपणा भिनलेली.
काशीबाईनचा दाखवलेला नाच इतिहासालाच मोठा पीळ देऊन गेलाय.आणि अशा प्रकारची मंगळागौर
संपूर्ण पेशवे खानदानात कोणी साजरी केलीये याची नोंद नाही मग कॅमेरा घेवून हि लोक थेट
पेशवाईच बदलवून टाकत आहेत हि चेष्टा कोणाची ? आपल्या प्रेक्षकाची, इतिहासाची कि रंगभूमीची
?
शनिवारवाड्यात अंधार्या रात्री आजही स्मशान शांतताच असते.गारद्यांच्या पाठलागाने
शहारलेल्या त्या शनिवारवाड्याच्या अभेद्य भिंती आणि नारायणरावांच्या रक्ताने रंगलेला
पुणे दरवाजाचा तो बुरुज आज या भन्साळीची मस्तानी आणि काशीबाइना बघून कुठ तोंड लपविल..
अरे इतिहास दाखवायचा तर कसा याची देखील जाण हवी.काय होते पेशव्यांचे वैभव ?
हे वाक्य म्हणत असताना बाबासाहेब उठून उभेच राहिले होते.तो रुबाब
ती ऐट तो खानदानीपणा.असा छचोरपणा दाखवायची बुद्धी तरी कशी होते.उगीच नाथ घातली आणि
साडी गुंडाळली कि मराठमोळेपणा आला असे ज्यांना वाटते त्यांनी मराठ्यांचा भूतकाळ कधी
जाणलाच नाही.आज खर्या अर्थाने इतिहास इथे ओशाळला.
बाबा थोडे संतापलेच होते.हाडाचे इतिहासकार ते..त्यांचा तो आवेश पाहून माझ्या शेजारी
बसलेल्या पु.लं.नी त्यांना पाण्याचा ग्लास दिला आणि त्यांना खाली बसवले.बाबा देखील
नंतर हसत खाली बसले.आता वेळ होती भाईंची..
जन्मतःच वाकचातुर्य,विनोदबुद्धी आणि निरीक्षणशक्ती या तिघांचा वरदहस्त लाभलेल्या
या माणसाला त्या चार मिनिटांचे वर्णन करताना ऐकणे यासारखा सुखावह क्षण नव्हता.पु.लंनी
सुरुवात केली.
मस्तानीने जर तेव्हा नाभिदर्शक साडी नेसली असती आणि तशीच अगदी त्याच रंगाची साडी
नेसून काशीबाइ खांद्याला खांदा लावून नाचल्या असत्या तर संपूर्ण पेशवाई 'काका मला नाचवा' म्हणाली नसती काय रे शिंच्या..
इतिहास म्हणून काहीतरी नवीन दाखवायची गरज नसते.कारण इतिहास बदलत नसतो.पण हे गाणे
पाहताना कुठे तरी जुन्या गाण्यांचा भास होतो.मराठीतील नाच ग घुमा,लटपट लटपट आणि छबीदार छबी या तीन गाण्यांची एकत्रित आठवण होते.अर्थात
मंगळागौरीच गाणं पाहताना लटपट लटपट या गाण्याची आठवण होणे यासारखा विरोधाभास नाही.
मस्तानी सारखी छत्रसाल राजाची मुलगी अचानक पिंगा घालत असताना मुस्लिम आणि मराठी
संस्कृतीची गळाभेट बघण्याचा आनंदाला अश्रुरूपी वाट करून द्यावी कि काय या विचारात माझा
काही वेळ गेला.
या बाजीराव मस्तानीची हि पाच मिनिटे जर आज खरच त्या शनिवारवाड्यासमोरच्या पेशव्यांच्या
पुतळ्यांनी जर पहिलीना तर पेशवे साहेब घोडी सहित नाव्यापुलावरून नदीत स्वतःला झोकून
देतील एवढे नक्की.
सर्वजण हास्यकल्लोळात बुडाले.भाई स्वतः मनसोक्त हसले.मी गेल्या तासभराच्या त्या
अद्भुत अनुभवाने भारावून गेलो होतो.सर्व वंदनीय व्यक्तींचा निरोप घेवून तृप्त होवून
बाहेर पडलो...
भन्साळीनची पेशवाई अटकेपार झेंडे गाडेल कि नाही हे प्रेक्षकच ठरवतील.त्या पेशव्यांनी
दिल्लीचे तख्त राखले आता हि पेशवाई किमान आठवडाभर तरी पुण्याचे तख्त राखते कि नाही
हे लवकरच कळेल.
पुण्यात राहून पेशव्यांचा इतिहास बदलताना पाहणे यासारखा ऐतिहासीक विरोधाभास नाही..
संजय...तेरी लीला अपार हे... माफ करा..लीला तेरा संजय अपार हे :)
हृषिकेश पांडकर
२०.११.२०१५